गोरक्ष सिद्धांत पद्धती, सिद्ध सिद्धांत पद्धती, योग मार्तंड, योग सिद्धांत पद्धती, योग बीज आणि योग चिंतामणी यांसारख्या ग्रंथांचे रचयिता, नवनाथांमधील दुसरे नाथ व मच्छिंद्रनाथांचे परमशिष्य गोरक्षनाथ हे एक सिद्ध योगी होते. गुरू मच्छिंद्रनाथांच्या योग सामर्थ्याने शेणाच्या उकिरड्यातून त्यांचा जन्म झाला. योगसाधनेच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी नेपाळ, भारत आणि अरब प्रांतापर्यंत भ्रमण केले. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे त्यांचे मुख्य मंदिर आहे. भारतात इतरही अनेक ठिकाणी गोरक्षनाथांची प्रसिद्ध मंदिरे आहेत. गेवराई तालुक्यातील कुंभेजळगाव येथील मंदिर त्यापैकीच एक होय. या पवित्र स्थानी प्रत्यक्ष गोरखनाथांचा वास असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
गोरक्षनाथ मंदिर हे वेगवेगळ्या कालखंडात बांधल्या गेलेल्या चार मंदिरांचे संकुल आहे. यातील गोरक्षनाथांचे मंदिर सुमारे बाराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ नाथ संप्रदायाचा प्रसार करण्यासाठी संपूर्ण भारतात भ्रमण करीत. भ्रमणादरम्यान ते बीड जिल्ह्यातील या गावी आले. त्यावेळी येथील गोरक्ष वृक्षाखाली बसून त्यांनी ध्यानधारणा केली होती. हा वृक्ष आजही येथे आहे.
या भागातील हा एकमेव गोरक्ष वृक्ष मानला जातो. गोरक्षनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ठिकाणी नंतरच्या काळात मंदिर बांधण्यात आले. नाथपंथ हा शिवभक्त आहे. त्यामुळे गोरक्षनाथांच्या मंदिराच्या शेजारी शिवमंदिर उभारले गेले. त्यानंतर या भागात इतर मंदिरे बांधण्यात आली.
हे मंदिर संकुल गावाबाहेर काही अंतरावर आहे. मंदिरापर्यंत येण्यासाठी पक्की सडक आहे. मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ व सभोवती दाट वृक्षराजी आहे. एका वृक्षाखाली शिवपिंडी, नंदीची मूर्ती व पाषाण पादुका आहेत. गोरक्षनाथ मंदिराचा सभामंडप प्रांगणापेक्षा उंचावर आहे. या सभामंडपाचे बांधकाम अलीकडील काळातील आहे. सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. येथे दोन्ही बाजूला प्रत्येकी चार नक्षीदार गोलाकार स्तंभ आहेत. हे स्तंभ एकमेकांना महिरप कमानीने जोडलेले आहेत. उभ्या धारेची नक्षी असलेल्या स्तंभांवर छत व वितानावर चक्रनक्षी आहे. सभामंडपात उजव्या बाजूला वज्रपीठावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. गर्भगृहाचे पाषाणी बांधकाम हेमाडपंती स्थापत्यशैलीतील आहे. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखा व ललाटपट्टी सपाट आहे. गर्भगृहात वज्रपीठावर गोरक्षनाथांची उभ्या अवस्थेतील मूर्ती आहे. गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे गोलाकार शिखर आहे.
शिखरातील खालील तीन थरांत प्रत्येकी सहा देवकोष्ठके आहेत. त्यामध्ये विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखरातील चौथ्या थरात स्तंभनक्षी असून शीर्षभागी आमलक व कळस आहे.
गोरक्षनाथांच्या गर्भगृहाच्या बाजूला कुंभेश्वर महादेवाचे गर्भगृह आहे. येथील द्वारशाखा सपाट व लाकडी आहेत. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे. त्यावर छत्र धरलेला पितळी नाग आहे. शिवपिंडीवर जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेकपात्र छताला टांगलेले आहे. गर्भगृहाच्या मागे बाह्य बाजूने छतावर जाण्यासाठी कोरीव पाषाणात बांधलेला जिना आहे. गर्भगृहाच्या छतावर तीन थरांचे शिखर आहे. शिखरातील पहिला थर चौकोनी आहे आणि त्यात चारही बाजूंना प्रत्येकी एक देवकोष्ठक आहे. शिखरातील दुसऱ्या थरात सहा देवकोष्ठके तर तिसऱ्या थरात स्तंभनक्षी आहे. शिखरात शीर्षभागी आमलक व कळस आहे. या मंदिराच्या बाजूला श्रीराम मंदिर आहे. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. या मंदिराच्या सभामंडपात गिरी महाराजांची समाधी आहे. गर्भगृहाच्या लाकडी द्वारशाखांवर व ललाटपट्टीवर पर्णलतानक्षी कोरलेली असून प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. गर्भगृहात वज्रपीठावर श्रीराम, लक्ष्मण, सीता व मारुती यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या छतावर तीन थरांचे चौकोनी शिखर आहे. शिखराच्या पहिल्या थरात चारही बाजूंना सूर्यशिल्प तर दुसऱ्या थरात देवकोष्ठके आहेत. शिखराच्या तिसऱ्या थरात चारही बाजूंना प्रत्येकी दोन अंगशिखर व त्यावर अर्धआमलक आहेत. शिखरांवर आडव्या रचनेची स्तंभनक्षी
आहे. यावर शीर्षभागी दोन आमलक व कळस आहेत.
राम मंदिराच्या बाजूला श्री दत्तात्रेयांचे मंदिर आहे. मंदिरात मध्यभागी कुंथलगिरी महाराजांची समाधी आहे. या समाधीवर शिवपिंडी आहे. मंदिरात मागील भिंतीलगत वज्रपीठावर त्रिमूर्ती दत्तात्रेयांची संगमरवरी मूर्ती आहे. मंदिराच्या छतावर खाली अष्टकोनी व वर निमुळते होत गेलेले गोलाकार शिखर आहे. शिखराच्या खालील भागात पद्मदलमंडळ आहे. या मंदिराच्या शेजारी विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. मंदिरात मध्यभागी बबनगिरी महाराजांची समाधी आहे. मागील भिंतीलगत वज्रपीठावर विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या छतावर वर निमुळते होत गेलेले गोलाकार शिखर असून त्यावर पद्मदलनक्षीचे रिंगण आहे. शिखरावर उभ्या धारेची नक्षी, आमलक व कळस आहे.
मंदिराच्या प्रांगणात गोरक्ष चिंचेचे प्राचीन झाड आहे. झाडाखालील चौथऱ्यावर बसून गोरक्षनाथांनी तपाचरण केले होते. या चौथऱ्याच्या बाजूने अर्धभिंती व छत आहे. माघ शुक्ल त्रयोदशीला येथे गोरक्षनाथांच्या जयंतीचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. यावेळी मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यावेळी हजारो भाविक येथे दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. दत्तजयंती हा येथील दुसरा महत्त्वाचा उत्सव आहे. त्यानिमित्ताने हरिनाम सप्ताहाचे आयोजन होते. सलग सात दिवस मंदिरात आध्यात्मिक कार्यक्रम चालतात. मंदिरात महाशिवरात्री, राम नवमी, गुरु पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, दसरा व दिवाळी उत्साहात साजरी केली जाते. गुरुवार, सोमवार, पौर्णिमा व अमावस्येला भाविकांची मंदिरात विशेष गर्दी असते.