हिंदू धर्मात अनेक पंथ उदयास आले. प्रत्येक पंथाची उपासना पद्धती व तत्त्वज्ञान वेगळे. प्रत्येकाची दैवते व देवस्थाने वेगळी. काही वेळा एकाच देवतेची वेगवेगळ्या संप्रदायात वेगवेगळ्या नावाने उपासना केली जाते. देवाच्या किंवा देवस्थानाच्या नावावरून ते कोणत्या पंथाचे उपास्य दैवत अथवा देवस्थान आहे हे ओळखू येते. भारतातील नाथ संप्रदाय मुळात शैव पंथीय असला तरी त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानाचा वेगळा ठसा जनमानसावर उमटवला. त्यामूळेच अनेक देवतांच्या नावापुढे नाथ हे बिरूद जोडले गेले. असेच एक प्राचीन आणि प्रसिद्ध काळभैरवनाथ मंदिर परांडा तालुक्यातील सोनारी गावात आहे.
हे मंदिर सुमारे हजार वर्षांपूर्वीचे आहे. परंतु मंदिर परीसरातील वेगवेगळ्या वास्तू वेगवेगळ्या कालखंडातील असल्याचे इतिहास अभ्यासकांचे म्हणणे आहे. या मंदिराची अख्यायिका अशी की सोनारी गाव हे प्राचीन काळी सुवर्णपूर या नावाने ओळखले जात असे. या नगरीवर सुवर्णासुर राक्षसाचे राज्य होते. या राक्षसाने येथील जनतेला त्राहीमाम केले होते. तेव्हा काळभैरवनाथांनी सुवर्णासुर व इतर राक्षसांचा वध करून येथील जनतेला त्याच्या त्रासापासून मुक्त केले. तेव्हापासून भगवान शंकराच्या आज्ञेने सुवर्णपुरी ऊर्फ सोनारीत काळभैरवनाथांचे वास्तव्य आहे.
हे मंदिर सिना नदीच्या तीरावर वसलेले आहे. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूस पुजा साहित्याची दुकाने आहेत. मंदिरास असलेल्या भक्कम तटबंदीत दुमजली प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. नगारखान्याच्या छतावर आडव्या रचनेचे नक्षीदार शिखर आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूने वरील नगारखान्यात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या आत दोन्ही बाजूला पहारेकरी कक्ष आहेत. तटबंदीत पश्चिम दिशेस आणखी एक द्वार आहे.
मंदिराच्या प्रांगणात प्रवेशद्वाराला लागून रथकक्ष आहे. येथे चैत्र महिन्यात देवाच्या विवाहप्रसंगी वापरला जाणारा नक्षीदार लाकडी रथ ठेवलेला आहे.
प्रांगणातील पायवाटेच्या दोन्ही बाजूला विविध वस्तूंची व पूजा साहित्याची दुकाने आहेत. यात मुख्यत्वे करून खोबरे व गुलालाची दुकाने अधिक आहेत. प्रांगणात मंदिरापासून काही अंतरावर कोरीव पाषाणात बांधलेला पाण्याचा कुंड आहे. या कुंडास सुवर्णतीर्थ म्हणून संबोधले जाते. कुंडात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. पायरीमार्गाच्या डाव्या बाजूला चौथऱ्यावर दीपमाळ आहे. कुंडाच्या दगडी भिंतीत देवकोष्टके व त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. या कुंडाबाबत अख्यायिका अशी की सुवर्णासुर राक्षसाला मारल्यानंतर काळभैरवनाथाला तहान लागली तेव्हा देवाने जमिनीत त्रिशूल मारून या कुंडाची निर्मिती केली होती.
