काळभैरव देवस्थान

हिंदळे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग

कोकणातील ब्राह्मण सामंत राजघराण्याशी निगडित असलेल्या हिंदळे या गावाचे ग्रामदैवत काळभैरव आहे. काळभैरव ही तांत्रिक देवता व शैव आगमांनी वर्णन केलेल्या अष्टभैरवांपैकी एक मानला जातो. कोशकारांनुसार भैरव याचा अर्थ भीषण असा आहे. त्याचा एक अर्थ भयापासून रक्षण करणारा, असाही असल्याचे सांगण्यात येते. भैरव हे शिवाचेच उग्र व भीषण रूप आहे. काळभैरवास काशीचा कोतवाल असेही म्हटले जाते. पापभक्षण, आमर्दक, काळराज ही त्याचीच नावे आहेत. हिंदळे गावात काळभैरवाचे अत्यंत प्राचीन मंदिर आहे.

काळभैरवाविषयी पौराणिक कथा अशी की भगवान शंकराच्या क्रोधातून काळभैरवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाने एकदा शंकराचा अपमान केला. त्यामुळे शंकर क्रोधीत झाला आणि त्या क्रोधाग्नीतून काळ्या रंगाचा भैरव जन्मला व त्याने ब्रह्माचे शिवनिंदा करणारे मस्तक छाटले. मात्र त्याच्या हातून हे ब्रह्महत्येचे पाप झाले. सर्व तीर्थांना जाऊनही त्याचे पापक्षालन झाले नाही. अखेरीस काशी येथे त्याला पापमुक्ती मिळाली आणि त्याने ब्रह्माचे मस्तक तेथे ठेवले. कालभैरवाने ब्रह्माचे मस्तक जेथे ठेवले त्या स्थानास कपालमोचनतीर्थ म्हणतात. कालिकापुराणात अशी कथा सांगण्यात येते की पार्वतीच्या शापाने महाकाल हा गण भैरवाच्या रूपाने जन्मला. त्याचा जन्म रात्रीच्या चौथ्या प्रहरी झाला. कार्तिक वद्य अष्टमीस भैरव जयंती हे काम्यव्रत केले जाते.

इतिहासकारांच्या मते, हिंदळे येथील काळभैरव मंदिर हे मुळात सामंत राजघराण्याच्या इतिहासाशी संबंधित आहे. हिंदळे गावाचा एक सर्वांत जुना उल्लेख इ.स. १४३६ मधील एका संस्कृत ताम्रपटात आढळतो. ‘नागदेवाचा ताम्रपट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्कृत ताम्रपटाच्या पहिल्या पत्र्यावरील पाचव्या ते आठव्या ओळीत असे लिहिलेले आहे की ‘काश्यपो देवशर्मेति ब्राह्मणो ब्रम्हवित्तमः यजुषां पारगो दांतः षटकर्मनिरतो भवत्। तुरुष्कोपप्लवात्तत्र कौंकणं समगादयं इंदुलाख्ये ग्रामवरे मुहू राज्ञां सभाजितः। राज्यश्रियं तदा लब्ध्वा कुणुकेश्वरवासिनः।’ याचा अर्थ असा, की ‘… काश्यप गोत्राचा देवशर्मा नामक ब्राह्मण हा ब्रह्मज्ञांमध्ये श्रेष्ठ, यजुर्वेदांत पारंगत आणि षट्‌कर्मात गढलेला असा होता. तेथे (म्हणजे जान्हवीतीरावर) तुरूष्क लोकांची स्वारी झाल्यामुळे तो कोकणात गेला. इंदुल (हल्लीचे हिंदळे) नामक प्रशस्त गावात राजाने त्याचा पुनःपुन्हा सन्मान केला. नंतर राज्यलक्ष्मी प्राप्त होऊन त्यास कुणकेश्वरस्थ भगवान् शंकराच्या प्रसादाने पुत्र झाले.’ या शिलालेखातून हिंदळे गावाचे प्राचीनत्व दिसून येते.

या ताम्रपटात वर्णन केलेला देवशर्मा हा आदिगौडदेशीय सामंत कुळाचा कुडाळ देशातील मूळपुरुष होता. गझनीच्या सुलतानाच्या म्हणजेच तुरूष्कांच्या उत्तर हिंदुस्थानातील स्वाऱ्यांना त्रासून तो हिंदळे येथे आला. त्याच्यासमवेत हिंदळे येथील राणे हे क्षत्रिय आले होते. (येथे आलेल्या मूळपुरुषाची समाधी काळभैरव मंदिरात आहे.) हा देवशर्मा शैवमतानुयायी होता. ‘भारत इतिहास संशोधक मंडळ पुरस्कृत ग्रंथमालेत’ १९२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘मठगावचा शिलालेख व ब्राह्मण सामंत राजवंश’ या संशोधन ग्रंथात वासुदेव अनंत बांबर्डेकर यांनी असे म्हटले आहे की देवशर्मा याने येथे राज्य स्थापन केले. त्यानंतर त्याच्या वंशात तेराव्या शतकात (सन १२२०) राजा मंग ऊर्फ मयिंदेव हा महापराक्रमी वीर निपजला. त्याने राज्याचा मोठा विस्तार केला. त्याच्या वंशात चौदाव्या शतकाच्या अखेरीस भैरवभूपती हा राजा जन्मला. इतिहास संशोधक बांबर्डेकर यांच्या संशोधनानुसार, भैरवभूपती हा मोठा पराक्रमी होता व त्याच्या नावाने हिंदळे येथे देऊळ आणि घाटी, तसेच दिगवळे गावाच्या बाजूस सह्याद्रीवर भैरवगड बांधलेला आहे. हिंदळे येथील काळभैरवाचे मंदिर हे या ब्राह्मण सामंत राजा भैरवभूपतीच्या नावाने बांधलेले आहे.

