सावंतवाडी तालुक्यातील आंबोली घाटात हिरण्यकेशी नदीच्या उगमाजवळ हिरण्यकेशी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. असे सांगितले जाते की देवी पार्वतीसाठी महादेवांनी ही गंगा निर्माण केली होती. या नदीचा उगम हिरण्यकेशी मंदिराच्या मागे असलेल्या लेण्यांमधून होतो. या स्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील कुंडात सापडणारा हिरण्यकेशी मासा. संस्कृतमध्ये हिरण्यकेशी या शब्दाचा अर्थ होतो सोनेरी केस. त्याचप्रमाणे सोनेरी पिवळा रंग असलेल्या या माशांची प्रजाती महाराष्ट्रात इतरत्र आढळत नाही, असा संशोधकांचा दावा आहे. हे मासे म्हणजे देवीची लेकरे आहेत, अशी येथील ग्रामस्थांची श्रद्धा आहे.
या मंदिराची आख्यायिका अशी की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, वेंगुर्ला तालुक्यातील, वजराट या गावातील रामकृष्ण विनायक पेंडसे व त्यांचे सहकारी मसाल्याच्या पदार्थांचा व्यापार करण्यासाठी सध्याच्या पाकिस्तानमध्ये असलेल्या कराची प्रांतात गेले होते; परंतु अनेक प्रयत्न करूनही त्यांच्या व्यवसायात म्हणावी तशी प्रगती होत नव्हती. त्यामुळे सर्वजण निराश होते. त्यावेळी शांडिल्य ऋषींनी पेंडसे भटजींना स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले की कोकणातील आंबोली या गावच्या पूर्वदिशेला महादेवाचे स्वयंभू स्थान आहे. त्याचा शोध घे आणि तेथे सेवा कर. त्यावेळी आंबोली येथील स्थानिकांनाही या स्थानाची कल्पना नव्हती. स्वप्नदृष्टांताप्रमाणे पेंडसे भटजींनी परिसरात शोध घेतला असता एका गुहेतील खडकात असलेले हे स्थान त्यांना सापडले. तेव्हापासून त्यांनी या स्थानावर महादेवाची पूजा–अर्चा सुरू केली. येथील पार्वती मातेचे त्यांनीच हिरण्यकेशी असे नामकरण केले होते. १९३८ ते १९७५ या काळात त्यांनी येथे सेवा केली. मरणापूर्वी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की हिरण्यकेशी नदीचे पाणी हे माझ्या समाधीवरून जावे. त्यांच्या इच्छेप्रमाणे भाविकांनी १९७५ मध्ये या नदीपात्रात त्यांची समाधी बांधली.
आंबोली बस स्थानकापासून काही अंतरावर हिरण्यकेशी मंदिर आहे. मुख्य रस्त्यापासून काही पायऱ्या उतरल्यावर हिरण्यकेशी नदीवर असलेला छोटा साकव पार करावा लागतो. या निसर्गसमृद्ध वातावरणातून जाताना विविध पक्ष्यांचे कुजन, झाडांच्या पानांची सळसळ तसेच नदीच्या वाहणाऱ्या प्रवाहाचा आवाज कानावर पडतो. भाविकांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मंदिरापर्यंतच्या या पायवाटेवर पेव्हर ब्लॉकची फरसबंदी केलेली आहे. या वाटेवरून मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत येता येते. येथून काही पायऱ्या उतरल्यावर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. चहुबाजूंनी झाडांनी वेढलेल्या या प्रांगणात सर्वत्र फरसबंदी आहे. प्रांगणात मध्यभागी हवनकुंड आहे व एका बाजूला रामकृष्ण विनायक पेंडसे यांची समाधी आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूला पाण्याचे एक कुंड आहे. असे सांगितले जाते की या कुंडात हिरण्यकेशी मासा या प्रजातीची पैदास होते. येथील पाण्यात तांबोशी हा ‘गोल्ड फिश’सारखा अंगावर लालसर पट्टे व संत्र्याच्या रंगाचा, तसेच अंगाने बारीक असलेला मासा सापडत असे. त्याहून वेगळा असलेला हा हिरण्यकेशी मासा आहे. हा मासा प्रामुख्याने दक्षिण आणि पूर्व आशियायी देशांत आढळणाऱ्या शिस्टुरा या मत्स्यकुळातील असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. या माशांचा आकार ३३ ते ३७.८ मिमी असून ते शैवाल व छोटे कीटक खातात. त्याचा अधिवास हिरण्यकेशी नदीच्या मुखाशी असलेल्या प्रवाहामध्ये आढळून आला. याचा शोध शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि वन्यजीव संशोधक तेजस ठाकरे व त्यांच्या चमुने २०२० मध्ये लावला.
