जोतिबा मंदिर

गिरजवडे, ता. शिराळा, जि. सांगली

दख्खनचा राजाआणि महाराष्ट्रातील विविध जातीजमातींचा कुलदैवत असलेल्या जोतिबाचे एक प्रसिद्ध स्थान शिराळा तालुक्यातील गिरजवडे येथे आहे. असे सांगितले जाते की चोपडाई देवीच्या मदतीने जोतिबाने या ठिकाणी गिरीजासूर राक्षसाला मारले होते. त्यानंतर रत्नासुराचा उपद्रव रोखण्यासाठी कोल्हापूर परिसरातील भाविकांनी पाचारण केल्यानंतर हा जोतिबा तेथे गेला. त्यामुळे जोतिबाच्या या मूळ स्थानास विशेष महत्त्व आहे. ‘चांगभलंचा गजर आणि गुलालखोबऱ्याची उधळण करीत दररोज येथे शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात

केदारविजयया ग्रंथामध्ये जोतिबाची माहात्म्यकथा सांगितलेली आहे. असे सांगितले जाते की हा मूळचा संस्कृत ग्रंथ होता. हरी अंगापूरकर नामक जोतिबाभक्ताने तो मराठीत आणला. ३६ अध्याय असलेला हा ग्रंथ .. १७७९ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. या ग्रंथातील माहात्म्यकथा अशी कीबदरीकेदारक्षेत्री पौगंड ऋषी त्यांची पत्नी विमलांबुजा हे दाम्पत्य पुत्रप्राप्तीसाठी तप करीत होते. त्यांना चैत्र शुद्ध षष्टी युक्त सप्तमीच्या दिवशी रविवारी सूर्योदय समयी पुत्र झाला. तोकेदार रवळेश्वरम्हणून प्रसिद्ध झाला. तो हिमालयातील केदारनाथाचाच अवतार मानला जातो. त्यामुळे त्याला केदार, केदारेश्वर किंवा केदारलिंग अशी नावे मिळाली. केदारनाथ हा ज्योतिर्लिंगापैकी एक असल्यामुळे केदारलिंगाला केवळ ज्योतिर्लिंग असेही म्हणू लागले. या नावावरूनच जोतिबा हे नाव रूढ झाले असल्याचेकेदारविजयकारांचे म्हणणे आहे

येथील स्थानमहात्म्यानुसार, पांडव वनवासात असताना गिरिजापुरी येथील गायमुख या ठिकाणच्या गंगा भागिरथी (भोगावती) या पवित्र नदीच्या प्रवाहाला भेट देण्यासाठी आले असता त्यांनी या ठिकाणी महादेवाच्या पिंडीची स्थापना केली होती. ते येथील डोंगरावर काही काळ वास्तव्यास होते. त्यावेळी त्यांनी या भागातील नागरिकांची एका राक्षसाच्या छळातून मुक्तता केली होती. तसेच धर्मराजाने येथील लोकांना सत्याचा आणि धर्माने वागण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे गिरजवडेलाधर्माची पांढरअसेही म्हणतात

एका आख्यायिकेनुसार, या परिसरात जोतिबाने गिरिज या असूराला मारले. त्या राक्षसाचे धड जेथे पडले त्या गावाचे नाव धामवडे, शीर आणि आतडी पडलेल्या गावाचे नाव शीरसी आणि अंत्री, असे पडले. चिंचोली येथे देवाच्या गळ्यातील आत्मलिंग पडले. तेथेही एक मंदिर आहे. ही सर्व गावे गिरीजवडे परिसरात आहेत. या परिसरातील माने, निकम आदी कुटुंबियांचे गिरजवडचा खंडोबा हे कुलदैवत आहे

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याच्या सीमेवर असलेले शिराळा तालुक्यातील गिरजवडे हे शेवटचे गाव आहे. त्यापुढे सर्व डोंगराळ भाग आहे. यापैकी एका डोंगर उतारावर जोतिबाचे स्थान आहे. सुमारे २५ ते ३० पायऱ्या चढून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. काही वर्षांपूर्वी येथे वाहने येण्यासाठी गाडीरस्ताही बनविण्यात आलेला आहे. प्रशस्त प्रांगणात सर्वत्र पेव्हरब्लॉकची फरसबंदी केल्यामुळे हा मंदिर परिसर सुरेख भासतो. या प्रांगणात एक प्राचीन दीपमाळ दीपस्तंभ आहे. मुख्य मंदिरासमोर नंदीमंडप आहे. नंदीमंडप मुख्य मंदिर हे उंच जगतीवर उभे आहेत. नंदीमंडपातून मंदिरात येण्यासाठी सुमारे तीन फूट उंचीचा दगडी मार्ग आहे. या मार्गाने मंदिर नंदीमंडप जोडण्यात आलेले आहेत. या नंदीमंडपात पाषाणातील नंदीची मोठी मूर्ती आहे. नंदीमंडपाच्या बाजुला काळ्या पाषाणातील तुलसी वृंदावन आहे

