महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी मूळ पीठ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावरील रेणुका मातेचे स्थान भाविकांच्या हृदयात अढळ आहे. जगदंबा देवीचे एक रूप असलेली रेणुका माता ही महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी आहे. माहूर गडावर जाऊन देवीचे दर्शन घेणे ही प्रत्येक भक्ताची इच्छा असते, परंतु प्रत्येकाला तिथे वारंवार जाणे शक्य होत नाही. अशा वेळी भक्तांची श्रद्धा आणि सोय लक्षात घेऊन राज्यात विविध ठिकाणी देवीची मंदिरे उभारली गेली आहेत, जी ‘प्रति माहूर’ म्हणून ओळखली जातात. नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील डोंगरगाव येथील डोंगरमाथ्यावर वसलेले रेणुका मातेचे मंदिर हे त्यापैकीच एक प्रमुख आणि जागृत देवस्थान मानले जाते.
रेणुका देवी ही भूदेवी असून, ‘रेणुका’ या शब्दाचा अर्थ रेणुमयी पृथ्वी असा होतो. पौराणिक आख्यायिकांनुसार, रेणुका ही जमदग्नी ऋषींची पत्नी आहे. ‘रेणुका माहात्म्य’ ग्रंथात तिची अशी चारित्र्यकथा सांगण्यात आली आहे की प्राचीन काळी कान्यकुब्ज देशात इक्ष्वाकुवंशीय रेणू ऊर्फ प्रसेनजीत नावाचा राजा राज्य करीत होता. त्याने कन्याकामेष्टी यज्ञ केला असता, त्या यज्ञाग्नीतून एक कन्या जन्मास आली. तिचे पाळण्यातील नाव कामली असे ठेवण्यात आले. रेणू राजाची कन्या म्हणून तिला रेणुका असे म्हणण्यात येऊ लागले. ती मोठी झाल्यानंतर रेणू राजाने भागीरथीक्षेत्री तिचे स्वयंवर मांडले. त्यात तिने जमदग्नी ऋषींना वरले. या दाम्पत्यास रुमण्वत्, सुषेण, वसू, विश्वावसू व रामभद्र म्हणजेच परशुराम असे पाच मुलगे झाले.
रेणुका आपल्या पतीदेवाच्या नित्यपूजेअर्चेसाठी लागणारे पाणी मातीच्या घड्यात भरून तुंगभद्रेवरून आणून देत असे.
एके दिवशी तुंगभद्रेच्या जलराशीत चित्ररथ गंधर्व जलक्रीडा करीत असताना, त्यास पाहून रेणुकेचे चित्त क्षणभरासाठी विचलित झाले. जमदग्नींना अंतर्दृष्टीने हा प्रसंग समजल्यानंतर त्यांनी आपल्या मुलांपैकी एकेकाला तिचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली. पहिल्या चार मुलांनी मातृहत्येस नकार दिला, मात्र परशुरामाने पित्याची आज्ञा तत्काळ पाळली. त्याने उडवलेले मातेचे शिर चांभाराच्या पाण्याच्या कुंडीत जाऊन पडले. त्याची आज्ञाधारकता पाहून जमदग्नी प्रसन्न झाले व त्यांनी त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्याने मातेला सजीव करण्याचा वर मागितला. त्यावर जमदग्नी म्हणाले की ते आता अशक्य आहे. कारण तू उडवलेले तिचे शिर अपवित्र ठिकाणी जाऊन पडले आहे. त्यामुळे ते तिच्या धडास लावणे इष्ट नाही. मात्र यापुढे लोक तिच्या शिराची उपासना करतील आणि तिच्या धडाची ख्याती भूदेवी म्हणून होईल. तेव्हापासून रेणुका देवीच्या शिराची पुजा केली जाते. या देवीचे मूळ पीठ असलेल्या माहूर गडावर रेणुका देवीचे शीर ‘तांदळा’ (शिराच्या आकाराचा स्वयंभू पाषाण) रूपाने भूमीतून वर आले. डोंगरगाव येथील मंदिरातही देवीची अशीच तांदळा स्वरूपातील मूर्ती आहे.
डोंगरगाव येथील डोंगरमाथ्यावरील मंदिराकडे येण्यासाठी कोरीव पाषाणात बांधलेल्या सुमारे साठ पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या मधोमध वरपासून खालपर्यंत स्टेनलेस स्टीलचा सुरक्षा कठडा लावलेला असल्याने वर जाण्यासाठी व खाली येण्यासाठी असे दोन स्वतंत्र पायरीमार्ग तयार झाले आहेत. लाल, पिवळ्या तैलरंगाने रंगवलेल्या या पायऱ्या हळदी-कुंकवाचे सडे ल्यायल्यासारख्या दिसतात. पायऱ्या चढून वर आल्यावर मंदिराच्या पेव्हर ब्लॉक आच्छादित प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात मंदिरासमोर सुमारे तीस फूट उंचीचा पाषाणी दीपस्तंभ आहे. प्रांगणात मंदिरासमोर लोखंडी स्तंभांवर पत्र्याचे छत असलेला रांगमंडप आहे व येथेच भाविकांना बसण्यासाठी आसनांची व्यवस्था आहे. येथील पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे हेमाडपंती शैलीचे दगडी बांधकाम असलेले मंदिर सुमारे सोळाव्या शतकातील असावे.
सभामंडप व गर्भगृह अशी रचना असलेल्या मंदिराच्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर चौकोनी कोरीव पाषाणावर देवीची पावले कोरलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या डावीकडे दर्शनी भिंतीलगत गणेशाची शेंदूरचर्चित पाषाणी मूर्ती आहे. सभामंडपात दोन नक्षीदार चौकोनी स्तंभ आहेत.
सभामंडपात उजव्या व डाव्या बाजूच्या भिंतीतील देवकोष्टकात देवतांच्या मूर्ती आहेत. पुढे सभामंडपापेक्षा उंचावर असल्यामुळे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर दोन पायऱ्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात मागील भिंतीलगत जमिनीवर रेणुका देवीची तांदळा स्वरूपातील स्वयंभू मूर्ती आहे. या मूर्तीसमोर देवीच्या पाषाणी पादुका आहेत. गर्भगृहाच्या छताला कोरीव पाषाणातील द्वादशकोनी वितानघुमट आहे व त्यात मध्यभागी कमळ फुलाची नक्षी आहे.
मंदिराच्या छतावर प्रवेशद्वाराजवळ दीपस्तंभाच्या आकाराचे उंच व निमुळते शिखर आहे. या शिखरावर कळस नसल्याने ते वैशिष्ट्यपूर्ण भासते. गर्भगृहाच्या छतावर पिरॅमिडसारखे वर निमुळते होत गेलेले चौदा चौकोनी पायऱ्यांचे शिखर आहे. त्यावर आमलक व कळस आहे. मंदिराच्या प्रांगणात उजव्या बाजूला धर्मशाळेची वास्तू आहे.
चैत्र नवरात्री व शारदीय नवरात्रौत्सव हे दोन मुख्य वार्षिक उत्सव येथे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. त्यावेळी जिल्ह्यातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. दोन्ही नवरात्रोत्सवात मंदिरांत दहाही दिवस भजन, कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.