जगदंबा देवी मंदिर

रिडज, ता. जिंतूर, जि. परभणी

महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या परभणी जिल्ह्यात अनेक प्रसिद्ध देवस्थाने आहेत. याच जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात रिडज नावाचे एक छोटे आणि पौराणिक महत्त्व असलेले गाव वसलेले आहे. रिडज येथील जगदंबा देवीचे मंदिर हे तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवीचे उपठाणे मानले जाते. गावातील एका उंच टेकडीवर हे मंदिर वसलेले आहे. ही देवी अत्यंत जागृत असून ती भक्तांच्या हाकेला धावून जाते, अशी गावकऱ्यांची तसेच पंचक्रोशीतील भाविकांची श्रद्धा आहे. यामुळे परभणी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आणि इतर भागांतून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी या ठिकाणी येतात. देवीवरील याच श्रद्धेपोटी गावाने आजही काही अनोख्या परंपरा जपल्या आहेत.

सनातन हिंदू धर्मात आदिपंच देव-देवतांना विशेष स्थान दिलेले आहे. या पंचदेवतांमध्ये भगवान गणेश, श्रीविष्णू, भगवती देवी, भगवान शिव आणि सूर्यदेव यांचा समावेश होतो. या सर्व देवतांमध्ये भगवती देवीला परमब्रह्म मानले गेले आहे. विश्वाचे संचालन करणाऱ्या या आदिशक्तीने दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि सामान्य लोकांच्या रक्षणासाठी वेगवेगळ्या कालखंडात विविध अवतार धारण केल्याचे वेद व पुराणांमध्ये सांगितले आहे. ‘विश्वाची आई’ म्हणून पूजल्या जाणाऱ्या या जगदंबा मातेची महाराष्ट्रात अनेक प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात. रिडज येथील जगदंबा देवीच्या स्थापनेबाबत गावकऱ्यांमध्ये एक प्राचीन आख्यायिका प्रसिद्ध आहे. देवी प्राचीन काळापासून या डोंगरावर निवास करत आहे. एके दिवशी देवीने गावातील एका ग्रामस्थाला स्वप्नात दृष्टांत दिला. देवीने त्याला सांगितले: “माझ्या सभोवती कोणीही राहत नाही, त्यामुळे तुम्ही सर्वांनी गावाच्या मध्यवस्तीमध्ये माझी प्रतिष्ठापना करा आणि माझ्यासोबत राहायला या.” देवीच्या या आदेशानंतर गावकऱ्यांनी त्या ठिकाणी वस्ती करण्यास सुरुवात केली आणि हळूहळू रिडज हे गाव वसले. कालांतराने या मूळ मंदिराचा विकास होत गेला आणि काही वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या जीर्णोद्धारामुळे मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास, परभणी जिल्हा मुख्यालयापासून जिंतूरकडे जाणाऱ्या मुख्य परभणी-जिंतूर महामार्गावर चांदज पाटी लागते. या चांदज पाटीपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर रिडज हे गाव आहे. या गावाजवळून परपरा नदी वाहते आणि या नदीकाठच्या एका डोंगरावर जगदंबा देवीचे हे मंदिर स्थित आहे. गावातील लोक या देवीला आपली रक्षणकर्ती मानतात. देवीच्या कृपेमुळे गावात सुख-समृद्धी आणि भरभराट आली आहे, असा गावकऱ्यांचा विश्वास आहे. या गावात पिढ्यानपिढ्या एक परंपरा पाळली जाते. मंदिरात देवीसाठी पलंग ठेवलेला आहे. देवीवरील अथांग श्रद्धेपोटी गावातील एकही नागरिक स्वतःच्या घरात गादी आणि पलंगाचा वापर करत नाही. ही परंपरा केवळ गावात राहणाऱ्या लोकांपुरतीच मर्यादित नाही. नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने पुणे, मुंबई किंवा अन्य शहरांत स्थायिक झालेली रिडज गावाची मंडळीही आपल्या घरात कधीही पलंग किंवा गादी वापरत नाहीत. गावातील मुलींचे विवाह ठरल्यानंतर त्यांना संसारोपयोगी साहित्य भेट म्हणून दिले जाते. या साहित्यातही पलंग न देण्याची परंपरा गावकऱ्यांनी आजही अत्यंत निष्ठेने पाळली आहे.

