ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठाणे शहरात अनेक प्राचीन व प्रसिद्ध मंदिरे आहेत. घोडबंदर रोडवरील गायमुख परिसरातील जागनाथ महादेव मंदिर हे त्यापैकीच एक. येथील स्वयंभू शिवलिंग जागृत असल्याच्या भाविकांच्या श्रद्धेमुळे या मंदिराला जागृतांचा नाथ म्हणजेच जागनाथ महादेव मंदिर असे नाव पडले. निसर्गरम्य, शांत वातावरणात व टेकडीवर वसलेल्या येथील शिवशंकराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची नेहमी गर्दी असते. श्रावणातील प्रत्येक सोमवारी व महाशिवरात्रीला दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भक्तांमुळे हा परिसर गजबजलेला असतो.
असे सांगितले जाते की येथील स्वयंभू शिवलिंग हे पूर्वीपासूनच येथे आहे. पूर्वी या शिवलिंगावर धबधब्याच्या पाण्याचा अभिषेक होत असे. या परिसरातील घनदाट जंगलात अनेक हिंस्र पशूंचा वावर असे. त्यामुळे येथे येण्यास कोणीही धजावत नसे. मूळचे पंजाबचे असलेले बुद्धदेव महाराज या सिद्धपुरुषामुळे हे मंदिर नावारूपास आले. इ.स. १९०७ मध्ये पंजाबमधील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बुद्धदेव महाराजांनी तरुण वयातच संसाराचा त्याग करून संन्यास घेतला. अनेक ठिकाणी भ्रमंती करत इ.स. १९५६ च्या सुमारास ते ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी परिसरात आले. तेथे काही दिवस तपश्चर्या केल्यानंतर ते या ठिकाणी आले. येथेही त्यांनी अनेक वर्षे तपश्चर्या केली. जंगलातील कंदमुळे
खाऊन ते उपजीविका करत असत. त्या काळात काही आदिवासी व गुराखी येथे येत. हिंस्र श्वापदांच्या सान्निध्यात राहूनही अविचलित मुद्रेत शिवलिंगाजवळ तपश्चर्या करणारे सिद्धदेव महाराज त्यांच्या नजरेस पडत.
येथील स्वयंभू शिवलिंग तसेच बुद्धदेव महाराजांबाबत माहिती मिळाल्याने अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी येथे येऊ लागले. बुद्धदेव महाराजही त्यांना योग्य ते मार्गदर्शन करीत असत. हळूहळू त्यांच्या शिष्य परिवारात वाढ होऊ लागली. कालांतराने बुद्धदेव महाराजांनी येथे आपल्या शिष्यांकरवी शंकराचे लाकडी व कौलारू मंदिर उभारले. चाळीस वर्षांपूर्वी हे मंदिर जीर्ण झाल्याने त्यांनी भक्तांना सांगून मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यासाठी लागलेले दगड राजस्थान व हरियाणा येथून आणण्यात आले. अनेक वर्षे तपश्चर्येच्या बळावर सिद्धी प्राप्त केलेल्या बुद्धदेव महाराजांनी प्रसिद्धीपासून विन्मुख राहून अनेक ठिकाणी लोकोपयोगी कामे केली. त्यांनी वज्रेश्वरी येथील नर्मदेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार, तसेच त्या मंदिराच्या परिसरात धर्मशाळा बांधून तेथे गरिबांसाठी भंडारा सुरू केला. रतलाम येथे शंकर मंदिर तसेच दोन धर्मशाळा उभारल्या. गायमुख परिसरात आश्रम बांधला. ठाण्यातील ओवळा परिसरात श्रीराम रुग्णालय, कासारवडवली परिसरात अरुणोदय माध्यमिक शाळा उभारली. २००८ मध्ये शेकडो भक्तांच्या उपस्थितीत त्यांनी बडोदा येथील महिसागर गंगेत जलसमाधी घेतली.