मुखमंडप, सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी या दुमजली मंदिराची संरचना आहे. मुखमंडपाच्या कमानीकृती प्रवेशद्वारातून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपाच्या दर्शनी भिंतीवर असलेल्या देवकोष्टकांत उजवीकडे गणपती डावीकडे सरस्वतीची मूर्ती आहे. सभामंडपाच्या द्वारशाखांवर नक्षी खालच्या बाजूला स्वागतिका आहेत. सभामंडपात डावीकडे असलेल्या एका देवळीत जोतिबाच्या गर्भगृहाकडे तोंड करून असलेली सात फूट उंचीची भीमभैरवाची मूर्ती आहे. मूर्तीच्या डोक्यावर पगडी उजव्या हातातील सोटा तलवारीसारखा डोक्यावर धरलेला आहे. डाव्या हाताने खाली पडलेल्या राक्षसाचा हात धरला आहे एक पाय त्याच्या छातीवर आहे.

भीमभैरवाच्या समोरील बाजूस तीन कमानी असलेले अंतराळ आहे. काहीशा उंचावर असलेल्या या अंतराळात येण्यासाठी चार पायऱ्या आहेत. गर्भगृहाच्या द्वारशाखा पितळी पत्र्याने मढविलेल्या आहेत. या द्वारशाखांवर वेलींचे नक्षीकाम आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात एका वज्रपिठावर जोतिबाची काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती आहे. डोक्यावर फेटा, मोठे डोळे भारदस्त मिशा यामुळे ही मूर्ती रुबाबदार भासते. या मूर्तीच्या गळ्यात विविध दागिने हातांत खड्ग, पानपात्र, डमरू आणि त्रिशूळ आहेत. जोतिबा हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे रूप मानले जाते. त्यामुळे जोतिबाच्या मूर्तीसमोर तीन मुख असलेली चांदीची पिंडी आहे त्यावर चांदीच्या नागाने छत्र धरलेले आहे. जोतिबाच्या पायाजवळ घोड्यावर स्वार असलेली पितळेची उत्सवमूर्ती आहे

गर्भगृहाच्या प्रदक्षिणा मार्गावर कुंतीमाता, धर्मराज, भीम, अर्जून, नकूल, सहदेव द्रौपदी यांच्या काळ्या पाषाणातील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहेत. याशिवाय येथे मंगळादेवी, तुकाई, काळम्मादेवी, विठलाई, वाघजाईदेवी, निनाईदेवी, श्रीकृष्ण, अंबामाता, यमाई देवी, महाकाली, संत ज्ञानेश्वर, विठ्ठलरखुमाई संत तुकाराम यांच्याही मूर्ती आहेत. याशिवाय येथे नंदी शिवपिंडीही आहे

मंदिराच्या बाह्यप्रदक्षिणा मार्गावर गणपती, सरस्वती, दत्त हनुमान मूर्ती आहेत. मंदिराच्या बाह्यभिंतींवर जोतिर्लिंगांच्या प्रतिमा आहेत. प्रदक्षिणा मार्गावरच शिवलिंगावर दुग्धाभिषेक करणाऱ्या एका गायीचे शिल्प आहे. मंदिराचे शिखर तीन थरांचे आहे. त्यातील पहिल्या थरांमधील कोष्टकांमध्ये सामान्य नागरिकांच्या प्रतिमा, दुसऱ्या थरातील कोष्टकांत साधुमुनी तिसऱ्या थरात देवदेवतांच्या प्रतिमा आहेत. त्यावरील भागात आमलक शिखर आहे

येथे हनुमान जयंतीला यात्रा असते. त्यावेळी भाविकांची येथे मोठी गर्दी होते. असे सांगितले जाते की या यात्रेच्या वेळी गाभाऱ्यात दवण्याचा सुगंध दरवळतो. दवणा ही जोतिबाची प्रिय वनस्पती मानली जाते. पन्हाळा तालुक्यातील ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या केखले गावात दवण्याची पारंपरिक शेती होते. कोल्हापूर जिल्ह्यात या गावाशिवाय दवणा कुठेच पिकत नसल्याचे सांगतात. जत्रेच्या वेळी गाभाऱ्यात दवण्याचा सुगंध घमघमत असला, तरी दवणा मात्र प्रत्यक्षात येथे नसतो. शिखर शिंगणापूरच्या महादेवाकडून तो गुप्त रितीने येथे येतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. गाभाऱ्यात या दवण्याच्या सुगंधाचा दरवळ आला की मगच देवाची पालखी काढली जाते. भक्तांचा उत्साह त्यावेळी शिगेला पोहोचतो. या जत्रेसाठी पंचक्रोशीतील धामोडे, पुळंब्री, शिरसी, वाकुर्डे, अंत्री, येणपे येळगाव (ता. कऱ्हाड) येथून पालख्या येतात. येथे डोंगरावर एक मोठे तळे आहे. श्रावणातील शेवटच्या सोमवारी देव तेथे स्नानाला जातो.

उपयुक्त माहिती

  • शिराळा शहरापासून १६ किमी, तर सांगलीपासून ७२ किमी अंतरावर
  • शिराळा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : प्रकाश पुजारी, मो. ९०२२५५४७०७
Back To Home