सद्गुरू जंगली महाराज मंदिर

जंगली महाराज मार्ग, शिवाजीनगर, पुणे

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजीनगर येथे जंगली महाराज रस्त्यावरील एका टेकडीवर सद्गुरू जंगली महाराज मंदिर वसलेले आहे. सोळाव्या शतकात भांबुर्डे नावाने ओळखले जाणारे हे मुठा नदीच्या काठावरील एक छोटे खेडे होते. येथील निसर्गसंपदा आणि घनदाट झाडीमुळे या भागाला नैसर्गिक संरक्षण लाभले होते. इ.स. १८९० मध्ये सिद्धयोगी जंगली महाराजांनी येथे समाधी घेतल्यापासून हे स्थान लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी १८९० पासून अखंड नंदादीप तेवत आहे.

मंदिर परिसराला पूर्वी ‘भांबुर्डे जंगल’ असे संबोधले जात असे. श्री सद्गुरू जंगली महाराज यांचे १८६८ मध्ये येथे आगमन झाल्यावर त्यांनी या परिसराला आपली कर्मभूमी बनवले. सोलापूरजवळील होनमुर्गी या गावी जन्मलेल्या महाराजांनी लहानपणापासूनच अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवले होते. महाराजांनी भांबुर्डे येथील रोकडोबा मंदिरात वास्तव्य करताना येथील अनेक अनिष्ट प्रथांना पायबंद घातला. मंदिरात होणारे प्राण्यांचे बळी त्यांनी आपल्या प्रेमाने बंद केले व समाजाला अहिंसेचा आणि शुद्ध भक्तीचा मार्ग दाखवला. मंदिराच्या आवारात होणारे तमाशे थांबवून त्यांनी तरुणांना व्यायामासाठी तसेच कुस्तीसाठी प्रोत्साहित केले. मंदिरात भजन आणि कीर्तनाचे मंगलमय वातावरण निर्माण करणाऱ्या महाराजांनी बलोपासनेचे महत्त्व सर्वांना पटवून दिले. त्यामुळे हे ठिकाण सामाजिक परिवर्तनाचे एक मोठे केंद्र बनले.

जंगली महाराजांनी १८९० मध्ये समाधी घेण्याचा निर्णय घेऊन ४ एप्रिल १८९० रोजी भांबुर्डे येथील टेकडीवर देह ठेवला. त्यांच्या निर्वाणानंतर या ठिकाणी समाधी मंदिराची उभारणी झाली. महाराजांच्या परम शिष्या रखमाबाई आईसाहेब यांनी अत्यंत निष्ठेने मंदिराचे व्यवस्थापन करत हा आध्यात्मिक वारसा आणि महाराजांची शिकवण लोकांपर्यंत पोहोचवली. इ.स. १९०२ मध्ये त्यांचे निधन झाल्यावर त्यांची समाधीदेखील याच परिसरात बांधण्यात आली आहे. आधुनिक काळात या परिसराचा विकास वेगाने झाल्यामुळे भांबुर्डे परिसराचे नाव बदलून शिवाजीनगर झाले. आज हे मंदिर पुण्याच्या मध्यवर्ती भागातील सर्वात शांत आणि पवित्र स्थान मानले जाते. दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात.

मंदिराच्या दगडी प्रवेशद्वारावर नक्षीकाम केलेले लाकडी दरवाजे आहेत. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती कोरली आहे आणि त्यासोबतच दोन्ही बाजूंना दीपकोष्टके आहेत. रात्रीच्या वेळी येथे दिवे लावले जातात. प्रवेशद्वाराच्या वरील भागातील पारंपरिक नगारखान्यातून आजही उत्सवप्रसंगी चौघड्याचे मंगल स्वर निनादतात. या प्रवेशद्वाराच्या आत कोरीव पाषाणात बांधलेल्या सुमारे वीस पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना भक्कम सुरक्षा कठड्यांसह पायरी मार्गावर वटवृक्षांची दाट सावली आहे. प्रवेशद्वाराच्या आत दोन्ही बाजूंना पहारेकऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष आहेत. येथे रात्रीच्या वेळी प्रकाशमान होणारी काचेची सुंदर झुंबरे टांगलेली आहेत.

