करवीर नगरीत शिल्पसौंदर्याने नटलेली आणि वास्तुकलेचा सुंदर आविष्कार असलेली अनेक प्राचीन मंदिरे आहेत. या मंदिरांना ऐतिहासिक वारसा आणि पौराणिक महत्त्व आहे. अशा या नगरीमध्ये ऐतिहासिकतेबरोबरच आधुनिक कलेचा वारसा लाभलेले एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. ‘कैलासगडची स्वारी’ या अनोख्या नावाने हे मंदिर ओळखले जाते. येथील शिवलिंग हे स्वयंभू आणि जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा असल्याने येथे दर्शनासाठी असंख्य लोक येत असतात. त्याचबरोबर या मंदिरातील कलायोगी जी. कांबळे यांचा बहुमूल्य चित्रसंग्रह हाही अनेकांच्या आकर्षणाचा विषय आहे.
कोल्हापूरच्या मंगळवारपेठ या मध्यवस्तीत आणि केशवराव भोसले सभागृहाजवळ ‘कैलासगडची स्वारी’ मंदिर आहे. या मंदिराचे नाव अत्यंत आगळेवेगळे असल्याने अनेकांना त्याबाबत कुतूहल असते. कैलासगडावर कोणी स्वारी केली, कधी केली, असे प्रश्न लोकांच्या मनात उमटतात. ‘स्वारी’ हा शब्द मोहीम या अर्थाने मराठीत रूढ असला, तरी या शब्दाचा मराठी व्युत्पत्तीकोशातील अर्थ ‘घोड्यावरील बैठक’ असा आहे व घोड्यावर बसणारा मनुष्य या अर्थाने या शब्दाचे सामान्यीकरण झाले आहे. जुन्या मराठीत ‘इकडची स्वारी आली’ वगैरे उद्गार रूढ होते. त्याच अर्थाने येथे हा शब्द आहे. कैलासगडावरील शंकरास उद्देशून स्वारी हा शब्द वापरलेला आहे. येथील शिवलिंगाचे स्थान हे प्राचीन आहे व साधारणतः १९६० मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
या मंदिराशी कोल्हापूरचे वैभव असलेले कलायोगी जी. कांबळे यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. जी. कांबळे अर्थात गोपाळ बळवंत कांबळे हे कोल्हापूरमधील थोर चित्रकार. त्यांनी चितारलेली असंख्य व्यक्तीचित्रे आज लोकस्मृतीत ठाण मांडून आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, म. जोतिबा फुले, राष्ट्रपिता म. गांधी, शाहू महाराज, लोकमान्य टिळक, पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लालबहादूर शास्त्री, जॉन एफ. केनेडी, व्लादिमीर लेनीन अशा अनेक राष्ट्रपुरुषांची, दिग्गज नेत्यांची उत्कृष्ट तैलचित्रे त्यांनी रंगविली आहेत. त्यांची एक सर्वांत महत्त्वाची कलाकृती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र. सतत पाच वर्षे अभ्यास आणि चिंतन करून त्यांनी २ मार्च १९७० रोजी चितारलेल्या महाराजांच्या तैलचित्रास महाराष्ट्र शासनाने शिवरायांचे अधिकृत चित्र म्हणून राजमान्यता दिलेली आहे. हे चित्र मुंबईत मंत्रालयामध्ये ठेवलेले आहे. विशेष म्हणजे या चित्रासाठी त्यांनी रॉयल्टी म्हणून एक पैसाही शासनाकडून घेतला नव्हता. देवाचे चित्र काढण्यासाठी पैसे घ्यायचे नसतात असे त्यांनी त्यावेळचे शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांना सांगितले होते. त्यांनी काढलेल्या चित्रांवरूनच भारत सरकारने शिवराय आणि शाहू महाराज यांची टपाल तिकिटे प्रकाशित केली. या शिवाय त्यांनी रंगविलेली अनेक चित्रपटांची पोस्टर्सही गाजली. के. असिफ यांच्या ‘मुगल-ए-आझम’ या चित्रपटाचे भव्य पोस्टर त्यांनी चितारलेले होते. पोस्टर पेंटिंगला अभिजात दर्जा देण्याचे श्रेय त्यांच्याकडेही जाते. तेव्हाची ती पोस्टर आज हजारो रुपयांना विकली जातात.
कलायोगी जी. कांबळे हे कोल्हापूरच्या मंगळवार पेठेत राहात असत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व सहयोगाने येथील मंदिराचे १९७२ मध्ये अत्यंत कलात्मक पद्धतीने नूतनीकरण करण्यात आले. मंदिर असलेल्या आळीच्या सुरुवातीलाच जांभ्या दगडात बांधलेली मोठी प्रवेशकमान आहे. ३० फूट उंच व २० फूट रुंद अशा या कमानीवर ललाटबिंबस्थानी गणरायाची पितळी मूर्ती आहे. येथून काही अंतरावर पुढे जाताच सर्वप्रथम दृष्टीस पडतात त्या भव्य समया. दीड टन वजनाच्या आणि २२ फूट उंचीच्या या समयांची रचना खालच्या बाजूस दीपस्तंभ आणि वर समई अशी आहे. विजेच्या दिव्याने त्या उजळल्या जातात.
