धाराशिव जिल्ह्यात देवींची अनेक प्राचीन व प्रसिद्ध मंदिरे आहेत. साडेतीन शक्तिपिठांपैकी एक तुळजाभवानीचे मंदिर याच जिल्ह्यात तुळजापूर येथे आहे. या शिवाय धाराशिवची धारासुरमर्दिनी, येरमळ्याची येडेश्वरी, हातलादेवी, टेंभीआई, चौंढेश्वरी व येल्लमा अशा अनेक देवींची मंदिरे या जिल्ह्यात आहेत. एकंदरीत धाराशिव जिल्ह्यात शाक्तपंथीय मंदिरांची संख्या अधिक आहे, असे म्हणता येईल. याच जिल्ह्यातील वाशी तालुक्यात पारा या गावी कागदंबा देवीचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. पाऱ्याची आई म्हणूनही हे देवस्थान प्रसिद्ध आहे.
हेमाडपंती स्थापत्यशैलीचे दगडी बांधकाम असलेले हे मंदिर सुमारे आठशे वर्षांपूर्वीचे आहे. मंदिराची अख्यायिका अशी की प्राचीन काळी या भागावर कागदासुर राक्षसाचे राज्य होते. राज्यातील रयतेवर राक्षसाचे अत्याचार वाढल्याने प्रजा त्राहीमाम झाली होती. या जुलमातून आपली मुक्तता करावी म्हणून प्रजेने जगदंबा देवीची मनधरणी केली. देवीने या ठिकाणी कागदासुर राक्षसाचा वध केला. तेव्हा प्रजेच्या रक्षणासाठी व कल्याणासाठी देवीने याच ठिकाणी स्थापित व्हावे, अशी देवीभक्तांनी विनंती केल्याने देवी मूर्ती रूपात येथे स्थीत झाली. कागदासुर राक्षसाला मारल्याने देवी कागदंबा या नावाने प्रसिद्ध झाली.
गावापासून काही अंतरावर असलेल्या या मंदिरापर्यंत पक्का रस्ता आहे. मंदिराच्या सामोर कल्लोळ कुंड आहे. या कोरीव पाषाणात बांधलेल्या कुंडात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. असे सांगितले जाते की या कुंडातील पाणी कधीही आटत नाही. येथे शुचिर्भूत होऊन मंदिरात दर्शनाला जाण्याची प्रथा आहे. मंदिराभोवती सुमारे पंधरा फूट उंचीची भक्कम तटबंदी आहे. या तटबंदीत दुमजली प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला तटबंदीच्या दर्शनी भिंतीत दीपकोष्टके आहेत. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा व द्वारशाखांवर अस्पष्ट नक्षी आहे. प्रवेशद्वाराच्या आत दोन्ही बाजूला पहारेकरी कक्ष व वरील मजल्यावर नगारखाना आहे. नगारखान्यात जाण्यासाठी प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूने पायऱ्या आहेत.
प्रवेशद्वारापासून सभामंडपापर्यंत फरशी आच्छादित पायवाट आहे. दगडी फरसबंदी प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. मंदिरासमोर दोन्ही बाजूला दगडी बांधणीच्या प्राचीन गोलाकार दीपमाळा आहेत.
सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या समोर चौथरा आहे. चौथऱ्यापुढे चार स्तंभांवर तीन कमानी असे प्रवेशद्वाराचे स्वरूप आहे. प्रांगणापेक्षा उंच असलेल्या सभामंडपात येण्यासाठी सात पायऱ्या आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी चार चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. सर्व स्तंभ एकमेकांना अर्धचंद्राकार कमानीने जोडलेले आहेत. प्रत्येक चार स्तंभांच्या मधील वितान घुमटाकार आहे. सभामंडपात जमिनीवर कासव शिल्प आहे.
सभामंडपापेक्षा गर्भगृह उंचावर असल्यामुळे चार पायऱ्या चढून यावे लागते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर वेलबुट्टी नक्षी व स्तंभनक्षी आहे. प्रवेशद्वाराच्या लाकडी जाळीदार झडपा रजतपटल अच्छादित आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर देवीची पाषाण मूर्ती आहे. देवीच्या मस्तकी चांदीचा मुकुट, चांदीचे डोळे, नाकात मोत्यांची नथ, अंगावर वस्त्रे व विविध अलंकार आहेत. मूर्तीसमोर पादुका आहेत. देवी मूर्तीच्या बाजूला देवीच्या शक्तीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. वज्रपिठाच्या मागील प्रभावळीवर पानाफुलांची नक्षी आहे. गर्भगृहाच्या छतावर चारही कोनांवर चार वामनस्तंभ, त्यावर आमलक व कळस आहेत. छतावर चार थरांचे भूमीज शैलीतील शिखर आहे. खालील तीन थरात चारही बाजूंना देवकोष्टके व स्तंभनक्षी आहेत. चौथ्या थरात चारही बाजूंना लघूशिखरे व मध्यभागी आमलक आहे. आमलकावर कळस व ध्वजपताका आहे.
वैशाख पौर्णिमा व आश्विन पौर्णिमेला देवीचे वार्षिक उत्सव साजरे केले जातात. दोन्ही उत्सवांच्या वेळी देवीची पालखी मिरवणूक निघते. ढोल ताशांच्या गजरात व गुलाल उधळीत देवीचा पालखी सोहळा साजरा केला जातो. यावेळी हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी, नवस फेडण्यासाठी व पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येतात. उत्सवांच्या वेळी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात्रेनिमित्त देवीच्या परड्या भरण्याची व खणा नारळाने देवीची ओटी भरण्याची प्रथा आहे. याशिवाय मंदिरात चैत्र पाडवा, शारदीय नवरात्र, दसरा, दिवाळी आदी सण व उत्सव साजरे केले जातात. दर महिन्याच्या पौर्णिमेला तसेच मंगळवार, शुक्रवार आदी दिवशी मंदिरात भाविकांची विशेष गर्दी असते. दररोज सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात दर्शन घेता येते.