जगन्नाथ मंदिर

तळंदगे, ता. हातकणंगले, कोल्हापूर

देश-विदेशात प्रसिद्ध असलेले, ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिर हे हिंदू धर्मियांचे एक अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र. दरवर्षी लाखो भाविक तेथे भेट देतात. या जगन्नाथाचे ओडिशा येथील स्थानाप्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्यातील तळंदगे येथे एक प्रसिद्ध स्थान आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील या मंदिरातील मूर्ती ही जगन्नाथ पुरीप्रमाणे आहे. या ठिकाणी निघणारी रथयात्रा पाहण्यासाठी दूरदुरून येथे भाविक येतात. येथील जगन्नाथाचे स्थान जागृत आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

जगन्नाथ पुरी येथील मंदिराबाबत पौराणिक आख्यायिका अशी की विश्ववसु नामक एक आदिवासी राजा भगवान जगन्नाथाची भगवान नीलमाधव या रूपात गुपचूप पूजा करीत असे. राजा इंद्रद्युम्न याला त्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने विद्यापती नामक ब्राह्मण पुजाऱ्याला त्याचा शोध घेण्यासाठी पाठवले. भगवान नीलमाधव यांचे स्थान शोधण्याचे सर्व उपाय थकल्यानंतर विद्यापतीने विश्ववसुच्या मुलीशी विवाह केला. नंतर त्याने आपल्या सासऱ्याकडे पूजास्थान पाहण्याचा हट्ट धरला. विश्ववसुने त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधून जंगलातील त्या ठिकाणी नेले. तेथे जात असताना विश्ववसुने ठिकठिकाणी गुपचूप आपल्या हातातील मोहरीच्या बिया टाकल्या. कालांतराने त्या उगवून आल्या. त्यावरून त्या स्थानाचा मार्ग समजला. ते ऐकताच राजा इंद्रद्युम्न तेथे धावत आला. परंतु पाहतो तर तेथील देवमूर्ती गायब झाली होती.

अखेर निराश होऊन राजाने तेथेच समुद्र तटावर भव्य मंदिर बांधले. तेव्हा त्याला जगन्नाथाचा स्वप्नदृष्टान्त झाला. त्यात जगन्नाथाने त्याला सांगितले की समुद्रातून लाकडाचा ओंडका वाहून येईल. त्याची सुरक्षित पूजा कर. त्यापासून नंतर जो आकार तयार होईल त्याची मंदिरात प्रतिष्ठापना कर. त्या मूर्तींनी जगन्नाथ, बलराम, सुभद्रा आणि सुदर्शन चक्राच्या मूर्तीचा आकार धारण केला. त्यांची राजाने मंदिरात प्रतिष्ठापना केली. अबुल फज्ल याने १५९८मध्ये लिहिलेल्या ‘आईन-इ-अकबरी’ या ग्रंथातही ही कहाणी दिली आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार हे मंदिर कलिंग राजा चोडगंग आणि अनंग भीमदेव यांनी सुमारे बाराव्या शतकात बांधले. काही इतिहासकारांनुसार, त्याच्या आधीपासून येथे मंदिर होते. ते सोमवंशी राजा ययाती द्वितीय (काळ इ.स. १०२१ ते १०४०) याने बांधले असावे. नंतर चोडगंगने त्याचा जीर्णोद्धार केला. ‘आईन-इ-अकबरी’नुसार बंगालचा सुलताना सुलेमान कर्रानी याचा सरदार काला पहाड याने जगन्नाथ पुरीवर हल्ला करून मंदिरातील मूर्तींना आग लावून त्या समुद्रात फेकून दिल्या होत्या. त्या घटनेशी इंद्रद्युम्न राजाची आख्यायिका निगडित आहे. काला पहाड हा एक वैष्णव ब्राह्मण होता. त्याने सुलतानाच्या मुलीशी लग्न करून इस्लाम धर्म स्वीकारला होता.

भगवान जगन्नाथाच्या या स्वप्नदृष्टान्ताच्या आख्यायिकेप्रमाणेच तळंदगे गावातील मंदिराशी संबंधित एक आख्यायिका आहे. ती अशी की या गावचे पाटील दर वर्षी कार्तिक पौर्णिमेला पुरी-जगन्नाथाच्या दर्शनासाठी जात असत. तो सारा प्रवास ते घोड्यावरून करीत असत. पण काही वर्षांनंतर उतारवयात शरीर साथ देत नसल्याने तो प्रवास करणे त्यांना शक्य होईना. एकदा जगन्नाथाच्या उत्सवकाळातच त्यांना जगन्नाथाचा स्वप्नदृष्टान्त झाला. तुला माझ्यापर्यंत येणे शक्य नसेल तर मीच तुझ्यापर्यंत येतो. तुझ्या गावच्या तळ्याजवळ मी आहे, असे जगन्नाथाने त्यांना सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठताच ते गावातील मान्यवरांसह तळ्यावर पोहोचले. तिथे त्यांना जगन्नाथाची मूर्ती गवसली. मनोमनी आनंद झालेल्या पाटलांनी मग जगन्नाथाचे मंदिर उभारण्याचे ठरवले. गावकऱ्यांनी त्यांच्या प्रयत्नांना साथ दिली आणि त्या तळ्याजवळ मंदिर उभारून त्यात या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकदा करवीर संस्थानचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिकारीसाठी येथील जंगलात आले होते. तहान लागल्याने पाण्याच्या शोधात ते या तळ्यापाशी असलेल्या छोट्या मंदिरात आले. तेथे एका साधूने त्यांची तहान भागवली. दुपारची वेळ असल्याने महाराजांनी तेथे विश्रांती घेतली. त्यावेळी स्वतः जगन्नाथाने त्यांना दृष्टांत दिला. त्यामुळे शाहू महाराजांनी हे मंदिर नव्याने बांधून दिले. या मंदिरास लाकडी सभामंडप व हेमाडपंती शैलीतील दगडी गर्भगृह होते असे गावकरी सांगतात. याच मंदिराचा आता जीर्णोद्धार करण्यात आला आहे.

