काळबादेवी मंदिर

मालवण, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग

छत्रपती शिवाजी महाराजांनी .. १६६४ मध्ये पाया रचलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आश्रयाने वृद्धिंगत झालेल्या मालवणची काळबादेवी ही आद्यदेवता आहे. मालवणमधील देव रामेश्वर, देव नारायण, सातेरी, जरीमरी तसेच गिरोबा, गांगोबा आदी बारापाच मानल्या गेलेल्या देवतांच्या मालिकेतील काळबादेवी ही एक देवता आहे. देवीचे येथील स्थान प्राचीन जागृत असल्याचे मानले जाते. मालवणचे ग्रामदैवत रामेश्वराची काळबादेवी ही बहीण असल्याची मान्यता आहे. त्यामुळे येथे दिवाळीत भाऊबीजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

देवीबद्दल अशी आख्यायिका आहे की ही देवी पूर्वी कुडाळ प्रांतातील माणगाव येथे होती. एकदा त्या गावात मोठी भुताटकी निर्माण झाली. तेव्हा तेथील लोकांनी घाबरून अन्य ठिकाणी स्थलांतर केले. तेथे धुरी घराणे होते. ते मालवणला आले. येथे येऊन ते स्थायिक झाले. त्यांनी जमिनी खरेदी केल्या. एकदा तेथील एका जमिनीत एक शेतकरी नांगरणी करीत असताना, नांगराचा फाळ एका पाषाणाच्या डाव्या बाजूस लागला. त्यातून रक्त येऊ लागले. ते पाहून तो घाबरला. त्याने गावातील धुरी मंडळींना त्याची माहिती दिली. त्यांनी ही हकिकत ग्रामदैवत रामेश्वरास सांगितली. त्यावर रामेश्वराने सांगितले की ही पाषाणस्वरूपात प्रकट झालेली देवी काळबादेवी आहे आणि ती माझी बहीण आहे.

याबाबत दुसरी आख्यायिका आहे त्यात पहिल्या आख्यायिकेचा दुसरा भाग वेगळ्या पद्धतीने सांगण्यात येतो. ती आख्यायिका अशी की छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले सिंधुदुर्गची पायाभरणी केली, त्यावेळी तेथील पायाचा दगड टिकत नव्हता. रघुनाथ यादव चित्रे ऊर्फ चित्रगुप्त याने .. १६८२ ते १६९२ मध्ये लिहिलेल्याछत्रपती शिवाजी महाराजांची बखरया ग्रंथात याबाबत अशी हकिकत देण्यात आली आहे की सिंधुदुर्गाच्यापाण्याचे माऱ्यास बुरूज करवणे असून नानाप्रकारे यत्न केला; परंतु उपाय चालेना. या करता महाराज चिंतासागरी पडले.’ बुरुजाचा पाया बांधताना अडचणी येत होत्या असे यावरून स्पष्ट होते. देवीच्या आख्यायिकेनुसार, त्या वेळी महाराजांची छावणी कांदळवनच्या माळरानावर होती. तेथे राजांना एक स्वप्न पडले. त्यात काळबादेवी आली. आपण कुठे आहोत ते ठिकाण तिने सांगितले आणिमाझे मंदिर बांध, मग तुझ्या किल्ल्याचा दगड टिकेल किल्ला बांधून पूर्ण होईल,’ असे देवीने शिवरायांना स्वप्नात सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी महाराजांनी आपल्या सैनिकांना घेऊन त्या ठिकाणाचा शोध सुरू केला. मेढा भागातील एका शेतात एक शेतकरी नांगरणी करीत असल्याचे शिवरायांच्या सैनिकांना दिसले. ते त्याला आणण्यासाठी गेले, तर तो पळून जाऊ लागला. अखेर त्याला पकडून महाराजांकडे आणले. त्याला अभय देऊन विचारणा केली की येथे देवी प्रकट झाली आहे, ती कुठे आहे ते दाखव. तेव्हा तो शेतकरी त्या जागेत त्यांना घेऊन गेला. तेथे पाषाण होते सर्वत्र रक्तच रक्त झाले होते. ते पाहून महाराजांनी येथे देवीचे छोटे मंदिर बांधले. शिवाजी महाराजांनी नित्यपूजा म्हणून देव नारायण, सातेरी, गांगोबा काळबादेवी या देवस्थानांना वर्षासन मंजूर केले. असे सांगितले जाते की अजूनही धुरी घराण्याची कुलदेवता असलेल्या या काळबादेवी मंदिराला प्रतिवर्षी १३ रु. ३७ पैसे एवढी रक्कम मिळते.

शिवकाळात बांधण्यात आलेल्या काळबादेवीच्या प्राचीन कौलारू मंदिराची वेळोवेळी डागडुजी करण्यात आली. .. १९०९ मध्ये देवीचे भक्त बाबुराव आवडोजी पराडकर यांनी मंदिराचा सभामंडप बांधला. नंतर २३ ऑगस्ट २००७ रोजी या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले. आता येथे काळबादेवीचे देखणे मंदिर उभे आहे.

