लिंगायत शैवांच्या काडसिद्धेश्वर परंपरेतील सर्वोच्च स्थान म्हणून ओळखला जाणारा सिद्धगिरी महासंस्थान तथा मठ करवीर तालुक्यातील कणेरी गावात आहे. हे काडसिद्धेश्वर परंपरेतील स्थिरपीठ मानले जाते. धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला हा मठ धार्मिक पर्यटनकेंद्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. येथे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. कडप्पा मंदिर म्हणूनही ते ओळखले जाते. येथील महादेवाचे स्थान सुमारे सातव्या शतकापासून असल्याचे सांगण्यात येते. या प्राचीन महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची सतत रीघ असते.
कणेरी येथील सिद्धिगिरी मठास सुमारे ७५० वर्षांची परंपरा असल्याचे सांगण्यात येते. नवनाथ संप्रदायातील रेवणनाथ हे काडसिद्धेश्वर परंपरेचे संस्थापक आणि पहिले काडसिद्धेश्वर मानले जातात. नवनाथांच्या ‘नवनाथ भक्तिसार’ या ग्रंथात रेवणनाथांचे चरित्र नमूद आहे. ते गोरक्षनाथांचे समकालिन मानले जातात. थोर संशोधक रा. चिं. ढेरे यांच्या ‘नाथ संप्रदायाचा इतिहास’ या ग्रंथानुसार इ.स. १०५० ते ११५० या दरम्यान गोरक्षनाथ होऊन गेले. हाच रेवणनाथ यांचा काळ. ते नाथसिद्धच होते. काडसिद्ध या नावाचेही एक नाथसिद्ध होते, असे रा. चिं. ढेरे यांनी म्हटले आहे. रेवणनाथ आणि काडसिद्ध यांचा संबंध नाथपरंपरेप्रमाणेच लिंगायत परंपरेशीही आहे. असे सांगितले जाते की या रेवणनाथ किंवा काडसिद्धेश्वर यांनी कणेरी येथील मठाची स्थापना केली.
या मठाच्या परिसरात काडसिद्धेश्वर यांच्याच नावाने ओळखले जाणारे हे पुरातन शिवमंदिर आहे. चौदाव्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. रस्त्यावर उभारलेल्या भव्य अशा प्रवेशद्वारातून पायरीमार्गाने मंदिर परिसरात प्रवेश होतो. या प्रवेशद्वारानजीक शंकर आणि नंदीची महाकाय मूर्ती आहे. पायऱ्यांवरून वर येताच दोन्ही बाजूंना गजराजांचे मोठे पुतळे आहेत. या गजराजांच्या वर माहुत आणि अंबारी आहे. एका अंबारीत वादकांचे, तर दुसऱ्या अंबारीत पूजेस निघालेल्या स्त्रियांचे सुबक पुतळे आहेत. समोरच महादेव मंदिर परिसराचे दगडी महाद्वार आहे. या द्वारातील देवळीमध्ये गणेशाची सुंदर अशी उभी मूर्ती आहे.
समोर महादेवाचे पुरातन दगडी मंदिर आहे. मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैलीत, उंच अधिष्ठानावर बांधलेले आहे. ओवरी, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. पाच पायऱ्या चढून मंदिराच्या ओवरीत प्रवेश होतो. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला हत्तीच्या छोट्या मूर्ती आहेत. ओवरीला समोरच्या बाजूने पाच कोरीव पाषाणस्तंभ आहेत. या स्तंभांच्या वरच्या भागात छोट्या चौरसाकार स्तंभांमध्ये शिवपिंडी आणि नंदीची शिल्पे कोरलेली आहेत. ओवरीच्या छतावरही नंदीच्या मूर्ती आहेत. सभामंडपाचे प्रवेशद्वार पंचशाखीय आहे. दरवाजाच्या उंच मंडारकावर अर्धचंद्रशिला व ललाटबिंबस्थानी शिवपिंडी आहे. सभामंडपास समोरील मुख्य प्रवेशद्वारासह डाव्या आणि उजव्या बाजूसही प्रवेशद्वारे आहेत. मंडपात आत पितळी बाजेवर चांदीच्या चौरंगावर काडसिद्धेश्वर स्वामींची प्रतिमा आणि पादुका ठेवलेल्या आहेत. तेथे त्यांच्या बैठकीचेही स्थान आहे. अंतराळात नंदीची मोठी पाषाणमूर्ती आहे. नंदीचे बाशिंग, नेत्र, कर्ण व शिंगे पितळेची आहेत व गळ्यात रूद्राक्षमाळा तसेच घुंगूरमाळा आहेत. गर्भगृहाचे प्रवेशद्वारही पंचशाखीय आहे. आत भूतलावर मोठी शिवपिंडी व त्यावर शंकराचा मुखवटा आहे. पिंडीच्या वर तांब्याची गलंतिका (अभिषेकपात्र) आहे. गर्भगृहावर मंदिराचे दगडातच बांधलेले, पिरॅमिडच्या आकाराचे तारकाकृती शिखर व त्यावर धातूचा कळस आहे.