मंदिराचे प्रांगण प्रशस्त आणि सुंदर आहे. येथे जुन्या आणि मोठ्या वृक्षांसोबतच प्रांगणात डाव्या बाजूला सुमारे ७५ फूट उंचीचा भव्य ध्वजस्तंभ उभा आहे. या स्तंभावर सोन्याचे लेपन केलेला आकर्षक कळस आहे व येथे सदैव भगवा ध्वज डौलाने फडकत असतो. ध्वजस्तंभासाठी पाच फूट उंचीचा षटकोनी चौथरा आहे. त्यावर कमळाच्या आकाराची प्रतिकृती आहे. या परिसरात जुन्या वटवृक्षांभोवती बसण्यासाठी आसने असलेले पार आहेत.

येथील सभामंडपाची रचना अर्धखुल्या स्वरूपाची आणि हवेशीर आहे. सभामंडपाचे पत्र्याचे छत लाकडी तुळयांवर आधारलेले आहे. हे लाकडी स्तंभ पाषाणी स्तंभपादावर उभे आहेत. सभामंडपाच्या छताला काचेची प्राचीन झुंबरे टांगल्यामुळे त्याचे सौंदर्य खुलून दिसते. सभामंडपात डाव्या बाजूला एक जुना नगारा ठेवलेला आहे आणि आरतीच्या वेळी तो वाजवला जातो. उजवीकडे एका स्वतंत्र कक्षात महाराजांच्या गुरूंची समाधी आहे.

सभामंडपाच्या डाव्या बाजूला घुमटाकार छत आणि सुबक शिखर असलेली एक मेघडंबरी उभारली आहे. महाराजांच्या पादुकांची स्थापना केलेल्या या मेघडंबरीच्या जागी महाराज स्नान करत असत, अशी मान्यता आहे. या जागेला पावन तीर्थाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या भागाची स्वच्छता आणि निगा उत्तम प्रकारे राखली जाते. मेघडंबरीच्या खांबांवर केलेले कोरीव काम वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे लहानसे मंदिर मुख्य मंदिराच्या सौंदर्यात अधिक भर घालते.

सभामंडपाच्या पुढे अंतराळ व गर्भगृह आहे. गर्भगृहात महाराजांचे समाधी स्थान आहे. मुख्य सभामंडपापेक्षा काहीशा उंचावर असलेल्या गर्भगृहात तीन पायऱ्या चढून प्रवेश होतो. गर्भगृहात समाधीच्या मागे भिंतीवर जंगली महाराजांचे सुमारे दहा फूट उंच भव्य तैलचित्र आहे. १८९० पासून येथे अखंड नंदादीप तेवत ठेवला आहे. गर्भगृहाच्या वर पाषाणात बांधलेले सुबक शिखर आहे.

मंदिरात दररोज शिस्तबद्ध पद्धतीने पूजाविधी पार पडतात. पहाटे महाराजांच्या समाधीला मंगलस्नान घालून पूजा केल्यावर सकाळी आणि सायंकाळी आरती संपन्न होते. रात्री नऊ वाजता पंचपदीचा कार्यक्रम होतो. सोमवार आणि गुरुवारी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते. वर्षातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे महाराजांचा पुण्यतिथी सोहळा होय. हा उत्सव चैत्र महिन्यात पंधरा दिवस मोठ्या उत्साहात चालतो. यावेळी प्रवचन, कीर्तन तसेच शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम होतात. उत्सवाच्या मुख्य दिवशी, चैत्र शुद्ध चतुर्दशीला महाराजांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक निघते. हनुमान जयंतीचा उत्सव देखील येथे आनंदाने साजरा केला जातो. यासह गुरुपौर्णिमा आणि महाशिवरात्रीला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्रिपुरारी पौर्णिमेला मंदिर व परिसरात शेकडो दीप लावले जातात. दररोज सकाळी साडेपाच ते दुपारी एक व सायंकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत भाविकांना येथे समाधीचे दर्शन घेता येते. सोमवारी आणि गुरूवारी हीच वेळ सकाळी साडेपाच ते रात्री दहा अशी सलग असते.

उपयुक्त माहिती

  • पुणे रेल्वे स्थानक व बस स्थानकापासून १.५ किमी अंतरावर
  • स्वारगेट एसटी स्थानकापासून ४.५ किमी अंतरावर
  • देशभरातील अनेक शहरांतून येथे येण्यासाठी विमान, रेल्वे व बस सेवा उपलब्ध
  • पुण्यातील अनेक भागांतून पीएमपीएमएल बस सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा
  • संपर्क: मंदिर कार्यालय, मो. ९५१०६९९७४५, दूरध्वनी : ०२०-२५५३४५३९
Back To Home