जोगेश्वरी मंदिर

सांजा, ता. धाराशिव, जि. धाराशिव

जोगेश्वरी, योगेश्वरी, जोगळाई अशा विविध नावांनी ओळखली जाणारी देवी आदी शक्तीचे रूप आहे. भारतातील ५१ शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ आंबेजोगाई येथील जोगेश्वरी देवीचे मंदिर आहे. या देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. मात्र ज्यांना दूरच्या तीर्थांची यात्रा करता येत नाही त्यांच्यासाठी देवी स्वतः त्यांच्या पर्यंत पोहचतो. त्याचमुळे मुख्य शक्तीपिठाची अनेक उपपीठे निर्माण झाली आहेत. अशाच प्रकारे धाराशिव जिल्ह्यातील सांजा गावचे जोगेश्वरी देवीचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आंबेजोगाई येथील जोगेश्वरी देवीचे उपपीठ मानले जाते. येथील जागृत देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

हे मंदिर सुमारे पाचशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. मंदिर परिसरातील प्राचीन दीपमाळा पाहता त्याच्या प्राचीनत्वाची खात्री पटते. या मंदिराची अख्यायिका अशी की या गावातील एक ग्रामस्थ देवीचा निस्सिम भक्त होता. तो नियमीत वर्षातून दोन वेळा आंबेजोगाई येथील देवीच्या दर्शनासाठी पायी जात असे. पुढे वृद्धापकाळाने त्याला देवीच्या दर्शनासाठी जाणे अशक्य होऊ लागले. म्हणून त्याने देवीने आपल्या गावी यावे, अशी देवीला विनंती केली. मागे वळून पाहू नये, या अटीवर देवी आपल्या भक्ताच्या मागे त्याच्या गावापर्यंत चालून आली. परंतू गावाजवळ पोहोचताच भक्ताने मागे वळून पाहिल्याने देवी या जागी पाषाण रुपात स्थीर झाली. पुढे ग्रामस्थांनी या ठिकाणी मंदिर बांधले.
सांजा गावापासून काहीसे दूर असलेल्या या मंदिराभोवती आवारभिंत आहे. आवारभिंतीत असलेल्या स्वागत कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. दोन्ही बाजूस दोन गोलाकार नक्षीदार स्तंभ व त्यावर अर्धंचंद्राकार तुळई, असे कमानीचे स्वरूप आहे. कमानीपासून मंदिरापर्यंत सिमेंटकाँक्रिटची पायवाट आहे. या पायवाटेच्या दोन्ही बाजूला झाडे आहेत. पायवाटेवर सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या चौथऱ्यावर यज्ञकुंड आहे. यज्ञकुंडाच्या प्रवेशद्वाराकडील बाजूला एका देवळीत स्थनिक देवतेची मूर्ती आहे.

सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या दर्शनी भिंतींना लागून प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला चौथरे आहेत. यात्रा काळात या चौथऱ्यावर जोगिनी व जोगते परड्या मांडून जोगवा मागतात. प्रांगणापेक्षा उंचावर असल्यामुळे सभामंडपाच्या प्रवेशद्वारास पाच पायऱ्या आहेत. द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटपट्टीवरील कमानीत गणपतीची मूर्ती आहे. बंदिस्त सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपास अंतराळाकडील बाजूला दुसरे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारासमोर सभामंडप व अंतराळ यांच्यामधे सुमारे चार फूट मोकळी जागा आहे. या ठिकाणी दगडी बांधणीची प्राचीन दीपमाळ आहे. त्यापुढे अंतराळ आहे. अंतराळाच्या प्रवेशद्वारासमोर कासव शिल्प आहे. अंतराळात मध्यभागी चौथऱ्यावर सिंहशिल्प आहे. अंतराळ बंदिस्त स्वरूपाचे आहे व त्याच्या छताला नवसाच्या पितळी घंटा टांगलेल्या आहेत. भिंतीजवळ देवीचा शयनमंच आहे. रोज रात्री शेजारती नंतर देवी शयनी जाते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अंतराळातून गर्भगृहाच्या दोन्ही बाजूला प्रदक्षिणा मार्गावर दारे आहेत.
पुढे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर वरील बाजूला गणपतीची मूर्ती व दोन्ही बाजूला सोंडेत पुष्पमाळा धरलेले गजराज शिल्पे आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर देवीचे मुखशिल्प आहे. डोक्यावर चांदीचा मुकुट, चांदीचे डोळे, नाकात नथ, विविध वस्त्र व अलंकार ल्यालेली ही मूर्ती सुंदर भासते. गर्भगृहाच्या छतावर पाच थरांचे शिखर आहे. शिखराचा खालील पहिला थर चौकोनी आहे व त्याच्या चारही बाजूंनी १६ देवकोष्टके आहेत. या थरात चारही कोपऱ्यांवर स्तंभ नक्षी आहेत. शिखराचा दुसरा, तिसरा व चौथा थर अष्टकोनी आहे. त्यात प्रत्येकी आठ देवकोष्टके आहेत. पाचव्या थरात एकावर एक असे दोन आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे.

मंदिराशेजारी ज्योतिबा व भैरोबा या दोन देवतांची मंदिरे आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी दोन्ही मंदिरांची रचना आहे व त्यांच्या छतांवर उंच शिखरे आहेत. मंदिराच्या प्रांगणात प्राचीन पाषाण शिल्पे, विरगळ व शिवपिंडी आहेत.
शारदीय नवरात्रौत्सव हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दरम्यान सलग दहा दिवस मंदिरात भजन, कीर्तन, संगीत, महाप्रसाद, जागरण, गोंधळ आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नवरात्रोत्सवात सप्तमी व अष्टमी या दोन दिवसांत येथे मोठी यात्रा असते. त्यावेळी हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. यात्रेनिमित्त परीसरात तात्पुरती बाजारपेठ भरते. पुजासहित्य, खाद्य पदार्थ, कपडे, गृहोपयोगी वस्तू आदी वस्तुंच्या खरेदी विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होते. याशिवाय मंदिरात दसरा, दिवाळी, चैत्रपाडवा, शरद पौर्णिमा आदी सण व उत्सव साजरे केले जातात. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी मंदिरात भाविकांची गर्दी असते.

उपयुक्त माहिती

  • धाराशिव येथून १३ किमी अंतरावर
  • धाराशिव येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home