इंद्रवरदायिनी मंदिर
पापनाश तीर्थ

तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव

तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. त्यामूळे तुळजापूर शहरास धार्मिक महत्त्व आहे. येथील मुख्य मंदिराव्यतिरिक्त शहरभर तुळजाभवानीची अनेक मंदिरे विविध नावांनी प्रसिद्ध आहेत. वेगवेगळ्या अख्यायिका प्रचलीत असलेली ही मंदिरे आपले वेगळे वैशिष्ट्य अधोरेखीत करतात. यामध्ये इंद्रदेवाला पापातून मुक्त होण्याचा वर देणाऱ्या तुळजाभवानीचे येथील इंद्रवरदायिनी मंदिर देखील प्रसिध्द आहे. या मंदिरातील पापनाश कुंडात स्नान केल्याने पापांचा नाश होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हे मंदिर व येथील पापनाश कुंड अनादी काळापासून येथे असल्याचे सांगितले जाते. तथापि अभ्यासकांच्या मते या मंदिराचे व कुंडाचे बांधकाम तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाले असावे. या मंदिराबाबत अख्यायिका अशी की कृत युगात देवांचा राजा इंद्रदेवाने व्रतासुर राक्षसाचा वध केल्याने त्याला ब्रम्हहत्येचे पातक लागले. त्या पापातून सुटका मिळावी म्हणून इंद्रदेवाने तुळजाभवानीस विनवणी केली. तेव्हा देवीने इंद्रदेवाला येथील कुंडात स्नान केल्याने ब्रह्महत्येचे पातक नाहीसे होईल, असे सांगून पापनाश होण्याचा वर दिला. म्हणून येथील देवीला इंद्रवरदायिनी नावाने संबोधले जाऊ लागले.
तुळजाभवानी देवीच्या मुख्य मंदिरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या हिरव्यागार उद्यानातील या मंदिरापर्यंत येण्यासाठी फरसबंदी पायवाट आहे. मंदिराभोवती असलेल्या भक्कम तटबंदीत अरुंद प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या छोटेखानी प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात मध्यभागी पापनाश कुंड आहे. कुंडाच्या भिंती कोरीव पाषाणात बांधलेल्या आहेत व आत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. दोन्ही बाजूंनी उतरती रचना असलेल्या या कुंडात स्नान केल्याने इंद्रदेवाचे ब्रह्महत्येचे पातक नाहीसे झाले होते, असे सांगितले जाते.
कुंडाच्या समोर इंद्रवरदायीनी देवीचे मंदिर आहे. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी त्याची संरचना आहे. मुखमंडपात चार नक्षीदार चौकोनी स्तंभ आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपाची प्रवेशद्वाराकडील बाजू खुली आहे. सभामंडपात उजेडासाठी भिंतीत दीपकोष्टकांची रचना केलेली आहे. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात वज्रपिठावर इंद्रवरदायिनी देवीची अष्टभुजा मूर्ती आहे. देवीने हातात त्रिशूल, खड्ग, धनुष्य, बाण अशी विविध शस्त्रे धारण केलेली आहेत व एक हात अभय मुद्रेत आहे. देवीच्या डोक्यावर चांदीचा मुकूट व अंगावर वस्त्रे आणि अलंकार आहेत.
मंदिराच्या प्रांगणात मुखमंडपाला लागून दोन्ही बाजूला पाषाणात बांधलेल्या ओवऱ्या आहेत. ओवऱ्यांच्या मागील भिंती तटबंदीत आहेत. समोरच्या बाजूला अर्धभिंत व त्यात स्तंभ आहेत. ओवऱ्या व अर्धभिंतीच्या मधील जमीन खोलगट आहे. डाव्या बाजूच्या ओवरीत वज्रपिठावर गणेशाची मूर्ती आहे. उजवीकडील ओवरीला लागून महादेवाचे मंदिर आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपात वज्रपिठावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. समोर गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या वरील बाजूला दर्शनी भिंतीत हस्त व त्यावर सज्जा आहे. सज्जावर तोरण नक्षी व दोन्ही बाजूला पाषाणी झुंबर आहेत. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी मोठी शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग व जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेकपात्र आहे.
मंदिरात चैत्र पाडवा, चैत्र नवरात्री, शारदीय नवरात्रौत्सव, महाशिवरात्री श्रावणी सोमवार, दसरा, दिवाळी आदी वार्षिक सण व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंदिरात कार्तिक स्नान, श्रावण स्नान, अधिक मासातील स्नान करण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. मंगळवार, शुक्रवार, सोमवार, पौर्णिमा अमावस्या, अष्टमी आदी दिवशी भाविकांची येथे वर्दळ असते.

उपयुक्त माहिती

  • तुळजापूर बसस्थानकापासून १ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून तुळजापूरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Back To Home