जपानी बुद्ध विहार

डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई

महानगरी मुंबईशी जपानचा ऐतिहासिक ऋणानुबंध आहे. ब्रिटिश वसाहतकालामध्ये व्यापारी संबंधांनी जोडल्या गेलेल्या जपानशी असलेले आपले नाते आजही मुंबईने येथील बुद्ध विहाराद्वारे जपले आहे. वरळी येथे हे वसाहतकालीन बुद्ध मंदिर आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली सहभागी झालेल्या ‘निप्पोंझन मायोहोजी’ या बौद्ध पंथाच्या अनुयायांनी त्याची स्थापना केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या मंदिरास भेट दिल्याची नोंद आहे. एवढेच नव्हे, तर “हा बुद्ध विहार म्हणजे बौद्धांचे प्रेरणास्थान आहे,” अशा शब्दांत त्यांनी त्याचा गौरव केला होता.

जपान आणि मुंबईच्या व्यापारी संबंधांचा प्रारंभ १८५८ नंतर झाला. त्यात ‘मर्चंट प्रिन्स ऑफ बॉम्बे’ म्हणून ओळखले जाणारे बगदादी ज्यू उद्योगपती डेव्हिड ससून यांचा पुत्र ईलियास ससून तसेच जमशेटजी टाटा यांचा मोठा वाटा होता. ससून आणि टाटा कंपन्यांनी जपानमध्ये कापसाच्या सूताची निर्यात सुरू केली. त्या काळात टाटा यांनी एका जपानी कंपनीशी भागीदारी करून मुंबई-जपान-चीन या मार्गावर दोन मालवाहू जहाजांची सेवा ‘टाटा लाइन्स’च्या ध्वजाखाली सुरू केली होती. या व्यापारी संबंधांमुळे येथे मोठ्या प्रमाणावर जपानी व्यापारी आणि कर्मचारी आले. १९०८ मध्ये येथे सुमारे ६०० जपानी नागरिक आणि २०० ‘कारायुकी सान’ (जपानी वारांगना, शब्दशः अर्थ परदेशात गेलेल्या स्त्रिया) राहत असल्याची नोंद आहे. मुंबईच्या तत्कालीन लोकसंख्येच्या मानाने ही संख्या मोठी होती. याच वर्षी मुंबईतील डॉ. ई. मोझेस मार्गावर जपानी स्मशानभूमी (‘निप्पॉनजिन बोजी’) उभारण्यात आली. येथील बौद्ध विहाराचा या स्मशानभूमीशी वेगळ्या प्रकारचा संबंध आहे.

जागतिक हिंसाचाराच्या पहिल्या महायुद्धाच्या पर्वामध्ये मानवी समाजास शांततामय साहचर्य, सामंजस्य आणि सहिष्णुता या मूल्यांची नितांत आवश्यकता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर सन १९१७ मध्ये जपानमध्ये ‘निप्पोंझन मायोहोजी’ या पंथाची स्थापना झाली. ही महायान बौद्ध पंथात तेराव्या शतकात स्थापन झालेल्या ‘निचिरेन’ या पंथाची शाखा आहे. बौद्ध धर्मगुरू निचिदात्सू फुजी गुरुजी हे ‘निप्पोंझन मायोहोजी’चे संस्थापक होत. इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या सुमारास रचले गेलेले ‘सद्धर्मपुण्डरिक सूत्र’ म्हणजेच ‘कमल सूत्र’ हे महायान बौद्ध धर्मातील अत्यंत महत्त्वाचे धर्मसूत्र मानले जाते. सर्व मनुष्यांमध्ये ज्ञान, करुणा आणि साहस या सर्वोच्च अवस्था म्हणजेच बुद्धत्व प्राप्त करण्याची क्षमता असते. चिखलातून उत्पन्न झालेले पुंडरिक म्हणजेच कमळ जसे चिखलाने माखलेले नसते, तसेच सामान्य जनतेतून उत्पन्न झालेले बुद्ध आणि त्यांनी उपदेशिलेला धर्म सामान्य जनतेच्या दोषांपासून मुक्त असतो, असा या ग्रंथातील मूळ सिद्धांत आहे. ‘निप्पोंझन मायोहोजी’ पंथाच्या मते या ‘कमलसूत्रातील’ शिकवणीद्वारे जगास शांततेच्या मार्गावर नेता येते. या सूत्रास जपानमध्ये ‘म्योहो रेंगे क्यो’ असे म्हणतात. ‘नामू – म्योहो रेंगे – क्यो’ म्हणजे ‘मी विश्वाच्या अंतिम सत्यरूपी कमल सूत्रास शरण जातो’ हा ‘निप्पोंझन मायोहोजी’ पंथातील पवित्र मंत्र आहे. येथील बौद्ध विहारात एका मोठ्या फलकावर तो लिहिलेला आहे. बौद्ध धर्माच्या पुनरुत्थानामुळे भारत ब्रिटिश आणि युरोपियन राजवटीतून मुक्त होईल, असे या पंथाचे संस्थापक निचिदात्सू फुजी गुरुजींचे मत होते. या दृष्टीने त्यांच्या पंथाचे आनंद मारुयामा यांच्यासारखे काही अनुयायी गांधीजींच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभागी झाले होते.

