बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहर हे मराठवाड्याची सांस्कृतिक ओळख मानले जाते. मुळात कोकणातील जोगेश्वरी देवी परळीच्या वैजनाथाशी विवाह करण्यासाठी येथे आली आणि इथल्याच मातीत विसावली, अशी आख्यायिका आहे. म्हणूनच अंबाजोगाई शहर हे देवीचे माहेर मानले जाते. अंबाजोगाई येथील जोगेश्वरी देवीचे मंदिर हे मूळ शक्तिपीठ असल्याचे मानले जाते. या देवीची अनेक उपपीठे संपूर्ण मराठवाड्यात गावोगावी आहेत. अशाच उपपीठांपैकी एक प्राचीन मंदिर आष्टी तालुक्यातील पारगाव येथे स्थित आहे. हे मंदिर महानुभाव पंथाचे एक पावन स्थळ म्हणूनही ओळखले जाते.
हेमाडपंती स्थापत्यशैलीतील दगडी बांधकाम असलेले हे मंदिर साधारण अकराव्या शतकातील असावे, असे येथील ग्रामस्थ सांगतात. चक्रधर स्वामी या देवीचे भक्त होते आणि ते दर्शनासाठी या मंदिरात येत असत, असे उल्लेख महानुभाव ग्रंथांत आढळतात. इतिहास अभ्यासकांच्या मते या मंदिराचा जीर्णोद्धार सुमारे पाचशे वर्षांपूर्वी झाला असावा. मंदिराचा निश्चित कालखंड अद्याप स्पष्ट नसला, तरी हे मंदिर प्राचीन काळातील असल्याचे सर्वमान्य आहे. या मंदिराबाबत आख्यायिका अशी की मध्यरात्रीच्या वेळी अंबाजोगाईची जोगेश्वरी देवी आपल्या भावाला, म्हणजेच वाईच्या भैरोबाला भेटायला निघाली होती. या गावाच्या वेशीवर येताच देवीच्या रथाचे चाक मोडले. रथ दुरुस्त होईपर्यंत देवीने गावात विश्राम करावा, अशी विनंती गावकऱ्यांनी केली. मात्र, मोडलेला रथ सूर्योदय होईपर्यंत दुरुस्त झाला नाही आणि त्यामुळे देवी येथेच स्थापित झाली. गावाच्या वेशीवर देवीच्या रथाचे चाक असलेले ‘गाडामोडी’ मंदिर आजही अस्तित्वात आहे.
रस्त्यालगत असलेल्या जोगेश्वरी मंदिराच्या पेव्हर-ब्लॉक आच्छादित प्रशस्त प्रांगणात प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना पाषाणी बांधणीचे चौथरे आहेत. त्यावर गोलाकार दीपमाळा आहेत. प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत, तसेच मंदिरासमोर एक चौथरा दिसतो. या चौथऱ्यावर चार नक्षीदार स्तंभ आहेत. या स्तंभांच्या मध्ये शिवपिंडी आहे. या शिवपिंडीत चौकोनी शाळुंकेवर मध्यभागी वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळावर चार लिंगपाषाण आहेत. चौकोनी शाळुंकेच्या चार कोपऱ्यांपैकी दोन कोपऱ्यांत पशुमुखे आहेत. या पशूंची जीभ मुखाबाहेर आलेली दाखवली आहे. दुसऱ्या दोन कोपऱ्यांत नरमुखे आहेत. प्राचीन काळात ही जागा बळीवेदी असावी, असा अंदाज पुरातत्वप्रेमींकडून व्यक्त केला जातो. या चौथऱ्यापुढे तुळशीवृंदावन आहे आणि त्यापुढे पाषाणी स्तंभावर शिवपिंडी आहे.
पुढे मंदिराची दुसरी तटबंदी लागते. या पाषाणी तटबंदीत प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारासमोर मुखमंडप आहे. मुखमंडप प्रांगणापेक्षा उंचावर असल्यामुळे वर चढण्यासाठी तीन पायऱ्या आहेत. मुखमंडपात चार नक्षीदार स्तंभ आहेत. स्तंभावरील चौकोनी पटावर संयुक्त नक्षी, पशुशिल्पे व कीर्तिमुखे आहेत. मुखमंडपाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या चौथऱ्यांवर अलीकडील काळात बांधलेले सिमेंट-काँक्रिटचे मंडप आहेत. मुखमंडपात दोन्ही बाजूंना कठडे आहेत आणि पुढे पाच द्वारशाखा असलेले प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारात वेलबुट्टीशाखा, पर्णशाखा, पुष्पशाखा व स्तंभशाखा आहेत, तर ललाटबिंबावर गणपतीशिल्प आहे. मंडारकावर पुष्पनक्षी केलेली आहे. प्रवेशद्वारासमोर मंदिराच्या मूळ प्रांगणात बाह्य बाजूच्या मुखमंडपासारखाच मंडप आहे. मंदिराच्या मूळ प्रांगणात प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत सिमेंट-काँक्रिटचा दर्शनमंडप अलीकडील काळात बांधलेला आहे. या दर्शनमंडपात यज्ञकुंड व कासवशिल्प आहे. दर्शनमंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे आणि त्याचे छत वर-खाली अशा दोन भागांत विभागलेले आहे.
