जुगाई देवी मंदिर

येळवण, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर

शिवशंकराच्या तेजापासून निघालेली शक्तीस्वरूप देवता म्हणजे योगेश्वरी होय. योगेश्वरीस आठवी मातृका समजले जाते. योगेश्वरी या नावाचा अपभ्रंश जोगेश्वरी असा झाला. या देवीला जोगाई असेही म्हणतात. मुंबईत या जोगेश्वरीचे एक ठाणे आहे व मराठवाड्यातील अंबेजोगाई येथे जोगाई या नावाने ती स्थित आहे. कोल्हापूर या ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील येळवण येथे ही देवी जुगाई नावाने वसलेली आहे. येथील देवीचे प्राचीन मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. ही देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

येथील जुगाई देवीचे स्थान हे सुमारे ७०० वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. मंदिराची आख्यायिका अशी की जुगाई ही जोतिबाची बहिण व अंबेजोगाई गावची जोगाई माता होय. ही देवी जोतिबाच्या भेटीला आली असता जोतिबाने तिला येथेच वेळूबनात राहण्याचा आग्रह केला. तेव्हा देवीने आपला जत्रोत्सव भावाच्या जत्रोत्सवासोबत होणार असल्यास येथे राहण्याचे मान्य केले व भावाच्या आग्रहानुसार तिने येथेच शिळारुपात वास केला. येथील घनदाट वनात एका गाईस देवीचे अस्तित्त्व जाणवले व ती गाय नित्यनेमाने त्या शिळेवर पान्हा सोडून देवीस अभिषेक घालू लागली. हे दृश्य गवळ्याने पाहिले व त्याने गावाला सांगितले. तेव्हा गावकऱ्यांनी देवीच्या शिळेवर मंदिर बांधून देवीची नित्य पूजा व वार्षिक उत्सव साजरे करण्यास सुरुवात केली.

गावातून मंदिराकडे जाताना रस्त्याच्या मधोमध मंदिराची पहिली स्वागत कमान आहे. पुढे मंदिराची आवारभिंत व दोन प्रवेशद्वारे आहेत. आवारभिंतीला असलेल्या दोन्ही प्रवेशद्वारांस दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन स्तंभ व स्तंभांवर सज्जासदृश छत आहे. या छतावर मध्यभागी एक व स्तंभांच्या बाजूस दोन अशी तीन शिखरे आहेत. येथून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात डाव्या बाजूला एका चौथऱ्यावर स्थानिक देवतांचे पाषाण व तुलसी वृंदावन आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर वैशिष्ट्यपूर्ण विहीर आहे. विहिरीच्या बाह्य भिंतीत २१ नक्षीदार स्तंभ व १२ देवकोष्ठके आहेत. देवकोष्ठकांत विविध देवतांच्या प्राचीन दगडी मूर्ती आहेत. कालौघात या मूर्तींची मोठी झीज झालेली आहे. विहिरीच्या काठावर कमळ फुलाची प्रतिकृती साकारलेली आहे व त्यावर गणपती व मूषकराज यांच्या मूर्ती आहेत. या विहिरीत उतरण्यासाठी काही पायऱ्या आहेत. खालच्या बाजूस असलेल्या कमानीवर मयूर युगुल नक्षी व त्यावरील भागात जलदेवीचे शिल्प आहे. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस भिंतीमध्ये असलेल्या सहा देवकोष्ठकांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत.

सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडप दगडी बांधणीचा आणि अर्धखुल्या पद्धतीचा आहे. त्यातील एकूण दहा स्तंभ एकमेकांना चंद्रकोर कमानीने जोडलेले आहेत. अंतराळाच्या द्वारावर महिरपी कमान आहे. अंतराळात डाव्या व उजव्या बाजूस बाहेर पडण्यासाठी दारे आहेत. त्यापुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहाचे दगडी बांधकाम हेमाडपंती स्थापत्य शैलीतील आहे. गर्भगृह अंतराळापेक्षा काहीसे उंच आहे. गर्भगृहाच्या तिन्ही द्वारशाखा पानाफुलांच्या नक्षीने सुशोभित आहेत. ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे.

गर्भगृहातील दगडी मखरात वज्रपीठावर देवीची काळ्या पाषाणातील सुमारे दोन फूट उंचीची चतुर्भुज मूर्ती आहे. देवीच्या उजव्या दोन हातात खड्ग, त्रिशूल व डाव्या दोन हातात नरमुंड व ढाल आहे. या मूर्तीच्या बाजुला देवीची पितळी उत्सवमूर्ती आहे. मूर्तीच्या मागे चांदीची प्रभावळ आहे. प्रभावळीत वर कीर्तीमुख व बाजूने पानाफुलांची नक्षी आहे. मखराच्या पुढील दोन्ही स्तंभात खाली व्याघ्र शिल्पे आहेत. स्तंभांना जोडणाऱ्या महिरपी कमानीवर कलशादी मंगलचिन्हे कोरलेली आहेत. कमानीत मध्यभागी गणपती आहे. गर्भगृहाचे घुमटाकार छत तुळयांच्या विशिष्ट रचनेतून साकारलेले आहे.

गर्भगृहाच्या बाह्य बाजूने असलेल्या प्रदक्षिणा मार्गावर १२ देवळ्या व त्यात विविध देवतांच्या प्राचीन मूर्ती आहेत. प्रदक्षिणा मार्गात उजेड व हवा येण्यासाठी अनेक गवाक्षे आहेत. मंदिराच्या गर्भगृहावर ११ थरांचे चौकोनी शिखर आहे. शिखराच्या प्रत्येक थरात चहूबाजूंनी बाशिंगी नक्षीची रचना आहे. शिखराच्या वरच्या थरात आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे. या मंदिराच्या डाव्या बाजूला शिवमंदिर आहे. शिवमंदिराच्या शिखरावर पंचफणी नाग व शिवपिंडीची प्रतिकृती आहे. गर्भगृहात शिवपिंडी व समोर नंदी आहे.

जुगाई मंदिरात चैत्र पाडवा, नवरात्र, दसरा, दिवाळी, महाशिवरात्र, त्रिपुरारी पौर्णिमा आदी वार्षिक उत्सव साजरे केले जातात. चैत्र पौर्णिमेस देवीचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रात्री बारा वाजता देवीची पालखी मंदिरातून ग्रामप्रदक्षिणेसाठी निघते. यावेळी टोक, नांदगाव, मिरज, इस्लामपूर, मान, मोळवडे, थेरगाव आदी भागातून सासनकाठ्या येतात. पालखीला ढोल, ताशा, निशाण, पताका व चौऱ्यांचा मान देतात. या वेळी संपूर्ण राज्यातून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येथे येतात. दररोज सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत भाविकांना या मंदिरातील जुगाई देवीचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • शाहुवाडीपासून १७ किमी, तर कोल्हापूरपासून ६४ किमी अंतरावर
  • शाहुवाडीपासून येथे येण्यासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home