२८ नोव्हेंबर १९३१ रोजी निचिदात्सू फुजी गुरुजी यांचे मुंबईत आगमन झाले. दक्षिण मुंबईतील कर्मवीर भाऊराव पाटील मार्गावरील (मेयो रोड) ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’च्या समोर त्यावेळी ‘निचिमेन’ या जपानी व्यापारी कंपनीचे कार्यालय होते. या कंपनीने त्यांचे स्वागत केले. येथे आल्यानंतर लगेचच, १ डिसेंबर रोजी निचिदात्सू फुजी यांनी तपश्चर्या सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी झोपडी उभारण्यासाठी कूपरेज मैदानासमोरील जपानी जिमखान्याची जागा त्यांना दाखवण्यात आली. परंतु त्यांनी डॉ. ई. मोझेस मार्गावर जपानी स्मशानभूमीच्या (‘निप्पॉनजिन बोजी’) नजीक वास्तव्य करण्याचे ठरवले. तेथे टाकाऊ पॅकेजिंग साहित्याचा वापर करून झोपडी उभारण्यात आली. २८ डिसेंबर १९३१ रोजी महात्मा गांधी लंडनमधील दुसऱ्या गोलमेज परिषदेहून भारतात परतले. त्यावेळी मुंबईत त्यांचे स्वागत करण्यासाठी प्रचंड जनसमुदाय जमा झाला होता. त्या स्वागत सोहळ्यामध्ये निचिदात्सू फुजी गुरुजी सहभागी झाले होते. यानंतर दोन वर्षांनी, ४ ऑक्टोबर १९३३ रोजी वर्धा येथील आश्रमात त्यांनी गांधीजींची भेट घेतली. तेथे ते आपल्या शिष्यांसह दोन महिने थांबले. गांधीजींशी त्यांनी जवळून संवाद साधला. याच काळात त्यांनी भारतात ‘निप्पोंझन मायोहोजी’ बौद्ध मंदिर बांधण्याची योजना मांडली. स्वातंत्र्यलढ्यातील गांधीजींचे सहकारी आणि राष्ट्रवादी उद्योगपती जे. के. बिर्ला यांनी या योजनेस पाठिंबा दर्शविला. त्यांनी दिलेल्या देणगीतून वरळी येथे एक लहानसे मंदिर उभारण्यात आले.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपान हे ब्रिटनचे शत्रूराष्ट्र बनले आणि येथील जपानी लोकांवर गंडांतर आले. जपानी कंपन्यांच्या, तसेच नागरिकांच्या मालमत्ता ‘एनिमी प्रॉपर्टी’ म्हणून घोषित करण्यात आल्या. त्यात या मंदिराचाही समावेश होता. या सर्व जागा जप्त करण्यात आल्या. पुढे देश स्वतंत्र झाल्यानंतर पंथाच्या अनुयायांनी ही जागा ‘कस्टोडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टी’ या सरकारी विभागाकडून परत मिळवली. परंतु त्या जागेवर काही लोकांनी अनधिकृत कब्जा केला होता. ती अतिक्रमणे कायदेशीर व शांततेच्या मार्गाने दूर करण्यात आली आणि अखेर १९५२ मध्ये शेठ राजा बलदेवदास बिर्ला यांच्या कुटुंबीयांनी चालवलेल्या ‘बिर्ला ट्रस्ट’ने दिलेल्या देणगीतून येथे निप्पोंझन मायोहोजी बौद्ध विहाराचा जीर्णोद्धार करण्यात आला. उद्योगपती जुगल किशोर बिर्ला यांचे त्यात मोठे योगदान आहे.

