आजची मुंबई पंधराव्या शतकाच्या अखेरच्या दशकापर्यंत अस्तित्वातही नव्हती. येथे मोठा कुलाबा, धाकटा कुलाबा, माझगाव, परळ, माटुंगा, माहीम अशी बेटे होती. यातील सातवे बेट म्हणजे वरळी. बेटावर लहानसा डोंगर आणि त्यावर वसलेले छोटे गाव असे वरळीचे स्वरूप होते. प्रत्येक गावास एक संरक्षक देव वा देवता असते. त्यानुसार वरळीची ग्रामदेवता आहे गोलफादेवी. या देवीचे वरळीतील स्थान किमान अकराव्या शतकापासून आहे आणि बाराव्या शतकात येथे देवीच्या मंदिराची स्थापना झाल्याचे सांगण्यात येते. गोलफादेवीचे हे स्थान जागृत आहे. येथे आजही कोळी व भंडारी बांधव कोणत्याही महत्त्वाच्या कामापूर्वी देवीचा कौल घेतात.
मुंबईच्या बेटांची एक सर्वांत जुनी ऐतिहासिक नोंद इ.स. १५० मधील आहे. ग्रीक गणिती व भूगोलशास्त्रवेत्ता क्लॉडियस टॉलेमी याने केलेल्या त्या नोंदीमध्ये या सात बेटांना ‘हेप्टॅनेसिया’ असे म्हटले आहे. यातील वरळी हे कुलाब्याखालोखालचे सर्वांत लहान बेट होते. जुन्या इंग्रजी ग्रंथांमध्ये वरळीस वर्ली, वडाली, वरेली, वेरूली असे संबोधलेले आहे.
अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, याचे मूळ नाव वरोळी असे होते. ‘द ओरिजिन ऑफ बॉम्बे’ (१९००) चे लेखक जे. गेर्सन दा कुन्हा सांगतात की वरळी या नावाच्या तीन व्युत्पत्ती आहेत. पहिली व्युत्पत्ती अशी की येथील वटवृक्षांच्या मोठ्या संख्येमुळे या गावाला वडांची आळी असे म्हटले जात असे. त्यावरून वडाळी हा शब्द तयार झाला व त्याचा अपभ्रंश होऊन वराली असे नाव पडले. काहींच्या म्हणण्यानुसार या गावास महालक्ष्मी देवीकडून वर प्राप्त झाला आणि त्यामुळे त्यास वरली म्हणू लागले. तिसरी व्युत्पत्ती अशी की ‘वरली’ म्हणजे ‘वरच्या भागातील’ या मराठी शब्दापासून हे नाव आले. मुंबई (कोटापासून पायधुणीपर्यंत) बेटाच्या उत्तरेकडे वरच्या बाजूला हे बेट असल्याने त्यास हे नाव पडले. ही व्युत्पत्ती अधिक सयुक्तिक असल्याचे दा कुन्हा यांचे मत आहे.
‘महिकावतीच्या बखरी’नुसार, गुजरातमधील अनहिलवाड पाटणच्या चालुक्यांचा मांडलिक असलेल्या चंपानेरचा राजा गोवर्धन बिंब याचा भाऊ प्रताप बिंब याने इ.स. ११४० मध्ये दमण ते चिंचणी-तारापूर, पालघर, केळवे-माहीम, वसईपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. यानंतर सन ११४२ मध्ये त्याने आपला प्रधान बाळकृष्णराव सोमवंशी यास वालुकेश्वरपर्यंतचा प्रदेश सर करण्यास पाठवले.
