जोतिबा मंदिर

वाडी रत्नागिरी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर

‘दख्खनचा राजा’ आणि महाराष्ट्रातील विविध जाती-जमातींचा कुलदेव म्हणजे वाडी रत्नागिरीच्या डोंगरावर विराजमान असलेला जोतिबा. मूळचा क्षेत्रपाळ असलेला हा लोकदेव येथे केदारेश्वर म्हणून पूजला जातो. जोतिबाच्याच नावाने ओळखल्या जाणाऱ्या या डोंगरावर त्याचे भव्य मंदिर उभे आहे. जोतिबाच्या नावाचे ज्योतिर्लिंग असेही संस्करण झाले आहे व तो केदारनाथाचा अवतार असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. ‘चांगभलं’चा गजर आणि गुलाल-खोबऱ्याची उधळण करीत त्याच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक येत असतात. चैत्री यात्रेच्या वेळी तर हे अवघे डोंगरपठार लक्षावधी भक्तांच्या गर्दीने भरून जाते.

‘केदारविजय’ या ग्रंथामध्ये जोतिबाची माहात्म्यकथा सांगितलेली आहे. असे सांगण्यात येते की हा मूळचा संस्कृत ग्रंथ होता. हरी अंगापूरकर नामक जोतिबाभक्ताने तो मराठीत आणला. ३६ अध्याय असलेला हा ग्रंथ इ.स. १७७९ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. या ग्रंथातील माहात्म्यकथा अशी की ‘बदरी’ केदारक्षेत्री पौगंड ऋषी व त्यांची पत्नी विमलांबुजा हे दाम्पत्य पुत्रप्राप्तीसाठी तप करीत होते. त्यांना चैत्र शुद्ध षष्टी युक्त सप्तमीच्या दिवशी रविवारी सूर्योदय समयी पुत्र झाला. तो ‘केदार रवळेश्वर’ म्हणून प्रसिद्ध झाला. तो हिमालयातील केदारनाथाचाच अवतार मानला जातो. त्यामुळे त्याला केदार,

केदारेश्वर किंवा केदारलिंग अशी नावे मिळाली. केदारनाथ हा ज्योतिर्लिंगापैकी एक असल्यामुळे केदारलिंगाला केवळ ज्योतिर्लिंग असेही लोक म्हणू लागले. या नावावरूनच जोतिबा हे नाव रूढ झाले असल्याचे ‘केदारविजय’कारांचे म्हणणे आहे. जोतिबाचे रवळेश्वर हे आणखी एक प्रसिद्ध नाव आहे. त्याची कथा अशी सांगितली जाते की तो जमदग्नीच्या रवाग्नीचा म्हणजे क्रोधाग्नीचा अवतार आहे. रेणुकावधानंतर जमदग्नीने त्यागलेला क्रोध नवनाथ, समुद्र, अरण्य व अन्य जग यांनी वाटून घेतला होता. यांपैकी नवनाथांकडे आलेला क्रोध एकरूप बनवून त्याचा स्वीकार करूनच केदारनाथाने अवतार घेतला. म्हणून त्याला रवळेश्वर असे नाव पडले. ‘नव रवाग्नीचा अवतार। धरिला त्रिगुणीं सगुणाकार।। म्हणूनी नाम रवळेश्वर। आगमोत्तरी ठेविलें।।’ अशी याबाबतची ओवी आहे.

केदारेश्वर हा हिमालयातून दक्षिणेत आला याचीही एक आख्यायिका मराठी `केदारविजय’ ग्रंथात सांगण्यात येते. ती अशी की कोल्हासुराच्या उत्पातांमुळे करवीरातून बहिष्कृत झालेल्या लक्ष्मीला तेथे पुन्हा प्रतिष्ठापित करण्याचे कार्य दक्षिणकेदाराने स्वीकारले. कोल्हासुराच्या साह्याला रत्नासुर, रक्तभोज, महिषासुर आदी दैत्य होते. तर केदारनाथाच्या साह्याला सिद्ध, भैरव व मातृका, तसेच चर्पटांबा (चोपडाई), महालक्ष्मी आणि यमाई या शक्ती होत्या. या युद्धात केदारनाथाने रत्नासुर व अन्य दैत्यांचा पराभव केला. ज्या ठिकाणी रत्नासुर मारला गेला तो पर्वत रत्नागिरी म्हणून ओळखला जाऊ लागला. कोल्हासुर पडला ते स्थान कोल्हापूर झाले. तेथे महालक्ष्मी प्रतिष्ठापित झाली व तिच्या आग्रहाने केदारनाथ रत्नागिरी डोंगरावर कायमचा वास्तव्यास आला.

