प्राचीन काळापासून समाजाला शांती प्रदान करणारी देवालये ही सामाजिक, आर्थिक वा राजकीय अस्वस्थता निर्माण होताच क्रांतीची केंद्रे झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथील इंजुबाई देवीचे मंदिर हे त्यापैकी एक. इंग्रजांची जुलमी सत्ता उलथवून टाकणाऱ्या क्रांतीचे ते केंद्र झाले होते. याशिवाय येथील जागरूक देवी हाकेला धावून येते आणि भक्तांचा उद्धार करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. माघ पौर्णिमेपासून पाच दिवस चालणारा जत्रोत्सव हा येथील मोठा उत्सव समजला जातो.
महात्मा गांधींनी १९४२ साली दिलेल्या ‘चले जाव’च्या नाऱ्याने देशभर इंग्रजांविरोधात आंदोलन सुरू झाले होते. सर्वत्र क्रांतीच्या मशाली पेटून उठल्या होत्या. यामध्ये कोल्हापूर जिल्हा अग्रेसर होता. त्यावेळी गारगोटीमधील इंजुबाई देवीचे हे मंदिर इंग्रज राजवटीविरुद्धच्या लढ्यातील मुख्य केंद्र बनले होते. गारगोटीतील सरकारी कचेरीवर तिरंगा फडकविणे, तेथे अटकेत असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना सोडविणे, सरकारी खजिना लुटणे व हे करताना कोल्हापूरवरून गारगोटीपर्यंत पोलीस कुमक पोहचू नये म्हणून कूर येथे वेदगंगा नदीवरील पूल उडविण्याची धाडसी योजना या मंदिरात ठरली. केंद्र सरकारच्या ‘डिजिटल डिस्ट्रिक्ट रिपॉझिटरी डिटेल’ या संकेतस्थळातील माहितीनुसार, ठरल्याप्रमाणे
१३ डिसेंबर १९४२ रोजी रात्री दोन वाजता इंजुबाई मंदिरातून मोठा जमाव गारगोटी कचेरीवर हल्ला करण्यासाठी निघाला. रात्रभर धुमश्चक्री सुरू होती. त्यावेळच्या हलकल्लोळात इंग्रज मॅजिस्टेटच्या अंगरक्षकांतील जाधव नावाच्या शिपायाने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात येथील करविरय्या स्वामी, नारायण वारके, तुकाराम भारमल, शंकरराव इंगळे, मल्लू चौगले, बळवंत जबडे, परशुराम साळोखे हे सात देशप्रेमी हुतात्मा झाले. याप्रकरणी इंग्रज सरकारने ४७ जणांविरोधात खटला भरला होता. या हुतात्मांच्या स्मरणार्थ गारगोटी येथील तहसील कार्यालयासमोर सात पाकळ्यांचे स्मारक आहे.
इंजुबाई ही लोकदेवता आहे. ती इंजाई, इंजुबाई, इंजाई दाई या नावांनीही ओळखली जाते. महाराष्ट्रातील स्त्रीगीतांमध्ये, प्रामुख्याने जात्यांवरील ओव्यांमध्ये तिचा नामोल्लेख आढळतो. ‘सेंटर फॉर को-ऑपरेटिव्ह रिसर्च इन सोशल सायन्सेस’ या संस्थेने अनेक जात्यांवरील ओव्या ध्वनिमुद्रित करून ठेवल्या आहेत. त्यातील एका ओवीमध्ये ‘दिवस मावळीला गेला झाडाच्या झुडीयत। आई ती गं इंजुबाई आहे फुलाच्या झबक्यात।।’ असा उल्लेख आला आहे. प्राचीन गोंडवाना राज्याची राजधानी असलेल्या चांदगड (चांदिया-मनोर)मध्ये इंजाई दाईचे एक पुरातन मंदिर आहे व त्या गावाचे नाव इंजापूर असे आहे. राज्यात अन्यत्रही इंजाईची अनेक मंदिरे आहेत. तेथे ती खंडोबाची बहीण म्हणूनही मानली जाते. खंडोबाचे पवित्र स्थान असलेल्या पाली येथे तिची खंडोबाची बहीण म्हणूनच पूजा केली जाते. गारगोटी येथे ती आदिशक्ती दुर्गामातेच्या रूपात स्थानापन्न आहे.
येथील इंजुबाई देवीचे हे मंदिर किती प्राचीन आहे याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी त्याच्या स्थापत्यशैलीनुसार ते १६व्या शतकातील असावे, असा अंदाज आहे. तर देवीची काळ्या पाषाणातील मूर्ती ही १३व्या शतकातील असावी, असा अभ्यासकांचा कयास आहे. या दगडी बांधणीच्या व कौलारू असलेल्या दुमजली मंदिराभोवती भक्कम आवारभिंत आहे. या भिंतीत असलेल्या स्वागतकमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात दोन थरांच्या चौथऱ्यावर वैशिष्ट्यपूर्ण दीपमाळ आहे. या दीपमाळेच्या खालील भागात चारही कोपऱ्यांवर गजराज कोरलेले आहेत व त्यांच्या डोक्यावर असलेल्या कमळ फुलातून ही दीपमाळ प्रकटली आहे, असे भासते.
जमिनीपासून काहीशा उंचीवर असलेल्या मोठ्या चौथऱ्यावर या मंदिराचे बांधकाम आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या दगडी द्वारशाखा नक्षीकामाने सुशोभित आहेत. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. या प्रवेशद्वारावर वरच्या बाजूला सज्जा आहे व त्यावरील भिंतीवर भारतमातेच्या स्वरूपात इंजुबाईचे चतुर्भुज उठावशिल्प आहे. देवीच्या हातात शंख, चक्र, खड्ग व कमळ फूल आहे व देवीने सिंहाच्या पाठीवर पाय ठेवलेला आहे. या मंदिराचा स्वातंत्र्यसंग्रामाशी असलेल्या संबंधामुळे या मूर्तीत भारतमातेचे रूप सामावले असावे. देवी प्रतिमेच्या वरील बाजूस छतावर आमलक व त्यावर कळस आहे. प्रवेशद्वाराकडील वरच्या दोन्ही कोपऱ्यांत दोन पूर्णाकृती गजराज शिल्पे आहेत. येथून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो.
मंदिराच्या आयताकृती व बंदिस्त सभामंडपातील बांधकामात लाकडांचा वापर केलेला दिसतो. सभामंडपात प्रत्येकी सहा लाकडी स्तंभांच्या दोन रांगा आहेत. त्यामधील जागा ही कोकणी स्थापत्यरचनेप्रमाणे काही इंच खोलगट आहे. सभामंडपाचे छत वर व खाली अशा दोन भागांत विभागलेले आहे. गर्भगृहाच्या लाकडी द्वारशाखांवर पाना-फुलांची नक्षी कोरलेली आहेत. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात चांदीच्या मखरात असलेल्या वज्रपीठावर इंजुबाई देवीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती आहे. देवीच्या एका हातात त्रिशूल, दुसऱ्या हातात तलवार, तिसऱ्या हातात कमळ व चौथ्या हातात ढाल आहे. देवी सिंहाच्या पाठीवर पाय ठेवून उभी आहे. मूर्तीवर उंची वस्त्रे व अलंकार कोरलेले आहेत. देवीच्या मस्तकी मुकुट आहे.
गर्भगृहावर असलेले मंदिराचे षट्कोनी शिखर पाच थरांचे आहे. सर्व थरांतून कमळ फुलाच्या प्रतिकृती साकारलेल्या आहेत. शिखरात वरच्या बाजूस एकावर एक असे दोन आमलक आहेत व त्यावर कळस आहे. मुख्य शिखराच्या चारही कोनांवर चार लघूशिखरे व त्यांवर कळस आहेत. मंदिरात चैत्र नवरात्री, शारदीय नवरात्री, दसरा, दिवाळी आदी उत्सव तसेच माघ पौर्णिमेपासून पाच दिवस चालणारा जत्रोत्सव हे मुख्य वार्षिक उत्सव साजरे होतात. या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांतून अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. वार्षिक उत्सवाच्या वेळी देवीची पालखी जोतिबा डोंगरावर जोतिबाच्या भेटीसाठी जाते.