जोगेश्वरी मंदिर

माणिकवाडी, ता. वाळवा, जि. सांगली.

जोगेश्वरी हे योगेश्वरी नावाचे अपभ्रंश होऊन आलेले नाव आहे. असे सांगितले जाते की जोगेश्वरी ही महादेवाची पत्नी पार्वती हिचे एक रूप आहे. भारतात जोगेश्वरी देवीची अनेक मंदिरे आहेत. काही ठिकाणी देवीस मूर्तीच्या रंगावरून किंवा देवीच्या कार्मिक गुणांवरून तांबडी जोगेश्वरी, काळी जोगेश्वरी पिवळी जोगेश्वरी अशी विविध नावे देण्यात आली आहेत. विशेषतः योग वा तंत्रमार्गातील ही देवता अत्यंत जागृत असल्याचे मानले जाते. जोगेश्वरी देवीचे असेच जागृत प्राचीन देवस्थान सांगली जिल्ह्यातील माणिकवाडी गावात आहे.

देवीकोशया प्रल्हाद कृष्ण प्रभुदेसाई यांच्या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडात योगेश्वरी (जोगेश्वरी) या देवीची आख्यायिका सांगण्यात आली आहे. ती अशी की भक्त प्रल्हादानंतर त्याच्या कुळात अंधकासुर नावाचा महाप्रतापी राक्षस जन्मास आला. त्रैलोक जिंकण्याच्या ईर्षेने त्याने ब्रह्मा, विष्णु महेश यांच्याबरोबर युद्ध सुरू केले. त्या युद्धात शंकराने आपल्या बाणाने अंधकासुराला जखमी केले. त्यानंतर त्याने आपला त्रिशुळ त्याच्या पोटात खुपसला. विष्णुने आपल्या चक्राच्या साह्याने इतर सैन्याचा समाचार घेतला. अंधकासुराच्या जखमेतून गळणाऱ्या प्रत्येक रक्तबिंदूतून एक याप्रमाणे अनेक राक्षस निर्माण होऊ लागले. तेव्हा शंकर अन्य देवांनी आपल्या तेजाने एक शक्ती उत्पन्न केली. तिने ते रक्त थांबवून राक्षसांची उत्पत्ती बंद केली. शिवतेजापासून निघालेली शक्ती म्हणून तिचे नाव योगेश्वरी असे पडले.

महाराष्ट्रात योगेश्वरी तथा जोगेश्वरीची दोन प्रमुख पीठे आहेत. त्यातील एक मराठवाड्यातील अंबेजोगाई येथे दुसरे मुंबईतील जोगेश्वरी येथे आहे. याच देवीचे महत्त्वाचे प्राचीन असे मंदिर माणिकवाडीत स्थित आहे. हे मंदिर सुमारे बाराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. अलिकडील काळात या मंदिरांचा आधुनिक पद्धतीने जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. रस्त्यालगत असलेल्या या मंदिराभोवती आवारभिंत आहे. त्यातील प्रवेशद्वारालगत असलेल्या देवकोष्टकात देवीची मूर्ती आहे. येथील प्रवेशद्वारावर दाक्षिणात्य पद्धतीचे गोपुरम् आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस चौथरे त्यावर चतुर्भुज स्त्रीद्वारपालांची शिल्पे आहेत. या द्वारपाल सिंहावर पाय ठेवून उभ्या आहेत. त्यांच्या तीन हातांत डमरू, त्रिशूल, गदा तर चौथा हात अभय मुद्रेत आहे. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या आतील दोन्ही बाजुंस पहारेकरी कक्ष आहेत. प्रवेशद्वाराच्या छतावर तीन थरांचे द्राविडी स्थापत्यशैलीतील शिखर आहे. शिखरातील प्रत्येक थरात चारही कोनांवर उभ्या शिखराच्या मंदिर प्रतिकृती मधल्या भागात आडव्या शिखरांच्या मंदिर प्रतिकृती आहेत. याशिवाय शिखरावर नक्षीदार स्तंभांच्या प्रतिकृती विविध देवतांची शिल्पे आहेत. शीर्षभागी आडवे गजपृष्ठाकार शिखर आहे. 

