कदंब काळात उभारण्यात आलेले आणि वैशिष्ट्यपूर्ण ‘बुडबुड तळ्या’मुळे ओळखले जाणारे गोपीनाथाचे मंदिर निसर्गसमृद्ध अशा नेत्रावली अभयारण्यामध्ये स्थित आहे. या मंदिरासमोर पुष्करणीसारख्या पायऱ्या असलेले तळे आहे. त्याचे वैशिष्ट्य असे की येथे जोरात टाळ्या वाजवल्या वा मोठ्याने आवाज केला असता त्यातील पाण्याखालून बुडबुडे निघतात. त्यामुळे ते ‘बुडबुड तळे’ या नावानेच ओळखले जाते. हे तळे, तसेच येथील पुरातन गोपीनाथ मंदिर पाहण्यासाठी भाविकांप्रमाणेच पर्यटक आणि वास्तुअभ्यासक येथे येत असतात.
गोपीनाथ म्हणजे कृष्ण. महाभारत, हरिवंश, विष्णुपुराणाचा पाचवा अंश, भागवताचा दशमस्कंध आणि ब्रह्मवैवर्तपुराण हे कृष्णचरित्राचे मुख्य आधार मानले जातात. आज सर्वत्र प्रसृत असलेली कृष्णकथा ही भागवताच्या दशमस्कंधातील कथा आहे. या भागवत ग्रंथामध्ये कृष्णाचे गोपींचा नाथ हे स्वरूप ठळकपणे आलेले आहे. गोपीनाथाच्या येथील मंदिराबाबत अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. एका कथेनुसार कदंब राजघराण्यातील एका राजास स्वप्नामध्ये कृष्णाने दर्शन दिले व सांगितले की ‘माझी मूर्ती पाण्याखाली आहे. ती शोध आणि तिची स्थापना मंदिरात कर.’ त्यानुसार त्या कदंब राजाने आपल्या अधिकाऱ्यांना नेत्रावलीच्या अरण्यात मूर्तीचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यावेळी एका विहिरीत ही कृष्णमूर्ती सापडली. नंतर तेथे मंदिर उभारून त्यात मूर्तीची स्थापना करण्यात आली.
या मंदिराची निर्मिती बाराव्या शतकात झाली असल्याचा अभ्यासकांचा कयास आहे. त्यानंतर तेराव्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या काळात आणि त्यानंतरही त्याचे अनेकदा नूतनीकरण झाल्याचे सांगण्यात येते. हे मंदिर नेत्रावलीच्या दाट अरण्यात, त्यावेळी अत्यंत दुर्गम असलेल्या भागात वसलेले असल्यामुळे ते बहमनी वा पोर्तुगीज या मूर्तिभंजक आक्रमकांच्या हल्ल्यातून वाचले. कोकणातील अठराव्या शतकातील थोर संत व ‘सिद्धान्तसंहिता’, ‘अक्षयबोध’, ‘अद्वयानंद’ आदी ग्रंथांचे लेखक सोहिरोबा आंबिये (१७१४–१७९२) यांनी या मंदिरात काही काळ ध्यानधारणा केल्याचे सांगण्यात येते. सोहिरोबा आंबिये यांचे घराणे मूळचे डिचोली तालुक्यातील पालये येथील होते.
येथील मूळ मंदिर कदंबकालीन स्थापत्य शैलीतील होते असे सांगण्यात येते. ही स्थापत्यशैली म्हणजे होयसाळ व चालुक्य यांच्या काळातील स्थापत्यशैलीचा संगम होय. या मंदिराच्या स्तंभांवर सूरसुंदरींचे, तसेच कृष्णलीलांचे चित्रण होते. कालौघात मंदिरवास्तु जीर्ण झाली. बांधकामास गळती लागली, तसेच काही भाग ढासळला.