या कडप्पा महादेव मंदिराच्या डावीकडे मागच्या बाजूस शंकराचे आणखी एक मंदिर आहे. मंदिराच्या वास्तुशैलीवरून याची रचनाही कडप्पा मंदिराच्या निर्मिती काळात झाली असावी असे दिसते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील पायऱ्यांच्या बाजूस असलेली मोठी शरभशिल्पे. सिंहासारखे मुख, बटबटीत डोळे, कराल मुख, मानेवर आयाळ, चार बोटे असलेला पाय अशा या शरभाने आपल्या पुढील दोन्ही पायांत गजशावक पकडलेले आहे व त्याची सोंड तोंडात धरलेली आहे, असे हे शिल्प दुर्मीळ प्रकारातील आहे. हे मंदिरही उंच जगतीवर आहे. खुल्या प्रकारचा सभामंडप, छोटे अंतराळ आणि गर्भगृह असे त्याचे स्वरूप आहे. सभामंडपातील कोरीव स्तंभ हे त्याचे एक आकर्षण स्थान आहे. सभामंडपात मध्यभागी नंदीची मूर्ती विराजमान आहे. अंतराळाच्या प्रवेशस्थानानजीक असलेल्या स्तंभांच्या खालच्या भागातील चौरसाकारात शंकर, भैरव, गणेश, गंडभेरूंड यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. तर स्तंभांच्या मध्यभागी नागप्रतिमा दिसतात. येथील गर्भगृहाचे प्रवेशद्वार तीन शाखीय आहे व द्वारचौकटीलगत द्वारस्तंभ कोरलेले आहेत. प्रवेशद्वाराचा मंडारक उंच आहे व त्यावर अर्धचंद्रशीला आहे, तर ललाटबिंबस्थानी शिवपिंडी आहे. मंदिराच्या दगडी गर्भगृहात भूतलावर शिवपिंडी आहे. पिंडीच्या लिंगस्थानी शंकराचा मुखवटा आहे. गर्भगृहाचा बाह्यभाग हा तारकाकृती आहे. मंदिराचे शिखरही कडप्पा मंदिरासारखेच पिरॅमिडच्या आकाराचे व तारकाकृती आहे.
या मंदिरांच्या मागच्या बाजूस गुरुदेव ध्यान मंदिराची आधुनिक, दुमजली इमारत आहे. येथे ४८वे मठाधिपती मुप्पिन काडसिद्धेश्वर स्वामी यांची समाधी आहे. अदृष्य काडसिद्धेश्व स्वामी यांनी या समाधी मंदिराची उभारणी केली. येथे मुप्पिन काडसिद्धेश्वर स्वामी यांची मूर्ती विराजमान आहे. स्वामी मठाचे उपास्य देव मानले जातात. मठीतील प्रत्येक सत्संग कार्यक्रम या मंदिरातील आरतीने सुरू होतो. अनेक भाविक येथे ध्यान करण्यासाठी येतात.
या मठाच्या परिसरात ग्रामीण भारताच्या पारंपारिक जीवनशैलीचे दर्शन घडवणारे ‘सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय’ आहे. ३० एकर परिसरात विस्तारलेल्या या संग्रहालयात ग्रामीण जीवनाचा अस्सल अनुभव मांडणारी, त्याचे वेगवेगळे पैलू टिपणारी शिल्पमांडणी आहे. या प्रदर्शनाबरोबरच येथे सेंद्रिय शेती, पर्यावरण संवर्धन, आरोग्य सेवा क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले जाते. मठाच्या परिसरात सेंद्रिय शेतीचा, औषधी वनस्पतींचा प्रकल्प तसेच गोरक्षण केंद्र आहे. येथे पर्यटकांसाठी सिद्धगिरी डिव्हाइन गार्डन, योग आणि ध्यान केंद्र, तसेच इतरही अनेक आकर्षणे आहेत.
महाशिवरात्रीला येथे तीन दिवसांचा मोठा उत्सव असतो. गुरुपौर्णिमेला येथे योग आणि ध्यान शिबिरे आयोजित केली जातात. श्रावण महिन्यात येथे विविध धार्मिक अनुष्ठाने सुरू असतात. कार्तिक महिन्यात दिव्यांचा उत्सव साजरा होतो. या उत्सवांसाठी महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक आणि गोवा या राज्यांतून मोठ्या प्रमाणावर भाविक येथे येतात. येथे रोज अन्नछत्र चालते. उत्सवांच्या दिवशी येथील अन्नछत्रात ५० हजारांहून अधिक लोकांना महाप्रसाद दिला जातो.