हैनाही महाराज संस्थान

मुंदेफळ, ता. मेहकर, जि. बुलडाणा

विदर्भ आणि मराठवाड्याला अनेक संतांची मोठी परंपरा लाभली आहे. त्यापैकी एक असणाऱ्या हैनाही महाराजांचे समाधी मंदिर मेहकर तालुक्यातील मुंदेफळ येथे आहे. तब्बल २४ वर्षे कठोर तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त केलेल्या हैनाही महाराजांनी विदर्भातील अनेक गावांमध्ये विविध लीला केल्या. बुलडाणा तसेच बीड जिल्ह्यात त्यांचे हजारो अनुयायी आहेत. चैत्र महिन्यात त्यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त मुंदेफळ येथे दहा दिवसांची मोठी जत्रा भरते. या सोहळ्यासाठी विदर्भ, मराठवाड्यासह मध्य प्रदेशातील अनेक भागांतून असंख्य भाविक त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात. या सोहळ्यादरम्यान महापंगतीत हैनाही महाराजांच्या हजारो अनुयायांना तब्बल ८० क्विंटल महाप्रसादाचे वाटप केले जाते.

हैनाही महाराजांचा जन्म बीड जिल्ह्यातील मुळूक येथे झाला. त्यांचा बालपणापासूनच आध्यात्मिकतेकडे ओढा होता. ते रात्रंदिवस भगवंताचे नामस्मरण करीत असत. हैनाही महाराजांच्या माता-पित्यांनी त्यांच्या इच्छेविरोधात त्यांचा विवाह लावून दिला. त्यांना एक कन्यारत्नही झाले; मात्र ते संसारात फार काळ रमले नाहीत. एके दिवशी माता-पिता व पत्नीचा निरोप घेऊन त्यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारला आणि तपश्चर्या करण्यासाठी हिमालयातील बद्रिकाश्रम येथे निघून गेले. तेथे १२ वर्षे कठोर तपश्चर्या केल्यानंतर ते विदर्भात आले. त्यानंतर ते मेहकर तालुक्यातील बकदाल्भ्य ऋषींची तपोभूमी असलेल्या देळप येथे आले. तेथील शिवलिंगाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी नजीकच असलेल्या ‘अंधाऱ्या’ वडाखाली १२ वर्षे कठोर तप केले. यामुळे त्यांना सिद्धी प्राप्त झाली. त्यानंतर ते भ्रमणासाठी निघाले. वाटेत लागणाऱ्या गावांतील पाच घरांमध्ये ते भिक्षा मागत. भ्रमण करता करता ते मुंदेफळ येथे आले. येथे त्यांनी अनेक लीला केल्या. त्यांच्या लीलांची माहिती सर्वदूर पसरल्याने दूरदूरवरून लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. त्यांच्या लीलांचे संकलन असलेला ‘हैनाही लीलामृत’ हा ३६ अध्याय असलेला ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यांचा शिष्यपरिवारही मोठा आहे. आपले येथील कार्य समाप्त होत असल्याची जाणीव झाल्यावर एके दिवशी त्यांनी काही शिष्यांना बोलावून घेतले आणि आपण समाधी घेणार असल्याचे जाहीर केले. समाधीस्थानही त्यांनी निश्चित केले. १९३६ मध्ये चैत्र शुद्ध एकादशीच्या दिवशी त्यांनी येथे संजीवन समाधी घेतली. त्यानंतर त्यांच्या शिष्यांनी व अनुयायांनी येथे समाधीमंदिर उभारले. काही वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.

मुंदेफळ हे गाव जगदंबा मंदिर तसेच भालचंद्रेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या जानेफळ गावाला लागूनच आहे. जुळी गावे म्हणून या गावांना ओळखले जाते. हैनाही महाराज समाधी मंदिरासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. मंदिराच्या चारही बाजूंनी आवारभिंत आहे. या भिंतीत असलेल्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात पेव्हर ब्लॉक्सची फरसबंदी आहे.

सभामंडप आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपातील भिंती व छतावर राजस्थानी पद्धतीची काचांची मीनाकारी कलाकुसर आहे. भाविकांच्या रांगेचे व्यवस्थापन करण्यासाठी सभामंडपात स्टेनलेस स्टीलचे रेलिंग बसवण्यात आले आहे. सभामंडपातील भिंतींवर ‘हैनाही लीलामृता’मधील अध्यायांमध्ये नमूद असलेल्या लीला दर्शवणारी चित्रे लावण्यात आली आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना असलेल्या मीनाकारीच्या नक्षीकामात मयूर दर्शवण्यात आले आहेत. गर्भगृहासमोर रेलिंगच्या मधोमध पादुका आहेत. गर्भगृहात मोठ्या पीठासनावर हैनाही महाराजांची संगमरवरी दगडात घडवलेली मूर्ती विराजमान आहे. मूर्तीच्या मागील बाजूस प्रभावळ आहे व वरच्या बाजूस त्यांची प्रतिमा आहे. मूर्तीसमोर पादुका आहेत.

मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर महाराजांच्या शिष्यांच्या समाधी आहेत. या मंदिराला लागूनच नंदी खंडोबा मंदिर आहे. हैनाही महाराजांनी दोन मृत बैलांना जिवंत केले होते, अशी आख्यायिका आहे. कालांतराने या बैलांची समाधी या मंदिरात बांधण्यात आली. येथे दोन नंदी व शिवलिंग आहे. या मंदिराला लागूनच हैनाही महाराजांची पत्नी चंद्रभागी आणि कन्या दगडाबाई यांच्या समाधी आहेत. हैनाही महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त गावातून रथयात्रा काढण्यात येते. त्यासाठी वापरण्यात येणारा लाकडी रथही या मंदिरात ठेवण्यात आलेला आहे. मंदिराच्या गर्भगृह व सभामंडपावर आकर्षक शिखरे आहेत. मंदिराच्या मागील बाजूस एक जुनी विहीर आहे. नजीकच खुले सभागृह आहे. विविध प्रसंगी होणाऱ्या कार्यक्रमांसाठी त्याचा वापर केला जातो.

या मंदिरात दररोज सकाळी व सायंकाळी आरती केली जाते. दर सोमवारी भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. चैत्र शुद्ध एकादशीला हैनाही महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येथे मोठा उत्सव होतो. त्याआधी दहा दिवस परिसरात मोठी जत्रा असते. उत्सवाच्या वेळी गावातून लाकडी रथामधून हैनाही महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येते. या पालखीत त्यांचा चांदीचा मुखवटा ठेवण्यात येतो. पालखी मार्गावर रांगोळ्या काढण्यात येतात. वाटेत सुवासिनी या पालखीचे पूजन करतात. हैनाही महाराजांचे अनेक अनुयायी या सोहळ्यात सहभागी होतात. या दिवशी मंदिर परिसरात महापंगतीत भाविकांना ८० क्विंटल पुरी व वांग्याच्या भाजीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी मुंदेफळ येथून देळपपर्यंतची पायी दिंडी काढण्यात येते.

उपयुक्त माहिती:

  • मेहकर येथून २१ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ५८ किमी अंतरावर
  • मेहकर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा नाही मंदिर

हैनाही महाराज संस्थान

मुंडेफल, ताल. मेहकर, जिला. बुलढाणा

Back To Home