मुंबईतील समृद्ध व्यापारी परिसराला काळबादेवी येथील मंदिराच्या स्थानामुळे काळबादेवी हे नाव मिळाले. येथील गजबजलेल्या काळबादेवी रस्त्यावरील इमारतींच्या गर्दीमध्ये या देवीचे प्राचीन आणि छोटेखानी मंदिर वसले आहे. येथील देवीची मूर्ती स्वयंभू आणि जागृत असल्याचे भाविक मानतात. ही देवी काली किंवा कालिका मातेचे एक रूप मानली जाते. काळबादेवी परिसरातील अनेक व्यापाऱ्यांची ती आराध्य देवता आहे. या देवीच्या कृपेने आपल्या व्यापारात वृद्धी होते या श्रद्धेमुळे येथील अनेक व्यापारी नित्यनेमाने दर्शनासाठी येतात.
कोकणातील अनेक गावांमध्ये काळबादेवीची मंदिरे आढळतात. काही ठिकाणी तिची काळंबादेवी म्हणून पूजा होते. रत्नागिरी तालुक्यात काळबादेवी (पुसाळे) नावाचे एक गाव आहे. तेथे काळबादेवी कालिका या नावानेही ओळखली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६६४ मध्ये पाया रचलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आश्रयाने विकसित झालेल्या मालवणची आद्यदेवताही काळबादेवी आहे. ती मालवणमधील देव रामेश्वर, देव नारायण, सांतेरी, जरीमरी तसेच गिरोबा,
गांगोबा अशा बारापाच मानल्या गेलेल्या देवतांच्या मालिकेतील एक देवता मानली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी नित्यपूजा म्हणून तेथील काळबादेवी देवस्थानास वर्षासन दिले होते. सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांची काळंबा रूपातील या देवीवर असीम श्रद्धा होती. कोकण किनारपट्टीवर आपली सत्ता गाजवलेल्या या पराक्रमी आंग्रे घराण्याची ही कुलदेवता आहे. या देवीची रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये ग्रामदेवता म्हणून पूजा केली जाते. तसेच मुंबईचा आद्य राजा प्रताप बिंब याचा सरचिटणीस गंभीरराव सूर्यवंशी यांचीही ती कुलदेवता होती.
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी संपादित केलेल्या ‘महिकावतीची बखर’ या ग्रंथातील नोंदीनुसार बाराव्या शतकात प्रताप बिंब या राजाने माहीम येथे आपली राजधानी स्थापन केली. ती राजधानी माहीम बिंबस्थान म्हणून ओळखली जात असे. हे बेट जिंकून घेतल्यानंतर प्रताप बिंबाने सोमवंशी, सूर्यवंशी आणि शेषवंशी अशा ६६ कुळांपैकी काही कुळांना येथे वस्ती करण्यासाठी पाचारण केले. आपल्या काही अधिकाऱ्यांना त्याने येथील काही गावे आणि पाडे वंशपरंपरागत इनाम म्हणून दुन दिले. त्यामध्ये त्याने गंभीरराव सूर्यवंशी यांना वरळी गाव दिले. प्रभावती देवी ही प्रताप बिंबाची कुलदेवता होती. त्याने आपल्या राजधानीत या प्रभादेवीचे मंदिर स्थापन केल्याचे सांगितले जाते. त्या वेळी या देवीसोबत त्याने सूर्यवंशी यांच्या कुलदेवतेची म्हणजेच कालिका मातेच्या मूर्तीचीही प्रतिष्ठापना केली.
‘द गॅझेटियर ऑफ बॉम्बे सिटी अँड आयलंड’ (खंड १, १९०९) या ग्रंथात माहीममधील कालिका देवीचा उल्लेख आहे. माहीम बेटावर काली किंवा कालिकादेवीचे मंदिर होते, असे त्यात म्हटले आहे. यावरून आगरी-कोळ्यांच्या या देवीचे स्वतंत्र मंदिरही तेथे असावे, असा निष्कर्ष निघतो. गॅझेटियरमधील नोंदीनुसार मुस्लिम सत्तेच्या काळात या मंदिराचे सध्याच्या काळबादेवी परिसरात स्थलांतर करण्यात आले. चौदाव्या शतकात पहिला मुबारक शहा हा गुजरातचा सुलतान होता. त्याने इसवी सन १३१८ मध्ये माहीम आणि सालशेत (साष्टी) हे भाग काबीज केले. या वेळी त्याच्या फौजेने येथील मुंबादेवीचे मंदिर उद्ध्वस्त केले.
