समाजात देव संकल्पना रुजू लागली तेव्हा उघड्या छताखाली पाषाण पुजण्याची पद्धत निर्माण झाली. शनी शिंगणापूर येथील शनिदेवाचे मंदिर याचे उत्तम उदाहरण आहे. स्थापत्यशास्त्राचा विकास झाल्यानंतर सुध्दा काही अख्यायिकांचा विचार करून अनेक मंदिरे उघड्या छताची बांधली गेली. असेच उघड्या छताचे प्राचीन व प्रसिद्ध हातलादेवी मंदिर धाराशिवपासून जवळ असलेल्या खानापूर गावच्या डोंगरात आहे. येथील जागृत देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हातलादेवी पार्वतीचे रुप असून ६४ योगिनी पैकी एक मानली जाते. बहुतेक वेळी योगिनी मंदिरे गोलाकार व उघड्या छताची बांधली जातात. योगिनी या निसर्ग देवता आकाशगामिनी असतात अशी मान्यता असल्याने या मंदिरांवर छत बांधले जात नाही. अशी योगिनी मंदिरे सुमारे सातव्या शतकानंतर बांधली जाऊ लागली, असे जाणकारांचे मत आहे. खानापूर येथील हे मंदिर चारशे ते पाचशे वर्षांपूर्वीचे असल्याचा अंदाज येथील ग्रामस्थ व्यक्त करतात. अनेकदा या मंदिरावर छत घालण्याचा प्रयत्न केला गेला. परंतू ते आपोआप उडून जाते, असेही येथील ग्रामस्थ सांगतात. त्यामूळे हे उघड्या छताचे मंदिर म्हणून ओळखले जाते.
डोंगरमाथ्यावर असलेल्या या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंदिराची पहिली स्वागतकमान आहे. रस्त्याच्या दुतर्फा गोलाकार नक्षीदार स्तंभ व त्यावर त्रिकोणी तुळई असे कमानीचे स्वरूप आहे. स्तंभांवर उभ्या धारेची नक्षी आहे. कमानीपासून मंदिराच्या पायथ्यापर्यंत सुमारे दोन किलोमीटर लांबीचा पक्का रस्ता आहे. हा संपूर्ण परीसर वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झाडी आहे. मंदिराच्या पायथ्याशी प्रशस्त वाहनतळ आहे. येथून मंदिरापर्यंत येण्यासाठी कोरीव पाषाणात बांधलेला पायरीमार्ग व पक्का रस्ता आहे. या वाटेवर वनविभागातर्फे विविध सूचना व सामाजिक संदेश लिहिलेले फलक लावण्यात आलेले आहेत.
मंदिरासमोर प्रशस्त प्रांगण आहे व त्याभोवती घनदाट वृक्षांची नैसर्गिक तटबंदी आहे. प्रांगणात सभोवतीने भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. सभामंडप प्रांगणापेक्षा उंचावर असल्यामुळे आठ पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो.
पुढे अर्धखुल्या स्वरूपाचा सभामंडप आहे. सभामंडपात प्रत्येकी चार स्तंभांच्या चार रांगा आहेत. सभामंडपास बाह्य बाजूने कठडा आहे. बाह्य बाजूचे चौकोनी स्तंभ कठड्यात आहेत. कक्षासने म्हणूनही या कठड्यांचा वापर केला जातो. सभामंडपातील मधले चार स्तंभ गोलाकार आहेत. स्तंभांवर तुळई व त्यावर छत आहे. जमिनीवर मध्यभागी यज्ञकुंड आहे.
पुढे एका चौथऱ्यावर गर्भगृह आहे. गर्भगृहाचा भाग सोडून सभोवताली फक्त प्रदक्षिणा मार्गावर छत आहे. गर्भगृहाच्या भिंती दगडी बांधणीच्या आहेत व त्या भिंतींवर छत नाही. गर्भगृहाच्या द्वारशाखा ग्रॅनाईट फरशी आच्छादित आहेत व ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहातील जमीन बाहेरील चौथऱ्यापेक्षा काही इंच उंच आहे. गर्भगृहात वज्रपिठावर हातलादेवीची शेंदूरचर्चित पाषाण मूर्ती आहे. मस्तकी चांदीचा मुकुट, चांदीचे डोळे, वस्त्रे व विविध अलंकार ल्यालेली ही मूर्ती सुंदर भासते. मूर्तीच्या मागे चांदीचे छत्र आहे. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे.
शारदीय नवरात्रौत्सव हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी दहा दिवस देवीचे अभिषेक, भजन, जागरण आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या प्रसंगी परिसरातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. दर पौर्णिमा, मंगळवार व शुक्रवारी मंदिरात भाविकांची वर्दळ असते. वैशाख पौर्णिमेला देवीचा पालखी उत्सव साजरा केला जातो. दररोज सकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात देवीचे दर्शन घेता येते. दर मंगळवारी, शुक्रवारी व पौर्णिमेला सकाळी ६.३० वाजता या मंदिरात अभिषेक केले जातात.