या माशास हिरण्यकेशी नदीवरून आता शिस्टुरा हिरण्यकेशी असे नाव देण्यात आले आहे. देवाचा मासा म्हटला जाणारा हा मासा आढळत असलेल्या या कुंडाच्या दोन्ही बाजूला सुमारे तीन फूट उंचीच्या भिंतीवर विविध रूपांतील देवीच्या मूर्ती आहेत. कुंडाच्या डाव्या बाजूला जिवंत भासावे असे गाय व वासराचे सुंदर शिल्प आहे.
पूर्वी या जागेवर मंदिर नव्हते. केवळ खडकाच्या खालच्या बाजूला स्वयंभू शिवलिंग होते. २००६ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सध्याचे हे मंदिर बांधले. खाली पाणी व वरच्या बाजूला दर्शनमंडप व तीन गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. यातील दर्शनमंडपासमोर असलेल्या मुख्य गर्भगृहातील वज्रपीठावर हिरण्यकेशी देवीची मगरीवर उभी असलेली शुभ्र संगमरवरी मूर्ती व बाजूला हिरण्यगर्भेश्वराचे शिवलिंग आहे. या मूर्तीसमोर नंदी विराजमान आहे, तर डाव्या बाजूला असलेल्या लहानशा वज्रपीठावर गणेशमूर्ती आहे. डावीकडील गर्भगृहात वज्रपीठावर श्रीदत्ताची शुभ्र संगमरवरी मूर्ती आहे. उजवीकडील गर्भगृहात एक गुहा आहे. या गुहेतूनच हिरण्यकेशी नदीचा उगम झाला आहे. असे सांगितले जाते की हिरण्यकेशी ही राज्यातील एकमेव अशी नदी आहे की तिचा उगम पूर्वेला झाला व ती पूर्वेकडेच वाहते.
महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. याशिवाय श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी हजारो भाविक हिरण्यकेशीच्या दर्शनासाठी येतात. याठिकाणी अस्थिविसर्जन, त्रिपिंड श्राद्ध, नारायण नागबळी असे धार्मिक विधीही केले जातात. मंदिराच्या आवारात एक जुन्या काळातील दगडी धर्मशाळा आहे. आंबोलीतील जैवविविधता व येथील हिरण्यकेशी मासा या प्रजातीचे जतन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे ३१ मार्च २०२१ मध्ये ‘शिस्टुरा हिरण्यकेशी जैवविविधता स्थाना’ची स्थापना करण्यात आली. या गोड्या पाण्यातील माशांचे जतन करण्याच्या हेतूने सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. माशांच्या दुर्मिळ प्रजातींचे रक्षण करण्यासाठी खास तयार करण्यात आलेला हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम ठरला आहे. येथील ग्रामस्थांनीही माशांच्या प्रजातीचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा निश्चय केलेला आहे. स्थानिक लोक या माशांना ‘स्वर्गातील मासा’ असे संबोधतात.
आंबोली घाट परिसराला गरिबांचे माथेरान तसेच महाराष्ट्राची चेरापुंजी असे म्हटले जाते. या भागात तब्बल ७४७ सें.मी. इतका पाऊस पडतो. (मुंबई, पुण्यात पावसाचे प्रमाण साधारणतः २५० ते ३०० सें.मी. इतके असते.) हा घाट जसा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, तसाच तो जैवविविधतेसाठीही प्रसिद्ध आहे. विविध प्रकारच्या प्रजातींचे संशोधन येथे केले जाते. त्यात अनेक दुर्मिळ वनस्पती, फुले, कीटक यांचा समावेश आहे. समुद्रसपाटीपासून ६९० मीटर उंचीवर असलेल्या या घाटाला १८८० मध्ये हिलस्टेशनचा दर्जा देण्यात आला होता. आंबोली ही सावंतवाडी संस्थानाची उन्हाळ्यातील राजधानी होती. अजूनही त्या काळातील काही इमारतींचे अवशेष येथे पाहायला मिळतात.
हिरण्यकेशी मंदिरापासून काही अंतरावर राघवेश्वराचे मंदिर आहे. हिरण्यकेशी मंदिराप्रमाणेच निसर्गसमृद्ध परिसरातून या मंदिरातही जाण्यासाठीचा मार्ग आहे. या मार्गावर हिरण्यकेशी नदीचा प्रवाह दिसतो. राघवेश्वर मठ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी गणपती व श्रीराम पंचायतन अशी मंदिरे आहेत.