कड्याचा महादेव मंदिर

घागरदरा, ता. कंधार, जि. नांदेड

चराचरात वास करणारा, भावाचा भुकेला आणि निर्गुण निराकार परमेश्वर भक्तांच्या उद्धारासाठी विविध रूपात प्रकट होतो. थकल्याभागल्या जीवाला दिलासा मिळण्यासाठी माती, पाषाण, काष्ठ अथवा निसर्गरूपातील देवाचे दर्शन पुरेसे ठरते. देव प्रकट होण्याच्या हजारो कथाआख्यायिका जनमानसात प्रचलित आहेत. अशाच एका भक्ताच्या विनवणीनुसार कंधार तालुक्यातील घागरदरा गावात डोंगराच्या कड्यावर प्रकटलेल्या महादेवाचे मंदिर प्रसिद्ध आहे. येथील जागृत महादेव नवसाला पावतो व हाकेला धावून येतो व निसर्गसौंदर्याने नटलेला मंदिराचा हा परिसर देवत्वाची प्रचिती देतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

घागरदरा येथील महादेव मंदिराबाबत आख्यायिका अशी की सुमारे तीनशे ते चारशे वर्षांपूर्वी एक शिवभक्त योगी या निसर्गरम्य परिसरात ध्यानमग्न होते. तेव्हा त्यांना महादेवाने दृष्टांत देऊन आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. त्यानुसार योगी महाराजांनी डोंगर कड्यावर उत्खनन केले असता, त्यांना शिवपिंडी दृष्टीस पडली. महाराजांनी पिंडीच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून घेतला व शिवपिंडीस अभिषेक करून त्याच ठिकाणी मंदिर बांधले. त्यानंतर आसपासच्या परिसरातील भाविक नित्यनेमाने महादेवाच्या दर्शनास येऊ लागले. भाविकांना या जागृत देवस्थानाची प्रचिती येऊ लागली. देव नवसाला पावतो, अशी ख्याती पसरल्याने हजारो भाविक या देवाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करू लागले.

मंदिरासमोरील प्रशस्त वाहनतळापर्यंत पक्की सडक आहे. वाहनतळावर भाविकांना बसण्यासाठी जागोजागी आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. येथून प्रांगणात उतरण्यासाठी मंदिराच्या तिन्ही बाजूंनी सुमारे पन्नास पायऱ्या आहेत. मंदिर डोंगराच्या कड्यात वसलेले असल्याने या मंदिरास ‘कड्याचा महादेव मंदिर’ या नावाने ओळखले जाऊ लागले. मंदिराचे प्रांगण फरसबंदी आहे. या प्रांगणात प्रवेशद्वारासमोर लहान दीपस्तंभ आहे. दीपस्तंभाच्या बाजूला असलेल्या मेघडंबरीत नंदी आहे. मेघडंबरीवर आमलक आणि त्यावर कळस आहे. या मेघडंबरीपुढे लहान मंडप आहे. येथे शेकडो नंदी व त्यांच्या समोर शिवपिंडी आहेत. असे सांगितले जाते की हे नंदी व शिवपिंडी मंदिराच्या मागील बाजूस वाहत असलेल्या नदीत सापडले आहेत. नदीतील पाण्याची शुद्धता व शक्ती वाढण्यासाठी पाण्यात शिवपिंडी ठेवण्याची पद्धत पूर्वीच्या काळी प्रचलित होती.

मंदिरासमोर सुमारे सात फूट उंच त्रिशूलडमरूची प्रतिकृती आहे. फक्त गर्भगृह असलेल्या मंदिराच्या बाह्य बाजूला चारही कोनांवर गोलाकार उभ्या धारेच्या नक्षी असलेले स्तंभ व त्यालगत सिंह शिल्प आहेत. मंदिराच्या भोवतीने लोखंडी जाळ्या लावलेल्या आहेत. मंदिरास समोर व डाव्या बाजूला अशी दोन प्रवेशद्वारे आहेत. मंदिरात मध्यभागी वज्रपीठावर विशाल शिवपिंडी आहे. या पिंडीवर जलाभिषेक करणारे पितळी अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे.

मंदिराच्या छतावर सात थरांचे चौकोनी शिखर आहे. या शिखराच्या पहिल्या चार थरात चारही बाजूंना प्रत्येकी एक दीपकोष्ठक आहे, ज्यामध्ये विविध देवतांच्या व साधूसंतांच्या प्रतिमा आहेत. शिखराच्या पहिल्या थरात चारही कोनांवर नंदी शिल्पे आहेत, तर त्यावरील थरात कोनांवर गजराज शिल्पे आहेत. तिसऱ्या थरातील देवकोष्ठकात श्रीकृष्ण व दोन्ही बाजूला गोमाता शिल्प आहेत. शिखराच्या चौथ्या थरातील देवकोष्ठकात संत तुकाराम व दोन्ही बाजूस गरुड व हनुमंत शिल्पे आहेत. पाचव्या थरातील देवकोष्ठात विठ्ठल मूर्ती आहे, तर वरच्या थरात तुलसी वृंदावन आहेत. शिखरात शीर्षभागी आमलक व त्यावर कळस आहे.

मंदिराच्या बाजूला स्थानिक देवतांची लहान मंदिरे व महंतमठ आहे. मंदिराच्या मागे प्रशस्त पायरीमार्ग आहे. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस स्टेनलेस स्टीलचे सुरक्षा कठडे आहेत. या पायरीमार्गाने मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या नदीपात्रात जाता येते.

महाशिवरात्री व श्रावण मास हे येथील मुख्य वार्षिक उत्सव आहेत. या काळात अनेक भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येथे येतात. यावेळी मंदिर परिसरात विविध वस्तूंची दुकाने थाटली जातात. मंदिराचा निसर्गरम्य परिसर, स्वच्छ हवा, नदी किनारा व शांतता अनुभवण्यासाठी तसेच नदीवर स्नानासाठी येणाऱ्या भाविकांची व पर्यटकांची संख्या मोठी असते. मंदिरात सोमवार, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी भाविकांची वर्दळ असते.

उपयुक्त माहिती:

  • कंधार येथून १८ किमी अंतरावर
  • नांदेड येथून ५४ किमी अंतरावर
  • कंधार येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही

कड़यचा महादेव मंदिर

घगरदरा, ता. कंधार, जिला. नांदेड़

Back To Home