पेडणे तालुक्यातील धारगळ हे धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे गाव गणले जाते. या गावात वसलेली काळभैरव व सप्तकोटेश्वर मंदिरे ही गोमंतकीय वास्तुशैलीची उत्तम उदाहरणे आहेत. काळभैरव हे भगवान शिवाचे एक उग्र रूप मानले जाते. ते काळ म्हणजेच ‘समय‘ आणि भैरव म्हणजे ‘भयंकर रक्षक‘ या संकल्पनेचे प्रतीक आहेत. ग्रामसंरक्षक देवता असलेल्या काळभैरवाच्या या मंदिरात दरवर्षी हजारो भक्त दर्शनासाठी येतात. कार्तिक वद्य अष्टमी हा काळभैरव जयंतीचा उत्सव येथे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. येथील कावी शैलीतील चित्रकला पाहण्यासाठी अनेक अभ्यासकही या मंदिराला भेटी देतात.
काळभैरवास ‘काशीचा कोतवाल’ असेही म्हटले जाते. पापभक्षण, आमर्दक, काळराज ही त्याचीच नावे आहेत. काळभैरवाविषयी पौराणिक कथा अशी की भगवान शंकराच्या क्रोधातून मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीस काळभैरवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाने एकदा शंकराचा अपमान केला. त्यामुळे शंकर क्रोधीत झाला आणि त्या क्रोधाग्नीतून काळ्या रंगाचा भैरव जन्मला व त्याने ब्रह्माचे शिवनिंदा करणारे मस्तक तोडले. मात्र त्याच्या हातून हे ब्रह्महत्येचे पाप झाले. सर्व तीर्थांना जाऊनही त्याचे पापशालन झाले नाही. अखेरीस काशी येथे त्याला पापमुक्ती मिळाली आणि त्याने ब्रह्माचे मस्तक तेथे ठेवले. कालभैरवाने ब्रह्माचे मस्तक जेथे ठेवले त्या स्थानास कपालमोचनतीर्थ म्हणतात. कालिकापुराणात अशी कथा सांगण्यात येते की पार्वतीच्या शापाने महाकाल हा गण भैरवाच्या रूपाने जन्मला होता.
धारगळ येथील हे मंदिर सुमारे पाचशे वर्षे प्राचीन असून ते सन १५६० ते १५६७ या काळातील आहे व काळभैरवाची येथील मूर्ती त्याहून अधिक प्राचीन असल्याचे सांगितले जाते. गोव्यात पोर्तुगीज सरकारच्या काळात अनेक मंदिरे संकटात सापडली तेव्हा तेथील मूर्तींचे स्थलांतर झाले. येथील काळभैरव मंदिर त्यापैकीच एक असल्याचे सांगितले जाते. पूर्वी ही मूर्ती गोव्याच्या कोंडवळी प्रांतात होती व तेथून सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात येथे आणली गेली. आजही भैरवनाथाला गाऱ्हाणे घालताना किंवा कौल लावताना कोंडवळीचा भैरवनाथ अशीच हाक मारली जाते.
गावाच्या वेशीवर मंदिराची कमान आहे. मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ आहे. मंदिराभोवती असलेल्या तटबंदीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. पेव्हर ब्लॉक आच्छादित प्रांगणात विहीर आहे. प्रांगणातील वृक्षांभोवती पार बांधलेले आहेत. प्रांगणात एकूण पाच मंदिरे असून जवळपास प्रत्येक मंदिरासमोर चौथरा व चौथऱ्यावर पाच थरांच्या शीर्षभागी शिखर असलेल्या दीपमाळा आहेत. काळभैरव मंदिरासमोर तुलसी वृंदावन आहे.
मुखमंडप, सभामंडप, मुख्य सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी काळभैरव मंदिराची रचना आहे. बंदिस्त स्वरूपाच्या मुखमंडपाच्या प्रवेशद्वारात महिरपी तोरण व लोखंडी जाळीदार अर्धझडपा आहेत. मुखमंडपात डाव्या व उजव्या बाजूला स्तंभ आणि भिंतीलगत भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या लाकडी द्वारशाखांवर पानाफुलांच्या नक्षी आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात चौकोनी स्तंभांच्या दोन रांगा आहेत. काही स्तंभांलगत देवशिल्पे आहेत. प्रत्येक रांगेतील स्तंभ एकमेकांना अर्धचंद्राकार तोरणांनी जोडलेले आहेत. तोरणांवर तुळई व त्यावर गजपृष्ठ आकाराचे छत आहे. स्तंभांवर व वितानावर कावी शैलीतील चित्रे साकारली आहेत. पुढे स्टेनलेस स्टीलचे सुरक्षा कठडे लावून अंतराळाची रचना केलेली आहे. अंतराळ सभामंडपापेक्षा काही इंच उंच आहे. अंतराळात स्थानिक देवतांची पाषाणे आहेत. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी आहे.
गर्भगृहात वज्रपिठावर काळभैरव देवाची उभ्या स्थितीतील चतुर्भुज मूर्ती आहे. देवाच्या हातात डमरू, त्रिशूल, कमळ व सोमपात्र आहे. देवाच्या पायाशी शक्ती शिल्पे आहेत. मूर्तीच्या पाठशिळेवर दोन्ही बाजूंनी कमळ फुलांची नक्षी आणि वर कीर्तीमुख आहे. देवाच्या डोक्यावर चांदीचा मुकुट व मूर्तीच्या मागे चांदीची प्रभावळ आहे. या प्रभावळीत मध्यभागी कीर्तीमुख व दोन्ही बाजूला पानाफुलांच्या नक्षी आहेत. गर्भगृहाच्या बाह्यबाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. मंदिराचे छत कौलारू आहे. मुखमंडपाच्या छतावर आडव्या रांगेत पाच कळस आहेत. गर्भगृहाच्या छतावर कळसांची अशीच रचना आहे.
या मंदिराच्या बाजूला प्रांगणात सप्तकोटेश्वर, सातेरी देवी, पूर्वादेवी, महालक्ष्मी व रवळनाथ अशी एकूण सहा मंदिरे आहेत. जवळपास सर्व मंदिरात भिंती व स्तंभांवर कावी शैलीतील चित्रे साकारली आहेत. येथील सातेरी देवी मंदिर सोडून सर्व मंदिरात काळ्या पाषाणातील देवता मूर्ती आहेत. सातेरी देवी मंदिरात वारुळाच्या स्वरूपात देवीची पूजा केली जाते. प्रांगणात मंगल कार्यालयाचे प्रशस्त सभागृह आहे.
कार्तिक वद्य अष्टमी हा काळभैरव जयंतीचा उत्सव येथे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. काळभैरव जयंती, दसरा, फाल्गुन पौर्णिमा हे देवाच्या पालखी उत्सवाचे मुख्य दिवस होत. याशिवात शारदीय नवरात्रौत्सव, चैत्र पाडवा, दसरा, दिवाळी, कार्तिक पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा आदी इतर सण व उत्सव साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी परिसरातील अनेक भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. पालखी उत्सवाच्या वेळी देव पालखीत बसून ढोल ताशांच्या गजरात व गुलाल उधळीत ग्रामप्रदक्षिणेला निघतात. देवाच्या पालखी सोबत इतर देवतांचे तरंग नाचवीत ग्रामप्रदक्षिणा करण्यात येते.
रविवार, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या आणि अष्टमी या दिवशी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. येथील कावी शैलीतील चित्रकला पहायला अनेक अभ्यासक मंदिराला भेटी देतात.