हिंदळे गावातील एका तिठ्यावर हे मंदिर वसलेले आहे. मंदिराचा दर्शनीभाग हा आधुनिक पद्धतीने बांधलेला आहे. दुमजली, खुल्या प्रकारचा, दोन्ही बाजूंना उतरते छप्पर असलेला सभामंडप, त्यात दगडी कक्षासने असे त्याचे स्वरूप आहे. जमिनीपासून काही फूट उंचावर हा सभामंडप आहे. या मंदिराच्या प्राचीनत्वाची साक्ष पटते ती मात्र या सभामंडपातून आत गेल्यानंतर. येथून तीन पायऱ्या चढून मंदिराच्या मुख्य व जुन्या सभामंडपात प्रवेश होतो. या सभामंडपाच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस एक शिलालेख आहे. त्यावर ‘अहमदखान ग. आगा (हिंदळे) व त्यांचे कुटुंबीयांकडून देवास अर्पण’ असे लिहिलेले आहे. हिंदळे गावातील सामाजिक एकात्मतेचे हे प्रतीक समजले जाते.

मंदिराचा मुख्य सभामंडप खुल्या प्रकारचा आहे. यात बाहेरच्या बाजूने दगडी गोलाकार स्तंभ आहेत. आत दोन्ही बाजूस सात काष्ठस्तंभ आहेत. सुरूदार व नक्षीकाम केलेले हे स्तंभ आणि त्यांना जोडणाऱ्या महिरपी कमानी यांनी सभामंडप सुशोभमान आहे. त्याच्या छतास कडीपाटावरही सागवानी लाकडी फळ्या आहेत. या सभामंडपात आल्यानंतर मंदिराचे प्रशस्त प्रांगण दिसते. प्रांगणास आवारभिंत बांधण्यात आलेली आहे. या प्रांगणातच सभामंडपाच्या डाव्या व उजव्या बाजूस चार-चार दीपस्तंभ आहेत. सभामंडपातील पाचव्या खांबाच्या तळाशी चौक चारी चव्हाटा आहे. तेथे एक पाषाण आहे. मुळात हा शब्द चौघचारी असा आहे. हा चव्हाटा म्हणजेच संपूर्ण गावाने जप करण्याची जागा आहे. हा जप अत्यंत प्रभावी असल्याचे कोकणातील गावऱ्हाटीमध्ये मानले जाते.

या पुढे काही फूट उंच जगतीवर मंदिराचे अंतराळ आहे. त्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपालांच्या उंच मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या चौकटीवर नक्षीकाम केलेले आहे व ललाटबिंब स्थानी गणेशाची मूर्ती कोरलेली आहे. त्याच्या दोन्ही बाजूंस रिद्धी-सिद्धी या गणेशपत्नीच्या मूर्ती आहेत. अंतराळात प्रवेश केल्यानंतर नजरेत भरतात ते येथील मोठा परिघ असलेले लाकडी स्तंभ. या स्तंभांवर घटपल्लव कोरलेले आहेत. त्यांत फुलांची सुंदर नक्षी आहे. स्तंभांच्या शीर्षस्थानी असलेले तरंगहस्त म्हणजे कोकणातील काष्ठशिल्पकलेचे उत्तम उदाहरण होय. या तरंगहस्तांवर पानाफुलांची नक्षी तसेच हत्ती, सर्पाकार तर दिसतातच शिवाय येथे त्रिमुखी दत्त, शेषशायी विष्णू, लक्ष्मी, विष्णूच्या नाभीतून आलेल्या कमळावर बसलेला ब्रह्मा, श्रीराम, हनुमान, मयुरारूढ सरस्वती यांच्या काही इंच आकाराच्या; परंतु अत्यंत प्रत्ययकारी अशा मूर्तीही कोरलेल्या दिसतात. यातील एका तरंगहस्तावर मगरीने गिळलेला हत्ती अशी मूर्ती आहे. ती गजेंद्रमोक्षाच्या पौराणिक कथेची आठवण करून देणारी आहे.