तीन अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे.
सभामंडपाच्या द्वारशाखांवर पानाफुलांची व स्तंभनक्षी आहे आणि ललाटबिंबावर गणपतीशिल्प आहे. तोरणात शिखरशिल्पे आहेत. मंडारकाला चंद्रशिळा आहे आणि दोन्ही बाजूंना कीर्तिमुखे आहेत. सभामंडपाला डाव्या व उजव्या बाजूला आणखी दोन दरवाजे आहेत. प्रवेशद्वारातून आत जाताच अर्धमंडपात प्रवेश होतो. अर्धमंडपात बाह्यबाजूस कक्षासने आहेत. प्रत्येक अर्धमंडपात चार नक्षीदार स्तंभ आहेत. सभामंडपात आठ नक्षीदार स्तंभ आहेत आणि ते सर्व चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. प्रत्येक चार स्तंभांच्या मधील वितानावर चक्राकार नक्षी आहे. स्तंभांतील चौकोनी पटावर विविध प्रकारची संयुक्त नक्षी, पशुशिल्पे व कीर्तिमुखे कोरलेली आहेत. हस्तांवर भारवाहक यक्षशिल्पे आणि तुळईवर पानाफुलांची नक्षी आहे.
सभामंडपात मध्यभागी चौथरा आहे. हे स्थान महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी यांच्या वास्तव्याचे स्थळ असल्याचे सांगितले जाते. सभामंडप व अंतराळाच्या भिंतीत असलेल्या देवकोष्ठकांमध्ये विविध देवतांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर पानफुलांची व स्तंभनक्षी आहे आणि ललाटबिंबावर गणपतीशिल्प आहे. मंडारकाला चंद्रशिळा आहे आणि दोन्ही बाजूंना कीर्तिमुखे आहेत. गर्भगृहात चार नक्षीदार स्तंभ आहेत. या स्तंभांची रचना सभामंडपातील स्तंभांसारखीच आहे. अष्टकोनी वितानावर चक्राकार नक्षी आहे.
गर्भगृहात जोगेश्वरी देवीचा स्वयंभू तांदळा विराजमान आहे, तर मागील भिंतीलगत वज्रपीठावर चतुर्भुज विष्णू व लक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. सर्व देवतांच्या मस्तकावर मुकुट आहेत. मंदिराच्या बाह्य बाजूने छतावर जाण्यासाठी पायरीमार्ग आहे. गर्भगृहाच्या छतावर चारही कोपऱ्यांत लघु शिखरे आहेत आणि त्यावरील आमलकावर कळस आहेत. छतावर पाच थरांचे चौकोनी शिखर आहे. या शिखराच्या प्रत्येक थरात देवकोष्ठके आहेत. शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक आणि त्यावर कळस आहे.
मंदिराच्या पाषाणी तटबंदीत अनेक देवकोष्ठके आहेत, ज्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. तटबंदीतील एका देवकोष्ठकात शनिदेवाची मूर्ती आहे. तटबंदीला लागून प्रांगणात एक लहान मंदिर आहे. त्यामध्ये चतुर्भुज विष्णू व लक्ष्मी यांच्या प्राचीन मूर्ती आहेत. मंदिराच्या मूळ तटबंदीच्या बाजूला अलीकडील काळातील विशाल सभागृह आहे. येथे उत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चैत्र पौर्णिमेला येथील मुख्य वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी देवी पालखीत विराजमान होऊन ढोल-ताशांच्या गजरात व गुलालाच्या उधळणीत ग्रामप्रदक्षिणेला निघते. परिसरातील हजारो भाविक देवीच्या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. रात्रभर पालखी गावात फिरून पहाटे देवी मंदिरात विराजमान होते. शारदीय नवरात्रोत्सव हा येथील दुसरा महत्त्वाचा उत्सव आहे. याशिवाय चैत्र पाडवा, दसरा, दिवाळी हे सण उत्साहात साजरे होतात. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या आणि अष्टमी या दिवशी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते.