इस्कॉन राधा गोपीनाथ मंदिर

गिरगाव चौपाटी, मुंबई शहर, मुंबई

ब्रह्मज्ञानापेक्षा भक्तिमार्ग श्रेष्ठ असून सर्वांना सहजसुलभ असलेल्या भक्तिमार्गाने परमेश्वराची प्राप्ती करता येईल, असे सांगून हरिनामाचे महत्त्व प्रस्थापित करणारे बंगालमधील लोकोत्तर वैष्णव संत म्हणजे चैतन्य महाप्रभू. त्यांनी सांगितलेल्या गौडीय वैष्णव तत्त्वविचारांवर चालणारी आणि जगभरात कृष्णभक्तीचा प्रचार व प्रसार करणाऱ्या ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस’ (इस्कॉन) या संस्थेतर्फे जगभरात अनेक ठिकाणी सुंदर आणि भव्य कृष्णमंदिरे उभारण्यात आली आहेत. मुंबईच्या गिरगाव चौपाटी परिसरात वसलेले राधा गोपीनाथ मंदिर हे त्यापैकी एक आहे. ‘इस्कॉन गिरगाव चौपाटी’ म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर श्रीकृष्ण भक्तांसाठी एक महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र मानले जाते. या मंदिराला ‘इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल’ने ऑगस्ट २०१८ मध्ये ‘रेव्हरन्ट’ हा हरित मानांकनाचा दर्जा प्रदान केला आहे.

ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद हे इस्कॉनचे संस्थापक आहेत. श्रील प्रभुपाद या नावानेही ते ओळखले जातात. स्वामींचा जन्म १ सप्टेंबर १८९६ रोजी कोलकात्यात झाला. त्यांचे मूळ नाव अभयचरण डे असे होते. त्यांचे वडील गौरमोहन डे व आई रजनी हे धार्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांच्याकडून स्वामींवर लहानपणापासूनच कृष्णभक्तीचे संस्कार झाले. कोलकात्यातील स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. इंग्रजी, संस्कृत आणि विविध विषयांवर त्यांनी तेथे प्रभुत्व मिळवले. १९२२ मध्ये प्रभुपाद यांची भेट भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर या श्री गौडीय वैष्णव परंपरेतील महान संतांशी झाली. १९३३ मध्ये प्रभुपाद यांनी भक्तिसिद्धांत सरस्वती यांच्याकडून औपचारिक दीक्षा घेतली आणि ते वैष्णव परंपरेचे प्रचारक बनले. आपला संसार चालवण्यासाठी काही काळ त्यांनी औषधनिर्मितीचा व्यवसाय केला, पण १९५० नंतर त्यांनी सांसारिक जीवनातून निवृत्ती घेतली आणि पूर्णवेळ कृष्णभक्ती आणि आध्यात्मिक प्रचाराला वाहून घेतले. १९५९ मध्ये त्यांनी संन्यासाश्रमाचा स्वीकार केला. या आश्रमात त्यांनी ए. सी. भक्तिवेदांत स्वामी हे नाव धारण केले.

प्रभुपाद स्वामी यांनी श्रीकृष्णाची शिकवण इंग्रजी भाषेतून पाश्चात्त्य जगात पोहोचवावी, अशी त्यांचे गुरू भक्तिसिद्धांत सरस्वती यांची इच्छा होती. त्यानुसार स्वामी प्रभुपाद यांनी ‘भगवद्गीता ॲज इट इज’ (भगवद्गीता यथारूप) हा भाष्यग्रंथ लिहिला. श्रीमद्भागवतम् आणि इतर वैष्णव ग्रंथांचे भाषांतरही त्यांनी केले. १९६५ मध्ये, वयाच्या ६९ व्या वर्षी, अनेक अडचणींवर आणि प्रवासादरम्यान दोनदा आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यांवर मात करून स्वामी प्रभुपाद अमेरिकेला गेले. त्यांच्या संकल्पनेतून १९६६ मध्ये न्यूयॉर्कमध्ये इस्कॉनची स्थापना झाली. संपूर्ण जगात भगवद्गीता आणि वैष्णव तत्त्वज्ञानाचा प्रसार करणे या मुख्य उद्देशाने ही संस्था प्रभुपाद यांनी उभारली. ‘हरे कृष्ण महामंत्र’ त्यांनी लोकांना शिकवला आणि त्यावर आधारित भक्ती आंदोलन सुरू केले. स्वामी प्रभुपाद यांनी ७० हून अधिक ग्रंथ लिहिले असून त्यात भगवद्गीता, श्रीमद्भागवतम यांवरील भाष्य आणि चैतन्य चरितामृत या प्रमुख ग्रंथांचा समावेश आहे. १४ नोव्हेंबर १९७७ रोजी वृंदावनातील कृष्ण बलराम मंदिरात त्यांनी देह ठेवला. आज जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये इस्कॉनची सहाशेहून अधिक भव्य मंदिरे, साठहून अधिक कृषी समुदाय आणि पन्नास गुरुकुले कार्यरत आहेत. यांतील वृंदावन, बंगळुरू, दिल्ली आणि मुंबईतील जुहू येथील भव्य मंदिरे त्यांच्या स्थापत्यासाठी आणि आध्यात्मिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहेत. या मंदिरांतून केवळ कृष्णाची पूजा केली जाते. याचे एक महत्त्वपूर्ण कारण आहे. ‘श्रीमद्‌भगवद्‌गीते’च्या ‘राजविद्या राजगुह्ययोग’ या नवव्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने अन्य देव-देवतांची पूजा करणे हे अज्ञानपूर्ण असल्याचे म्हटले आहे. हा श्लोक असा आहे – ‘येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः। तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् ।।२३।।’ याचा अर्थ असा की ‘हे कुंतीपुत्रा, जे मनुष्य श्रद्धापूर्वक भक्तिभावाने अन्य देवी-देवतांची पूजा करतात, ते निश्चित रूपाने माझीच पूजा करीत असतात; परंतु त्यांची ती पूजा शास्त्राला अनुसरून नसल्याने अज्ञानापोटी केलेली असते.’