समुद्रसपाटीपासून सुमारे ३१०० फूट उंच असलेल्या या डोंगरावर जोतिबाचे पुरातन स्थान होते. त्याचा नेमका इतिहास अज्ञात आहे. मात्र या मंदिराचा जीर्णोद्धार प्रथम नावजी ससे (किवा रावजी साया) या किवळ या गावाच्या पाटलाने केला, असे सांगण्यात येते. पुढे पेशवाईमध्ये १७३० साली राणोजीराव शिंदे यांनी या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार केला. राणोजीराव शिंदे यांच्या घराण्याकडे साताऱ्यातील कण्हेरखेडची पाटीलकी होती. राणोजीराव हे पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या पदरी पायदळात होते. स्वपराक्रमाने चढून ते १७२५ मध्ये शिलेदार बनले. इ.स. १७२८-२९ मध्ये चिमाजी आप्पा यांनी शिंदे, पवार, होळकर यांच्या साह्याने माळवा घेतला. त्यावेळी दीड कोटी वसुलीच्या या प्रांतातील ६५.५ लाख रुपये वसुलीचा भाग चिमाजी आप्पांनी राणोजीराव शिंदे यांना दिला. राणोजीराव हे जोतिबाचे भक्त होते. त्यांच्या एका मुलाचे नावही जोतिबा असे होते. जोतिबाच्या मंदिराच्या बाजूला केदारेश्वर मंदिर आहे. हे बिनखांबी मंदिर इ.स. १८०८ मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधले. दौलतराव हे १७९५ ते १८२७ या काळात गादीवर होते. ते सुप्रसिद्ध सेनानी महादजी शिंदे यांचे बंधू होत. जोतिबाच्या आणि केदारेश्वर मंदिराच्यामध्ये चोपडाईचे मंदिर आहे. हे मंदिर इ.स. १७५० मध्ये कोल्हापूरचे जहागीरदार प्रितीराव (बापूसाहेब) चव्हाण हिंमतबहाद्दर यांनी बांधले. अशा प्रकारे जोतिबा मंदिरावरील मंदिर समूहास पेशवाईच्या कालखंडापासूनचा इतिहास आहे.

जोतिबा हा दख्खनचा राजा म्हणून ओळखला जातो. त्याचे स्थानही एखाद्या गडकिल्ल्यास साजेल असेच आहे. मंदिराच्या विस्तीर्ण प्रांगणात दगडी बांधणीच्या भव्य अशा महाद्वारांतून प्रवेश होतो. मंदिरात सामान्यतः उत्तरेकडील पायरी मार्गाने प्रवेश केला जातो. प्रांगणात सर्वत्र दगडी फरसबंदी आहे. मात्र भक्त भाविकांनी उधळलेल्या गुलालामुळे येथील काळ्या पाषाणास गुलाबी रंग आलेला असतो. प्रांगणात प्रवेश करताच तेथील उंच दगडी दीपमाळा लक्ष वेधून घेतात. आवारात ठिकठिकाणी असलेल्या या दीपमाळांपैकी जोतिबा मंदिराच्या समोरच असलेल्या एका भव्य दीपमाळेच्या चौथऱ्यावर सुबक कोरीव काम केलेले आहे. त्यात देवाच्या चैत्रयात्रेचा सर्व लवाजमा आहे. यामध्ये घोड्यावर स्थानापन्न देव, गरुड, हनुमंत, हत्ती, उंट, चौघडा असे शिल्पचित्रण आहे. या दीपमाळेत देवी अन्नपूर्णेचीही मूर्ती आहे. त्रिपुरारी पौर्णिमेस येथे मोठा दीपोत्सव केला जातो. तसेच चैत्र शुद्ध षष्ठीला येथे बाजूलाच असलेल्या चुलांगणात देवाचा महाप्रसाद शिजवला जातो.