जगदंबा देवीचे हे मंदिर जमिनीपासून अंदाजे शंभर फूट उंचीवर असलेल्या एका टेकडीवर आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे साठ दगडी पायऱ्या चढून वर जावे लागते. या मंदिराच्या चारही बाजूंना मजबूत दगडी तटबंदी उभारलेली आहे. तटबंदीच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात मंदिराच्या अगदी समोर एक दगडी दीपमाळ उभारलेली आहे. मंदिराची एकूण रचना मुख्यत्वे सभामंडप आणि गर्भगृह अशी विभागलेली आहे. मंदिराच्या सभामंडपाला कमानीच्या आकाराची तीन सुंदर प्रवेशद्वारे आहेत. या कमानीदार प्रवेशद्वारांतून भाविक मुख्य सभामंडपात प्रवेश करतात. सभामंडपच्या पुढे मंदिराचे मुख्य गर्भगृह आहे. या गर्भगृहात एका उंच पीठासनावर जगदंबा देवीची पाषाणात कोरलेली अत्यंत तेजस्वी मूर्ती विराजमान आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे देवीचे दोन्ही हात बाजूला पसरलेल्या स्थितीमध्ये आहेत. वस्त्र आणि सोन्या-चांदीच्या अलंकारांनी सजवलेल्या या देवीच्या हातांमध्ये हिरवा चुडा भरलेला आहे.

रिडजची जगदंबा देवी ही नवसाला पावणारी देवता असल्याच्या मान्यतेमुळे येथे वर्षभर धार्मिक विधी सुरू असतात. या मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव हा वर्षातील सर्वात मोठा आणि प्रमुख उत्सव म्हणून साजरा केला जातो. या नऊ दिवसांच्या उत्सवाच्या काळात गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती नऊ दिवस कडक उपवास पाळतात. अश्विन शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच नवरात्राच्या पहिल्या दिवशी मंदिरात शास्त्रोक्त पद्धतीने घटस्थापना केली जाते. नवरात्राच्या नऊही दिवसांत मंदिरात सकाळी आणि संध्याकाळी विविध धार्मिक विधी, पूजा आणि आरतीचे आयोजन केले जाते. उत्सवानिमित्त संपूर्ण मंदिरावर आणि टेकडीच्या परिसरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. या नऊ दिवसांमध्ये जिल्ह्यातील आणि पंचक्रोशीतील हजारो भाविक अनवाणी पायांनी टेकडी चढून देवीच्या दर्शनासाठी येतात. अनेक भाविक देवीची खण आणि नारळाने ओटी भरून आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी नवस बोलतात. नवरात्रीच्या नवमीच्या दिवशी मंदिरात मुख्य होमहवन केले जाते. या विधीमध्ये मोठा जनसमुदाय सहभागी होतो. या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात रामायण पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. या सप्ताहादरम्यान रोज नामांकित कीर्तनकारांची कीर्तने, भजने आणि भाविकांसाठी महाप्रसादाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर पार पडतात. दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविक या मंदिरात दर्शनासाठी येऊ शकतात.

उपयुक्त माहिती

  • जिंतूर येथून १३ किमी अंतरावर
  • परभणी शहरापासून ३८ किमी अंतरावर
  • जिंतूर व परभणी येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिर असलेल्या टेकडीच्या पायथ्यापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा नाही

जगदम्बा देवी मंदिर

रिज, तालुका जिंतुर, जिला परभणी

Back To Home