हिंगळाज देवी मंदिर

हिंगळजवाडी, ता. धाराशिव, जि. धाराशिव

हिंगळाज देवीचे मुळ शक्तिपीठ पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात आहे. कुलवर्ण तंत्रातील अठरा शक्तिपिठांपैकी तिसरे शक्तिपीठ हिंगळाज देवीचे आहे. देवीच्या ५१ शक्तिपिठांपैकी हिंगळाज माता हे एक शक्तिपीठ आहे. देवी अनेक कुळांची कुलदेवी व आराध्य देवता असल्याने राजस्थान, गुजरात व महाराष्ट्रासहीत अनेक राज्यांत अनेक ठिकाणी हिंगळाज देवीची मंदिरे आहेत. धाराशिव जिल्ह्यातील हिंगळजवाडी येथील हिंगळाज देवीचे प्रसिद्ध मंदिर हे शक्तिचे उपपीठ आहे. येथील जागृत देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथील महादेव मंदिरातील जात्यासारखी गरगर फरणारी शिवपिंडी हे येथील वेगळेपण आहे.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, हेमाडपंती स्थापत्यशैलीतील दगडी बांधकाम असलेले हे मंदिर बाराव्या शतकातील आहे. पाकिस्तानातून देवी धराशिव येथे आली याबाबत अख्यायिका अशी की धाराशिव येथील महंत पुरी महाराज हिंगळाज देवीचे निस्सिम भक्त होते. ते दरवर्षी बलुचिस्तान येथील हिंगळाज देवीच्या दर्शनासाठी जात असत. वयोमानाप्रमाणे त्यांना ही यात्रा करणे अशक्य होऊ लागले. तेव्हा त्यांनी देवीला आपल्या गावी येण्याची विनंती केली. देवीने त्यांच्या सोबत ‘मागे न पाहण्याच्या’ अटीवर गावी येण्याचे मान्य केले. हिंगळाजवाडी येथील तलावाच्या काठी येताच महाराजांचा विश्वास डळमळीत झाला व त्यांनी देवी आपल्या मागे येते आहे की नाही हे पाहण्यासाठी मागे पाहिले. त्याच क्षणी पाषाण रूप धारण करून देवी येथे स्थिर झाली.
रस्त्यालगत असलेल्या या मंदिरासमोर वाहनतळ आहे. मंदिराभोवती दुहेरी तटबंदी आहे. बाहेरील तटबंदी अलिकडील काळातील आहे. पहिल्या प्रवेशद्वारावर अर्धचंद्राकार लोखंडी कमान व त्यावर जाळीदार झडपा आहेत. या प्रवेशद्वारातून आत आल्यावर जुन्या दगडी बांधणीची दुसरी तटबंदी आहे. या तटबंदीतील प्रवेशद्वारासमोर दोन्ही बाजूस भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस स्तंभांलगत पहारेकऱ्यांची आसने व आतील बाजूस पहारेकरी कक्ष आहेत.
मंदिरांच्या फरसबंदी असलेल्या प्रांगणात प्रवेशद्वारासमोर कडुलिंबाच्या पारावर मेघडंबरीत मारूतीची शेंदूरचर्चित प्राचीन व जीर्ण मूर्ती आहे. तटबंदीला लागून बंदिस्त खोल्यांचे भक्तनिवास व खुल्या ओवऱ्या असलेली धर्मशाळा आहे. प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी ठिकठिकाणी आसने आहेत. प्रांगणात मंदिरासमोर चौथरा आहे व त्यावर पाच दीपमाळा आहेत. त्यातील चार दीपमाळा गोलाकार व एक चौकोनी आहे. दीपमाळांच्या चौथऱ्यावर वीरगळ व काही शिल्पे आहेत.
सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपात चौकोनी पाषाणी स्तंभ एकमेकांना कमानीने जोडलेले आहेत. प्रत्येक चार स्तंभांच्या मध्यभागी घुमटाकार वितान आहे. सभामंडपास डाव्या बाजूला आणखी एक दरवाजा आहे. सभामंडपापुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर वेलबुट्टी नक्षी व ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात वज्रपिठावर देवीचा स्वयंभू तांदळा आहे. देवीने चांदीचा मुकुट धारण केलेला आहे. मूर्तीच्या मागील प्रभावळीवर पानाफुलांची व शंखचक्र नक्षी आहे. छताला चांदीचे छत्र टांगलेले आहे. स्वयंभू मूर्तीसमोर वज्रपिठावर देवीची महिषासुरमर्दिनी रूपातील पितळी मूर्ती व शेजारी त्रिशूल आहे.
गर्भगृहाच्या मंडोवरावर तिन्ही बाजूंनी देवकोष्टके आहेत. गर्भगृहाच्या छतावर उरूशृंगी प्रकारचे शिखर आहे. मुख्य शिखराच्या चारही बाजूंनी आठ उपशिखरे आहेत. मुख्य शिखरात शीर्षभागी स्तुपी, त्यावर कळस व ध्वजपताका आहे. प्रांगणात मंदिराशेजारी पालखी कक्ष आहे. येथे उत्सव काळात वापरली जाणारी देवीची पालखी ठेवलेली आहे. पालखी कक्षाच्या बाजूला यज्ञमंडप आहे. सुमारे तीन फूट उंच चौथऱ्यावर मध्यभागी यज्ञकुंड आहे. यज्ञमंडपासमोर जमिनीवर कासव शिल्प आहे.
देवीच्या मंदिरासमोर प्राचीन महादेव मंदिर आहे. सभामंडपात एका चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. नंदीवरील घुंगरमाळ, पाठीवरील झुल व मुखबंध वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसरीत कोरलेले आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस सिंहशिल्पे आहेत. उजव्या बाजूच्या सिंहशिल्पाच्या वर देवकोष्टकात गणपतीची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. डावीकडे चक्रनक्षी आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी वज्रपिठावर शिवपिंडी आहे. ही शिवपिंडी हाताने फिरवली असता शाळुंकेसहीत ती ३६० अंश कोनात जात्यासारखी गोल फिरते. परंतू ती खालील पाषाणातून वेगळी काढता येत नाही. शिवपिंडीवर पितळी मुखवटा व छत्र धरलेला पितळी नाग आहे. गर्भगृहात मागील भिंतीवर गरूड, लक्ष्मीनारायण व मारूती यांची उठाव शिल्पे आहेत. दुसऱ्या शिल्पात सात घोड्यांच्या रथावर आरूढ सूर्यदेव आहे. मंदिराच्या छतावर उरूशृंगी प्रकारचे शिखर आहे. मुख्य शिखराच्या चारही बाजूंना चार उपशिखरे आहेत.
चैत्र वद्य अष्टमीला देवी या ठिकाणी आली असे मानतात. त्यामुळे मंदिरात चैत्र पौर्णिमा ते चैत्र वद्य अष्टमी हा आठ दिवसांचा चैत्रोत्सव साजरा केला जातो. यावेळी देवीची पालखी मिरवणूक काढून ग्रामप्रदक्षिणा करण्यात येते. यावेळी महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी राज्यांतील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. देवीस हार, नारळ, साडी-चोळी व बकरा देण्याचे नवस बोलले जातात. शारदीय नवरात्रौत्सव, महाशिवरात्री, दसरा, दिवाळी आदी वार्षिक उत्सवांच्या वेळी मंदिरात भाविकांची गर्दी होते.

उपयुक्त माहिती

  • धाराशिवपासून २४ किमी अंतरावर
  • धारशिव येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : पुजारी, मो. ८९७५७५०८३०
Back To Home