जगदंबा मंदिर

कोराडी, ता. कामठी, जि. नागपूर

नागपूर जिल्ह्यात असलेल्या मोठ्या देवस्थानांमध्ये श्रीक्षेत्र रामटेक, आदासा येथील शमी विघ्नेश कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा माता मंदिर यांचा समावेश होतो. सुमारे १५० एकर परिसरात असलेले महालक्ष्मी जगदंबेचे भव्य सुंदर मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. विदर्भाची कुलस्वामिनी अशी या देवीची ख्याती आहे. नवरात्रीच्या काळात देवीच्या दर्शनाला १५ ते २० लाख भाविक येतात, अशी येथे नोंद आहे.

मंदिराची आख्यायिका अशी की हजारो वर्षांपूर्वी या परिसरात जाखापूर नावाचे राज्य होते तेथे झोलन राजा राज्य करीत असे. महापराक्रमी बुद्धिमान असणाऱ्या या राजाला पुत्र होते; परंतु त्याला कन्यारत्न हवे होते. यासाठी राजाने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतले. ब्रह्मदेवाने तुझ्या पोटी साक्षात महालक्ष्मी जन्म घेईल, असा वर दिला. काही दिवसांनी झोलन राजाच्या पत्नीला सुंदर कन्यारत्न झाले. ब्रह्मदेवाने सांगितल्याप्रमाणे तिचे नामकरण महालक्ष्मी असे करण्यात आले. दिवसेंदिवस महालक्ष्मी मोठी होत होती. एकदा अचानक जाखापूर राज्यावर शेजारी राज्याकडून आक्रमण झाले. यावेळी मलाही युद्धभूमीवर घेऊन चला, असा आग्रह महालक्ष्मीने वडिलांकडे केला. लाडक्या मुलीचा हट्ट राजाला टाळता येईना म्हणून तो तिला स्वतःसोबत युद्धभूमीवर घेऊन गेला. घनघोर युद्ध सुरू असताना महालक्ष्मीने सांगितल्याप्रमाणे राजाने डावपेच टाकले आणि त्याचा या युद्धात विजय झाला.

विजयश्री मिळाल्यानंतर झोलन राजा राजकन्या महालक्ष्मीसह जाखापूर येथे परतत असताना महालक्ष्मीने त्यांना सांगितले की या प्रवासात ज्या ठिकाणी सूर्य मावळेल तेथेच मी थांबेन. त्यापुढे येणार नाही. त्याप्रमाणे कोराडी येथे आल्यानंतर सूर्य मावळला महालक्ष्मी येथेच थांबून गुप्त झाली. ज्या ठिकाणी महालक्ष्मी गुप्त झाली त्याच ठिकाणी महालक्ष्मी देवीची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. तीच स्वयंभू मूर्ती आज कोराडी येथील महालक्ष्मी मंदिरात प्रतिष्ठापित आहे.

नागपूर जिल्ह्यात कामठी या तालुक्यात कोराडी येथे हे मंदिर आहे. १७ व्या शतकात श्रीमंत नागपूरकर भोसले या मराठा घराण्याच्या अखत्यारित हे मंदिर होते, त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आहे. मंदिराचा परिसर प्रशस्त असून तेथील वाहनतळावर एकाच वेळी हजारो वाहने उभी राहू शकतात. वाहनतळापासून मंदिराच्या मुख्य प्रवेश कमानीपर्यंतच्या मार्गावर शेकडो पूजासाहित्याची दुकाने आहेत. विदर्भात कोराडी येथील रांगोळी प्रसिद्ध असून मंदिर परिसरात असलेल्या शेकडो दुकानांमधून रांगोळीची विक्री होत असते. वृद्ध अपंगांसाठी मंदिर समितीतर्फे मंदिरापर्यंत जाण्यासाठी खास वाहनांची सुविधा उपलब्ध केली आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार भव्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर तेथे एक सुंदर उद्यान विकसित करण्यात आलेले पाहायला मिळते. त्यामध्ये अनेक शोभेची फुलझाडे आहेत आणि संपूर्ण परिसराला फरसबंदी केलेली असल्यामुळे हा परिसर वैशिष्ट्यपूर्ण भासतो. रात्रीच्या वेळी मंदिरासह संपूर्ण परिसरात रोषणाई करण्यात येते.