प्रांगणात मंदिरासमोर दोन्ही बाजूला प्राचीन दीपमाळा आहेत. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. येथील सभामंडप मुळ मंदिरासमोर नव्याने बांधलेला आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात बाह्य बाजूला कठडा आहे. सभामंडपात एकूण ३४ स्तंभ आहेत. सर्व स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. पुढे अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. अंतराळात डाव्या व उजव्या बाजूच्या भिंतीत आणखी दोन दरवाजे आहेत. अंतराळात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. हे स्तंभ चौकोनी, षट्कोनी, अष्टकोनी व वर्तुळाकार अशा विविध भौमितिक आकारात आहेत. यापैकी मधल्या चार स्तंभांवर पितळी धातूचे आच्छादन आहे. यापैकी प्रवेशद्वाराकडील डाव्या स्तंभावर गरुड, उजव्या स्तंभावर हनुमंत शिल्पे व वर कीर्तीमुख आहेत. अंतराळात उजव्या बाजूला लहान रथ व त्यावर घोड्याची पितळी मूर्ती आहे. देवाच्या रथ मिरवणुकीत या रथावरील घोडा पुढे ठेवून मागे देवाचा रथ ओढला जातो.
पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व वरील बाजूला त्रिकोणी कमान आहे. प्रवेशद्वारास पितळी आच्छादन असलेल्या नक्षीदार लाकडी झडपा आहेत. गर्भगृहात वज्रपिठावरील पितळी मखरात काळभैरवनाथ व जोगेश्वरी देवी यांच्या मूर्ती आहेत.
मूर्तींच्या मागील प्रभावळीवर पानाफुलांच्या नक्षी व वर मध्यभागी कीर्तीमुख आहे. गर्भगृहात उजव्या बाजूला देवाच्या उत्सवमूर्ती आहेत. उत्सव काळात रथ अथवा पालखी सोहळ्यात या मूर्तींची मिरवणूक काढली जाते. गर्भगृहाचे वितान अष्टकोनी व घुमटाकार आहे.
मंदिराच्या छतावर चहूबाजूंनी सुरक्षा कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावर दहा थरांचे चौकोनी शिखर आहे. शिखरावर सर्व बाजूंना चक्र व इतर नक्षी आहेत. चारही बाजूंना तिसऱ्या, पाचव्या व सातव्या थरात देवकोष्टके आहेत. शिखरात शीर्षभागी स्तूपिका, त्यावर कळस व ध्वजपताका आहे. मंदिरासमोर काळभैरवनाथ देवाच्या पादुका असलेले लहान मंदिर आहे. येथे देवाच्या पादुकांसोबत दोन नंदी आहेत.
मंदिराच्या बाजूला नाथपंथीय मठ आहे. येथे भुयारी गुफा आहे व त्यात भद्रकाली देवीचे मंदिर आहे. गुफेत भद्रकाली देवीचा तांदळा आहे. मठाच्या भिंतींत भैरवनाथ मंदिराच्या मंडारकाचे पाषाण आहे. यात दोन्ही बाजूस कीर्तीमुख कोरलेले आहेत. या मठास इनामी जमिनी आहेत. येथील महंतांची निवड नाशिक कुंभमेळ्यात बारा वर्षातून एकदा केली जाते. जे महंत येथे मठाधिपती असताना मरण पावले, अशा सहा महंतांच्या समाध्या या मठात आहेत. समाधी स्थळात शिवपिंडी आहे. मठात गोरक्षनाथांची संगमरवरी मूर्ती आहे.
मंदिरात चैत्र वद्य अष्टमीला रात्री बारा वाजता काळभैरवनाथ व जोगेश्वरी देवी यांचा विवाह सोहळा साजरा केला जातो. चैत्र वद्य एकादशी ते त्रयोदशी हा वार्षिक जत्रोत्सव साजरा केला जातो. चैत्र वद्य त्रयोदशी या दिवशी देवाची वरात म्हणून रथ मिरवणूक काढली जाते. यावेळी हजारो भाविक देवाचा रथ ओढण्यासाठी सरसावतात. कार्तिक वद्य अष्टमीला देवाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. यावेळी देवाचे पाळणे टांगून पाळणे गायले जातात. पौष पौर्णिमा या दिवशी देवाचा पालखी सोहळा साजरा केला जातो. त्यानंतर देव काशी यात्रेला जातात. माघ पौर्णिमेला देव काशी यात्रेहून परत येतात. त्यावेळी देखील पालखी सोहळा साजरा केला जातो. दसऱ्याचे सीमोल्लंघन देव पालखी मिरवणुकीने करतात. वर्षभरातील इतर सण उत्सवांचे आयोजनही येथे केले जाते. सर्व उत्सवांच्या वेळी ढोल ताशांच्या गजरात गुलाल व खोबऱ्याची उधळण केली जाते.