जकाई देवी मंदिर

नेलकरंजी, मानेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली

जकाई, जाकमाता, जाखमाता तसेच जाखाई ही एकाच देवीची वेगवेगळी नावे आहेत. स्थळकाळपरत्वे अपभ्रंश होऊन देवीच्या नावाचे उच्चार वेगवेगळे झाले आहेत. जकाई ही भैरवपत्नी आहे ती स्वतः शक्ती स्वरूपिणी असल्याने रक्षक देवता म्हणून सर्वत्र पुजली जाते. ती मातृस्वरूप असल्याने पुत्र, पौत्र, धनधान्य, यशकीर्ती, जयविजयाची दात्री असल्याची मान्यता आहे. जकाई देवीची मंदिरे देशभरात विविध ठिकाणी आहेत. त्यापैकी आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथील गुहेत असलेले जकाई देवीचे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे.

या मंदिराची अख्यायिका अशी की जकाई देवी नेलकरंजी गावातील भोसले घराण्यातील राजकन्या होती. तीचे खरसुंडीच्या सिद्धनाथावर प्रेम जडले तीने त्या देवाशी विवाह केला. विवाहानंतर देवाने सध्या जेथे मंदिर आहे तेथे जकाई देवीस ठेवले वेळ मिळेल तसा देव जकाईच्या भेटीस येत असे. ही बाब जेव्हा देवाची पहिली पत्नी जोगाई देवीस माहिती पडली, तेव्हा जोगाई देवीने सिद्धनाथास जकाई देवीला तीन वर्षातून एकदाच भेटावे, अशी अट घातली. जोगाई देवीस दिलेल्या वचनानुसार देव दर तीन वर्षांनी जकाई देवीस भेटण्यासाठी येथे पालखीत बसून येतो.

हे मंदिर सुमारे हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. गुहेतील गर्भगृहापुढे सभामंडप इतर बांधकामे ही नंतरच्या काळातील आहेत. गावापासून डोंगरावर असलेल्या मंदिराकडे येण्यासाठी पक्का डांबरी रस्ता आहे. डोंगराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत येणारा जुना पायरी मार्गही आहे. त्यात १५० पायऱ्या आहेत. वाहनतळापासून वीस पायऱ्या चढून मंदिरापर्यंत पोहोचता येते. पायरी मार्गाच्या अंतिम टप्प्यात भक्त निवासाची इमारत आहे. पुढे मंदिराच्या प्रांगणात दर्शन रांगेची व्यवस्था आहे. या प्रांगणात म्हसोबा देवाचा स्वयंभू पाषाण आहे. त्याभोवती स्टेनलेस स्टीलच्या चार स्तंभांना साखळ्या लावलेला सुरक्षा कठडा आहे.

येथील सभामंडप समोरील बाजूने खुला आहे त्याला दोन्ही बाजूला कठडे आहेत. सभामंडपात मध्यभागी असलेल्या चौथऱ्यावर दर तीन वर्षांनी होणाऱ्या यात्रेच्या वेळी खरसुंडी येथून आलेली सिद्धनाथांची पालखी देवाचा मुखवटा भाविकांच्या दर्शनासाठी ठेवला जातो. पुढे गर्भगृहाच्या द्वारशाखांवर नक्षीकाम आहे. मंडारकावर कीर्तीमुख ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. लालटपट्टीच्या दोन्ही बाजूस मानवी चेहरे आहेत. ते द्वारपाल असल्याचे सांगितले जाते. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीत प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दीपकोष्टके आहेत

प्रवेशद्वारातून आत आल्यावर गर्भगृहात प्रवेश होतो. हे गर्भगृह म्हणजे डोंगरातील गुहा असल्यामुळे येथील भिंती छतात डोंगराचा कातळ दिसतो. येथील वज्रपिठावर जकाई देवीची काळ्या पाषाणातील उभी मूर्ती आहे. मूर्तीच्या अंगावर उंची वस्त्रे, अलंकार डोक्यावर चांदीचा मुकूट आहे. देवीच्या डोक्यावर चांदीचे छत्र आहे. मंदिराच्या प्रांगणात असलेल्या महावृक्षाखाली प्राचिन शिवपिंडी नंदी आहे. महावृक्षाच्या बाजूला डोंगरातील कपारीत मारुतीचे मंदिर आहे. मंदिरात मागील भिंतीलगत मारुतीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. मूर्तीजवळ स्थानिक देवतांचे पाषाण आहेत. मंदिराच्या बाजूला डोंगराचा उभा कडा आहे. पावसाळ्यात येथून कोसळणाऱ्या जलधारा झेलण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते.

मंदिराजवळ म्हसोबाचे एक लहानसे मंदिर आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारातही स्थानिक देवतांचे पाषाण शिवपिंडी आहे. मंदिरातील वज्रपिठावर म्हसोबा देवाची हातात दंड अमृतपात्र असलेली द्विभुज मूर्ती आहे. देवाच्या कटीला धोतर, अंगावर अलंकार डोक्याला मुंडासे बांधलेले आहे. मूर्तीच्या पायाजवळ इतर स्थानिक देवतांचे पाषाण आहेत. पायरी मार्गाच्या उजव्या बाजूला नव्याने बांधलेले सभागृह आहे. येथे अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंदिरापासून जवळच मोठा तलाव आहे. तो जकाई तलाव म्हणून परिचित आहे

जकाई माता मंदिरात दर तीन वर्षांनी एकदा पौष शुद्ध चतुर्दशीस जत्रोत्सव साजरा केला जातो. यावेळी खरसुंडी येथील सिद्धनाथाची पालखी मिरवणूक जकाई देवीस भेटण्यासाठी येते. यावेळी भजन, कीर्तन आदी कार्यक्रमांसोबतच कुस्त्यांचे फड इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी राज्यभरातून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी नवस फेडण्यासाठी येतात. येथील संपूर्ण डोंगर हजारो भाविकांनी उधळलेल्या गुलालामुळे यावेळी रंगीत दिसतो

उपयुक्त माहिती

  • विटापासून ३७ किमी, तर सांगलीपासून ६७ किमी अंतरावर
  • विटा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिर असलेल्या डोंगर पायथ्यापर्यंत येऊ शकतात
  • मंदिर परिसरात असलेल्या भक्तनिवासात राहण्याची सुविधा
Back To Home