काळभैरव मंदिर

बड्याची वाडी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर

भारतात शैव पूजनाची परंपरा अतिप्राचीन आहे. भैरव हे शिवाचे एक रूप असून आठ भैरवांच्या प्रमुखाला अष्टभैरव व अष्ट भैरवांच्या प्रमुखाला काळभैरव असे संबोधले जाते. ‘भय’ आणि ‘रव’ हे दोन शब्द मिळून झालेल्या भैरव शब्दाचा अर्थ भयापासून रक्षण करणारा असा आहे. या काळभैरवाची मंदिरे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत. यातील गडहिंग्लज तालुक्यातील बड्याची वाडी येथील डोंगर कपारीत असलेले काळभैरव मंदिर जिल्ह्यात विशेष प्रसिद्ध आहे. हे देवालय जागृत व नवसाला पावणारे आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या देवाची जत्रा गोंड्याची जत्रा म्हणून परिचित आहे.

बड्याची वाडी येथील हे मंदिर किती पुरातन असावे याबाबत निश्चित माहिती मिळत नसली तरी मंदिराच्या स्थापत्यशैलीवरून ते ७०० ते ८०० वर्षे प्राचीन असावे असा अभ्यासकांचा अंदाज आहे. ४०० वर्षांपूर्वी या मंदिराला विविध भेटी वा देणगी मिळाल्याच्या नोंदी आहेत. या मंदिराची आख्यायिका अशी की प्राचीन काळी एक राजा शिकारीसाठी सध्या जेथे मंदिर आहे तेथे आला होता. त्यावेळी त्याला या जागेवर कळभैरवाची मूर्ती दिसली. याच ठिकाणी राजाने मंदिर बांधून या मूर्तीची त्यात प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून हा काळभैरव भक्तांच्या हाकेला धावून येत असल्याच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात.

हे मंदिर बड्याची वाडी गावाच्या सीमेपासून काहीसे दूर, डोंगराच्या पायथ्याशी, रस्त्यापासून खालच्या भागात स्थित आहे. लाल बेसॉल्ट पाषाणात बांधलेले मंदिराचे स्वागतद्वार वैशिष्ट्यपूर्ण आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुमारे सहा फूट लांब व दोन फूट रुंद आयाताकृती स्तंभ व त्याला लागूनच चौथऱ्यावर दोन-दोन गोलाकार नक्षीदार स्तंभ आहेत. या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी वरच्या बाजूला गणेशाची मूर्ती आहे व त्यावर तीन कळस आहेत. येथून मंदिराकडे जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. या पायऱ्यांवर असलेल्या एका चौथऱ्यावर भगवान शिवाची सुंदर ध्यानस्थ मूर्ती आहे. पायऱ्यांवरून आणखी पुढे आल्यावर दगडी बांधकाम असलेले दुमजली प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या वरच्या मजल्यावर नगारखाना आहे.

येथून खाली पाहिल्यास काळभैरवाचे भव्य मंदिर नजरेस पडते. सभामंडप, गर्भगृह व उंचच उंच शिखर अशी या मंदिराची संरचना आहे. मुख्य मंदिराला लागून नव्यानेच बांधलेला दुमजली दर्शनरांग मंडप आहे. या मंडपात भाविकांना बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था आहे. मुख्य मंदिराच्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारावरील दोन्ही नक्षीदार स्तंभ महिरपी कमानीने एकमेकांशी जोडलेले आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ एक कासव व दोन संगमरवरी गजराज आहेत. सभामंडपात चार कोनांत चार नक्षीदार स्तंभ असून, त्यावर कणी व हस्त आहेत. हस्तांवर दगडी तुळया आहेत. छतावर कमळ फुलांची नक्षी आहे. आटोपशीर सभामंडपाच्या पुढील बाजूस गर्भगृह आहे.

गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस दोन नंदी व शंकराचे उठाव शिल्प आहे. शिल्पाच्या मागे प्रभावळीवर व भिंतीवर पानाफुलांची सुंदर नक्षी आहे. गर्भगृहातील एका उंच वज्रपीठावर काळभैरव, जोगेश्वरी देवी व नागेश्वर अशा काळ्या पाषाणातील तीन मूर्ती आहेत. जोगेश्वरी देवीची मूर्ती काळभैरवाच्या उजव्या बाजूस आहे. असे सांगितले जाते की देवाने युद्धात जिंकलेली ही शक्ती असल्याने जोगेश्वरीचे स्थान नेहमी काळभैरवाच्या उजव्या बाजूस असते. काळभैरव व जोगेश्वरी देवीच्या डाव्या हातात तलवार तर उजव्या हातात अमृत पात्र आहेत. दोन्ही मूर्तींच्या वर कीर्तिमुख शिल्पे आहेत. या तिन्ही मूर्तीं संगमरवरी मखरात आहेत व त्यावर मोदकाच्या आकाराचे शिखर आहे.

मंदिराचे चौकोनी शिखर उरूशृंग प्रकारातील आहे. या मुख्य शिखरात आणखी १६ लहान शिखरे व त्यावर कळस आहेत. मुख्य शिखराच्या चारही बाजूला देवकोष्टके आहेत व त्यांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. देवकोष्टकांवर शरभशिल्पे आहेत. काल्पनिक पक्षी किंवा प्राण्यांना शरभ म्हटले जाते. शिखर ग्रीव्हेवर शिखराचा कुंभाकार भाग व त्यावर मुख्य कळस आहे. संपूर्ण शिखर व मंदिरावर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम केलेले आहे.

मुख्य मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या देवकोष्टकात महाकाली देवीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती आहे. मूर्तीच्या उजव्या दोन हातांत दंड व तलवार आहे व डाव्या हातांत मुंड व अग्निपात्र आहे. देवी राक्षसाच्या देहावर पाय ठेवून उभी आहे. देवीने उंची वस्त्रे व अलंकार परिधान केलेली असून गळ्यात मुंड माळा धारण केली आहे. देवीच्या मूर्तीच्या वर कीर्तिमुख आहे.

मंदिर परिसरात उजव्या बाजूस महादेव मंदिर आहे. या मंदिरातील भल्यामोठ्या नंदीच्या पाषाणमूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या पाठीवरील माळ ही कीर्तिमुखांची आहे. येथे दत्त व बाळभैरव मंदिरे आहेत. या मंदिरात हनुमानाची छोटी प्राचीन उठावशिल्पे आहेत. मंदिरांच्या बाजूला पाण्याचे कुंड आहे. येथील काही वैशिष्ट्यपूर्ण नागप्रतिमाही पाहावयास मिळतात.

माघ कृष्ण द्वितीयेला काळभैरव देवाचा जत्रोत्सव साजरा केला जातो. या जत्रेस महाराष्ट्रासह कर्नाटकमधूनही लाखो भाविक येतात. या दिवशी भल्या पहाटे देवाचा महाअभिषेक करून पूजा केली जाते. मुरगूड गावातून काळभैरवाची पालखी देवळात आणली जाते. येथे उत्सव मूर्तीची पूजा होऊन देव पालखीत बसवून ग्राम प्रदक्षिणेस निघतात. प्रदक्षिणा मार्गावरील प्रत्येक देवस्थानाला काळभैरव भेट देतात. पालखी सोहळ्यात भाविक देवाच्या सासनकाठीस गोंडे बांधतात. आकाश कंदिलाच्या आकाराचे हे गोंडे सासनकाठीस बांधण्याच्या या परंपरेमुळे ही जत्रा गोंड्यांची जत्रा म्हणून परिचित आहे. पालखी मंदिराकडे जाताना सासनकाठीवरील मोठे गोंडे प्रवेशद्वाराजवळ बांधले जातात, तर लहान गोंडे सासनकाठी सोबत मंदिरापर्यंत नेले जातात.

यात्रेत मिळणारा नडगी लाडू, करदंड हा सुका मेवा व गूळ वापरून केलेला प्रसाद हे या जत्रेचे विशेष आकर्षण असते. मंदिरात महाशिवरात्र, दसरा, दिवाळी, त्रिपूर पौर्णिमा आदी वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.

उपयुक्त माहिती

  • गडहिंग्लजपासून ६ किमी, तर कोल्हापूरपासून ७२ किमी अंतरावर
  • गडहिंग्लज येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या पायरी मार्गापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : पुजारी, आदित्य गुरव, अश्विनकुमार गुरव,
  • मो. ९८५०११५०६०, ९३२६७०५७५७
Back To Home