मंदिर प्रांगणास चार नक्षीदार खांबांवर उभारलेले प्रवेशद्वार आहे. त्याच्या छतावर तीन शिखरे कीर्तिमुख आहे. येथून आत प्रवेश करताच समोर एक मोठा पार आहे त्यावर काही प्राचीन खंडित शिल्पे मांडलेली आहेत. त्यातील एका भग्न शिल्पामध्ये प्रसन्नवदन अशी देवीची मूर्ती आहे. ही देवी आसनावर बसलेली आहे. तिच्या मस्तकी वैशिष्ट्यपूर्ण असा मुकुट आहे. कानात मोठी कुंडले आहेत. हात, पाय, कंबर येथील भाग भग्न असल्यामुळे त्याचे नेमके स्वरूप स्पष्ट होत नाही. या ठिकाणी अशाच प्रकारची साधारणतः दोन फूट उंचीची पुरुष प्रतिमा आहे. चौकोनी शिळेवर कोरलेल्या या मूर्तीच्या मस्तकी मुकुट आहे. ओठांवर मिशा आहेत. ही मूर्ती चतुर्भुज असावी असे दिसते. एक पाय मुडपलेला आणि दुसरा खाली सोडलेला अशा स्वरूपात ती बसलेली आहे. या दोन मूर्तींच्या मध्ये साधारणतः दीड फूट उंची आणि अडीच ते तीन फूट रुंदीच्या कोरीव शिळा आहेत. त्यांच्या मागच्या पुढच्या अशा दोन्ही बाजूंना कोरीव काम केलेले आहे. यातील एका शिळेवर हत्ती आणि गदाधारी पुरुषाकृती शिल्पांकित केलेला आहे, तर तिच्या मागील बाजूस युद्धास निघालेले दोन घोडेस्वार कोरलेले आहेत. त्यातील एका स्वाराच्या हातातील भाला स्पष्ट दिसतो. तिच्या बाजूस ठेवलेल्या शिळेमध्येही हत्ती आणि स्त्रीप्रतिमा कोरलेली आहे, तर या शिळेच्या मागील भागात दौडत असलेल्या घोड्यांवर स्वार असलेल्या वीरांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. या शिळांमधील हत्ती हे चाल करून येत असताना दिसतात. या शिळा एखाद्या मोठ्या स्तंभाचा भाग असाव्यात त्यावरील शिल्पांकन हे युद्धप्रसंगाचे असावे, असे दिसते. ही शिल्पे येथील प्राचीन मंदिराचे अवशेष आहेत त्यावरून या देवस्थानाचे प्राचीनत्व लक्षात येते.

या पारापासून पुढे एका पायऱ्यापायऱ्यांच्या चौथऱ्यावर स्थानिक देवतेचा पाषाण आहे. बाजूलाच विहीर आहे. मंदिरासमोर सातस्तरीय दीपस्तंभ आहे. त्याच्या वरच्या भागात आमलक आहे. बाजूलाच तुळशी वृंदावन आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ अंतराळात स्थित असलेले गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृहावर शिखरे आहेत. अंतराळावरील शिखर गोपुराच्या आकाराचे आहे त्यावर चारी बाजूंनी देवकोष्टकांत देवीच्या मूर्ती विराजमान आहेत. सभामंडपाच्या छतावर खालून लहान होत गेलेल्या, एकावर एक असलेल्या पायऱ्या आणि त्यावर उंच तबकडीच्या आकाराचे शिखर आहे. गर्भगृहावरील शिखर चौकोनी नक्षीदार स्तंभ, त्यात देवकोष्टके, त्यांत देवीच्या विविध रूपांतील मूर्ती, घुमटाकार आमलक आणि त्यावर कळस अशा प्रकारचे आहे.

या मंदिराचा मुखमंडप आणि सभामंडप खुल्या प्रकारचे आहेत. दोन्ही मंडपांत संगमरवरी कक्षासने आहेत. अंतराळाच्या दर्शनीभिंतीवरील दोन देवकोष्टकांत स्त्री द्वारपालांच्या मूर्ती स्तंभांनी मंडित अशा प्रवेशद्वारावर ललाटबिंबस्थानी कीर्तिमुख आहे. या दर्शनीभिंतीच्या लगतच देव रामेश्वराच्या गादीचा उंच ओटा आहे. मंदिरात रामेश्वराची पालखी येते तेव्हा ती येथे ठेवली जाते. अंतराळातून गर्भगृहास प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या दर्शनीभिंतीवर उजव्या बाजूस छोट्या कोनाड्यात राधाकृष्णाची, तर डाव्या कोनाड्यात गणेशाची सुबक मूर्ती आहे. आत वज्रपीठावर दोन पाषाण आहेत. त्यापैकी एक काळबाई देवीचा तर दुसरा देव जळमादो यांचा आहे.

या मंदिरात श्रावणातील दुसऱ्या वा तिसऱ्या मंगळवारी मोठा जत्रोत्सव होतो. या जत्रेचा दिवस मानकरी ठरवतात. श्रावणात पहिल्या तीन मंगळवारी देवीच्या पाषाणास साडी नेसवली जाते, तर चौथ्या मंगळवारी देवीची उभी मूर्ती असते. तिला अलंकारांनी मढवले जाते. दर दिवाळीत मालवणमधील रामेश्वर देव नारायण मंदिरात मोठा उत्सव असतो. देवाच्या पालखीची परिक्रमा असते. त्या वेळी रामेश्वर देव समुद्रमार्गे भाऊबीजेच्या दिवशी आपल्या बहिणीला म्हणजेच काळबादेवीला भेटण्यासाठी येतो. या मंदिराचा वर्धापनदिनही येथे धार्मिक पद्धतीने साजरा केला जातो. एप्रिल वा मे महिन्यात, मानकरी काढतात त्या मुहूर्तावर हा वर्धापनदिन सोहळा होतो. नवरात्रीतील नऊ दिवसांतही येथे मोठा उत्सव असतो. देवीची आरती हा त्या उत्सवाचा महत्त्वाचा भाग असतो

उपयुक्त माहिती

  • मालवण बस स्थानकापासून दोन किमी अंतरावर
  • सिंधुदुर्ग व रत्नागिरी तालुक्यातील अनेक शहरांतून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने देव नारायण मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मिथुन धुरी, पुजारी, मो. ८७६६५२४७५१
Back To Home