समोरच संगमरवरी फरशा बसवून नूतनीकरण केलेले गर्भगृह आहे. अंतराळातून गर्भगृहास प्रदक्षिणा मार्ग आहे. आत भूतलावर शिवपिंडी आहे. त्याच्या मागच्या बाजूस कोपऱ्यात छोट्या चौथऱ्यावर भैरवीचे पाषाण आहे. येथे काळभैरवाची मूर्ती नसून शिवपिंडी आहे हे विशेष. अशा प्रकारे काळभैरवाच्या मंदिरात मूर्तीऐवजी शिवपिंडी असलेले हे काशीनंतरचे महत्त्वाचे स्थान असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.

मंदिराच्या मोठ्या प्रांगणामध्ये आकारी ब्राह्मण, तसेच दिर्बादेवीचे मंदिर आहे. याच प्रांगणात पूर्व वांशिक (आजोबा), देव चुरमुरा यांचेही चाळे आहेत. आकारी ब्राह्मण मंदिराच्या समोर उंच जगतीवर एक मंडप आहे. ‘श्री वामन नाईक’ अशी पाटी असलेल्या या मंडपात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण कोरीवकाम आणि आकार असलेल्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. या शिवलिंगाच्या बाजूलाच सुबक कोरीवकाम असलेली सतीशिळा आहे. या शिळेच्या खालच्या बाजूस कोपरापासून दुमडलेले तीन हात दाखवलेले आहेत. त्यावरून ही तीन सतींची शिळा असल्याचे स्पष्ट होते. सभामंडपाच्या डाव्या बाजूसही एका ठिकाणी अशा सतीशिळा आहेत. त्यातील काहींची मोडतोड झालेली आहे तर एक शिळा झिजलेली आहे. या मंदिराच्या परिसरातही पूर्वी अनेक समाध्या आणि सतीशिळा दिसत असे सांगितले जाते.

या सतीशिळांबद्दलची आख्यायिका अशी की इ.स. १५७० नंतर म्हणजे बहामनी शहाने दक्षिण कोकण काबीज केल्यानंतर हिंदळे गावात मुस्लिम सत्ता प्रस्थापित झाली. यानंतर काही वर्षांनी येथे राणे ऊर्फ रावळ नावाच्या एका मराठा कुळाने आपला जम बसवला. हिंदळ्याच्या मैदानात एकदा या राण्यांची आणि मुस्लिम सरदाराची लढाई झाली. त्यात अनेक मराठे सैनिक मारले गेले. या सैनिकांच्या ज्या पत्नी सती गेल्या त्यांच्या या सतीशिळा असल्याचे इतिहासकार सांगतात. या लढाईच्या वेळी भैरव मंदिराच्या ब्राह्मण पुजाऱ्याच्या पत्नीने राणे घराण्यातील एका गर्भवती स्त्रीला मोठ्या हिकमतीने वाचवले. त्यामुळे राण्यांचा वंश टिकला. या स्त्रीच्या पोटी जन्मास आलेला मुलगा मोठा पराक्रमी निघाला. गर्भावस्थेत असताना आपले मरण ज्या स्त्रीने टाळले, त्या स्त्रीचे उपास्यदैवत असलेल्या या भैरवदेवाच्या मंदिराची त्याने डागडुजी केली. त्याच्या पुढील वंशजांनी हे देवालय वाढवून त्यास सध्याचे स्वरूप दिले. या लढाईची स्मृती येथील जुन्या जाणत्या ग्रामस्थांनी टिकवून ठेवली आहे. हे गाव पेशव बाळाजी विश्वनाथ यांचे मेहुणे व प्रतिनिधी भैरव मेहंदळे यांचे मूळ गाव असल्याचेही सांगण्यात येते. याच मेहंदळे घराण्यातील सरदार आप्पा बळवंत मेहंदळे यांच्या नावाने आज पुण्यातील आप्पा बळवंत चौक ओळखला जातो.

हिंदळे गावात काळभैरवाप्रमाणेच शैवपरिवारातील आणखी एक देवता म्हणजे कार्तिक स्वामींचे मंदिर आहे. दक्षिणेकडील राज्यांत मुरूगन, सुब्रह्मण्यम म्हणून ओळखले जाणारा कार्तिकेय पौराणिक कथांनुसार गणेशाचा मोठा बंधू आहे. कार्तिकेयाची स्थापना वनात, मानवी वस्तीपासून शक्यतो दूर करावी, असा संकेत आहे. त्यानुसार हिंदळे गावापासून काही अंतर दूर हे टुमदार मंदिर आहे. या मंदिरात कार्तिकेयाची शस्त्रधारी संगमरवरी मूर्ती आहे. कार्तिकेय ब्रह्मचारी असल्याने त्याच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश निषिद्ध मानला जातो. या मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेला मोठा उत्सव साजरा केला जातो. त्या दिवशी मात्र काही तास महिला या मंदिरात येऊन कार्तिकेयाचे दर्शन घेऊ शकतात. या मंदिराजवळच विठ्ठल-रखुमाईचेही मंदिर आहे.

उपयुक्त माहिती

  • देवगडपासून १६ किमी, तर मालवणपासून ३२ किमी अंतरावर
  • देवगड व मालवणपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Back To Home