त्या काळात संपूर्ण देशभरात हरिजनांना मंदिरांमध्ये प्रवेश द्यावा या मागणीसाठी गांधीजींच्या मार्गाने चळवळ सुरू होती. सनातनी लोकांचा यास विरोध होता. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी साने गुरुजींना उपोषण करावे लागले होते. या पार्श्वभूमीवर वरळीतील या बौद्ध विहारात सर्व हिंदूंना मुक्त प्रवेश देण्यात आला होता. ‘या मंदिरातील दैनंदिन पूजा व सत्संगात सर्व हिंदू म्हणजेच हिंदू (आर्य) धर्माच्या बौद्ध, सनातनी, जैन, शिख, आर्य-समाजी आदी विविध शाखांतील लोकांना प्रवेश आहे. हे मंदिर हरिजनांसह सर्व हिंदूंना खुले आहे,’ असा शिलालेख या मंदिरात त्यावेळी लावण्यात आला होता. आजही तो येथे आहे. या मंदिराचे काम सुरू असतानाच्या काळात, २९ सप्टेंबर १९५० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या बुद्ध विहारास भेट दिली होती. त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी लोकांना बौद्ध धर्म स्वीकारण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे बौद्ध धर्माच्या पुनरुत्थान आणि प्रचारासाठी आपण आपले जीवन व्यतीत करू, अशी घोषणा त्यांनी येथे केली. ‘हिंदू कोड बिल’ला सनातन्यांकडून झालेल्या विरोधामुळे व्यथित होऊन डॉ. आंबेडकर यांनी पं. नेहरू मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. त्यानंतर दोन महिन्यांनी ते मुंबईत आले, तेव्हा २२ डिसेंबर १९५१ रोजी त्यांनी पुन्हा या बुद्ध विहारात येऊन बौद्ध धर्माविषयी भाषण दिले. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ (वसंत मून, अनुवाद प्रशांत पांडे, नॅशनल बुक ट्रस्ट, १९९१, पा. १९०, १९३) या हिंदी चरित्रग्रंथामध्ये ही नोंद आहे.

