गोपाल गणपती मंदिर

फर्मागुढी, बांदोडा, ता. फोंडा, जि. उत्तर गोवा

छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतलेल्या फोंड्यातील मर्दनगडाच्या समोर बांदोड्यातील फर्मागुढीचा रमणीय परिसर आहे. येथील एका टेकडीवर गोपाल गणपतीचे प्राचीन मंदिर वसले आहे. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब ऊर्फ दयानंद बांदोडकर यांनी जीर्णोद्धारित केलेले हे ऐतिहासिक मंदिर देशविदेशातील पर्यटकांच्याही आकर्षणाचे केंद्र आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की गणपतीचे हे देवस्थान जागृत आहे व येथील विघ्नहर्ता नवसाला पावणारा आहे. यामुळे येथे सातत्याने भाविकांचा राबता असतो.

बांदिवाटिका, तसेच बांदवाडा या नावाने प्राचीन काळी ओळखल्या जाणाऱ्या बांदेवाडीची स्थापना श्रीपाल नावाच्या राजाने केल्याची पंधराव्या शतकातील शिलालेखीय नोंद आहे. याच प्रमाणे बांदिवडे येथे मौर्य नृपती अनिर्जितवर्मन् याच्या कारकिर्दीतील संस्कृत भाषेतील शिलालेख सापडला आहे. तो त्यातील पेटिकाशीर्षक लिपीच्या आधारे सहाव्या वा सातव्या शतकातील आहे. यात नागपद्द, मल्लदत्त व अचल या दानकर्त्यांनी हस्तार्य नावाच्या हारित गोत्री ब्राह्मणाला काही जमीन, घरासाठी जागा, मळा आणि तलाव किंवा टाके दान केल्याचे उल्लेख आहेत. यावरून बांदिवड्याचे प्राचीनत्व स्पष्ट होते. मराठ्यांच्या इतिहासाशीही या गावचा निकटचा संबंध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ मे १६७५ रोजी गोपाल मंदिराच्या टेकडीनजीकचा फोंड्याचा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला होता.

या वेळी महाराजांनी या किल्ल्यास मर्दनगड असे नाव दिले होते. या विजयामुळे स्वराज्यात तिसवाडी, चंद्रमहल, केपे, बाळ्ळी आणि काणकोण हे आदिलशाही प्रदेश सामील झाले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळीही हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. १६८३मध्ये येथे तळ ठोकून संभाजी राजांनी गोव्यावर स्वारी केली होती. येथील सरदेसाई दुलबाजी नाईक प्रतापराव हा पोर्तुगीजांना फितूर झाला. तेव्हा पोर्तुगीजांनी फोंडे जिंकण्याचा प्रयत्न केला. परंतु येसाजी कंक यांचा सुपुत्र कृष्णाजी कंक यांनी पराक्रमाची शर्थ करून किल्ल्याचे संरक्षण केले आणि ११ नोव्हेंबर १६८३ या दिवशी लाजिरवाणे अपयश घेऊन व्हिसेरेइ कौंट द आल्व्होर याला परतावे लागले. संभाजी राजांच्या गोवा मोहिमेतील यशाच्या प्रीत्यर्थ फोंडा किल्ल्यानजीक असलेल्या या फर्मागुढीच्या टेकडीवर ऑगस्ट १६८३मध्ये गुढी उभारण्यात आली होती. स्वतः संभाजी राजांच्या आज्ञेने ही विजयाची गुढी उभारण्यात आली होता. त्याची स्मृती म्हणून आजही अनंत चतुर्दशीच्या दिवशी देवस्थानसमोरील पेडावर व गुडयेतेम येथील वडावर विजय-गुढी उभारली जाते.

येथील गोपाल गणपती मंदिराबाबत आख्यायिका अशी की फर्मागुढीच्या या टेकडीवर पूर्वी घनदाट जंगल होते. येथे काही गोपाल गायी-गुरे चारण्यासाठी घेऊन येत असत. एके दिवशी त्यातील एका गुराख्यास एका झुडपामध्ये गणपतीची मूर्ती दिसली. त्याने ही वार्ता ग्रामस्थांना सांगितल्यानंतर, गावकारभाऱ्यांनी या ठिकाणी झावळ्यांचे मंदिर उभारले व त्यात या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. ज्या गोपालांना ही मूर्ती सापडली होती, ते देवाच्या सेवेत रूजू झाले. यामुळे या गणेशास गोपाल गणपती या नावाने संबोधले जाऊ लागले. आज ज्या ठिकाणी मंदिराची तुळस आहे, तेथेच पूर्वी झावळ्यांचे मूळ मंदिर होते, असे सांगण्यात येते. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे लोकप्रिय नेते व गोवा, दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांचे पहिले मुख्यमंत्री दयानंद ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांच्या कानावर या गणपतीची महती पडली. या नंतर त्यांनी फर्मागुढीस भेट देऊन झावळ्यांच्या मंदिरातील गणेशाचे दर्शन घेतले. त्यानंतर काही काळाने ते येथे पुन्हा परतले. आपण जी मनोकामना केली होती, ती या गणेशाच्या आशीर्वादाने पूर्ण झाल्याचे त्यांनी येथील सेवेकऱ्यांना सांगितले व येथे मोठे मंदिर उभारण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार येथे मोठे मंदिर उभारण्यात आले. ‘गोवा गॅझेटियर’मधील नोंदीनुसार, त्यावेळी गोपाल गणेशाची धातूची मूर्ती घडवून २४ एप्रिल १९६६ रोजी तिची मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

