जंगलेश्वर मंदिर

तेर, ता. धाराशिव, जि. धाराशिव

ऋषी, मुनी, योगी, सन्यासी, संत व साधू यांची भूमी म्हणून भारताची जगभर ओळख आहे. त्यामुळेच काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत साधू संतांचे अनेक आश्रम व मठ आहेत. योग, अध्यात्म, सत्संग, तत्वज्ञान, उपदेश, तंत्र, मंत्र, वैराग्य, चिंतन अशी नानाविध प्रकारची कार्ये आश्रमातून चालतात. साधू संतांचे कार्य त्यांच्या मृत्यूपश्चात अविरतपणे सुरू ठेवण्याचे काम आश्रम करतात. तेर येथील जंगलेश्वर महाराज मठ त्यापैकीच एक आहे. येथील आश्रमात आजही जंगलेश्वर महाराजांचे अस्तित्व आहे व त्यांच्या आशिर्वादाने जीवनातील नानाविध अडचणी दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
जंगलेश्वर आश्रम नदी किनारी वसलेला आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार तो सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वीचा आहे. या मठाचे संस्थापक जंगलेश्वर महाराज महान योगी होते. त्यांनी त्यांच्या जीवनकाळात अनेक चमत्कार केले असल्याचे त्यांचे भक्त सांगतात. या मठाबाबत अख्यायिका अशी की मठाच्या प्रांगणात एक प्राचीन वटवृक्ष आहे. तो वेगाने वाढत होता. जंगलेश्वर महाराज या वृक्षाखाली बसून ध्यान साधना करीत असताना वडाच्या पारंब्या वाढून त्यांच्या डोक्यावर येऊ लागल्या. वेगाने वाढणाऱ्या पारंब्यामुळे महाराजांना साधनेला बसायला जागा अपुरी पडू लागली. तेव्हा महाराजांनी वटवृक्षाला ‘या पुढे वाढायचे नाही’ असा आदेश दिला. असे सांगितले जाते की महाराजांच्या आदेशामुळे तो वटवृक्ष जराही न वाढता आजही त्याच स्थितीत आहे. वैशाख शुद्ध चतुर्थी सन १९०० साली महाराज या ठिकाणी समाधिस्थ झाले.
मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीत साधीशी स्वागत कमान आहे. प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी आसने व अनेक वृक्ष आहेत. प्रांगणात भाजक्या विटा वापरून बांधलेली गोलाकार खोल विहीर आहे. या विहिरीचे पाणी कधीही आटत नाही, असे सांगितले जाते. मंदिरासमोर नंदीशिल्पे आहेत. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपास पूर्व व उत्तर दिशेला प्रवेशद्वारे आहेत. सभामंडपात पाषाणी स्तंभपादावर उभे नक्षीदार लाकडी स्तंभ आहेत या सर्व स्तंभांवर नक्षी कोरलेल्या आहेत. सभामंडपात अनेक देवी-देवतांची व साधू-संतांची चित्रे भिंतींवर रेखाटलेली आहेत. सभामंडपातील जमिनीचा अर्धा भाग अधिक उंच आहे व येथे जंगलेश्वर महाराजांच्या विविध वस्तू ठेवलेल्या आहेत.
पुढे अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. नक्षीदार प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल चित्रे रंगविलेली आहेत व त्यावर पद्मनक्षी आहे. द्वारशाखांवर खालील बाजूस पद्मनक्षी व वर पर्णलता, पुष्पलता व स्तंभनक्षी आहेत. ललाटबिंबावर गणेशमूर्ती व प्रवेशद्वारावरील माहिरपीत सूर्यप्रतिमा आहे. अंतराळात प्रत्येकी सहा नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. अंतराळात मधल्या स्तंभाच्या मधील जमीन खोलगट आहे व शेजारी दोन्ही बाजूला सुमारे दोन फूट उंचीचे चौथरे आहेत. सर्व स्तंभ चौथऱ्यावरील पाषाणी स्तंभपदावर उभे आहेत. येथील भिंतींवरही विविध देवीदेवतांच्या व साधूसंतांच्या प्रतिमा रेखाटलेल्या आहेत. अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस जंगलेश्वर महाराजांची प्रतिमा आहे.
पुढे गर्भगृहाचे अरुंद व कमी उंचीचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला श्रीराम व डावीकडे श्रीकृष्ण अशी चित्रे आहेत. गर्भगृहात जंगलेश्वर महाराजांची समाधी आहे व समाधीसमोर पादुका आणि शिवपिंडी आहे. मंदिराच्या बाह्य बाजूला गर्भगृहात एक कक्ष आहे. या कक्षात सद्गुरूंची गादी, महाराजांचा पितळी मुखवटा व नित्य वापरातील वस्तू ठेवलेल्या आहेत. गादीवर महाराजांची प्रतिमा आहे. या कक्षाच्या प्रवेशद्वाराच्या वर शिखरालगत मारुतीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या छतावर उंच निमुळते गोलाकार शिखर आहे. शिखरात खालील बाजूला कमळदल नक्षीचे रिंगण व वर उभ्या धारेची नक्षी आहे. शिखरात शीर्षभागी आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे.
वैशाख शुद्ध चतुर्थी ही जंगलेश्वर महाराजांची पुण्यतिथी येथे वार्षिक उत्सव म्हणून साजरी केली जाते. मंदिरात दत्तजयंती, गुरू पौर्णिमा या दिवशी विशेष उत्सव साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात भजन, कीर्तन, पारायण आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या प्रसंगी हजारो भाविक जंगलेश्वर महाराजांच्या दर्शनाला येतात. गुरुवारी व पौर्णिमेस मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात.

उपयुक्त माहिती

  • धाराशिवपासून २८ किमी अंतरावर
  • धाराशिव येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Back To Home