त्या वेळी “या दडपशाहीच्या धोरणामुळेच महालक्ष्मी आणि तिच्या भगिनींनी आपल्या किनाऱ्यावरून तात्पुरते प्रस्थान केले,” अशी नोंद मुंबई गॅझेटियरचे लेखक एस. एम. एडवर्ड्स यांनी त्यांच्या ‘द राईज ऑफ बॉम्बे’ (१९०२) या पुस्तकात केली आहे. त्या काळात मुंबई बेटांवर नागरदेव ऊर्फ नागरशा याचे राज्य होते. इसवी सन १३४७ मध्ये मुबारक शहाचा सरदार मलिक निका आणि नागरशा यांनी भायखळा येथे मोठे युद्ध केले. त्यात नागरशाचा पराभव होऊन मुंबईवर मुस्लिम सत्ता स्थापन झाली. यावरून इसवी सन १३१८ किंवा इ.स. १३४७ नंतर कधी तरी माहीम येथील कालिका ऊर्फ कालबादेवीच्या मंदिराचे स्थलांतर करण्यात आले.
काळबादेवी परिसरात आल्यानंतरही या देवीच्या मंदिरास पुन्हा एकदा स्थलांतरास सामोरे जावे लागले. याचा उल्लेख इसवी सन १८६३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या गोविंद नारायण माडगावकर यांच्या ‘मुंबईचें वर्णन’ या पुस्तकात आढळतो. त्यांनी पुस्तकात लिहिले आहे, “काळबादेवीचे देवालयही फार पुरातन आहे आणि तें कोणी बांधिलें याचा बरोबर शोध लागत नाहीं. परंतु याची सध्या वहिवाट पळशे जोशी यांजकडे आहे. ज्यावेळीं सरकारानें काळबादेवीचा रस्ता वाढविला त्यावेळीं हे देऊळ मागें हटवायचा हुकूम करून जुनें देऊळ मोडविलें आणि त्याचा जीर्णोद्धार करून देवीची पुनः स्थापना करण्याचा खर्च सरकारानें दिला. ह्याची सर्व वहिवाट मयत रघुनाथ जोशी यांचकडे सोंपिली होती. रघुनाथ जोशी हे एथील मूळ स्थायिक होते आणि मोठे प्रख्यात गृहस्थ होते. पूर्वीं मुंबई बेटांत वैद्य म्हटले म्हणजे हेच लोक आणि अद्यापिही हे लोक बहुधा तोच धंदा चालवितात. मुंबईतील उपाध्येगिरीचें काम हेच पूर्वीं चालवत असत.” ‘द गॅझेटियर ऑफ बॉम्बे सिटी अँड आयलंड’ या ग्रंथातही हे मंदिर हलवण्यात आल्याच्या घटनेस दुजोरा मिळतो.
अठराव्या शतकात ब्रिटिशांनी मुंबईचा भूगोल मोठ्या प्रमाणावर बदलला. या शतकात ब्रिटिशांनी मुंबईची सात बेटे एकमेकांस जोडली. इसवी सन १७१० च्या सुमारास शीव ते धारावी आणि धारावी ते माहीम असा बांध घालण्यास सुरुवात झाली.
या बांधांमुळे माहीम ते शीव दरम्यानच्या खाडीतून घुसून आजच्या प्रभादेवीपर्यंत जाणारे समुद्राचे पाणी अडवण्यात आले. यानंतर इसवी सन १७११-१२ दरम्यान माहीम आणि वरळी बेटांमध्ये बांध घालण्यात आला. त्याचप्रमाणे उमरखाडीची खिंड तसेच माझगाव आणि परळ बेटातील खाडीही बुजवण्यात आली. इसवी सन १७८४ पर्यंत हॉर्नबी व्हेलार्ड हा बांध घालून वरळीची खिंड बुजवण्यात आली. यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध झाली आणि तेथे नव्याने वस्ती होऊ लागली. तसेच जुनी वस्ती व रस्ते यांची पुनर्रचना करण्यात येत होती. याचाच भाग म्हणून हॉर्नबी व्हेलार्ड पूर्ण झाला त्याच वर्षी म्हणजे इ.स. १७८४ मध्ये काळबादेवी परिसरातील रस्त्याचेही रुंदीकरण करण्यात आले. सॅम्युएल टी. शेफर्ड यांच्या ‘बॉम्बे प्लेस नेम्स अँड स्ट्रीट नेम्स’ (१९१७) या पुस्तकानुसार कर्नाक रोड ते परेल रोड असा काळबादेवी भागातील रस्ता अत्यंत अरुंद होता. त्या रस्त्याचा मोठा भाग काळबादेवी मंदिराने व्यापला होता. रघुनाथ जोशी यांच्याकडे या मंदिराची मालकी होती. सरकारने त्यांच्याशी बरीच वाटाघाट केली आणि अखेर मंदिराची जागा ताब्यात घेऊन त्याऐवजी नवे मंदिर बांधून देण्याचे ठरवले. त्यानुसार इसवी सन १७८४-८५ मध्ये काळबादेवीच्या या नव्या मंदिराची स्थापना झाली.
