कल्याणेश्वर गणेश मंदिर

नेहरू नगर, नंदुरबार, ता. / जि. नंदुरबार

नंदुरबार शहराबाबत अशी मान्यता आहे की येथे गवळ्यांचा राजा नंद याचा दरबार भरत असे. म्हणून हे ठिकाण नंद दरबार म्हणून पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. त्याचा अपभ्रंश होऊन ते नंदुरबार झाले. आजही नंदुरबार शहरास नंदभूमी म्हटले जाते. या नंदुरबार शहरातील कल्याणेश्वर गणेशाची स्थापना ही नंद राजाने केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या मंदिराचा इतिहास थेट द्वापार युगाशी जोडला जातो. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यकाळात या मंदिराचा जिर्णोद्धार झाल्याची नोंद आहे.

समूहाचा किंवा जमातीचा पती तो गणपती, अशी गणपती या शब्दाची फोड सांगितली जाते. ऋग्वेदात ब्राम्हणस्पती देवाला गणपती या विशेषणाने संबोधले गेले आहे. पुढे .. पूर्व सहाव्या शतकातील मैत्रेय संहितेत तत्पुरुष, वक्रतुंड दंती या नावाने गणपतीचा उल्लेख आढळतो, असे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय प्राच्यविद्यासंशोधक भारतविद्यातज्ज्ञ वा. वी. मिराशी यांचे मत आहे. पुढे गणपती अथर्वशीर्ष या उपनिषदात गणपती देवाचे वर्णन आले आहे. हे वर्णन गुप्त काळातील असावे, असे जाणकारांचे मत आहे. अशा या गणनायकाची जगभरात लाखो मंदिरे आहेत. त्यापैकी उघड्या छताचे एक प्राचीन प्रसिद्ध मंदिर नंदुरबार शहरात आहे. कल्याणेश्वर गणेश म्हणून प्रसिद्ध असलेला हा जागृत देव नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

असे सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराज सुरत मोहिमेवर असताना प्रवासादरम्यान या गणपतीचे दर्शन घेऊन पुढे गेले होते. तेराव्या शतकातील डोंगराच्या कुशीत असलेले हे मंदिर कालांतराने मातीत गाडले गेले होते. मातीच्या ढिगाऱ्याखाली असलेल्या या मंदिराचे अस्तीत्व सन १९८५ साली काही भक्तांच्या लक्षात आल्यानंतर उत्खनन करून मंदिराला पुन्हा स्थापित करण्यात आले. मंदिराच्या प्रांगणात आवारभिंत आहे. रस्त्यापेक्षा खोलगट असलेल्या प्रांगणात उतरण्यासाठी चार पायऱ्या आहेत. या प्रांगणात अनेक झाडे भाविकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था आहे. येथील एका वृक्षाखाली प्राचीन शिवपिंडी नंदीमूर्ती आहेत.

खुला मंडप, सभामंडप छत नसलेले गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ बाहेरच्या बाजूला एका वज्रपिठावर नंदीची मूर्ती आहे. येथून पुढे अर्धचंद्राकृती आकाराच्या प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश होतो. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती दोन्ही बाजूला वातायने आहेत. सभामंडपात उजव्या बाजूला दोन शिवपिंडी आहेत. दोन्ही शिवपिंडींवर छत्र धरलेले पाच फण्याचे पितळी नाग पिंडीवर जलधारा धरलेली चांदीची अभिषेक पात्रे टांगलेली आहेत. सभामंडपात डावीकडील बंदिस्त मखरात कार्तिक स्वामींची मूर्ती आहे. येथून पुढे गर्भगृहात प्रवेश होतो. सभामंडपापेक्षा गर्भगृह काहीसे उंचावर आहे. गर्भगृहातील जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी त्यावर छत्र धरलेला पितळी नाग आहे. गर्भगृहाच्या मागील भिंतीतील देवकोष्टकात गणेशाची शेंदुरचर्चित पाषाणमूर्ती आहे. मूर्तीच्या मागील दोन्ही हातात पाषांकुश, खालील एका हातात मोदक दुसरा हात अभय मुद्रेत आहे. देवाच्या डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. गर्भगृहात डाव्या बाजूला देवकोष्टकात पार्वती देवीची मूर्ती आहे.

सभामंडपाच्या छतावर घुमटाकार शिखर त्यावर कळस आहे. गर्भगृहावर छत नसल्यामुळे येथील देवतांवर सूर्यदेव वरुणदेव निर्वेध नियमित सूर्याभिषेक जलाभिषेक करीत असतात. या मंदिरात गणेश जयंती, भाद्रपद मासातील गणेशोत्सव महाशिवरात्री हे मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. गणेश जयंतीस पंचकुंडी यज्ञ आयोजित केला जातो. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात महाअभिषेक, भजन, किर्तन प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. प्रत्येक संकष्ट चतुर्थी, विनायकी चतुर्थी, पौर्णिमा आदी दिवशी तसेच मंगळवार रविवारी मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात.

उपयुक्त माहिती

  • नंदुरबार बस स्थानकापासून किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून नंदुरबारसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : हेमंत कुलकर्णी, पुजारी, मो. ८८०५२२००५८
Back To Home