‘हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी, तू उभी हायस वेसावे गावानु, तुझे पुनवेला जमलाय बघ लोक सारा देवलानू…’ या गाण्याने घरोघरी हिंगळादेवीची महती पोहोचली आहे. या देवीचे मंदिर अंधेरीच्या पश्चिम भागातील वेसावे (वर्सोवा) गावठाणात स्थित आहे. ही देवी या भागातील कोळी जमातीचे आराध्यदैवत आहे आणि ती वेसाव्याची ग्रामदेवता मानली जाते. ही देवी पाकिस्तानातील हिंगलाज मातेचे रूप आहे. तिच्या आगमनामुळे या परिसराचे भाग्य उजळले, अशी येथील ग्रामस्थांची श्रद्धा आहे. त्यामुळे येथे देवीचा नवरात्रोत्सव अत्यंत जल्लोषात आणि हजारो कोळी बांधवांच्या उपस्थितीत साजरा केला जातो.
हिंगलाज देवीचे मूळ स्थान पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील लसबेला जिल्ह्यातील हिंगोल नॅशनल पार्कमध्ये स्थित आहे. तेथील हिंगोल वा हिंगुला नदीच्या तीरावर एका डोंगरावरील एका गुहेमध्ये ही देवी विराजमान आहे. गणेश, कालीमाता, गुरु गोरखनाथ धूनी, ब्रह्मकुंड, रामझरोका बैठक आदी तीर्थस्थळांनी वेढलेल्या परिसरात मातेचे हे मंदिर स्थित आहे. शाक्तपंथीयांच्या ‘तंत्रचूडामणी’ या ग्रंथातील महापीठनिरूपण अध्यायात देवीची एकूण ४३ शक्तिपीठे सांगितलेली आहेत. कालांतराने त्यात भर पडून शक्तिपीठांची संख्या ५१ झाली. ‘तंत्रचूडामणी’ ग्रंथानुसार या शक्तिपीठांच्या यादीमध्ये पहिल्या स्थानी हिंगलाज मंदिराचा समावेश आहे. पौराणिक कथांनुसार, या ठिकाणी सतीमातेचे ब्रह्मरंध्र पडले होते. पाकिस्तानातील हिंदूंप्रमाणेच तेथील झिक्री मुस्लिम जमातही या देवीस मानते.
झिक्री मुस्लिम या मंदिरास ‘नानी मंदिर’ असे संबोधतात आणि देवीच्या यात्रेस ‘नानी की हज’ असे म्हणतात. हिंदूंप्रमाणेच स्थानिक मुस्लिम समाजानेही वेळोवेळी धर्मांध दहशतवाद्यांकडून या मंदिरावर होणारे हल्ले परतवून लावले होते, असे सांगितले जाते.
‘लिंगपुराण’ या ग्रंथात या देवीसंबंधी एक आख्यायिका आढळते. त्यानुसार, एकदा शंकर रावणाच्या भयाने कैलास सोडून बाल्हिक वनात गेले होते. ते कोठे गेले, हे पार्वतीला माहीत नव्हते. बरेच दिवस झाले तरी ते परत आले नाहीत. त्यामुळे पार्वती शंकराचा शोध घेण्यासाठी बाहेर पडली. ती गुप्तवेशाने फिरत फिरत या स्थळी आली. त्यावेळी तिला येथे शंकर गंगेसह क्रीडा करत असल्याचे दिसले. या ठिकाणी नंतर पार्वतीचे मंदिर स्थापन करण्यात आले. हे स्थान हिंगोल किंवा हिंगुला नदीच्या तीरावर असल्यामुळे देवीला ‘हिंगुला’ असे नाव देण्यात आले. त्यानंतर या नावाचा अपभ्रंश ‘हिंगलाज’ असा झाला. याच सतीमातेचे रूप वेसाव्यातील हिंगळादेवी मंदिरात विराजमान आहे.
या मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. ब्रिटिश वसाहतकाळात वेसावे कोळीवाड्यात दिघे आडनावाचे एक मच्छीमार कुटुंब राहत होते. एकदा त्या कुटुंबातील एक पुरुष मासेमारीसाठी समुद्रात गेला असता त्याच्या जाळ्यात एक पाषाण आला. त्याने तो पुन्हा समुद्रात टाकून दिला. मात्र, त्यानंतर काही दिवस सतत त्याच्या जाळ्यात तोच पाषाण येत राहिला. तेव्हा त्याने तो पाषाण गावठाणात आणून एका ठिकाणी ठेवून दिला. यानंतर एके दिवशी त्या ठिकाणी एक लहान बालिका आली. भरजरी वस्त्रे आणि सुवर्णालंकारांनी नटलेल्या त्या बालिकेने दिघे यांना दर्शन दिले आणि त्यानंतर ती गुप्त झाली. त्यानंतर त्यांना एक स्वप्नदृष्टांत झाला. तो पाषाण म्हणजे हिंगलाज मातेची मूर्ती होती, असा तो दृष्टान्त होता. त्यानंतर कोळी बांधवांनी त्या मूर्तीची पूजा करण्यास प्रारंभ केला. कालांतराने तेथे देवीचे मंदिर बांधण्यात आले. या देवीच्या आगमनामुळे गावठाणाचे भाग्य उजळले व घराघरांमध्ये समृद्धी आली, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. या श्रद्धेतून वेसावे कोळी समाजाने देवीच्या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार केला. गावठाणातील सर्व मंदिरांचा कारभार वेसावे कोळी जमात ट्रस्ट पाहते. या ट्रस्टने अलीकडे केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
अरुंद रस्ते आणि गल्ल्या, दोन्ही बाजूंना उंच इमारती तसेच दुकानांची दाटीवाटी असलेल्या या वेसावे गावठाणातील एका रस्त्यालगतच देवीचे हे सुंदर मंदिर उभे आहे.