ठाण्यातील घोडबंदर रोडवर गायमुख परिसरात नागला बंदराच्या विरुद्ध दिशेला एका हिरव्यागार टेकडीवर जागनाथ महादेवाचे मंदिर आहे. गायमुख बसस्थानकापासून अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर चार खांब असलेली मंदिराची नक्षीदार, पांढरीशुभ्र कमान नजरेस पडते. या कमानीच्या मध्यभागी नटराजाची मूर्ती आहे. मंदिरात येण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिल्या मार्गाने वाहनातून थेट मंदिराजवळ जाता येते. दुसरा मार्ग पायऱ्यांचा आहे. येथे एकूण ८७ पायऱ्या आहेत. मंदिर टेकडीवर असल्याने या पायऱ्या नागमोडी वळणाच्या आहेत. भाविकांच्या गर्दीचे नियोजन करता यावे यासाठी या पायऱ्यांच्या मध्यभागी रेलिंग लावण्यात आलेले आहेत. हा परिसर खूपच रमणीय असल्याने पायऱ्या चढताना थकवा जाणवत नाही. काही पायऱ्या चढून आल्यावर मंदिराचे शिखर नजरेस पडते. पायऱ्या संपल्यावर समोरच पांढऱ्याशुभ्र मंदिराचे दर्शन होते.
खुला सभामंडप, पश्चिमेकडील मुख्य मुखमंडपासह उत्तर व दक्षिणेकडेही आणखी दोन मुखमंडप, अंतराळ व गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपात चौथऱ्यावर नंदी व त्यासमोर कासव आहे. भिंती नसलेल्या या सभामंडपात कुठेही उभे राहिले तरी गर्भगृहातील शिवशंकराचे दर्शन होऊ शकेल, अशी मंदिराची रचना आहे. अंतराळात गणेशाच्या आणि हनुमानाच्या संगमरवरी मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपाल असून प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात मंगलकलश कोरलेला आहे. गर्भगृहात स्वयंभू शिवलिंग आहे व त्यावर नागाने छत्र धरले आहे. शिवपिंडीच्या मागील बाजूस पार्वतीची मूर्ती आहे. या मूर्तीच्या जवळ शिवशंकरांचा मुखवटा आहे. महाशिवरात्र तसेच इतर उत्सवांच्या वेळी शिवलिंगावर हा मुखवटा ठेवून पूजा केली जाते.
गर्भगृहात पुजाऱ्यांशिवाय कोणालाही प्रवेश नाही. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना शिवलिंगावर अभिषेक करायचा असल्यास पुजारी पाण्याने भरलेला तांब्या त्यांच्यासमोर ठेवतात. भाविकांनी त्या तांब्याला हात लावल्यावर पुजारी त्यातील पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करतात आणि पिंडीवरील फूल भाविकांना प्रसाद म्हणून देतात. असे सांगितले जाते की पिंडीवर केलेल्या अभिषेकाचे पाणी बाहेरच्या बाजूला असलेल्या गोमुखातून बाहेर पडते, त्यामुळे या परिसराला गायमुख हे नाव पडले आहे. या मंदिराच्या प्रत्येक मुखमंडपावर एक, सभामंडपावर गोल व घुमटाकार आणि गर्भगृहावर मुख्य अशी पाच शिखरे आहेत. सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे मंदिर दर्शनासाठी खुले असते. सायंकाळी ७ वाजता महादेवाची आरती होते. महाशिवरात्रीच्या दिवशी शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. त्यादिवशी अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मंदिर परिसरात माफक दरात विवाह सोहळेही होतात.
मंदिराभोवती वड, पिंपळ, सोनचाफा, जांभूळ, नारळ आदी झाडांची दाट वनराई आहे. मंदिराच्या प्रांगणात छोटे शिवमंदिर आहे. या मंदिरात छोटे शिवलिंग, नंदी तसेच पार्वतीची मूर्ती आहे. येथे अखंड दगडात कोरलेला दिवा आहे. त्या शेजारी गणेश मंदिर आहे. येथे कमळावर विराजमान झालेल्या गणेशाची सुबक मूर्ती आहे. मंदिरासमोर भलेमोठे पटांगण आहे. आजूबाजूला हिरवीगर्द झाडी व रमणीय परिसर यामुळे येथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी व दर्शनासाठी सायंकाळी भाविकांची गर्दी होते. येथून डोंगरांच्या मधून वाहणारी उल्हास नदी व त्यातील लहान लहान होड्या व बोटींमुळे नागला बंदराचे सुंदर दृश्य दिसते. मंदिराजवळ असलेला एक रस्ता जंगलाकडे जातो. तेथे बुद्धदेव महाराजांचा आश्रम, छोटे शिवमंदिर आणि एक धबधबा आहे. मात्र परवानगीशिवाय या परिसरात कोणालाही जाता येत नाही.