हरेश्वर मंदिर

आरे, ता. करवीर, जि. कोल्हापूर

कोल्हापुरातील करवीर तालुका हा प्राचीन मंदिरांचा एक धार्मिक व ऐतिहासिक ठेवा आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असलेल्या महालक्ष्मी मंदिराप्रमाणेच अनेक प्राचीन शिवमंदिरे या भागात आहेत. त्यापैकीच एक आहे हरेश्वर मंदिर. करवीर तालुक्यातील तुळशी आणि भोगावती या नदीच्या संगमावर वसलेल्या आरे या गावात हे मंदिर स्थित आहे. हे मंदिर प्राचीन आणि जागृत देवस्थान मानले जाते. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे बहुधा महाराष्ट्रातील सर्वात मोठा वीरगळ आहे. मंदिराच्या आवारातही अनेक वीरगळ आहेत.

आरे गावात एका बाजूला नदीतीरानजीक असलेल्या या हेमाडपंती शैलीतील मंदिराचा इतिहास अज्ञात आहे. मात्र त्याची स्थापत्यशैली, त्यातील कोरीव काम, दगडी स्तंभांची रचना यावरून ते शिलाहार काळातील, साधारणतः ११व्या-१२व्या शतकातील असावे, असा अभ्यासकांचा कयास आहे. याच काळात शिलाहार राजा मारसिंह याने करवीरनिवासी महालक्ष्मी-अंबाबाई मंदिराचा विस्तार केला होता. त्यानंतर त्याचा पुत्र गंडरादित्य याने मंदिरावर कळस चढवला होता. गंडरादित्य राजाच्या कालखंडातील एक वीरगळ आरे गावात सापडला आहे. या शिलाहार तसेच त्यानंतर आलेल्या यादव राजांनी अनेक मंदिरे बांधली. त्यापैकीच हरेश्वराचे मंदिर असावे, असे सांगण्यात येते.

हरेश्वर महादेवाचे हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मुखमंडप, गर्भगृह, अंतराळ, सभामंडप आणि त्यास उत्तर व दक्षिण दिशेस लागून असलेले दोन मुखमंडप अशी या मंदिराची रचना आहे. मंदिराच्या समोर एक दगडी बांधणीचे जुन्या पद्धतीचे तुळशी वृंदावन आहे. मंदिराची जगती साधारण एक फूट उंचीची आहे. पूर्व दिशेस असलेल्या मुखमंडपातून मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. मुखमंडप दोन अर्धखांब व दोन पूर्णखांबांवर तोललेला आहे. या खांबांवर नागफणा शिल्पे कोरलेली आहे व हे मंदिर नागांनी तोललेले आहे, अशी लोकश्रद्धा आहे.

मुखमंडपात दगडी कक्षासने आहेत. सभामंडपात जाण्यासाठी जे प्रवेशद्वार आहे, त्याचा काही भाग नाहीसा झाला आहे. प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला कीर्तिमुख कोरण्यात आले आहेत. या मंडपात चतुष्की म्हणजे भूतलापासून किंचित उंच असा चौकोनी ओटा आहे. सभामंडपाच्या द्वारशाखेच्या बाजूला कोरीव स्तंभ आहेत. द्वारचौकटीच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. ही मूर्ती मात्र अलीकडे बसवण्यात आली आहे. मंडारक म्हणजे उंबरठ्यास अर्धचंद्रशिळा असून बाजूला कीर्तिमुखे आहेत. या मंडारकासमोर कोरीव काम केलेली दगडी पायरी आहे.

सभामंडपात डाव्या आणि उजव्या बाजूस प्रवेशद्वारे आहेत. मध्यभागी चार भव्य पाषाणस्तंभ आहेत व त्यांमध्ये रंगशिला आहे. त्यावर पितळी कासवाची मूर्ती बसवलेली आहे. येथील स्तंभ खालच्या बाजूने चौकोनी, मध्यभागी अष्टकोनी, त्यावर चौकोन आणि शीर्षस्थानी गोल चकतीसारखी कणी अशा प्रकारचे आहेत. सभामंडप आणि गर्भगृह यांना जोडणारे अंतराळ काहीसे अंधारे आहे. येथे नंदीची मूर्ती आहे. मूर्ती सुबक कातीव काळ्या पाषाणातील आहे. तिच्या पाठीवरील घुंगुरमाळ अत्यंत हुबेहूब अशी कोरलेली आहे. नंदीचे मस्तक आणि शिंगांवर पितळी पत्रा चढवण्यात आला आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार साधे दगडी आहे व त्याच्या मंडारकावर कीर्तिमुखे दिसतात. आत गाभाऱ्यात हरेश्वराची दगडी मोठी पिंडी आहे, जी जमिनीपासून काहीशी उंचावर आहे. पिंडीला वेटोळे घातलेली नागदेवतेची तांब्याची मूर्ती आहे.

