वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावचे ग्रामदैवत देव जैतीर हे जागृत देवस्थान म्हणून सर्वत्र परिचित आहे. असे सांगितले जाते की हे देवस्थान पंधराव्या शतकातील आहे. माणसाचा देव होऊन पंचायतन देवस्थानची सूत्रे सांभाळणारे दक्षिण कोकणातील हे एकमेव देवस्थान असल्याची मान्यता आहे. दरवर्षी येथील यात्रोत्सवात देव जैतीरच्या पत्नीच्या स्मृतिप्रीत्यर्थ परब घराण्यातील सुवासिनींना चक्क पेटत्या निखाऱ्यांची आंघोळ घातली जाते. या प्रथेला येथे ‘इंगळे न्हाणे’ असे म्हटले जाते. यामध्ये महिला डोक्यावर पदर घेऊन आगीजवळ जातात. तेथे एका सुपलीतून (लहान सूप) त्यांच्या डोक्यावरील पदरावर निखारे टाकले जातात. हा उत्सव पाहण्यासाठी कोकणातील हजारो भाविक उपस्थित असतात.
या देवस्थानाबद्दल आख्यायिका अशी की तुळस गावात दांडपट्टा खेळणारे व तलवारबाजीत मातब्बर असलेले जैते परब नावाचे सत्पुरुष होते. त्यांचा धाडसी स्वभाव व शस्त्र चालविण्याचे कसब पाहून सावंतवाडी संस्थानातर्फे त्यांची एका गडावर किल्लेदार म्हणून नेमणूक करण्यात आली होती. सुभेदारीवरून येताना आपल्या मुलीला माहेरी आणावे म्हणून ते तिच्या सासरी गेले; परंतु बरोबर कुळंबीण (कुणब्याची बायको, कुणबीण) नसल्याने मुलीच्या सासरकडील मंडळींनी तिला माहेरी पाठविण्यास नकार दिला. नाईलाज झाल्याने ते तुळस गावात आले व दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्याबरोबर गावचा नागल महार व कुळंबीणीस घेतले व पुन्हा मुलीकडे जाण्यास निघाले; परंतु वाटेत त्यांना भिल्लांनी अडविले. कुळंबीणीने परिधान केलेले दागिने त्यांना लुटायचे होते.
चर्चेतून मार्ग निघत नसल्याने जैते परब व भिल्ल यांच्यात चकमक उडाली. जैते परब यांनी आपले कौशल्य पणास लावून अनेक भिल्लांना तलवारीने कंठस्नान घातले. त्यांची तलवारबाजी पाहून भिल्लांनी तेथून काढता पाय घेतला व घनदाट रानातून त्यांच्या दिशेने तीर सोडू लागले. भिल्लांच्या या हल्ल्यात कुळंबीणीस बाण लागला व त्यात तिचा मृत्यू झाला. त्याचवेळी एक बाण जैते परब यांच्या डोक्याला लागल्याने ते जखमी झाले. संधी पाहून भिल्लांनी कुळंबीणीच्या अंगावरील दागिने काढून ते पसार झाले. नागल महाराने जखमी जैते परब यांच्या डोक्याला वनौषधी लावून त्यांना आपल्या पाठीवर घेतले व तो तुळस गावाकडे येण्यास निघाला.
त्यांनी पहिला मुक्काम नारूर येथे केला. नारूर येथील सुद्रीक या वैश्य गृहस्थाने त्यांच्यावर औषधोपचार केले; परंतु बाणाने झालेली जखम खोलवर असल्याने औषधोपचारादरम्यान जैते परब यांची प्राणज्योत मालवली. तो दिवस होता वैशाख कृष्ण चतुर्दशीचा. त्याच दिवशी जैतोबांनी (जैते परब) सुद्रीक यांच्या अंगात संचार केला आणि आपल्या अंत्यसंस्काराबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे आपल्या धन्याचे शिर घेऊन नागल महार तुळस गावी येण्यासाठी निघाला. आता जेथे मंदिराचे गर्भगृह आहे, तेथे पूर्वी राऊळांचे घर होते. येथे नागल महाराने जैतोबांचे शिर ठेवले. नारूर येथील ग्रामस्थांनी जैतोबांचा धडाशिवाय असलेला मृतदेह त्याच ठिकाणी आणला. ज्याठिकाणी जैतोबांची समाधी बांधण्यात आली त्याच ठिकाणी आताचे भव्य व प्रशस्त असे मंदिर आहे. या समाधीस्थानासमोर आपलीही समाधी बांधावी, अशी इच्छा प्रगट केल्याने मंदिरासमोर नागल महाराचीही समाधी आहे. त्यामुळेच येथील प्रत्येक उत्सवात हरिजन समाजाला प्रमुख मान दिला जातो.
गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी रस्त्याला लागून देव जैतीर मंदिर आहे. मंदिराच्या दर्शनी भागात एक दीपस्तंभ व तुळशी वृंदावन आहे. दुमजली असलेल्या या मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात एका गोलाकार देवकोष्ठकांत गणपतीची मूर्ती आहे. त्याच्या वरच्या बाजूला लहानसे शिखर, त्यावर आमलक व कळस आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या या सभामंडपातील स्तंभ हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. जमिनीकडच्या बाजूने चौकोनी, त्यावर कमळाकृती कलाकुसर, त्यावरच्या भागात गोलाकार व छताजवळ पुन्हा कमळाकृती आकार दिलेला आहे. या खांबांवर फुलांची व वेलींची उठावशिल्पे आहेत. या स्तंभांच्या दोन रांगा या आयताकृती सभामंडपात आहेत. कोकणी स्थापत्यशैलीप्रमाणे सभामंडपाच्या जमिनीचा या दोन स्तंभांच्या रांगेमधील भाग काही इंच खोलगट आहे. सभामंडपाच्या बाहेरील बाजूला भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत.
सभामंडपाच्या पुढील भागात प्रदक्षिणा मार्ग सोडून काही उंचीवर अंतराळ व गर्भगृह आहे. अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला गदा व सुदर्शनचक्रधारी द्वारपालांची शिल्पे आहेत. कमानीदार द्वारपट्टीच्या वरील भागात कीर्तिमुख आहे. येथील अंतराळ हे बंदिस्त स्वरूपाचे आहे. त्यामध्ये असलेले मोठे दगडी स्तंभ एकमेकांशी कमानीसदृश्य आकाराने जोडलेले आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी एका कमी उंचीच्या वज्रपीठावर काळ्या पाषाणातील जैतीर देवाची मूर्ती आहे. या गर्भगृहाच्या वरील बाजूस वैशिष्ट्यपूर्ण शिखर असून त्यावर गजराजांची मुखे कोरलेली आहेत.
वैशाख कृष्ण चतुदर्शीपासून देव जैतीराचा प्रमुख उत्सव सुरू होत असला तरी त्याची सुरुवात चार दिवस आधी दशमीच्या दिवशी रात्री दिव्यांच्या कार्यक्रमांनी होते. यात्रोत्सवाच्या दिवशी विविध वाद्यांच्या गजरात देव जैतीर यांची मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीच्या पुढे व मागे रवळनाथ, भूतनाथ व देवी सातेरी यांचे तरंगही असतात. हा उत्सव कोकणात ‘जैतीर उत्सव’ म्हणून प्रसिद्ध आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच वैशाख कृष्ण अमावास्येच्या दिवशी जैतीरचा मृतदेह तुळस गावात आणण्यात आला होता. असे सांगितले जाते की त्या वेळी त्यांची पत्नी त्यांच्याबरोबर सती गेली होती. जैतीरच्या पत्नीच्या स्मृतिप्रीत्यर्थ या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी परब घराण्यातील सुवासिनी चक्क पेटते निखारे डोक्यावर घेतात. हा उत्सव अकरा दिवस चालतो. कोकणासह महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या राज्यांतूनही हजारो भाविक या उत्सवासाठी येतात.
भक्तांवर जेव्हा संकट येते, तेव्हा जैतीर देव हातात शस्त्र घेऊन बाहेर पडतो. हा देव जसा तुळस गावातल्या भक्तांच्या रक्षणासाठी सज्ज असतो, तशीच शेजारच्या नारूर गावातही दृष्ट शक्तींविरोधात त्याची तलवार फिरते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिर परिसरात देव रवळनाथ मंदिर, सावंत वस मंदिर व देव जैतीरच्या सहा पिढ्यांच्या प्रमुखांच्या समाध्या आहेत.