संपूर्ण मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंती रचनेचे असून त्यावर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर आहे. मंदिरातील खांब हे कलाकुसरीने युक्त आहेत. दर्शनमंडप, सभामंडप गाभारा अशी मंदिराची रचना आहे. भव्य अशा सभामंडपाच्या मध्यभागी असलेल्या गाभाऱ्यात देवीचे स्थान आहे. या गाभाऱ्यात चांदीची सजावट असून चांदीच्या मखरातच देवीची मूर्ती आहेही मूर्ती फूट उंचीची आहे. मूर्ती चतुर्भुज असून तिच्या हातांमध्ये त्रिशूळ, खड्ग, डमरू आणि धनुष्य आहेत. मूर्तीला चांदीचा मुखवटा लावण्यात आलेला आहे; परंतु मूळ दगडी मूर्तीच्या चेहऱ्याकडे पाहिल्यास सकाळी कन्या रूपात, दुपारी तरुण किंवा युवा रूपात आणि सायंकाळी प्रौढ किंवा वृद्ध रूपात दर्शन होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. नवरात्रीच्या दिवसांत भाविकांना या देवीच्या मूळ रुपाचे दर्शन घडविले जाते. या मंदिरापासून कि.मी. अंतरावर असलेल्या टेकडीवर तिचा भाऊ दत्तासूर यांचे मंदिर आहे.

मंदिर परिसरात उंच दीपमाळ असून शिवपार्वती आणि नंदी, गणेश दक्षिणमुखी हनुमान यांच्या मूर्ती आहेत. मंदिरासमोरच भलामोठा औदुंबर वृक्ष आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून १० दिवस येथे देवीचा नवरात्र उत्सव साजरा केला जातो. यावेळी देवीच्या समोर असंख्य घट मांडून त्यावर मनोकामना दीपज्योती लावण्यात येतात. याची संख्या सुमारे १०,००० इतकी असते. नवसपूर्तीनिमित्त अशा अखंड दीपज्योती लावण्याची येथे प्रथा आहे. त्यामध्ये माती अथवा रेतीवर गहू वा धान्य पेरले जाते. त्यावर मडकं ठेवलं जातं त्यावर वात प्रज्वलित केली जाते. मंदिर प्रशासनातर्फे घटावर पाणी मडक्यात तेल टाकून या ज्योती नऊ दिवस अखंड प्रज्वलित राहतील, याची जबाबदारी घेतली जाते. त्यासाठी दररोज या मडक्यामध्ये तेल टाकले जाते. या अखंड मनोकामना ज्योतीसाठी मंदिरात आगाऊ नोंदणी करावी लागते. यासाठी ते वर्षांची प्रतीक्षा यादी असते.

ही देवी जागृत असून नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात विदर्भासह महाराष्ट्र, छत्तीसगड मध्य प्रदेश येथून भाविक देवीच्या दर्शनाला येतात. प्रत्येक मंगळवारी आणि रविवारीही दर्शनासाठी गर्दी असते. दररोज सकाळी ११ ते दुपारी सायंकाळी ते रात्री वाजेपर्यंत भाविकांना येथील अन्नछत्र भवनामध्ये महाप्रसादाची सुविधा आहे.

राज्य शासनाकडून या मंदिराला तीर्थक्षेत्राचादर्जा देण्यात आला आहे. (ज्या देवस्थानाच्या दर्शनासाठी वर्षाला लाखांहून अधिक भाविक येतात, अशा देवस्थानाला राज्य शासनाकडून तीर्थक्षेत्राचादर्जा प्राप्त होतो. त्या दर्जानुसार येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधांसाठी वेळोवेळी शासनाकडून निधी उपलब्ध होतो.)

नागपूरमधील कोराडी हे गाव महालक्ष्मी मंदिराबरोबरच येथे असलेल्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रासाठीही प्रसिद्ध आहे. येथील वीजनिर्मिती केंद्र हे महाराष्ट्रातील मोठ्या प्रमुख वीजनिर्मिती केंद्रांपैकी एक आहे.

उपयुक्त माहिती:

  • नागपूरपासून १४ किमी, तर कामठीपासून १२ किमी अंतरावर
  • नागपूर, कामठीपासून कोराडीसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • मंदिर परिसरात भक्त निवास प्रसादालयाची सुविधा
  • मंदिराची वेबसाईट :   https://koraditemple.com/
Back To Home