हा भाग जिंकल्यानंतर प्रताप बिंब याने येथे ‘देशवसाहत’ केली. येथील बरडबेटामध्ये त्याने आपली राजधानी वसवली व त्यास आपल्या पहिल्या राजधानीचे म्हणजे माहीम (केळवे) चे नाव दिले. तेच आजचे माहीम. यानंतर प्रताप बिंब याने आपल्या सोबत असलेल्या अनेक अधिकारी, सेनापती आदींना येथील काही गावे इनाम म्हणून दिली. त्यातील वरळी हे गाव त्याने सरचिटणीस सूर्यवंशी गंभीरराव यास दिले. महिकावतीच्या बखरीत याबद्दल – “या परांत सूर्यवंशी गंभिरराव सरचिटणीस गोत्र वसिष्ट। कुळदेवता कालिका। त्यासी इनाम वरोळी पद पुरो देवोन आपले शुमासि स्थापिला।” – असे म्हटले आहे. ‘मुंबईचें वर्णन’कार गोविंद नारायण माडगांवकर यांनी या पुस्तकात अन्य एका बखरीमधील उतारा दिला आहे. ‘एका सधन व पुरातन स्थायिक वृद्ध परभू गृहस्थाकडे वरळीचा पुरातन वृत्तांत लिहिलेली’ ही एक लहान बखर होती. त्यात “श्रीराजबिंब महाराज याणीं आपले पाटील यांस वरली गांव वंशपरंपरा इनाम दिलें होतें” असा उल्लेख आहे. यावरून वरळी हे गाव इ.स. ११४२ च्या पूर्वी अस्तित्वात होते हे स्पष्ट होते.
गोलफादेवी ही या वरळीची ग्रामदेवता आहे. देवीस हे नाव कसे प्राप्त झाले याविषयी अनभिज्ञता आहे. स्थानमाहात्म्य सांगणाऱ्या पारंपरिक लोककथांनुसार,
बाराव्या शतकात प्रताप बिंब राजाने गोलफादेवीच्या येथील मंदिराची स्थापना केली. गोलफादेवी ही येथे शाकंभरी या नावानेही पूजली जाते. प्रताप बिंब राजाची कुलदेवता असलेली प्रभावती ही शाकंभरी देवीचे रूप आहे. प्रताप बिंबाने माहीम येथे आपली राजधानी वसवल्यानंतर येथे आपल्या कुलदेवतेचे म्हणजेच प्रभादेवीचे मंदिर उभारले, असा अभ्यासकांचा तर्क आहे. प्रभादेवी परिसरात असलेल्या या प्रभादेवीची यात्रा पौष पौर्णिमेला भरते. या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असेही म्हटले जाते. याच प्रमाणे गोलफादेवीच्या मंदिरातही शाकंभरी पौर्णिमेला यात्रा भरते. प्रभादेवीच्या मंदिरात प्रताप बिंब राजाचा सरचिटणीस गंभीरराव सूर्यवंशी याची कुलदेवता कालिका, तर राजगुरू हेमाडपंडित याची कुलदेवता चंडिका यांच्या मूर्ती प्रभादेवीच्या बाजूला विराजमान आहेत. त्याच प्रमाणे गोलफादेवीच्या मंदिरात प्रताप बिंब राजाचे सरसबनीस शेषवंशी आनंदराव यांची कुलदेवता असलेल्या हरबादेवीची मूर्ती गोलफादेवीच्या बाजूला विराजमान आहे. मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक आणि ‘अज्ञात मुंबई’ या ग्रंथाचे लेखक नितीन साळुंखे यांच्या मते, यावरून राजा बिंबाने येथे गोलफादेवीची पुनर्स्थापना केली असावी किंवा बिंब राजाची ही कुलदेवता कोळीवाड्याने स्वीकारली असावी या शक्यतेस पुष्टी मिळते.
वरळीतील कोळी आणि भंडारी बांधवांप्रमाणेच गोलफादेवीच्या यात्रेमध्ये गुजरातमधील वाघरी या काठीयावाडी समाजातील भाविक मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. या समाजाने मुंबईत अनेक ठिकाणी गोलफादेवीची मंदिरे स्थापन केली आहेत. गुजरातमधील या समाजाचा राजा सोलंकी राजघराण्यातील होता. ‘महिकावतीची बखर’च्या प्रदीर्घ प्रस्तावनेत इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की सोलंकी (सोळंकी) म्हणजेच चौलुक्य आहेत आणि ते मूळचे मराठा कुळ आहे. या कुळासोबत इतर अनेक मराठी कुळे पाटण प्रांतात (अनहिलवाड पाटण) गेली आणि त्यात बिंब घराण्याचे एक मराठा कूळ होते. या बिंब आडनावाच्या क्षत्रियांचा संबंध पैठण येथे राज्य करणाऱ्या भौम आडनावाच्या क्षत्रियांशी होता. बिंब हे मूळचे महाराष्ट्रीय ऊर्फ मराठे होते. प्रभावती म्हणजेच शाकंभरी ही बिंबाप्रमाणेच सोलंकीचीही कुलदेवता होती. या सोलंकी राजांचे प्रजानन असलेल्या वाघरी समाजाने मुंबईत आल्यानंतर शाकंभरी म्हणून गोलफादेवीचे पूजन सुरू केले, असे सांगण्यात येते. आजही या समाजातर्फे यात्रेत गोलफादेवीला झेंडा अर्पण केला जातो.
