ग्रामदेवी मंदिर

गावदेवी रोड, गिरगाव, मुंबई

भारतीय समाजरचनेमध्ये ग्राम या घटकास विशेष महत्त्व असते. हिंदू लोकधर्माने या ग्रामांचे संरक्षण करणारी दैवते मानलेली आहेत. त्यांना ग्रामदैवते म्हणतात. वैदिक दैवतांहून भिन्न स्वरूप व प्रकृतीची ही दैवते स्त्री वा पुरुष रूपात असतात. आर्यपूर्व मूळ भारतीयांच्या काही लोकदेव वा देवतांचे नंतर उन्नयन होऊन त्यांना पौराणिक चरित्र प्राप्त झाले. देवीच्या नावावरून ओळखल्या जाणाऱ्या गावदेवीची ग्रामदेवी येथे आपल्या स्वरूपातच विराजमान आहे. येथे ती तांदळा स्वरूपात आहे. मात्र येथे तिला ‘लीलावती’ ही नाममुद्रा देण्यात आली आहे. या मंदिरात तिच्यासोबत शीतलादेवी ही लोकदेवताही विराजमान आहे.

लोकश्रद्धेनुसार ग्रामदैवते रोगराई तसेच दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्ती यांच्यापासून गावांचे संरक्षण करतात. त्यांच्या कृपेमुळे गावातील ‘पांढरी’प्रमाणेच ‘काळी’ म्हणजे शेतजमीनही समृद्ध होते, असे मानले जाते. बहुतांश ग्रामदैवते ही स्त्रीरूपी आहेत आणि त्यांना गावदेवी म्हटले जाते. इतिहासकार उषा विजयलक्ष्मी यांनी गावदेवी मंदिरांच्या उत्पत्तीचा शोध घेतला आहे. त्यांच्या मते ही मंदिरे उपासनेची ठिकाणे होती. त्याचबरोबर ग्रामसीमा निश्चित करणे हाही मंदिरांचा एक उद्देश होता. पूर्वीच्या काळी गावांच्या सीमा दगडांनी निश्चित केलेल्या असत. अनेकदा लोक हे दगड हलवत असत आणि त्यावरून दोन गावांमध्ये वाद होत असे. अशा वादांमुळे संस्कृत भाषेत ‘संग्राम’ हा शब्द आला आहे. याचा अर्थ दोन गावांतील लढाई किंवा भांडण असा होतो. या समस्येच्या निवारणासाठी सीमांचे कायमस्वरूपी चिन्ह म्हणून गावदेवीचे मंदिर सीमेवर उभारण्यात येत असे.

या व्यावहारिकतेच्या पलीकडेही पवित्र श्रद्धास्थान तसेच येथील कुटुंबांची कुलदेवता म्हणूनही गावदेवीची मंदिरे उभारली जात. आर्य व आर्येतर संस्कृतीसंगमात त्यांना नवा पावित्र्यसांभार दिला जाई. गावदेवी येथील या मंदिरातील ग्रामदेवीस दुर्गादेवीचे रूप मानण्यात आले आहे. आदिशक्ती ही विविध लीला करणारी असल्याने तिला लीलावती म्हणतात. येथील ग्रामदेवीस हे नामाभिधान देण्यात आले आहे. या देवीच्या मंदिराविषयीच्या आख्यायिकेनुसार ही देवी मूळची सात आसरांपैकी एक आहे. थोर विदुषी दुर्गा भागवत यांनी ‘धर्म आणि लोकसाहित्य – अभिचार किंवा जादुटोणा’ (नवभारत, प्राज्ञपाठशाला मंडळ, वाई, नोव्हें. १९५९, पा. २६) या लेखामध्ये पृथ्वीमातेच्या प्रतीकांविषयी मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, “पृथ्वीमातेची प्रतीके म्हणजेच अनंत अशा लौकिक ग्रामदेवता होय. या साऱ्या देवतांत सात बहिणींची प्रतिष्ठा सर्वांत मोठी आहे. या सात बहिणींची प्रतिष्ठा भारतभर या ना त्या रूपाने होत असते. या रोगकारिणी देवता म्हणून प्रसिद्ध आहेत.” याच सात बहिणी सप्तमातृका वा सात आसरा म्हणून पूजल्या जातात. ‘भारतीय संस्कृतीकोश’नुसार आसरा हा अप्सरा या शब्दाचा अपभ्रंश आहे. अप्सरा या गंधर्व वर्गातील स्त्रिया असतात व त्यांना गांधर्वी असेही म्हणतात. सायणाचार्यांनी या शब्दाची व्युत्पत्ती ‘अप्‌ + सरस्’ अशी दिली आहे. त्याचा अर्थ ‘जलात क्रीडा करणाऱ्या त्या अप्सरा’ असा होतो. यामुळे यांना जलदेवता मानण्यात आले आहे. त्या नेहमी सातच्या संख्येने एकत्र असतात म्हणून त्यांना सात वा साती आसरा असे म्हणतात. मत्स्यी, कूर्मी, कर्कटी, दर्दुरी, जतुपी, सोमपा व मकरी अशी त्यांची नावे होत.