हे मंदिर उंच अधिष्ठानावर बांधलेले आहे. छोटी ओसरी, सभामंडप आणि त्यात गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. या ओसरीवजा ओट्याला चौकोनाकार स्तंभ आहेत आणि त्यावर नक्षीदार मकरतोरणे आहेत. ओट्याच्या पायऱ्यांच्या बाजूला दोन सिंहमूर्ती आहेत. येथील सभामंडप प्रवेशद्वार चौकटीच्या बाजूला असलेल्या छोट्या देवकोष्ठांत देवीची ऐश्वर्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, आदिलक्ष्मी, वीरलक्ष्मी आणि विजयलक्ष्मी अशी आठ रूपे विराजमान आहेत. देवीचे गर्भगृह खुल्या स्वरूपाचे आहे. येथे उंच संगमरवरी वेदीवर देवीचा सुवर्णरंगी देव्हारा आहे. या देव्हाऱ्याला जडवलेल्या पत्र्यावर पानाफुलांची नक्षी तसेच धार्मिक चिन्हे कोरलेली आहेत. देव्हाऱ्याच्या छतावर मधोमध शिखर आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना कलश तसेच गजमुखे आहेत. या देव्हाऱ्यामध्ये हिंगळादेवीची संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठापित आहे. येथे देवी समपाद व चतुर्भुज स्वरूपात विराजमान आहे. तिने शस्त्र व अक्षय्यपात्र धारण केले आहे आणि ती अभयमुद्रेत आहे. देवीला कोळी समाजाच्या पद्धतीनुसार भरजरी वस्त्रे आणि अलंकारांनी शृंगारलेले आहे, तसेच तिच्या मस्तकावर पुष्पवेणी घातलेली आहे. देवीच्या बाजूलाच एक मोठा त्रिशूळ आहे. याशिवाय, या वेदीवर डाव्या बाजूला भवानी माता, भैरीदेव आणि खंडोबा यांच्या छोट्या मूर्ती आहेत, तर उजवीकडे लक्ष्मीमाता आणि अनंतराया यांच्या मूर्ती आहेत.
मंदिराच्या गर्भगृहावर विविध कलशाकार कोरलेले मोठे शिखर आहे. त्यावर कलश आणि धर्मध्वज आहे.
वेसावे कोळीवाड्याचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात भाविक सकाळी ६ ते दुपारी २ आणि सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत देवीच्या दर्शनाचा लाभ घेऊ शकतात. दूरदूरचे भाविक मोठ्या श्रद्धेने या देवळात दर्शनासाठी गर्दी करतात. मंदिरात रोज सकाळी महिला अतिशय भक्तीभावाने आरतीसाठी एकत्र येतात आणि देवीला सुंदर हार-फुलांनी सजवले जाते. दर मंगळवारी येथे देवीची विशेष सांगता आरती म्हणजेच सांज आरती संपन्न होते. या मंदिरात वर्षातून एकदा होणाऱ्या हिंगळादेवीच्या पारंपरिक गोंधळ उत्सवाची पूर्वतयारी देवळात आठवडाभर आधीपासूनच उत्साहात सुरू होते. या काळात संपूर्ण गावठाणात आणि घराघरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होते. या उत्सवादरम्यान रविवारी देवीला विशिष्ट मान अर्पण करण्याची जुनी प्रथा असून त्यानंतर गावातील सर्व कोळी बांधव एकत्र येऊन श्रद्धेने तो ‘मानाचा भात’ म्हणजेच महाप्रसाद ग्रहण करतात.
या मंदिरातील सर्वांत मोठा उत्सव नवरात्र हा आहे. या काळात येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत घटस्थापना, गोंधळ, जागरण असे कार्यक्रम आयोजित केले जातात. हिंगळाज माता ही नवसाला पावणारी देवी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या देवीला केलेले नवस फेडण्यासाठी नवरात्र काळात अनेक महिला येथे येतात. नवस पूर्ण करण्यासाठी अनेक भाविक पायात बेड्या घालून, डोक्यावर आगीचे कुंड धारण करून आणि रात्रीच्या वेळी मोकळ्या मैदानात विशेष भारात चालण्याची पारंपरिक प्रथा आजही तितक्याच निष्ठेने पाळल्या जातात.
कोळीवाड्यातील या सर्व पारंपरिक उत्सवांमध्ये हिंगळादेवीवर रचलेली लोकगीते आणि कोळीगीते या भक्तीचा अविभाज्य भाग आहेत. ‘वेसावची सोनटिकली’ आणि ‘वेसावची पारू’ यांसारख्या अत्यंत गाजलेल्या संगीत अल्बममधील गाण्यांमधून देवीला ‘आदिमाया शिवशक्ती’ आणि ‘कृष्णाबाई’ अशा विविध आदराच्या नावांनी आळवले जाते. या लोकगीतांमध्ये वेसावकरांची देवीवरील अथांग श्रद्धा, मासेमारीसाठी खोल समुद्रात जाताना मिळणारे तिचे भक्कम रक्षण आणि कोळी संस्कृतीची वैशिष्ट्ये यांचे अत्यंत सुंदर वर्णन केलेले आहे.