हुपरीच्या पश्चिमेस साधारण पाच किमीवर तसेच कोल्हापूरच्या आग्नेय दिशेला साधारण २० किमीवर तळंदगे गाव वसले आहे. अंबाबाई मंदिरामुळे प्रसिद्धीस आलेल्या आणि चांदी व्यवसायामुळे ओळखल्या जाणाऱ्या हुपरीप्रमाणेच तळंगदे गावातही चांदी व्यवसायाने मूळ धरले आहे. गावातील आर्थिक उलाढाल वाढली आहे. हे सगळे जगन्नाथाच्या कृपेमुळे होत आहे, अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे.

गावाच्या दक्षिण टोकाला अगदी वेशीवर, रस्त्यापासून काही अंतर आत हे मंदिर स्थित आहे. मंदिर पूर्वाभिमुखी आहे. सभामंडप, गर्भगृह आणि त्यावर उंच शिखर अशी मंदिररचना आहे. सभामंडपाच्या समोर पाषाणाचा मोठा गरुडस्तंभ आहे. सभामंडप आधुनिक बांधणीचा व प्रशस्त आहे. गर्भगृहाच्या बांधकामासाठी दगडाचा मोठ्या प्रमाणावर वापर केलेला आहे. गर्भगृहास कमी उंचीचे प्रवेशद्वार आहे. द्वारचौकटीवर ललाटबिंबस्थानी गणेशमूर्ती विराजमान आहे. त्यावर उत्तरांगस्थानी कृष्ण, बलराम व सुभद्रेच्या मुखमूर्ती आहेत. गर्भगृहात पाषाण देव्हाऱ्यामध्ये जगन्नाथाची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. येथे पूर्वी स्वयंभू जगन्नाथाची मूर्ती होती. मात्र ती भंगल्यामुळे तिच्या जागी सध्या असणारी मूर्ती स्थापित केली आहे. जुनी मूर्ती गर्भगृहात ठेऊन त्यावर बांधकाम करण्यात आल्याचे सांगण्यात येते. सध्याची मूर्ती काळ्या पाषाणातील आहे. उभ्या स्वरूपातील जगन्नाथाचे दोन्ही हात उंचावलेले आहेत. मूर्ती वस्त्रालंकारयुक्त आहे व मस्तकी मंदिल आहे. मूर्तीच्या उजव्या बाजुला पुरीच्या जगन्नाथ, बलराम व सुभद्रा यांच्या मूर्ती आहेत.

गर्भगृहाच्या छतावर चारी कोपऱ्यांवर लहान छत्र्या आहेत. येथील शिखर उंच व उरूशृंग प्रकारचे म्हणजे मुख्य शिखराच्या छातीवर चारी बाजूंनी शिखरांच्या लहान प्रतिकृती कोरलेले असे आहे. गर्भगृहाच्या बाहेर डाव्या बाजूस जगन्नाथाचा मोठा लाकडी रथ ठेवलेला आहे. पुरीच्या जगन्नाथ मंदिरात असतो तसाच हा रथ आहे. येथेच एका पारावर जुन्या मंदिराचे काही भग्न अवशेष, तसेच मूर्ती ठेवलेल्या आहेत. यात नंदी, हनुमंत, सुदर्शन चक्र, काही पाषाण यांचा समावेश आहे. शिवाय या ठिकाणी एक पाली भाषेतील शिलालेखही आहे. मंदिराच्या उजव्या बाजुस तुळजामातेचे छोटे मंदिर असल्याचे सांगितले जाते. पण पुरातत्व खात्याच्या म्हणण्यानुसार ते देवी सुभद्रेचे असल्याचे समजते. ही मूर्तीही अतिशय सुरेख व आकर्षक आहे. मुख्य मंदिराच्या डाव्या बाजुला राधाकृष्णाचे एक छोटे मंदिर आहे. राधाकृष्णाची मूर्तीही अतिशय रेखीव आहे. त्याच्या बाजूलाच तळे आहे.

उपयुक्त माहिती

  • हातकणंगले येथून २० किमी, तर कोल्हापूर येथून २२ किमी अंतरावर
  • हातगणंगले व कोल्हापूर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : गणेश कदम, पुजारी, मो. ९६०४४५४७३९, ९५६११६७३०२
Back To Home