ईश्वर पार्वती मंदिर

ऐनापूर, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर

महालक्ष्मी मंदिरामुळे प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील लहान लहान गावांनाही ऐतिहासिक आणि पौराणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. हिरण्यकेशी नदीच्या तीरावर हजारो वर्षापासून कृषी संस्कृती फुलत आहे. देवगिरीचे राजे यादवांच्या राजवटीत निर्माण झालेली देवालये आजही या नदीतीरावर ध्यानस्थ ऋषींसारखी स्थिर आहेत. असेच एक शिव, पार्वती व गणेश एकत्र असलेले आगळे वेगळे देवस्थान ऐनापूर गावात प्राचीन काळापासून स्थित आहे. अन्यत्र सहसा न दिसणारे शिव कुटुंब इथे एकाच मूर्तीत एकत्र पहायला मिळते हे येथील वैशिष्ट्य आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापूर या लहानशा खेड्यात एका शेतामध्ये तेराव्या शतकातील यादवकालीन शिलालेख सापडला आहे. हा शिलालेख शके ११९२चा (इ.स. १२७०) आहे. त्यात यादव नृपती महादेवराय यांचा, तसेच यादवांचा नायक रवलदेव यांचा उल्लेख आहे. शिलालेखात हे गाव अग्रहार म्हणजे ब्राह्मणांना मंदिराच्या खर्चासाठी व धार्मिक कार्यांसाठी दान देण्यात आल्याचे नमूद आहे. या शिलालेखामुळे ऐनापूर गावाची ऐतिहासिकता अधोरेखीत होते. अभ्यासकांच्या मते येथील ईश्वर पार्वती मंदिर सुध्दा यादव सत्तेच्या याच काळातील म्हणजे तेराव्या शतकातील असावे. सुमारे आठशे वर्षांचा इतिहास असल्याने या मंदिरास अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. कोल्हापूरच्या जैन पुरातन वास्तू जतन व संशोधन समितीने येथे प्राचीन मूर्ती व शिल्पे जतन केलेली आहेत.

रस्त्यावरून मंदिराकडे जाताना मंदिराच्या आवारभिंतीस लागून असलेले बालोद्यान दिसते. येथे मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी आहेत. मंदिर परिसराचे स्वागतद्वार आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे लक्ष वेधून घेते. मुख्य स्वागतद्वाराच्या दोन्ही बाजूंना लहान दारे आहेत. या लहान द्वारांच्या वरील भागात हत्तींचे पुतळे आहेत. मुख्य स्वागतदाराच्या वरील बाजूस मध्यभागी देवळीमध्ये शंकर, पार्वती व गणपती यांच्या मूर्ती आहेत. या देवळीच्या वर तसेच दोन्ही बाजूला कळसयुक्त आमलक आहेत.

प्रवेशद्वारालगत बाहेरच्या बाजूला असलेल्या एका देवळीत भगवान महावीर यांची मूर्ती आहे. प्रवेशद्वारातून पुढे आल्यावर मंदिराच्या पेव्हर ब्लॉक लावलेल्या प्रांगणात प्रवेश होतो. नव्याने जीर्णोद्धार केलेले हे मंदिर उंच जगतीवर आहे. प्रांगणातून पाच पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. मंदिराच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व ललाटबिंबस्थानी शिवपिंडी आहे. ललाटपट्टीच्या वरील भागात चंद्र व सूर्य प्रतिमा कोरलेल्या आहेत. हे लाकडी प्रवेशद्वार नक्षीकामाने सुशोभित आहेत. सभामंडप बंदिस्त स्वरुपाचा (गुढमंडप) आहे व येथील छत वर-खाली असे दोन भागांत विभागलेले आहे. त्यामुळे मंदिरातील हवा खेळती राहून गारवा निर्माण होतो. सभामंडपामध्ये असलेल्या चार स्तंभांच्या मधली जमीन सुमारे दीड फूट खोलगट आहे.

सभामंडपात अंतराळाच्या दर्शनी भिंतीजवळ उजव्या बाजुला असलेल्या चौथऱ्यावर शिवपिंडी व बाजूला पंचफणी नागमूर्ती आहे. डावीकडील चौथऱ्यावर विठ्ठल व रखुमाई यांच्या मूर्ती आहेत. विठ्ठलाच्या पायाजवळ संत ज्ञानेश्वर, रखुमाईच्या पायाजवळ संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आहे. या मूर्तींच्या दोन्ही बाजूस वीणा आहेत. येथून पुढे अंतराळात प्रवेश होतो. अंतराळात एका चौथऱ्यावर काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. अंतराळातील भिंतींमध्ये गणपती, भगवान महावीर, खंडोबा म्हाळसा व इतर देवतांच्या काळ्या पाषाणातील प्राचीन मूर्ती आहेत. पुढे मंदिराचे गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या लाकडी प्रवेशद्वारावरील ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहात मध्यभागी असलेल्या वज्रपिठावर शिव, गणेश व पार्वतीची एकत्र मूर्ती आहे. शंकराचा एक हात अभय मुद्रेत व दुसरा हात पार्वतीच्या खांद्यावर आहे. शंकराने धोतर परिधान केलेले आहे. गळ्यात रुद्राक्ष माळा, नाग व मागे त्रिशूल आहे. शंकराच्या डाव्या बाजूस बसलेल्या पार्वतीच्या एका हातात मंगल कलश व दुसरा हात अभय मुद्रेत आहे. पार्वतीने डोक्यावर मुकुट, अंगावर उंची वस्त्रे व अलंकार परिधान केलेले आहेत. शंकराच्या उजव्या बाजूस बाळ गणेश विराजमान आहे.

मंदिराच्या प्रांगणात असलेल्या महावृक्षाला दगडी पार आहे. त्या बाजुला असलेल्या दत्तमंदिरात दत्तात्रेयांची पांढऱ्या संगमरवरी दगडातील चतुर्भूज व त्रिमुखी मूर्ती आहे. मुर्तीच्या तीन हातात शंख, चक्र व गदा आहे तर एक वरदहस्त आहे. पाराच्या दुसऱ्या बाजूस मारुती व गणपतीचे मंदिर आहे. मंदिरात श्री गणेश व मारुतीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. मंदिराच्या प्रांगणात मागच्या बाजूस अनेक विरगळ व सतीशिळा तसेच नाग प्रतिमा आहेत.

या मंदिरात, महाशिवरात्री, वैकुठ चतुर्दशी, श्रावण पौर्णिमा, तसेच गणेश जयंती, नवरात्री, हनुमान जयंती आदी वार्षिक उत्सव साजरे होतात. श्रावणी सोमवार, वद्य त्रयोदशी, संकष्टी चतुर्थी आदी दिवशी अनेक भाविक देवाच्या दर्शनाला येतात.

उपयुक्त माहिती

  • गडहिंग्लजपासून ९ किमी, तर कोल्हापूरपासून ७३ किमी अंतरावर
  • गडहिंग्लजपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९९२३७२१०३३, ९८६०८५२४०९
Back To Home