समोरच जोतिबा, केदारेश्वर आणि चोपडाईचे काळ्या पाषाणातील मंदिर आहे. त्यांवर तीन उंच शिखरे आहेत. जोतिबाच्या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी येथे सर्वप्रथम काळभैरवाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. येथे काळभैरव हा जोतिबाचा सहायक मानला जातो. मंदिराच्या प्रांगणात काळभैरवाची देवळी आहे. पितळी खांब असलेल्या या देवळीमध्ये उंच चौथऱ्यावर काळभैरवाची कृष्णवर्णीय मूर्ती विराजमान आहे. डोईस फेटा, भरजरी अंगरखा, धोतर, हाती तेग घेतलेल्या काळभैरवाच्या या मूर्तीचे जोतिबाच्या मूर्तीशी बरेच साम्य आहे. येथेच मूळ ज्योत सतत तेवत असते.

या मंदिरात दर्शन मार्ग ठरलेला आहे. येथे स्टीलचे पाईप लावून दर्शनरांग तयार करण्यात आली आहे. या मार्गात सर्वप्रथम महादेवाच्या नंदीचे स्थान आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे एकाच ठिकाणी दोन नंदींच्या दगडी मूर्ती आहेत. ते सगुण व निर्गुणाचे द्योतक मानले जातात. त्यांच्यासमोरच जोतिबाचा पितळी मुखवटा आहे. हे नंदी दौलतराव शिंदे यांनी बसवले आहेत. या नंदीमंडपाच्या समोर केदारेश्वर मंदिर आहे. मंदिरास मोठे दगडी खांब आणि त्यात कमान असलेली ओवरी आहे. गर्भगृहामध्ये तीन लिंगे आहेत. यातील एक लिंग हे जोतिबाचे लिंगरूप आहे व दुसरे ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांनी स्थापन केलेले मातुलिंग आहे. तिसरे जोतिबाने रत्नागिरी डोंगर परिसरात प्रतिष्ठापित केलेल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या काशी विश्वेश्वराचे लिंग आहे. या ठिकाणी मागच्या बाजूस मोठा पितळी मुखवटा आहे व त्यावर नागाने फणा उभारलेला आहे. या नंतर दर्शन होते ते चोपडाई देवीचे.

चोपडाई म्हणजेच चर्पटांबा देवीच्या या मंदिराची स्थापत्यशैली हेमाडपंती आहे व त्यात दक्षिणी स्थापत्यशैलीचे मिश्रण आहे. येथे दगडी गाभाऱ्यात उंच वज्रपीठावर चोपडाई देवीची पश्चिमाभिमुख अष्टभुजा मूर्ती विराजमान आहे. तिच्या मस्तकी चांदीचा मुकुट तसेच गळ्यात सुंदर अलंकार आहेत. तिच्या एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात फूल आहे. मूर्तीचा एक पाय उंच आसनावर असल्यामुळे देवी युद्धपावित्र्यात असल्याचे दिसते. मूर्तीस चांदीचा पत्रा लावलेले मखर आहे व त्यावर बारीक कोरीवकाम केलेले आहे. मखरस्तंभांच्या तळाशी व्याघ्रशिल्पे आहेत. तसेच वरच्या बाजूस नागफणा आहे.

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराप्रमाणेच चोपडाईच्या मंदिरातही दरवर्षी किरणोत्सव साजरा केला जातो. या मंदिराच्या सभामंडपाच्या एका गवाक्षातून फेब्रुवारी महिन्यातील एका दिवशी सायंकाळच्या वेळी सूर्यकिरणे थेट चोपडाईच्या पदकमलांवर येऊन पडतात. श्रावणी षष्ठीस येथे चोपडाईची अहोरात्र पूजा केली जाते. यानंतर जोतिबाच्या मुख्य मंदिरात प्रवेश होतो. मंदिराचा सभामंडप भव्य कमानदार पाषाण स्तंभांनी सुशोभित आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील गरुडस्तंभाप्रमाणेच येथील एका पितळी स्तंभास महत्त्व आहे. या स्तंभावर श्रीराम-लक्ष्मण-सीता, वृंदावनातील कृष्ण, तसेच विष्णूचे विविध अवतार कोरलेले आहेत. त्याच प्रमाणे येथे पौष पौर्णिमेस जोतिबा शिकारीस जातात या घटनेचे चित्रिकरण केलेले आहे. जोतिबाप्रमाणेच क्षेत्रपाळ देवता असलेला खंडोबा व म्हाळसादेवी यांचेही कोरीव चित्र या स्तंभावर आहे.