या मंदिराच्या उभारणीचा इतिहास असा सांगितला जातो की मंदिराची सुरुवात अतिशय साध्या स्वरूपात झाली होती. लेडी नॉर्थकोट हिंदू अनाथालयाचे तत्कालीन अध्यक्ष अरविंद मफतलाल आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. एन. डी. देसाई (श्री नाथजी दास) यांनी इस्कॉनच्या भक्तांना येथे पारंपारिक गुरुकुल पद्धतीनुसार अनाथालय चालविण्यास मदत करण्यासाठी आमंत्रित केले होते. सुरुवातीला विश्वस्तांनी इस्कॉनला अनाथालयाच्या पाठीमागे केवळ एक छोटी खोली दिली होती. त्या छोट्याशा जागेत काही मोजके भक्त आपल्या अल्पशा साहित्यासह राहू लागले. १९७१ मध्ये येथून जवळच असलेल्या ‘भारतीय विद्या भवन’मध्ये एका कार्यक्रमानिमित्ताने स्वामी प्रभुपाद आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर भारतीय विद्या भवनच्या पायऱ्या उतरत असताना अचानक त्यांनी आपल्या हातातील काठीने सध्या मंदिर असलेल्या जागेकडे निर्देश केला. त्यांच्या सोबत त्यांचे सचिव श्यामसुंदर दास होते. स्वामी प्रभुपाद त्यांना म्हणाले की येथे आपले एक मंदिर असले पाहिजे. स्वामी प्रभुपाद यांच्या भक्त आणि अनुयायांनी त्यांची ही सूचना मान्य केली आणि श्री राधानाथ स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्या छोट्या खोलीचे रूपांतर आजच्या भव्य मंदिरात झाले. १७ जुलै १९८८ रोजी एका भव्य समारंभात येथे राधा गोपीनाथ यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. उत्तर प्रदेशातील कृष्ण लीलाभूमी वृंदावनात उभ्या असलेल्या राजस्थानी राजवाडे आणि भव्य हवेल्यांच्या धर्तीवर, ओडिशातील कारागिरांनी हे मंदिर उभारले आहे. मंदिरासाठी राजस्थानातील भरतपूर येथील सँडस्टोन (वाळूचा दगड) वापरण्यात आला आहे. या पाषाणावरील बारीक नक्षीकाम गुजरातमधील पाटण येथील शिल्पकारांनी केले आहे. गिरगावातील शांत परिसरात हे मंदिर स्थित आहे. मंदिराच्या प्रशस्त व स्वच्छ अशा प्रांगणात सर्वत्र संगमरवरी फरशी बसवली आहे. दुमजली हवेलीसारख्या या मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर मंदिराचा भव्य सभामंडप आणि गर्भगृह आहे. या सभामंडपाची जमीन इटालियन संगमरवराने तयार केलेली आहे. सभामंडपाच्या भिंतींवरील देवळ्यांसाठी ‘बर्मी’ सागवानी लाकडाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. त्यावर बारीक नक्षीकाम केलेले आहे. सभामंडपाचे छत चार सुंदर झुंबरांनी सुशोभित केले आहे. येथे भिंतीलगत ठिकठिकाणी भाविकांना बसण्यासाठी खुर्च्या ठेवलेल्या आहेत. इस्कॉन मंदिरांच्या मानकांनुसार या मंडपामध्ये स्वामी प्रभुपाद यांचीही मूर्ती स्थापित केली आहे. भव्य व सुंदर अशा लाकडी मखरामध्ये ही मूर्ती विराजमान आहे. मखराच्या मागच्या भिंतीवरील काचकपाटात स्वामी प्रभुपाद यांनी लिहिलेल्या भगवद्‌गीता भाष्याच्या जगभरातील विविध भाषांमध्ये झालेल्या अनुवादाच्या प्रती ठेवलेल्या आहेत. सभामंडपात एका भिंतीलगत पवित्र गादी ठेवलेली आहे. त्या सागवानी मंचकावरील चौरंगावर श्रीमद्‌भगवद्‌गीतेची लाल वस्त्रात गुंडाळलेली प्रत ठेवलेली आहे.

