भक्तांच्या हाकेला धावून येणारी व नवसाला पावणारी देवी, अशी जिच्यावर असंख्य भाविकांची श्रद्धा आहे त्या काळंबादेवीचे देखणे मंदिर डिगस येथे आहे. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे दसरा मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो; परंतु तो शारदीय नवरात्रीच्या दहाव्या दिवशी म्हणजे अश्विन शुद्ध दशमीऐवजी नवरात्रीच्या नवव्या दिवशीच साजरा केला जातो. या दिवशी काळंबादेवीच्या मंदिरात देवांचा विवाह सोहळाही मोठ्या थाटात व साग्रसंगीत होतो.
काळंबादेवी ही आदिशक्ती दुर्गेचे रूप मानली जाते. पुराणांनी दुर्गेची रौद्र व सौम्य अशी दोन रूपे वर्णिली आहेत. चंडी या स्वरूपात ती चतुर्भुजा, अष्टभुजा, दशभुजा व अष्टादशभुजा अशा स्वरूपातही आढळते. डिगस येथील काळंबादेवी मूर्ती चतुर्भुजा व शस्त्रधारिणी रूपात आहे. सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांची काळंबा देवीवर असीम श्रद्धा होती. ही देवी आंग्रे घराण्याची कुलदेवता तसेच रायगड जिल्ह्यातील अलिबागची ग्रामदेवता आहे. कान्होजी आंग्रे यांचे घराणे मूळचे पुणे जिल्ह्यातील काळोसे येथील होते. मात्र कान्होजी यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे या गावी झाला. कोकणच्या किनारपट्टीवर त्यांनी व त्यांच्या आरमाराने गाजवलेल्या पराक्रमामुळे छत्रपती राजाराम महाराज यांनी त्यांचा ‘सरखेल’ या किताबाने गौरव केला होता. कोकण किनारपट्टीवर आपली सत्ता गाजवलेल्या या पराक्रमी आंग्रे घराण्याचे श्रद्धास्थान असलेल्या काळंबादेवीची मंदिरे कोकणातील अनेक गावांमध्ये आहेत.
डिगस येथील काळंबादेवीचे मंदिर भव्य व आधुनिक बांधणीचे आहे. मंदिरासमोर असलेल्या मोठ्या चौथऱ्यावर आठ स्तरांची दीपमाळ व त्यावर आमलक आहे. दीपमाळेच्या शेजारी चौथऱ्यावर तुळशी वृंदावन आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. येथील मुखमंडप व सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचे आहेत. यामध्ये बाह्यभिंतींऐवजी त्या जागेवर भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. मुखमंडपावर पिरॅमिडसारखे शिखर व त्यावर लहान पाच कळस आहेत. कौलारू सभामंडपावरही सात कळस आहेत. मुखमंडप व सभामंडपाच्या मध्यभागी अनेक स्तंभ आहेत. या स्तंभांच्या वरच्या बाजूला भक्कम व नक्षीदार तुळया आहेत. या तुळयांना सोनेरी रंग दिल्यामुळे त्या आणखी खुलून दिसतात. कोकणी स्थापत्य शैलीनुसार सभामंडपाचा मधला आयताकृती भाग हा बाजूच्या जमिनीपासून काही इंच खोलगट आहे. अंतराळाच्या प्रवेशद्वाराजवळ जमिनीपासून काहीशा उंचीवर असलेल्या लहान चौथऱ्यावर स्थानिक देवता, तिच्या पादुका व काळ्या पाषाणातील नंदी आहे. सभामंडपाच्या पुढील बाजूस असलेल्या पाच पायऱ्या चढून अंतराळात प्रवेश होतो. अंतराळाचे प्रवेशद्वार लाकडी आहे. त्यावर वेलबुट्टीची वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर केलेली दिसते. या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर लाकडातून गणेशमूर्ती कोरलेली आहे. हे अंतराळ बंदिस्त आहे व यामध्ये प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. अंतराळात एका बाजूस पाच दैवतांच्या तरंगकाठ्या आहेत.
अंतराळाप्रमाणे गर्भगृहाची द्वारपट्टीही लाकडी व नक्षीकाम केलेली आहे. या द्वारपट्टीच्या ललाटबिंबावर ओम कोरलेला आहे. गर्भगृहात एका उंच संगमरवरी वज्रपीठावर काळंबादेवीची काळ्या पाषाणातील मूर्ती व त्या बाजूला अन्य परिवारदेवता आहेत. काळंबादेवी ही देव रवळनाथाची बहीण मानली जाते. अंतराळाच्या वर घुमटाकृती शिखर आहे. या शिखरावर आमलक व कळस आहे. मंदिराचे मुख्य शिखर गर्भगृहावर आहे. या शिखरावर अनेक देवकोष्ठके आहेत. त्यावरही मोठा आमलक व त्यावर सुंदर पितळी कळस आहे.
या मंदिरात दरवर्षी नवरात्रीच्या नवव्या दिवशी दसरा महोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. या दिवशी देवांचे पूजन, रुजवण म्हणजे पंचधान्य रुजवून ते देवाला अर्पण करण्याचा सोहळा असतो. या वेळी तरंगकाठ्यांची मिरवणूक म्हणजेच देवांची वारी काढली जाते. त्याच प्रमाणे येथे देवांचे लग्न लावले जाते. त्यास शिवलग्न असे म्हणतात. मंदिराबाहेर हा मोठा सोहळा असतो. यावेळी तरंगकाठ्यांच्या मध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हटली जातात. देवांवर अक्षता टाकल्या जातात. या लग्नानंतर येथे ढोल–ताशांच्या गजरात सोने लुटले जाते. मंदिर परिसरात शमीचे म्हणजेच आपट्याचे झाड आहे. ग्रामस्थ मंडळी हिरीरीने शमीची पाने लुटतात. एकमेकांना ही पाने देऊन गळाभेट घेतली जाते. यानंतर मंदिरातील देव येथील लिंगेश्वर मंदिरात भेटीस मिरवणुकीने नेले जातात. अश्विन शुद्ध नवमीला साजऱ्या केल्या जाणाऱ्या या विजयादशमी सोहळ्यास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
याच प्रमाणे येथील जत्रा हा एक महत्त्वाचा उत्सव असतो. मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशीला येथे जत्रोत्सव असतो. त्या वेळी सकाळी देवीची ओटी भरणे, तसेच देवांचे पूजन केले जाते. सायंकाळी दशावतारी नाटकाचा खेळ होतो. या यात्रेच्या वेळी परिसरात विविध साहित्य व खाद्यपदार्थांची दुकाने लागतात. मंदिरासह अवघा परिसर विद्युत दिव्यांनी सजवला जातो. या सोहळ्यास बाहेरगावी नोकरी–व्यवसायानिमित्ताने गेलेले चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित असतात.