गर्भगृहाचे प्रवेशद्वार पितळी आहे. त्यावर विविध देवदेवतांची, प्राणी व फुलांची नक्षी कोरलेली आहे. या ठिकाणी जोतिबाचे वाहन असलेल्या अश्वाच्या देखण्या मूर्तीही कोरलेल्या आहेत. येथील दगडी पायऱ्यांवर अनेक गोलाकार उंचवटे दिसतात. असे सांगितले जाते की पूर्वी येथे भक्तगण चांदीची नाणी ठोकून बसवत असत. त्यातील काही नाणी अजूनही दिसतात.

गर्भगृहानजीक भितींतील एका देवळीत हनुमानाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. हनुमानाची मूर्ती ही चपेटदान हनुमान या स्वरूपातील आहे. याचा अर्थ असा की येथे हनुमानाचा हात चापट मारण्यास उगारलेला आहे. त्याच्या दुसऱ्या हातात गदेऐवजी वृक्षांच्या फांद्या आहेत. पायाखाली एक राक्षसी आहे. हनुमान अशोकवनात सीतेच्या शोधासाठी गेला होता, त्या घटनेची स्मृती जागवणारी ही मूर्ती आहे. पायाखाली पडलेली राक्षसी ही अशोकवनातील आहे व तिला पनौती वा साडेसाती असे म्हणतात. हनुमानाची ही मूर्ती १७३० च्या पूर्वीची असावी, असे सांगितले जाते. येथेच गणेशाच्या शेंदूरचर्चित दोन मूर्तीही आहेत. यातील एक मूर्ती ही पूर्णब्रह्मस्वरूप गणेशाची आहे व ती अथर्वशीर्षात वर्णिलेल्या गणेशाप्रमाणे आहे; तर दुसरी मूर्ती गणेशाच्या शिवनंदन स्वरूपातील म्हणजे शंकराच्या पुत्राच्या स्वरूपातील आहे. या शिवनंदन गणेशाच्या हातात त्रिशूल आहे.

गर्भगृहात उंच चौथऱ्यावर असलेल्या पितळी देव्हाऱ्यामध्ये जोतिबाची मूर्ती विराजमान आहे. मूर्ती तीन फूट उंचीची व निळसर काळ्या घोटीव पाषाणातील आहे. कोणत्याही मंदिरात मूर्ती दक्षिणाभिमुख नसते. जोतिबा मंदिर मात्र त्यास अपवाद आहे. याची आख्यायिका अशी की रत्नासुराच्या वधानंतर महालक्ष्मी-अंबाबाईने जोतिबाला विनंती केली की तुझी दृष्टी सतत माझ्यावर असू दे. त्यामुळे जोतिबाची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे. ही मूर्ती क्रमणपद स्वरूपातील आहे. म्हणजे मूर्तीचा डावा पाय किंचित पुढे टाकलेला आहे. मूर्तीच्या हातांत खड्ग, अमृतपात्र, त्रिशूल आणि डमरू आहे. मागे जोतिबाचे उपवाहन असलेला शेषही आहे. मूर्तीशास्त्र अभ्यासकांनुसार येथील जोतिबाची मूळ मूर्ती ही बाल केदारेश्वराच्या स्वरूपातील आहे. त्यामुळे भाविकांना दिसणाऱ्या मूर्तीच्या ओठांवर मिशा कशा, हा प्रश्न पडतो. मात्र या मिशा नंतर देवाची अंलकारपूजा करताना त्यास चिकटवल्या जातात. अलंकारपूजेच्या वेळी मस्तकावर डौलदार फेटा बांधतात, तसेच अंगात भरजरी अंगरखा व कमरेला धोतर नेसवतात. येथे दिवसातून दोन वेळा मूर्तीचा पोषाख बदलला जातो. मूर्तीच्या मागे असलेले मखर चांदीचा पत्रा लावलेले आहे व त्याच्या स्तंभांवर अश्वशिल्पे बसवलेली आहेत. इ.स. १९३५, १९८५ व २००६ मध्ये जोतिबाच्या मूर्तीस वज्रलेप करण्यात आला होता. यामुळे मूर्तीस पूर्वीचे रूप प्राप्त झाले आहे. मंदिरात जोतिबाची चांदीची उत्सवमूर्तीही आहे. विविध उत्सवांवेळी या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढली जाते.