या मंदिरातील एका देवकोष्टकात चामुंडादेवीची मूर्ती आहे. ‘देवीकोशा’नुसार चामुंडादेवी ही करालवदना, खड्ग, पाश, विचित्र खट्‌वाग, नरमुंडमाला धारण करणारी, गजचर्म पांघरणारी, आरक्त नेत्र असणारी आणि शंखनादाने दशदिशा भारून टाकणारी अशी देवता आहे. या देवीने चंड आणि मुंड या दैत्यांचा नाश केला म्हणून तिचे चामुंडा हे नाव रूढ झाले, अशी कथा प्रचलित आहे. येथील चामुंडेची मूर्ती या वर्णनानुसार आहे. मांसरहीत, केवळ त्वचा आणि हाडे असलेली, उग्रवदना अशी ही देवी आहे. तिच्या शिरावर मुकुट आहे, विविध दागदागिने तिच्या अंगावर दिसतात. वरील हातात त्रिशूल आहे, दुसऱ्या हातातील एका पात्रातून ती रक्त प्राशन करत आहे. खालील डाव्या हातात दैत्याचे शिर आहे व दुसऱ्या हातात खंजीर आहे. तिच्या बाजूला तिचे दोन सेवक आहेत. देवीचे वाहन प्रेत आहे. त्यावर ती उभी आहे. तेथेच बाजूला सिंहही आहे.

येथे दुसऱ्या देवकोष्टकात उमा-महेशाची मूर्ती आहे. महादेवाच्या शिरावर मुकुट व अंगावर मेखला, तोडे, केऊर, उदरबंध असे दागिने कोरलेले आहेत. महादेवाच्या डाव्या हातात तीन फण्यांचा नाग व दुसऱ्या हातात एक माळ आहे. डावीकडे पार्वती बसलेली आहे. तिच्या हातात आरसा आहे. शिव-पार्वतीचे आणखी एक शिल्प येथे आहे. यामध्ये ते नंदीवर आरूढ आहेत. शंकराच्या हातात त्रिशूल व दुसऱ्या हातात तलवार आहे. अन्य एका देवकोष्टकांत ध्यानमुद्रेत असलेली पुरुष मूर्ती आहे. त्याच्या दंडात रूद्राक्षाच्या माळा बांधलेल्या आहेत.

येथे भैरवनाथाचीही मूर्ती आहे. त्याच्या वरील एका हातात डमरू व दुसऱ्या हातात त्रिशूल आहे. खालच्या हातांपैकी एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात एक पात्र आहे. त्या हाताच्या एका बोटात दैत्याचे मस्तक अडकविलेले आहे. मूर्तीच्या अंगावर दागिने आहेत. पायांना नागाने वेढा दिलेला आहे.

हेमाडपंती स्थापत्यशैलीतील हे मंदिर ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केलेले आहे. राज्य पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयातर्फे त्याची जपणूक करण्यात येत आहे. या मंदिराची संचालनालयातर्फे डागडुजी करण्यात आली आहे व त्याअंतर्गत त्यावर शिखरे बांधण्यात आलेली आहेत. मंदिराच्या तीनही मुखमंडपांवर, सभामंडपावर तसेच गर्भगृहावर शिखरे आहेत. या बांधकामात विटांचा वापर करण्यात आला आहे.

मंदिराच्या पूर्वेकडील मुख्य मुखमंडपाच्या बाजूला एक भव्य असा वीरगळ आहे. गावाच्या वा गाईंच्या रक्षणासाठी किंवा युद्धात मृत्युमुखी पडलेल्या वीरांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणाऱ्या स्मारकशिळांना वीरगळ अथवा कांदळ असे म्हणतात. हा वीरगळ सामान्य वीरगळांहून उंच आहे. त्याच्या खालच्या स्तरावर वीरयोद्धा हत्तीवरील शत्रूयोद्ध्यांशी युद्ध करताना शिल्पांकित केलेला आहे. दुसऱ्या स्तरात त्यास अप्सरा स्वर्गात घेऊन जाताना दिसत आहेत, तर तिसऱ्या स्तरात तो शिवलिंगाची पूजा करीत आहे व त्याच्या समोर पुरोहित बसलेला आहे. या शिवलिंगावरील शिल्पे आजही तुलनेने चांगल्या स्थितीत आहेत. त्यातील हत्ती, योद्ध्याच्या हातातील ढाल, तलवार, कमरेचे म्यान, अप्सरांच्या अंगावरील दागिने, त्या त्यांस आकाशमार्गे घेऊन जात असल्याचे दाखविले असल्याने त्या पद्धतीची त्यांची देहरचना येथे स्पष्ट दिसते. या वीरगळाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या वरून पहिल्या व दुसऱ्या स्तराच्या मध्ये कन्नड भाषेत लेख कोरलेला आहे.

मंदिराच्या प्रशस्त आवारात प्रवेश करताना एका भिंतीच्या बाजूला काही पूर्णाकार वीरगळ, तर काही वीरगळाचे तुकडे मांडलेले आहेत. यात तलवारयुद्ध करणारे योद्धे कोरलेले आहेत. मंदिराच्या आवारात नंदीची काळ्या पाषाणातील एक प्राचीन भग्न मूर्ती आहे. त्याच्या गळ्यातील माळांचे कोरीव काम सुबक आहे. हरेश्वर मंदिरापासून डावीकडे काही अंतरावर मारुतीचे मंदिर आहे. हरेश्वर मंदिरात दर सोमवारी, तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते.

उपयुक्त माहिती

  • कोल्हापूरपासून २४ किमी अंतरावर
  • कोल्हापूरपासून एसटी व खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home