काळेश्वर मंदिर

विष्णुपुरी, ता. नांदेड, जि. नांदेड

हिंदू मंदिरे मुख्यत्वेकरून नद्यांच्या तीरावर विकसित झाली आहेत. त्यात उत्तर भारतातील गंगा नदीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. दक्षिणेत हेच महत्व त्र्यंबकेश्वर येथे उगम पावून बंगालच्या उपसागरात विलीन होणाऱ्या गोदावरी नदीला लाभले आहे. त्यामुळेच गोदावरी नदीला ‘दक्षिण गंगा’ म्हणून ओळखले जाते. गोदावरी नदीचे नाभीस्थान म्हणून नांदेड शहराची ओळख आहे. या शहरापासून जवळ असलेल्या विष्णुपुरी गावात गोदावरी नदीच्या तीरावर काळेश्वर महादेव हे प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर वसलेले आहे.

सोळाव्या शतकातील या मंदिराची आख्यायिका अशी की गावातील एक ब्राह्मण शंकराचा निस्सिम भक्त होता. त्याला महादेवाच्या दर्शनाची इतकी ओढ लागली की तो अन्नपाण्याचा त्याग करून दिवसरात्र शिवनाम जपत असे. अशाच अवस्थेत त्याला महादेवाचा दृष्टांत झाला की आपण गोदावरी तीरावर जमिनीत लिंग रूपात वास्तव्य करत आहोत, आपणास वर काढावे. दृष्टांतानुसार ब्राह्मणाने जमीन खोदली असता त्याला काळ्या पाषाणातील शिवपिंडी आढळली. त्या ब्राह्मणाने ती पिंडी बाहेर काढून त्याच ठिकाणी शिवमंदिर बांधले. तेच हे काळेश्वर मंदिर होय. येथील शिवलिंग काळ्या पाषाणातील असल्यामुळे त्यास ‘काळेश्वर’ अथवा ‘काळोबा’ असे नामाभिधान प्राप्त झाले.

मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर भव्य स्वागतकमान आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी चार नक्षीदार गोलाकार स्तंभ व त्यावरील सज्जावर पाच घुमटाकार शिखरे असे या स्वागतकमानीचे स्वरूप आहे. येथील सर्व स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. येथून काही अंतरावर मंदिराचे दुमजली प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूस द्वारपाल शिल्प आहेत. प्रवेशद्वारात चौकोनी स्तंभपाद असलेले नक्षीदार गोलाकार स्तंभ महिरपी कमानीने जोडलेले आहेत. प्रवेशद्वाराच्या आतल्या दोन्ही बाजूस पहारेकरी कक्ष व येथून वरील नगारखान्याकडे जाण्यासाठी जीना आहे. नगारखान्यात दोन्ही बाजूस प्रत्येकी चार खिडक्या आहेत. या खिडक्यांना बाह्य बाजूला सज्जा, स्तंभ व घुमट आहेत. नगारखान्याच्या छतावर चहुबाजूने कठडा आहे. कठड्यात मध्यभागी असलेल्या देवकोष्ठकात गणपतीची मूर्ती आहे. या कठड्यावर दहा लघूशिखरे आहेत.

या प्रवेशद्वारातून मंदिराच्या पेव्हर ब्लॉक बसवलेल्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात प्रसाद व पूजा साहित्य विक्रीची अनेक दुकाने आहेत. प्रांगणापेक्षा उंचावर असलेल्या मंदिराच्या सभामंडपास समोरून एक व डाव्या तसेच उजव्या बाजूला प्रत्येकी एक अशी एकूण तीन प्रवेशद्वारे आहेत. समोरील प्रवेशद्वारासमोर महावृक्ष आहे व त्याभोवती पार बांधलेला आहे. उजव्या व डाव्या बाजूच्या प्रवेशद्वारास पाच पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस स्टेनलेस स्टीलचे सुरक्षा कठडे आहेत. येथील सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. यामध्ये २४ चौकोनी स्तंभ आहेत. स्तंभपाद व स्तंभदंड चौकोनी आहेत. स्तंभांचा वरचा भाग सुवर्णपटल आच्छादित आहे आणि त्यावर कमळ व मयूर नक्षी आहेत. वितानावर चक्राकार कमलदल नक्षी आहे. सभामंडपात मध्यभागी वज्रपीठावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. नंदीच्या मूर्तीपुढे अरुंद अंतराळ व त्यापुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या पहिल्या दोन द्वारशाखांवर पानाफुलांच्या नक्षी आहेत. तिसऱ्या द्वारशाखेवर खालील बाजूस गंगा-यमुना शिल्प व वरच्या बाजूला प्रत्येकी चार शिवपिंडींची शिल्पे आहेत. ललाटबिंबावर शिव-पार्वतीचे शिल्प व ललाटपट्टीवर चार मयूर आणि दोन नंदीशिल्पे आहेत. स्तंभशाखांवर सज्जा व प्रवेशद्वारावरील उत्तरांगावर शिखरनक्षीचे तोरण आहे. प्रवेशद्वारास धातुच्या पत्र्याने मढविलेले आहे. त्यावर ओम्, स्वस्तिक, मंगलकलश आदी नक्षी व शिल्पे आहेत.

गर्भगृहात जमिनीवर शिवपिंडी आहे. मूळ काळ्या पाषाणातील असलेल्या या शिवपिंडीची शाळुंका चांदीच्या पत्र्याने मढविलेली आहे. पिंडीभोवती वेढा घातलेला पितळी नाग व शेजारी काळ्या पाषाणातील पाचफणी नागाचे शिल्प आहे. गर्भगृहाचे षटकोनी वितान पानफुलांच्या नक्षीने सुशोभित आहे. वितानावर मध्यभागी चक्राकार नक्षी आहे. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. दक्षिणी स्थापत्यशैलीतील या मंदिराच्या छतावर चहुबाजूने कठडा आहे. त्यातील सुमारे २४ देवकोष्ठकांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या छतावर पाच थरांचे शिखर आहे. पहिले दोन थर चौकोनी व वरील तीन थर गोलाकार आहेत. त्यांतील देवकोष्ठकांत शिवपिंडी शिल्पे आहेत. शिखरात शीर्षभागी स्तुपी व त्यावर पंचकुंभी कळस आहे. मंदिराच्या शेजारी धुनी कक्ष आहे. असे सांगितले जाते की येथे शेकडो वर्षापासून अखंड धुनी प्रज्वलित आहे.

मंदिराच्या परिसरात विविध खेळणी असलेले बालोद्यान आहे. मंदिरास लागूनच गोदावरी नदीवरील घाट आहे. येथे सशुल्क नौकानयन सुविधा उपलब्ध आहे. घाटावर विविध शांती, श्राद्ध व धार्मिक विधी करता येतात.

मंदिरात महाशिवरात्री व श्रावण मास हे मुख्य वार्षिक उत्सव उत्साहाने व श्रद्धेने साजरे केले जातात. मंदिरात भजन, कीर्तन, संगीत, प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते व भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जाते. वार्षिक उत्सवांच्या वेळी महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा राज्यांतील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येथे येतात. दर सोमवारी व सुट्टीच्या दिवशी भाविकांची येथे मोठी गर्दी असते.

उपयुक्त माहिती:

  • नांदेड शहरापासून ७ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून नांदेडसाठी एसटी व रेल्वेची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : नारायण धनमणे स्वामी, मुख्य पुजारी, मो. ९१७५५८१२७८
  • मंदिर कार्यालय, मो. ९३२५६१०९९०

कालेश्वर मंदिर

विष्णुपुरी, ताल. नांदेड़, जिला. नांदेड़

Back To Home