या प्रवेशद्वारातून आत मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात मंदिरासमोर नक्षीदार तुलसी वृंदावन एका चौथऱ्यावर तीन थरांची दीपमाळ आहे. दीपमाळेच्या खालील भागावर कमळ फुलाची प्रतिकृती शीर्षभागी कमळ फुलाच्या आकाराचे शिखर आहे. दीपमाळेत दीप प्रज्वलन करण्यासाठी स्वतंत्र हस्त आहेत. जोगेश्वरी मंदिर सुमारे तीन फूट उंच जगतीवर बांधलेले आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मुखमंडपात समोरील बाजूस चार नक्षीदार चौकोनी स्तंभ काहीशा रुंद चौकोनी स्तंभपादांवर उभे आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर एका चौथऱ्यावर सिंहशिल्प आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस स्त्रीद्वारपालांची शिल्पे आहेत. त्यांना उंची वस्त्रे नेसवली जातात. मुखमंडपाच्या छतावर समोरील बाजूस तीन देवकोष्टके आहेत. त्यातील मधल्या देवकोष्टकात दुर्गादेवीची मूर्ती त्याबाजूला चवऱ्या ढाळणाऱ्या देवींची शिल्पे आहेत. दोन्ही बाजूच्या देवकोष्टकांत लक्ष्मी सरस्वती यांच्या मूर्ती आहेत.

बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात (गूढमंडप) हवा प्रकाश येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपात मध्यभागी जमिनीवर पितळी कासवशिल्प भिंतीलगत उत्सव काळात वापरली जाणारी पालखी आहे. अंतराळाच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस देवकोष्टके आहेत. अर्धखुल्या स्वरुपाच्या अंतराळातून डाव्या उजव्या बाजूने बाहेर पडण्यासाठी दरवाजे आहेत.

पुढे गर्भगृहाचे महिरप कमान असलेले प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर खाली स्त्रीद्वारपालांची शिल्पे त्यावर नक्षीकाम आहे. येथील ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात वज्रपिठावर जोगेश्वरी देवीची काळ्या पाषाणातील उभी मूर्ती आहे. देवीच्या मस्तकी मुकूट अंगावर उंची वस्त्रे आणि अलंकार आहेत. मूर्तीच्या मागील बाजूस असलेल्या सुवर्ण प्रभावळीत दोन्ही बाजूस नक्षीदार स्तंभ, त्यावरील कमानीवर मकरतोरण तोरणात वर मध्यभागी कीर्तीमूख आहे. गर्भगृहात उजेड हवा येण्यासाठी वातायने आहेत. गर्भगृहाच्या बाह्यबाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. सभागृहाच्या छतावरील कठड्यात असलेल्या देवकोष्टकांत विविध देवतांची शिल्पे आहेत. गर्भगृहाच्या छतावर चौकोनी शिखर, त्यावर चारही बाजूंनी देवकोष्टके त्यात देवमूर्ती आहेत. शिखराच्या भिंतींवर उभ्या धारेची नक्षी, शीर्षभागी आमलक त्यावर कळस आहे

या मंदिराच्या बाजूला मारुती मंदिर आहे. मंदिरात वज्रपिठावर मारुतीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. मारुतीच्या एका हातात गदा दुसरा हात अभय मुद्रेत आहे. मंदिराच्या चौकोनी नक्षीदार शिखरावर समोरील बाजूला मारुतीची मूर्ती दोन्ही बाजूस सिंहशिल्पे आहेत. शिखरात शीर्षभागी आमलक त्यावर कळस आहे. मारूती मंदिराच्या शेजारी महादेवाचे मंदिर आहे.

महाशिवरात्र हा येथील सात दिवसांचा मुख्य वार्षिक उत्सव उत्साहाने साजरा केला जातो. या शिवाय चैत्र पाडवा नवरात्री, शारदीय नवरात्र, दसरा, दिवाळी, श्रावण मास आदी काळात उत्सव साजरे केले जातात

उपयुक्त माहिती

  • वाळवा शहरापासून २२ किमी, तर सांगलीपासून ५३ किमी अंतरावर
  • वाळवा, शिराळा कराड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home