जोतिबाच्या देवालयाचे पूर्वेकडील बाहेरील बाजूस सटवाई, तर पश्चिमेस रामलिंग स्थित आहे. इ.स. १७८० मध्ये मालजी निकम पन्हाळकर यांनी रामलिंगाचे हे मंदिर बांधले. याशिवाय मंदिर प्रांगणात दत्ताची देवळी आहे. एका बाजूस मंडपामध्ये गाईची मूर्ती उभारलेली आहे. कामधेनू म्हणून भाविक या गायीची पूजा करतात. प्रांगणात एका बाजूला दगडी पायऱ्या असलेली देवबाव किंवा पुष्करिणी आहे. त्यात जलसेना आणि चंद्रसेना अशी दोन तीर्थे आहेत. या देवबावेतील पाणी देवाच्या पूजेसाठी वापरले जाते. या विहिरीच्या पायऱ्यांच्या बाजूला एक प्राचीन शिलालेख आहे. त्यावर गिरवली गावातील एक जमीन करवीरनिवासिनीच्या पूजेसाठी दान केल्याची नोंद आहे. या शिलालेखाच्या शेजारी मोठी नागप्रतिमा कोरलेली आहे. याच प्रमाणे प्रांगणात एका बाजूस असलेल्या दगडी ओवऱ्यांमध्ये सासनकाठ्यांची स्थाने आहेत.

जोतिबा हे जागृत व नवसाला पावणारे दैवत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. येथे अनेक भाविक सोन्या-चांदीचे दागिने, अश्वप्रतिमा, हात त्याच प्रमाणे मिठाई, नारळ नवसपूर्तीनिमित्ताने जोतिबास अर्पण करतात. या मंदिरात रोजच भाविकांची मोठी गर्दी असते. रविवार हा जोतिबाचा उपास्यवार गणला जातो. त्यामुळे त्या दिवशी, तसेच दर पौर्णिमा आणि श्रावण शुद्ध षष्ठीस येथे अधिक गर्दी असते. चैत्री पौर्णिमेला मंदिरात मोठी यात्रा भरते. या यात्रेस प्रारंभ अष्टमीपासूनच होतो. येथे चैत्र शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत रोज जोतिबाची पालखी निघते. त्यावेळी ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या गजराने अवघी वाडी रत्नागिरी दुमदुमून जाते. यावेळी गुलाल-खोबऱ्याची मुक्त उधळण केली जाते. चैत्री पौर्णिमेस जोतिबाची पालखी वाजत-गाजत यमाई देवीच्या मंदिराकडे नेली जाते. या मिरवणुकीत पन्नासहून अधिक सासनकाठ्या नाचवत नेल्या जातात. सासनकाठी म्हणजे सुमारे ३० ते ३५ फूट उंचीची बांबूची काठी असते. त्यावर तांबडी-पांढरी पागोटी गुंडाळलेली असतात. वरच्या टोकास काळे-पांढरे चवरीचे गोंडे किंवा मोरचेल वा कलश बांधलेले असतात. काठीच्या तळापासून वर चार ते पाच फूट उंचीवर आडवी फळी बांधलेली असते. या फळीवर अश्वमूर्ती वा देव प्रतिमा बसवतात. ही फळी खांद्यावर घेऊन भक्तजन काठी नाचवतात. यातील काही काठ्या या मानाच्या असतात. पहिला मान हा पाडळी (निनाम) या गावाचा असतो. या यात्रेस महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश तसेच जोतिबा हे ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे कुलदैवत असल्याने तिकडूनही मोठ्या प्रमाणावर भाविक येतात.

उपयुक्त माहिती

  • कोल्हापूरपासून २१ किमी, तर पन्हाळा येथून ११ किमी अंतरावर
  • कोल्हापूरातून जोतिबा डोंगरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०२३२८ २३९०४१
  • ईमेल: dmckolhapur@gmail.com
Back To Home