तेव्हा १९६१ ते १९८० या कालावधीत वेळोवेळी मंदिराचा जीर्णोद्धार, तसेच नूतनीकरण करण्यात आले. या नव्या रचनेत मंदिराच्या सभामंडपाचा आकार वाढवण्यात आला. नव्वदच्या दशकात मंदिर नूतनीकरणाचा दुसरा टप्पा पार पडला. त्यात आधुनिक पद्धतीचे बांधकाम करण्यात आले. त्यावेळी मंदिरावर पारंपरिक कदंब पद्धतीच्या शिखराऐवजी उत्तर भारतीय प्रभाव असलेली शिखर रचना करण्यात आली.
]मोठी गवाक्षे असलेला अर्धखुला सभामंडप, अंतराळ आणि प्रदक्षिणा मार्ग असलेले गर्भगृह अशी येथील मंदिराची संरचना आहे. मंदिराच्या गर्भगृहात वज्रपिठावर स्थापित असलेली मुरलीधारी श्रीकृष्णाची मूर्ती अतिशय रेखीव आहे. एका अखंड शिळेतून घडविण्यात आलेल्या या कोरीव मूर्तीवर सुंदर नक्षीकाम आहे. त्रिभंग पद्धतीची म्हणजे तीन ठिकाणी बाक असलेली ही मूर्ती आहे. कृष्णाच्या पायाशी एका बाजुला गोधन म्हणजे गायीगुरे चित्रित करण्यात आलेली दिसतात. गोव्यातील इतर अनेक जुन्या मंदिरांप्रमाणे, गर्भगृहावरील शिखर वगळता मंदिराच्या इतर भागाच्या छतावर कौले आहेत. गर्भगृहावर सिमेंटचा वापर करून उभारण्यात आलेले षटकोनी शिखर आहे.
गोपीनाथाच्या या मंदिरात रोज सकाळी ६.३० ते १२.३० आणि संध्याकाळी ३.३० ते ६.३० या काळात भाविक दर्शन घेऊ शकतात. येथे साजरा केला जाणारा मुख्य उत्सव श्रावणातील जन्माष्टमी हा आहे. यावेळी भजन–कीर्तन, रासलीला नाट्य आणि अन्नदान केले जाते. दुसरा प्रमुख उत्सव म्हणजे कार्तिक महिन्यात केली जाणारी गोवर्धन पूजा. अन्य उत्सवांत गणेश चतुर्थी आणि होळी म्हणजेच शिगमोत्सव यांचा समावेश आहे. या उत्सवांच्या वेळी येथे स्थानिक लोककलांचे सादरीकरण करण्यात येते. उत्सव काळात येथे मोठ्या प्रमाणावर भाविक येतात.
या मंदिरासमोर चारही बाजूंनी चिऱ्याच्या दगडांनी बांधलेले मोठे तळे आहे. त्याच्या काठाशी उभे राहून मोठ्याने ओंकाराचा निनाद केला असता पाण्यातून बुडबुडे येतात, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. असाच प्रकार येथून सुमारे २०० किमी अंतरावरील मठ बुद्रुक या मालवण तालुक्यातील गावामधील बोंबडेश्वराच्या मंदिरात पाहावयास मिळतो. तेथील तळ्यातूनही बुडबुडे येतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाधवडे हे गाव तर उमाळ्याचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तेथील वाहत्या पाण्यातून असे बुडबुडे येतात. याची वैज्ञानिक मीमांसा अशी की भूस्तराखाली असलेल्या खडकांत काही सच्छिद्र खडकही असतात. त्यांतील पोकळीत हवा असते. कोकणात बेसॉल्ट प्रकारचे खडक आहेत. त्यांत क्षार असतात. ते येथील प्रचंड पावसामुळे हळुहळू वाहून जातात. त्यामुळे खडक सच्छिद्र बनतात. मोठ्याने केलेल्या आवाजामुळे पाण्यात कंपने निर्माण होतात. त्या कंपनांमुळे खडकांच्या पोकळीतील हवा बाहेर येते व त्यामुळे बुडबुडे निर्माण होतात. असे बुडबुडे टाळी वाजवली वा जोरात ओरडले तरीही येतात. नेत्रावली अभयारण्यात जंगलसफारीसाठी येणारे पर्यटक हा नैसर्गिक चमत्कार अनुभवण्यासाठी येथेही आवर्जून येतात.