मंदिराचे गर्भगृह आणि त्यातील सिंहासन हा कोरीव कलेचा एक उत्कृष्ट नमुना मानले जाते. या गर्भगृहाचा दर्शनी भाग राजस्थानी हवेल्यांची आठवण करून देणारा आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतींवर पानाफुलांचे मनमोहक नक्षीकाम केलेले आहे. आत उंच वेदीवरील सहा शिखरांच्या त्रिकूट मखरामध्ये मध्यभागी राधा आणि गोपीनाथाच्या संगमरवरी मूर्ती विराजमान आहेत. त्यांच्यासमवेत अत्यंत उठावदार व आल्हाददायक रंगांची वस्त्रे परिधान केलेल्या गोपींच्या मूर्तीही आहेत. येथे कृष्ण बासरी धारण केलेल्या स्वरूपात आहे, तर राधा दोन्ही हातांत पुष्पमाला घेतलेल्या स्वरूपात आहे. मखराच्या मागच्या भिंतीवर कृष्णचरित्रातील प्रसंग चितारलेले आहेत. मंदिर हवेलीच्या तळमजल्यावर भक्तिवेदांत हॉल आहे. या हॉलमध्ये मकराना जातीच्या पांढऱ्या संगमरवरी दगडाची फरशी बसवली असून भिंतींवर उत्तम दर्जाचे सागवानी विनीअर लावण्यात आले आहे. हे मंदिर पूर्णतः वातानुकूलित आहे.

मंदिरातील दैनंदिन धार्मिक उपक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत चालतात. पहाटे ४:३० वाजता मंगल आरतीने मंदिराची दिनचर्या सुरू होते. या आरतीच्या वेळी गर्भगृहाचे दरवाजे उघडले जातात आणि मूर्तींना नेवैद्य व धूप अर्पण केला जातो. पहाटे ५ वाजता तुळशी आरती होते. त्यात भक्तांकडून तुळशीच्या रोपाची प्रदक्षिणा आणि प्रार्थना केली जाते. सकाळी ५:१५ ते ७:१५ या वेळेत भाविक एकत्र बसून महामंत्राचा जप करतात. सकाळी ७:१५ वाजता दर्शन आरती होते. यावेळी मूर्तींना नवीन वस्त्रे परिधान करून शृंगारलेले गर्भगृह दर्शनासाठी खुले केले जाते. यानंतर ७:३० वाजता गुरुपूजा होते. त्यावेळी स्वामी प्रभुपाद यांच्या मूर्तीची आरती केली जाते. सकाळी ८ वाजता श्रीमद्भागवत पुराणावर आधारित प्रवचन आयोजित केले जाते. या प्रवचनात श्रीमद्भागवतममधील श्लोकांचे वाचन करून त्यांचे अर्थ आणि वैदिक तत्त्वज्ञान समजावून सांगितले जाते. दुपारी १ वाजता मंदिर दर्शनासाठी बंद केले जाते आणि दुपारच्या विश्रांतीनंतर सायंकाळी ४:३० वाजता पुन्हा उघडते. सायंकाळी ७ वाजता संध्या आरती सुरू होते. या आरतीच्या वेळी टाळ आणि मृदंगाच्या तालावर संकीर्तन केले जाते. संध्या आरतीनंतर ७:३० वाजता भगवद्गीतेवर आधारित सायंकालीन प्रवचन होते. रात्री ८:३० वाजता शयन आरती होते, त्यात मूर्तींच्या विश्रांतीपूर्वीची शेवटची प्रार्थना केली जाते. रात्री ९ वाजता मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी बंद केले जातात.

या दैनंदिन कार्यक्रमांव्यतिरिक्त मंदिरात विविध धार्मिक उत्सव आयोजित केले जातात. श्रीकृष्ण जन्माष्टमी, राधाष्टमी, गौर पौर्णिमा, रामनवमी आणि गोवर्धन पूजा हे सण येथे मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या गर्दीत साजरे केले जातात. या उत्सवांच्या वेळी मंदिराची फुलांनी विशेष सजावट केली जाते आणि अखंड कीर्तन व महाप्रसादाचे वाटप होते. तसेच रविवारी विशेष आध्यात्मिक वर्ग चालवले जातात. त्यांत वैदिक वाङ्मयावर आधारित मार्गदर्शन दिले जाते.

उपयुक्त माहिती

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकापासून ६ किमी अंतरावर
  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून ३ किमी अंतरावर
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ७९७७१०८१०८

इस्कॉन राधा गोपीनाथ मंदिर,

गिरगाँव चौपाटी, मुंबई शहर, मुंबई

Back To Home