
पुण्यातील कात्रज-कोंढवा बायपासवर स्थित इस्कॉन मंदिर न्यू वेदिक कल्चरल सेंटर (NVCC) म्हणून प्रसिद्ध आहे. इस्कॉनचे संस्थापक ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभूपाद यांच्या प्रेरणेतून साकारलेल्या या वास्तूचे उद्घाटन २०१३ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झाले. सुमारे सहा एकर परिसरात विस्तारलेल्या, पांढऱ्या संगमरवरातील वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम असलेल्या या मंदिरात मुख्यत्वे राधा-कृष्ण आणि व्यंकटेश्वर बालाजी यांची दोन स्वतंत्र मंदिरे आहेत. येथील प्रसन्न वातावरणामुळे दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी व मनःशांतीसाठी या मंदिर परिसराला भेट देतात.
पुणे शहरातील या मंदिराची पार्श्वभूमी इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस अर्थात इस्कॉन या जागतिक संस्थेशी जोडलेली आहे. गौडीय वैष्णव संप्रदायाचा प्रसार करण्यासाठी ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभूपाद यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट श्रीकृष्णाची भक्ती आणि भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाचा प्रचार करणे हे आहे. पुण्यात अशा एका मोठ्या केंद्राची गरज लक्षात घेऊन मंदिरासोबतच न्यू वेदिक कल्चर सेंटर विकसित करण्याची योजना आखण्यात आली. लोकांना वैदिक मूल्यांची आणि अध्यात्माची ओळख करून देण्याच्या मुख्य विचारातून या वास्तूच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
या वास्तुचे काम २००३ मध्ये प्रत्यक्षात सुरू होऊन ते पूर्ण होण्यासाठी सुमारे दहा वर्षांचा काळ लागला. अंदाजे ४० कोटी रुपये खर्चून सहा एकरच्या विस्तीर्ण परिसरात साकारलेल्या या मंदिराचा लोकार्पण सोहळा २०१३ मध्ये पार पडला. पुण्यातील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक असलेल्या या वास्तूत आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक भारतीय मंदिर शैलीचा सुयोग्य संगम साधला आहे. आज हे मंदिर पुण्यातील भाविकांसाठी श्रद्धेचे एक महत्त्वाचे ठिकाण बनले आहे.
सुंदर आणि प्रशस्त परिसर असलेल्या या मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर पाच मजली वाहनतळाची इमारत दिसते. येथे शेकडो वाहने उभी करण्याच्या सोयीसह इस्कॉनतर्फे चालवले जाणारे ‘गोविंदा’ उपाहारगृह, भक्तनिवास आणि आध्यात्मिक पुस्तकांचे दालन आहे. नक्षीदार स्तंभांनी व महिरपी कमानींनी सजलेल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या छतावर तीन वैशिष्ट्यपूर्ण मेघडंबऱ्या आहेत. प्रवेशद्वारातून आत आल्यावर उजव्या बाजूला एक गोशाळा दिसते. मंदिराच्या प्रांगणात सुनियोजित पद्धतीने विकसित केलेल्या उद्यानात विविध प्रकारची शोभेची झाडे व फुलझाडे असून येथे पूजेसाठी लागणारी फुले आणि तुळशीची रोपे स्वतंत्रपणे जोपासली जातात.
मंदिरासमोर प्रांगणात कालियामर्दन प्रसंगाचे दृश्यशिल्प पाहायला मिळते.
वास्तुकलेचा एक उत्तम नमुना असलेली ही तीन मजली वास्तू शुभ्र संगमरवरी पाषाण व लाल दगडाचा वापर करून बांधली आहे. मंदिराच्या कमळाच्या आकाराच्या शिखरावर राधा-कृष्णाच्या प्रतिमा कोरल्या आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतींवरील भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंगांच्या भित्तिचित्रांवर उत्तर भारतीय शैलीचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. सूक्ष्म कोरीव काम केलेल्या प्रत्येक खांबाच्या आणि भिंतीच्या तळाशी हत्तीच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. रात्रीच्या वेळी संगमरवरी वास्तूवर केली जाणारी विद्युत रोषणाई मंदिराच्या बाह्य सौंदर्यात भर घालते.
मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील विस्तीर्ण सभामंडपाच्या छतावर पौराणिक शिल्पे कोरलेली आहेत. छताच्या मध्यभागी एक मोठे झुंबर बसवलेल्या वितानावर चक्राकार नक्षीकाम केलेले दिसते. सभामंडपात प्रवेश केल्यावर समोरच एका सिंहासनावर इस्कॉनचे संस्थापक स्वामी प्रभूपाद यांची मूर्ती प्रतिष्ठापित केलेली आहे. नक्षीदार स्तंभांच्या वरच्या बाजूला असलेल्या सज्जाच्या रचनेमुळे येथे एकाच वेळी शेकडो भाविक बसून प्रवचन किंवा कीर्तनाचा लाभ घेऊ शकतात. शांत आणि प्रसन्न असलेल्या या सभामंडपात भाविकांना ध्यान करण्यासाठी जागा उपलब्ध आहे.
ही जागा सामाजिक व धार्मिक मेळाव्यांसाठी देखील वापरली जाते.
सभामंडपाच्या पुढील भागात अंतराळ आणि तीन गर्भगृहे आहेत. लाकडी कोरीव काम केलेल्या देवकोष्टक युक्त द्वारशाखा असलेल्या प्रत्येक गर्भगृहात सुंदर मूर्ती विराजमान आहेत. मधल्या मुख्य गर्भगृहात राधा-कृष्णाच्या, डाव्या बाजूला श्रीनित्यानंद प्रभू व श्रीचैतन्य प्रभूंच्या आणि उजव्या बाजूला श्रीकृष्ण, सुभद्रा व बलरामाच्या मूर्ती आहेत. या सर्व मूर्तींना दररोज विविध प्रकारची वस्त्रे आणि अलंकारांनी सजविले जाते. प्रदक्षिणा मार्गाच्या भिंतींवर कृष्णलीलांचे चित्रण केलेले असून हा मार्ग गर्भगृहाच्या बाहेरील बाजूने आहे.
मुख्य श्रीकृष्ण मंदिराच्या मागील बाजूस थोड्या उंचावर श्री व्यंकटेश्वर अर्थात बालाजीचे मंदिर आहे. दक्षिण भारतीय द्राविडी शैलीत बांधलेल्या या मंदिरापर्यंत जाण्यासाठी पन्नास ते साठ पायऱ्या चढाव्या लागतात. उंच आणि नक्षीदार असलेल्या या मंदिराच्या गोपुरावर कळसांची मांडणी केलेली आहे. तिरुपती येथील मंदिराच्या धर्तीवर केलेल्या या बांधकामात कोटा दगडांचा वापर केला आहे.
मंदिराच्या समोर ध्वजस्तंभ आणि गरुड मंडप असलेल्या गर्भगृहात भगवान बालाजींची चतुर्भुज मूर्ती आहे. येथे दाक्षिणात्य पद्धतीनुसार दररोज अभिषेक आणि पूजाविधी केले जातात. एकाच परिसरात दोन वेगवेगळ्या प्रादेशिक मंदिर शैलींचा अनुभव येणे हे या ठिकाणचे एक विशेष आकर्षण आहे.
मंदिरात दररोज पहाटे साडेचार वाजता दर्शन आरती आणि दुपारी साडेबारा वाजता राजभोग आरती केली जाते. दररोज संध्याकाळी मृदंग व टाळांच्या साथीने होणारे नामसंकीर्तन हे भाविकांसाठी मुख्य आकर्षण असते. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्ताला दररोज दुपारी प्रसादाचे वाटप केले जाते. धार्मिक कार्यांव्यतिरिक्त येथे भगवद्गीता आणि श्रीमद्भागवताचे अभ्यास वर्ग नियमितपणे घेतले जातात. विद्यार्थ्यांसाठी आध्यात्मिक समुपदेशन, तरुणांसाठी व्यक्तिमत्त्व विकास आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांसाठी तणाव व्यवस्थापनाची शिबिरे या केंद्रात आयोजित केली जातात. यामुळे हे मंदिर भक्तीच्या ठिकाणासोबतच प्रबोधनाचे केंद्र बनले आहे.
या मंदिरात वर्षभरातील सर्व प्रमुख हिंदू सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. जन्माष्टमीच्या उत्सवाच्या वेळी सर्वात मोठी आणि सुंदर सजावट केली जाते. रामनवमी, गोवर्धन पूजा, होळी आणि दसरा यांसारख्या सणांना हजारो भाविक दर्शनासाठी येतात. उत्सवाच्या काळात येथे सांस्कृतिक कार्यक्रम, भजन आणि प्रवचनांचे आयोजन केले जाते. भाविकांसाठी दर्शनाची वेळ सकाळी ४.३० ते ११.५५ व सायंकाळी ४.३० ते रात्री ८.४५ अशी आहे.