वरळीतील डॉ. ॲनी बेझंट मार्गावर, आवारभिंतीआड प्रशस्त प्रांगणात हे मंदिर वसले आहे. याचा बाहेरील भाग महाबोधी विहारासारखा आहे, तर आतील भाग मुख्य चैत्यासारखा आहे. मंदिर स्थापत्यशैलीच्या परिभाषेत, मुखमंडप, उपसभामंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी त्याची संरचना आहे. मंदिर उंच जगतीवर वालुकाश्मात उभारलेले आहे. त्यास अष्टकोनी पाषाण स्तंभ असलेला मुखमंडप आहे. त्यावर ‘निप्पोंझन मायोहोजी टेंपल’ असा जपानी लिपीत कोरलेला नामस्थलक आहे. येथील दर्शनी भिंतीवर पांढरा शुभ्र रंग दिलेल्या दोन लहान आणि दोन मोठ्या खिडक्या आहेत. मंदिराच्या छतास चारही बाजूंनी कठडा आहे. त्याच्या चारही कोपऱ्यांत चार स्तंभ-शिखरे व गर्भगृहावर उंच शिखर आहे. त्यावर कलशासारखी रचना आहे. ही शिखरे शांततेचे प्रतीक असलेल्या पांढऱ्या रंगात रंगवलेली आहेत. मंदिराचा सभामंडप दोन मजल्यांएवढा उंच आणि प्रशस्त आहे. त्यात भिंतीपासून काही अंतरावर पाषाणाचे अष्टकोनी कोरीव स्तंभ आहेत. या स्तंभांच्या वरच्या भागात असलेल्या भिंतीवर गौतम बुद्धांच्या जीवनातील विविध प्रसंगांची मोठी चित्रे रंगवलेली आहेत. येथील समतल वितानावर मध्यभागी मोठे कमलपुष्प कोरलेले आहे. सभामंडपातील संगमरवरी फरसबंदीवर मोठा गालिचा अंथरलेला आहे. स्तंभांनजीक भाविकांना आणि भिख्खूंना बसण्यासाठी वेताच्या तसेच लाकडी खुर्च्या मांडलेल्या आहेत. एके ठिकाणी प्रार्थनेच्या वेळी वाजवण्यात येणारा नगारा ठेवलेला आहे. या विहार वा मंदिराच्या गर्भगृहास रुंद चौकोनाकार प्रवेशद्वार आहे. त्याच्या बाजूच्या भिंतींवर बिर्ला परिवारातील व्यक्तींच्या तसबिरी, बौद्धधर्मीय सम्राट अशोकाच्या राजाज्ञा, तसेच काही बुद्धमूर्ती पाहावयास मिळतात. प्रवेशद्वारावर ‘नामू – म्योहो रेंगे – क्यो’ हा मंत्र लिहिलेला मोठा फलक आहे. त्यावरील भिंतीवर गौतम बुद्धांचे भव्य भित्तीचित्र आहे. महापरिनिर्वाणाच्या वेळी शयनावस्थेतील शाक्यमुनी बुद्ध ही बौद्धधर्मातील एक सुप्रसिद्ध प्रतिमा आहे. ती येथे रंगवलेली आहे. गर्भगृहात संगमरवरी पायऱ्या-पायऱ्यांच्या अधिष्ठानावर गौतम बुद्धांची संगमरवरी पाषाणात घडवलेली मूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती ‘आसीन’ (बैठी) या पद्धतीची आहे. येथे बुद्ध ध्यानस्थ स्वरूपात पद्मासनात बसलेले आहेत. चेहऱ्यावर नितांत शांत भाव आहेत. मस्तकी काळे कुरळे केस व त्यावर ‘उष्णीष’ (ज्ञानाचे प्रतीक असलेला डोक्यावरील उंच भाग) आहे. हात ‘व्याख्यान’ वा ‘धम्मचक्र प्रवर्तन’ मुद्रेत आहेत. ही मुद्रा गौतम बुद्धांनी सारनाथ येथे दिलेल्या पहिल्या उपदेशाचे म्हणजे धम्मचक्र प्रवर्तनाचे प्रतीक मानली जाते. मूर्तीच्या पाठशिलेवर विशिष्ट प्राणी व हंसशिल्पे कोरलेली आहेत. मूर्तीच्या चेहऱ्याच्या मागे गोलाकार प्रभावळ आहे. मूर्तीच्या मागे ‘निप्पोंझन मायोहोजी’चे संस्थापक निचिदात्सू फुजी गुरुजींचे छायाचित्र तसेच मूर्ती ठेवलेली आहे. मूर्तीच्या मागच्या बाजूस अधिष्ठानावर विविध सोनेरी बुद्धमूर्ती ठेवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जपानी चित्रशैलीतील काही धार्मिक चित्रेही आहेत.

या मंदिरात सकाळी ५.३० ते दुपारी १२.३० आणि दुपारी ३.३० ते सायंकाळी ७.३० या कालावधीत भाविक बुद्धदर्शनाचा लाभ घेऊ शकतात. मंदिरात रोज सकाळी ६ वाजता आणि सायंकाळी ५.३० ते ७ या कालावधीत प्रार्थना केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिरास प्रथम भेट देऊन बुद्धवंदना केली, तो २९ सप्टेंबरचा दिवस येथे विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. सन २०२५ मध्ये या बुद्धवंदनेचा अमृत महोत्सव येथे उत्साहाने साजरा करण्यात आला होता.

उपयुक्त माहिती

  • दादर रेल्वे स्थानकापासून ६ किमी अंतरावर
  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून ४ किमी अंतरावर
  • शहरातील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा उपलब्ध आहे
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०२२ २४९३५७९०
मंदिर लोकेशन:

जापानी बौद्ध विहार

डॉ. एनी बेसेंट रोड, वर्ली, मुंबई

Back To Home