वरळी कोळीवाड्यात जाणाऱ्या अरुंद रस्त्यावरून काही अंतर आत चालत गेल्यानंतर एका चढावर डावीकडे गोलफादेवीचे हे मंदिर वसलेले आहे. हे मंदिर उंच ओट्यावर स्थित आहे. पाच पायऱ्या चढून या ओट्यावर प्रवेश होतो. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना दगडात कोरलेल्या दोन प्राचीन सिंहमूर्ती आहेत. ओट्यावर दोन्ही बाजूला भाविकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपाचे छत समतल आहे. गर्भगृहावर उंच शिखर आहे. गर्भगृहाची बांधणी ताशीव पाषाणात केलेली आहे. आता पाषाणाच्या उंच वेदीवर मध्यभागी गोलफादेवीची प्राचीन मूर्ती प्रतिष्ठापित आहे. देवीच्या डावीकडे साकबादेवी आणि उजवीकडे हरबादेवीच्या मूर्ती आहेत. या मूर्ती मूळच्या काळ्या पाषाणातील आहेत. त्यांच्यावर शेंदूर लावलेला आहे. तिन्ही मूर्ती वस्त्रालंकार व पुष्पमालांनी शृंगारलेल्या आहेत. गोलफादेवीच्या मूर्तीस अर्धगोलाकार पाठशिळा आहे. अन्य दोन्ही देवींच्या मूर्तींची पाठशिळा वरच्या बाजूस त्रिकोणाकार आहे. यातील गोलफादेवी आणि साकबादेवीच्या पाठशिळेवर मूर्तीच्या चेहऱ्यांच्या बाजूला चंद्र आणि सूर्य प्रतिमा कोरलेली आहे.
गोलफादेवी मंदिरात सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविक देवीचे दर्शन घेऊ शकतात. ही देवी नवसाला पावणारी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. अनेक नाविक समुद्रात जाण्यापूर्वी देवीचा कौल घेतात. “मातोश्री तू, गावची धनीण आहेस. तुला छत्तीस नेत्र आहेत. तुला सारं काही दिसतं. तरीही आम्ही तुला आणलेला फुला-पानांचा-नारळांचा नैवेद्य तू मान्य करून घ्यावा… आणि बघ, आमची गोरख पालखी (बोट) घेऊन आम्ही उद्या समुद्रात जाणार आहोत, तरी तुझा हुकूम, आज्ञा आम्हाला पाहिजे… बोल, सत्याचा जबाब दे…” असा हा अर्ज म्हणजेच कौल असतो. देवी देईल तो कौल मान्य केला जातो.
पौष महिन्यातील पौर्णिमेला देवीची वार्षिक यात्रा असते. या यात्रेस सुमारे सव्वाशे वर्षांचा इतिहास आहे. अवघा वरळी कोळीवाडा या यात्रेत मोठ्या उत्साहाने सहभागी होतो. यात्रेच्या निमित्ताने या गावातून लग्न होऊन बाहेर गेलेल्या महिला (माहेरवाशिणी) आवर्जून देवीच्या दर्शनासाठी येतात. यात्रेच्या आदल्या दिवशी येथे अभिषेक व हरिपाठाचा कार्यक्रम होतो. नंतर देवीचा शृंगार केला जातो. यात्रेच्या दिवशी हजारो भाविक येथे नवस फेडण्यासाठी येतात. असंख्य लोक देवीची खणा-नारळाने ओटी भरतात. पहाटेपासून उत्तररात्रीपर्यंत यात्रेचा हा सोहळा चालतो.