बाळकृष्ण बापू आचार्य आणि मोरो विनायक शिंगणे यांनी इसवी सन १८८९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘मुंबईचा वृत्तांत’ या पुस्तकात तत्कालीन मंदिराचे वर्णन केले आहे. ते त्यात लिहितात, “हें देऊळ लहानच आहे आणि टुमदार आहे. घुमटाच्या बाजूला चार कोपऱ्यांवर चार ब्राह्मण बसविले आहेत. दरवाज्यांत दोन दिपमाळी आहेत… ह्या देवीस कालिका देवी असेंही ह्मणतात.” गेल्या २४० वर्षांपासून हे कालिका ऊर्फ काळबादेवीचे मंदिर सध्याच्या ठिकाणी उभे आहे. मधल्या काळात मंदिराभोवती उंच इमारती उभ्या राहिल्या. वेळोवेळी मंदिराची दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्यात आले. त्यामुळे मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पदपथाला जोडून असलेला उंच ओटा, त्यामधील तीन पायऱ्या आणि समोर मंदिराचे साधे प्रवेशद्वार आहे. ओट्यावर दोन कोपऱ्यांत उभ्या असलेल्या दोन दगडी दीपमाळा मंदिराच्या प्राचीनत्वाच्या खुणा जपतात. एका बाजूला पुष्पहारांचे छोटे दुकान आहे. असे या मंदिराचे दर्शनी स्वरूप आहे. मंदिराच्या द्वारचौकटीवर नक्षीकाम केलेला चंदेरी पत्रा जडवला आहे. चौकटीच्या ललाटबिंबस्थानी देवीची कमलासनावर बसलेली चतुर्भुज कोरीव मूर्ती आहे. गर्भगृहात उंच वेदीवर तीन शिखरांचे चंदेरी मखर आहे. या मखराच्या दर्शनी भागात कडेच्या खांबांवर देवीच्या सेविकांच्या चांदीच्या दोन वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहेत. मखरात मध्यभागी काळबादेवीची मोठी मूर्ती प्रतिष्ठित आहे. मूर्तीला चांदीचा मुखवटा आहे. मोठे कोरीव डोळे, नाकात मराठमोळी नथ आणि मस्तकावर चांदीचा मुकुट अशा रूपातील या देवीला भरजरी वस्त्रे, अलंकार आणि पुष्पमालांनी शृंगारले आहे. देवीच्या मागे त्रिशूळ आहे आणि वर चांदीचे छत्र आहे. काळबादेवी ही कालीमातेचे रूप असले तरी ती येथे उग्र स्वरूपात नाही. ‘महानिर्वाण तंत्र’ या ग्रंथातील नोंदीनुसार काली जेव्हा सृष्टिकर्मात निमग्न असते, तेव्हा ती रजोगुणी व रक्तवर्णी असते. ती जेव्हा संहारक्रियेत मग्न असते, तेव्हा तमोगुणी व काळी असते. जेव्हा ती विश्वस्थितीच्या कार्यात असते, तेव्हा ती सत्त्वगुणी व गौर असते. काळबादेवीची येथील मूर्ती अशीच सत्त्वगुणी व गौर स्वरूपाची आहे. तिच्या एका बाजूला राजराजेश्वरी आणि दुसऱ्या बाजूला महालक्ष्मी मातेच्या चांदीच्या दोन लहान मूर्ती आहेत. या मूर्तीही मुखवटा रूपात आहेत. मंदिरावर घुमटाकार शिखर आहे. त्यावर विटांमध्ये बांधलेला मोठा कलश आहे आणि त्यावर धातूचा द्विस्तरीय कलश आहे.
सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत या मंदिरात भाविकांना देवीचे दर्शन घेता येते. नवरात्र उत्सव हा या मंदिरातील सर्वांत मोठा उत्सव आहे. हा उत्सव येथे साधेपणाने परंतु मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ही देवी जागृत आहे आणि ती आपल्या मनोकामना पूर्ण करते अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे अनेक भाविक देवीला नवस करतात. नवरात्राच्या काळात नवस फेडण्यासाठी अनेक भाविक येथे येतात. मार्गशीर्ष अमावस्या हा मंदिराचा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. या वेळी येथे देवीची विशेष पूजा करण्यात येते. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील डिगस गावातील काळंबादेवी मंदिराची यात्राही याच मार्गशीर्ष महिन्यात (कृष्ण त्रयोदशी) भरते.