कृष्णराव रघुनाथजी नवलकर उर्फ के. रघुनाथजी यांनी १८९५ साली ‘द हिंदू टेम्पल्स ऑफ बॉम्बे’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. या पुस्तकात ग्रामदेवी मंदिराची आख्यायिका दिली आहे. त्यानुसार कोणे एके काळी एका व्यक्तीला झोपेत देवीचा स्वप्नदृष्टान्त झाला. हिरवी साडी, कपाळी कुंकवाचा मळवट, हातात हिरव्या बांगड्या आणि मोकळा केशसांभार अशा स्वरूपात त्याला देवीने दर्शन दिले. दर्शन देऊन देवीने सांगितले, “मी सप्तविश्वांवर राज्य करणाऱ्या सात आसरांपैकी एक आहे. माझे नाव गावदेवी असे आहे. तू येथे माझे मंदिर बांध.” दुसऱ्या दिवशी त्याने या स्वप्नाची हकीकत आपल्या शेजाऱ्यास सांगितली. पाहता पाहता ती कर्णोपकर्णी झाली. लोकांनी देवीने स्वप्नात सांगितलेल्या जागेवर जाऊन शोध घेतला. तेव्हा त्यांना तेथे देवीचा तांदळा म्हणजेच अनघड पाषाण सापडला. त्यानंतर सर्वांनी मिळून येथे देवीचे मंदिर उभारून त्यात या तांदळ्याची प्रतिष्ठापना केली. प्रा. डॉ. भालचंद्र आकलेकर यांच्या ‘मुंबईतील आद्य जागृत शक्तिपीठे’ या पुस्तकानुसार, स्वप्नदृष्टान्त झालेल्या व्यक्तीचे नाव बाबाजी म्हात्रे होते आणि ही घटना सन १७५० च्या सुमारास घडली होती.

कृष्णराव रघुनाथजी नवलकर यांनी सन १८९५ च्या सुमारास या मंदिरास भेट दिली होती. त्यावेळी या मंदिराची रचना एखाद्या घरासारखी होती व सभामंडप आणि गाभारा एकत्र होता. तळमजल्याच्या एका बाजूला दोन छोटी मंदिरे होती. छप्पर आणि तळमजल्याच्या मध्ये कीर्तनाच्या प्रसंगी महिलांकरिता सज्जा म्हणजेच गॅलरी बांधलेली होती. इमारतीच्या मागील भागावर घुमट आणि कळस होता. हा घुमट सिमेंटमध्ये बांधलेला होता, तर कळस लाकडाचा होता. मंदिराला समोरून एक आणि बाजूचे दोन असे तीन दरवाजे होते. समोरील दरवाजाभोवती गॅसचे पाईप होते आणि मोठ्या उत्सवांच्या तसेच जत्रेच्या दिवशी त्यावर लहान घुमट लावून रोषणाई केली जात असे. मंदिरासमोर तीन दीपमाळाही होत्या. कालौघात करण्यात आलेल्या जीर्णोद्धारांनंतर या मंदिरास सध्याचे रूप प्राप्त झाले आहे.

