‘रजतनगरी’ असा लौकिक असलेल्या खामगावनजीकच्या घाटपुरी येथील जगदंबा देवीचे मंदिर प्राचीन व प्रसिद्ध आहे. विदर्भातील अनेक कुटुंबांची कुलदेवता असलेल्या येथील जगदंबा देवीची पाषाणी मूर्ती गावातील एका विहिरीच्या खोदकामादरम्यान आढळली होती. नवसाला पावणाऱ्या या देवीच्या दर्शनासाठी येथे नेहमीच भाविकांची मांदियाळी असते. विदर्भात सहसा न आढळणारी देवीला कौल लावण्याची पद्धत येथे आहे. शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान नऊही दिवस दररोज दोन लाखांहून अधिक भाविक या देवीसमोर नतमस्तक होतात. या उत्सवादरम्यान मंदिरात अखंड ज्योतीचे शेकडो दिवे तेवत असतात.
अनेक वर्षांपूर्वी गावातील शेतकरी जानराव देशमुख यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू असताना एका कपारीत देवीची मूर्ती सापडली. त्यानंतर या देवीची येथे प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या ठिकाणी एक वारूळ होते. अनेक वर्षे भाविक तेथेच तेल वाहून देवीची पूजा करत. गावच्या पाटलांनी नंतर ही जागा देवीच्या मंदिरासाठी दान केली.
स्थानिक लोक या देवीला तुळजाभवानीचे रूप मानतात, असा उल्लेख ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स – अकोला डिस्ट्रिक्ट, व्हॉल्यूम ए’ (१९१०) मध्ये आहे.
या मंदिराचा परिसर पूर्वी आडवळणाचा होता. मंदिराच्या बाजूने नदी वाहत असे. नवसाला पावणारी देवी असा लौकिक पसरल्याने विविध भागांतील भाविक तिच्या दर्शनासाठी येऊ लागले. सुरुवातीला हे मंदिर छोटेखानी होते. काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले. पूर्वी छोटे खेडे असलेले घाटपुरी आता खामगाव शहराचाच भाग बनले आहे. मुख्य शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात दोन्ही बाजूंना सिंहांची शिल्पे आहेत. प्रवेशद्वारातून आत आल्यावर पेव्हर ब्लॉकची फरसबंदी केलेले प्रशस्त प्रांगण आहे. प्रांगणात पूजासाहित्य विक्रीची अनेक दुकाने आहेत. मंदिराच्या समोर असलेल्या मोठ्या पिंपळ वृक्षाखाली काही शेंदूरचर्चित पाषाण आहेत. नजीकच छोटे शिवमंदिर आहे.
सभामंडप आणि दोन गर्भगृहे अशी जगदंबा देवी मंदिराची संरचना आहे. सभामंडपात देवीचे वाहन असलेल्या वाघाचे शिल्प आहे.
मुख्य गर्भगृहाला महिरपी कमानीचे प्रवेशद्वार आहे आणि आत तीन मोठ्या संगमरवरी मखरांमध्ये मध्यभागी देवीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. तीन फूट उंचीच्या या चतुर्भुज मूर्तीच्या हातांत शंख, चक्र, गदा, पद्म आहेत. या मुकुटधारी मूर्तीच्या दोन्ही बाजूंना दोन राक्षस आहेत आणि समोर सिंहाच्या दोन मूर्ती आहेत. देवीच्या डावीकडील मखरात नागदेवतेची चांदीची मूर्ती तर उजवीकडील मखरात गणेशाची मूर्ती विराजमान आहे. या मंदिरातील दुसऱ्या गर्भगृहात शिवलिंग आहे. या गर्भगृहासमोर नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहातील शाळुंका तसेच पिंडीवर चांदीच्या पत्र्याचे आवरण आहे आणि वरच्या भागात असलेल्या गलंतिकेतून पिंडीवर अभिषेक होत असतो. येथील देवकोष्ठकांमध्ये पार्वतीमाता तसेच गणेशाचे स्थान आहे. मंदिरात हनुमानाचीही मूर्ती आहे. दोन्ही गर्भगृहांवरील आधुनिक पद्धतीची उंच शिखरे संगमरवरी फरशा वापरून उभारण्यात आली आहेत.
दूरवरून येथे येणाऱ्या भाविकांच्या निवासाच्या सोयीसाठी परिसरात धर्मशाळा बांधण्यात आली आहे. आळंदी येथील श्री महर्षी वेद व्यास प्रतिष्ठानतर्फे या मंदिराच्या परिसरात वेद विद्यालय चालवण्यात येते. येथे विद्यार्थ्यांना पांडित्य, संस्कृत वेदपठण, धर्मशास्त्र आदींचे शिक्षण दिले जाते.
या मंदिरात दररोज पहाटे ५ वाजता अभिषेक व पूजा करण्यात येते. सकाळी व सायंकाळी ७ वाजता येथे आरती होते. रात्री ९ वाजता मंदिर दर्शनासाठी बंद होते. येथे देवीला कौल लावण्याची पद्धत आहे. मंदिरातील पुजारी हा कौल लावतात. मंदिरात सहा इंच उंचीचे दोन गोलाकार पाषाण आहेत. एका पाषाणावर तीन तर दुसऱ्या पाषाणावर चार छोटे पाषाण ठेवण्यात येतात. देवीच्या उजव्या बाजूच्या उतरंडीवरचा पाषाण उजव्या हाताला पडला तर देवीने कौल दिला, असे मानण्यात येते.
शारदीय नवरात्रोत्सव हा येथील मोठा उत्सव असतो. या काळात मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप येते. उत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात येते. या उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करण्यात येते. उत्सवादरम्यान देवीच्या अंगावर सोन्या-चांदीची आभूषणे चढवण्यात येतात. नऊही दिवस येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अष्टमीच्या दिवशी होमहवन व महाभंडारा असतो. या उत्सवादरम्यान मनोकामना पूर्ण होण्यासाठी अनेक भाविक सभामंडपात अखंड ज्योतीचे शेकडो दिवे लावतात. सुमारे पंधरा वर्षांपासून येथे नवरात्रोत्सवादरम्यान हे दिवे लावले जातात. या उत्सवादरम्यान मंदिर रात्री १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते. विदर्भ, खानदेशसह महाराष्ट्रातील विविध भागांतील तसेच गुजरात, मध्य प्रदेशसारख्या राज्यांतूनही अनेक भाविक या काळात येथे दर्शनासाठी येतात. या उत्सवादरम्यान मंदिर परिसरात प्रसाद, फुलांसह विविध वस्तूंची विक्री करणारी अनेक दुकाने थाटली जातात.