मुख्य रस्त्यापासून उंच जागी वसलेल्या या मंदिराच्या प्रांगणात काही पायऱ्या चढून यावे लागते. पायऱ्यांच्या सुरूवातीलाच उंच प्रवेशद्वार आहे. त्याच्या दोन्ही स्तंभांलगत उभारलेल्या उभट छोट्या मंडपात द्वारसेविकांच्या प्रतिमा आहेत. प्रवेशद्वाराच्या छतावर गणेशाची मूर्ती विराजमान आहे. पायऱ्या चढून आल्यावर डावीकडे हिरवळीवर जुन्या मंदिराचा अवशेष शोभावा असा भलामोठा पाषाणी भिंतीचा भाग दिसतो. हा मंदिराच्या जगतीचा भाग असून त्यावर गजथर कोरलेला आहे. येथून काही अंतरावर उंच अधिष्ठानावर मंदिर वास्तू उभी आहे. मंदिरासमोरील ओट्यावर पत्र्याचा मंडप आहे. उजव्या बाजूला सहा स्तरांचा चौकोनाकार दीपस्तंभ आहे. मंदिर गोमंतकीय स्थापत्यशैलीत बांधलेले आहे. छोटेखानी सभामंडप, महामंडप आणि गर्भगृह अशी त्याची रचना आहे. सभामंडप व महामंडपावर उतरते कौलारू छप्पर आहे. गर्भगृहावर गोमंतकीय आणि नागर स्थापत्यशैलीच्या समन्वयातून निर्माण झालेले शिखर आहे. या शिखराचा खालचा भाग चौकोनाकार व त्यावर नागरशैलीतील चारी बाजूंनी वर निमुळते होत गेलेले उरुशृंग प्रकारचे शिखर आहे. त्यावर आमलक आणि कलश आहे. सभामंडपाच्या भिंतींत मोठ्या खिडक्या आहेत. दोन्ही बाजूंनी कक्षासने आहेत. मध्यभागी स्टीलचे रेलिंग लावलेल्या मोठ्या आयताकृती भागात संगमरवरी फरशांवर राधा आणि कृष्णाचे नृत्य करतानाचे मोठे चित्र रंगवलेले आहे. असे सांगण्यात येते की कृष्ण हा गोपालांचा सखा असल्याने त्याची प्रतिमा गोपाल गणेश मंदिरात औचित्यपूर्ण ठरते.

मंदिराच्या महामंडपास नक्षीदार प्रवेशद्वार आहे. त्याच्या ललाटबिंब स्थानी ओंकार कोरलेला आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस वैष्णव द्वारपालांच्या दोन सुबक कोरीव मूर्ती आहेत. त्यांवरील भागात गणेशाच्या कृष्णधवल प्रतिमा लावलेल्या आहेत. महामंडपातील स्तंभही नक्षाकामाने सुशोभित आहेत. या स्तंभांवर देव-देवता व यक्ष-यक्षिणींच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. छतावर पितळी घंटा, तसेच बिलोरी काचांचे झुंबर टांगलेले आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वारही नक्षीकामाने सजवलेले आहे. आत उंच अधिष्ठानावर चांदीची गोपाल गणेशाची मूर्ती विराजमान आहे. मूर्तीसमोर दोन्ही बाजूंनी उंच समया मांडलेल्या आहेत.

या मंदिरात सकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत भाविकांना श्रींचे दर्शन घेता येते. येथे विविध हिंदू सण-समारंभ उत्साहाने साजरे केले जातात. येथे माघ महिन्यातील गणेश जयंती, तसेच संकष्टी व विनायकी चतुर्थीच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते. या दिवशी येथे भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. दरवर्षी येथे भाद्रपदातील गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात व तितक्याच धार्मिक वातावरणात साजरा केला जातो. या उत्सवात, तसेच मे महिन्यातील विनायक चतुर्थीस होणाऱ्या मंदिर वर्धापन दिन उत्सवात बांदोडा आणि फर्मागुढीतील असंख्य भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. वर्धापन दिन सोहळ्यात येथे गणपती पूजन, स्थलशुद्धी, अर्थर्वशीर्ष आवृत्ती, शत-कलशाभिषेक, महाआरती आदी कार्यक्रम केले जातात. यानंतर सायंकाळी येथे गणेशाची मुषकवाहनातून भव्य मिरवणूक काढली जाते.

उपयुक्त माहिती:

  • फोंडा येथून ३ किमी आणि पणजी येथून २७ किमी अंतरावर
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • गोव्यातील अनेक शहरांतून येथे येण्यासाठी राज्य परिवहन बसची सुविधा
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home