गावदेवीच्या या परिसरात आल्यानंतर येथील तिठ्यावरून पहिल्यांदा मंदिराचा पाठीमागील भाग दिसतो. या उंच दुमजली वास्तूवर उरुशृंग पद्धतीची छाप असलेली आधुनिक बांधकामातील दोन समान उंचीची शिखरे बांधलेली आहेत. या वास्तूच्या बाजूस असलेल्या लोखंडी कमानीतून या मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणास सर्वत्र फरसबंदी केलेली आहे. त्यात ठिकठिकाणी एकूण पाच नव्या-जुन्या दीपमाळा, त्याचप्रमाणे तुलसीवृंदावन व कारंजे आहे. समोरच्या बाजूस नर्मदेश्वर देवालय ट्रस्टने बांधलेले नर्मदेश्वराचे आणि दत्ताचे मंदिर आहे. डाव्या बाजूस ग्रामदेवी मंदिराची वास्तू आहे. सभामंडप आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. रुंदसर लाकडी द्वारातून या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात येताच त्याचे प्रशस्त आणि उंच स्वरूप नजरेत भरते. चौरसाकार मोठ्या खिडक्या आणि तीन प्रवेशद्वारे असलेल्या या सभामंडपास वरच्या बाजूस सज्जा आहे. समोर सिमेंट-काँक्रीटने बांधलेले साधेसे गर्भगृह आहे. त्याच्यावरच्या भिंतीवर दुर्गामातेची उठावशिल्प प्रकारातील भव्य मूर्ती आहे. येथे देवी अष्टभुजा स्वरूपातील व व्याघ्रारूढ आहे. तिने गदा, खड्ग, चक्र, shंख, त्रिशूळ, धनुष्य आणि पुष्प धारण केले आहे. तिचा एक हात अभयमुद्रेत आहे. गर्भगृहामध्ये उंच वेदीवर उजवीकडे ग्रामदेवी म्हणजेच लीलावतीची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. येथे देवी वस्त्राच्छादित अनघड तांदळा स्वरूपात आहे. त्यावर चांदीचा मुखवटा आहे. वेदीवर डावीकडे शीतलामातेची मूर्ती विराजमान आहे. काळ्या पाषाणात घडवलेल्या या मूर्तीस वस्त्रालंकार व पुष्पमालांनी शृंगारलेले आहे. या दोन्ही मूर्तींच्या मध्यभागी विघ्नविनाशक गजाननाची चांदीची मूर्ती विराजमान आहे.

‘गावदेवी व गिरगाव ग्रामस्थ सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती’च्या मालकीच्या या देवालयात सकाळी ५.३० ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री १० या कालावधीत भाविक देवदर्शन घेऊ शकतात. येथे सकाळी ९ ते ११ व सायंकाळी ५ ते रात्री ८ या काळात भाविक पुजाऱ्यांमार्फत देवीस हार, वेण्या वा ओट्या अर्पण करू शकतात. मंदिरात विविध धार्मिक सण व उत्सव परंपरेनुसार साजरे केले जातात. नवरात्र हा येथील सर्वात मोठा उत्सव होय. या काळात मंदिर परिसर रोषणाईने सुशोभित केला जातो. नवरात्राच्या सातव्या दिवशी देवीसमोर हवन विधी केला जातो. दीपावली व विजयादशमीलाही मंदिरात मोठा उत्सव होतो. या मंदिराजवळ नर्मदेश्वराचे मंदिर आहे. त्याच्या शेजारीच दत्ताचे देवालय आहे. गावदेवी आणि नर्मदेश्वर या दोन्ही मंदिरांची वार्षिक जत्रा मार्गशीर्ष पौर्णिमेला भरते. यात्रोत्सवात अनेक भाविक सहभागी होतात.

उपयुक्त माहिती

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकापासून ६ किमी
  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून ३ किमी अंतरावर
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय

ग्रामदेवी मंदिर

गावदेवी रोड, गिरगाँव, मुंबई

Back To Home