कैलासगडची स्वारी मंदिर हे काळ्या पाषाणात बांधलेले आहे. मंदिराची उंची दोन मजल्याएवढी आहे. प्रवेशद्वारासमोर मोठा नंदीमंडप आहे. त्यास कोरीव नक्षीकाम असलेला सोनेरी पत्रा लावलेला आहे. तेथे संगमरवरी चौथऱ्यावर नंदीची मोठी पितळी मूर्ती आहे. मंदिराच्या रुंद प्रवेशद्वाराच्या कमानदार चौकटींवर शंख आणि बेलाची पाने यांचे सुबक नक्षीकाम व वरच्या बाजूस गजप्रतिमा आहेत. येथे ललाटबिंबस्थानी गणेशाची संगमरवरी मूर्ती आहे. या मुख्य प्रवेशद्वाराच्या डावीकडे एक छोटे प्रवेशद्वार आहे. त्याच्या वरच्या बाजूस पितळी कीर्तिमुख आहे. मंदिराच्या बाह्यभिंतीवर डाव्या बाजूला ब्राँझची सूर्याची आणि उजवीकडे चंद्राची प्रतिमा दिसते. याच भिंतीवर ‘सत्यम्, शिवम्, सुंदरम्’ची पाषाणातील शब्दचित्रे आहेत व त्याखाली पितळी ओमकार व काळ्या पाषाणातील नंदीचे उठावशिल्प आहे. या बाह्य भिंतीच्या अगदी वरच्या बाजूला धनुष्यबाणाचा आकार साकारण्यात आला आहे. मुख्य गाभाऱ्यावर संगमरवरी शिखर व त्यावर सोनेरी कळस आहे. मंदिराच्या उजव्या बाजूस नगारखाना आहे.
मंदिरास प्रशस्त सभामंडप आहे. याला दरबार हॉल असे म्हणतात. या हॉलमध्ये कलायोगी जी. कांबळे यांनी काढलेली काही तैलचित्रे आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा, अर्जुनास कृष्णाचा गीता उपदेश, राजर्षी शाहू महाराज यांच्या तैलचित्रांचा समावेश आहे.
मंदिराच्या गर्भगृहाची द्वारचौकट बारीक नक्षीकाम केलेली आहे. येथे शैव द्वारपालांची धातूत कोरलेली मोठी उठाव शिल्पे आहेत. त्यांच्या वरच्या बाजूला श्रीराम आणि कृष्णाच्या सुंदर तसबिरी आहेत. ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती आहे व गणेशाच्या मस्तकी मोठा नागफणा आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस छत्रपती शिवाजी महाराज यांचे मोठे राज्यमान्य तैलचित्र आहे, तर उजव्या बाजूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे अत्यंत सुंदर असे चित्र आहे. मावळत्या सूर्याची किरणे रायगडावरील समाधीवर पडत आहेत व त्यामागे धूसर अशी महाराजांची प्रतिमा दिसत आहे, अशा प्रकारचे हे अद्वितीय चित्र आहे.
गर्भगृहाच्या द्वारचौकटीच्या वरील बाजूस असलेले ध्यानस्थ महादेवाचे, गणरायाचे नृत्य करतानाचे व सरस्वतीमातेचे वीणावादन करत असतानाचे, तसेच महादेवाचे तांडवनृत्य करतानाचे चित्र लक्ष वेधून घेते. गर्भगृहात चांदीत घडविलेल्या स्वारीच्या पादुका आणि शिवलिंग आहे. बाजूला चांदीची गणेशमूर्ती, भवानी मूर्ती, शेषनारायण स्वारीची काठी, पाठ, त्रिशूल, हनुमानाची मूर्ती, तसेच राजदंड आहे. समुद्रमंथनाच्यावेळी भगवान शंकराने हलाहल विषाचे प्राशन केले होते. तो प्रसंग चित्रित केलेले तैलचित्र गाभाऱ्याच्या मागील भिंतीवर लावण्यात आले आहे.
या मंदिरात पहाटे पाच वाजता नगारा, त्यानंतर पूजा, मंगल आरती, धूप-दीप पूजा होते. संध्याकाळी ६.३० वाजता ग्रंथवाचन आणि रात्री ८ वाजता आरती आणि मंत्रपुष्पांजली असे दैनंदिन विधी होतात. होळीच्या दिवशी मंदिराचा वर्धापन दिन साजरा केला जातो. या प्रसंगी ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, सोंगी भजन आदी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या वेळी सत्यनारायण महापूजा, मैदानी खेळ यांचेही आयोजन केले जाते.