श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे एक निसर्गसमृद्ध व टुमदार गाव. हे गाव प्रसिद्ध आहे ते येथील विस्तीर्ण, स्वच्छ व सुंदर समुद्रकिनाऱ्यामुळे! याच दिवेआगरची एक वेगळी ओळख निर्माण झाली ती येथील सुवर्ण गणेश मंदिरामुळे! नोव्हेंबर १९९७ मध्ये येथे सुमारे १३२० ग्रॅम वजनाचा गणेशाचा सोन्याचा मुखवटा आणि २८० ग्रॅम वजनाचे गणेशाचे दागिने जमिनीत खोदकाम करताना सापडले आणि दिवेआगर संपूर्ण राज्यात प्रसिद्धीच्या झोतात आले. दिवेआगरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात सुवर्णगणेश स्थानापन्न असला, तरी हे मंदिर सुवर्ण गणेश मंदिर म्हणूनच आता प्रसिद्ध आहे.
असे सांगितले जाते की सिद्धिविनायक मंदिराच्या शेजारी द्रौपदी पाटील यांची नारळाची बाग आहे. त्या बागेत सुपारीच्या रोपास आळे करत असताना त्या खड्ड्यात पहार आपटून खण्ण् असा आवाज आला. तेव्हा पाहिले असता तेथे एक जुनी तांब्याची पेटी सापडली. त्यात साधारणतः सव्वा किलो वजनाचा गणेशाचा सोन्याचा मुखवटा व कंठी तसेच इतर काही दागिने सापडले. ती तारीख होती १७ नोव्हेंबर १९९७. त्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. अशा पवित्र दिवशी गणेशाचा मुखवटा आणि दागिने सापडल्याचे पाहून सर्वच जण चकित झाले. यानंतर द्रौपदी पाटील यांनी हा मुखवटा व दागिने लोकांच्या दर्शनासाठी ठेवले. या मुखवट्याची यथोचित पूजा आपल्याकडून होणे अवघड असल्याचे व हा मुखवटा मूळचा सिद्धिविनायक मंदिरातील असल्याच्या भावनेतून द्रौपदी पाटील यांनी तो मंदिराच्या व्यवस्थापनाकडे सुपूर्द केला. आज या मूर्तीमुळे दिवेआगर संपूर्ण देशात ख्यातनाम झाले आहे.
याबाबत अशी माहिती सांगितली जाते की हा मुखवटा शुद्ध म्हणजेच बावन्नकशी सोन्याचा आहे. त्याची घडणावळ दाक्षिणात्य शैलीतील आहे. याचे एक कारण म्हणजे त्याच्या मुकुटावर कोरलेले दक्षिण भारतीय शैलीतील व्यालमुख. हा मुखवटा शिलाहारांच्या काळातील असावा, असा अभ्यासकांचा कयास आहे. या सुवर्णगणेशाच्या कानावर, तसेच खांद्यावर चाफ्याची फुले कोरलेली आहेत. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीच्या दोन्ही कानांवर आंबे कोरलेले आहेत. हे आंबे पायरी जातीचे आहेत. कोकणाची प्रसिद्धी हापूस आंब्यांसाठी असताना त्यावर पायरीचा आंबा कोरलेला आहे, यावरून ही मूर्ती येथे पोर्तुगीज येण्याआधीची आहे हे स्पष्ट होते, असे अभ्यासकांचे मत आहे. बहुधा येथील मुस्लिम आक्रमकांच्या भयाने मंदिरात असलेला हा सुवर्णाचा मुखवटा कोणी तरी येथील नारळाच्या वाडीत पुरून ठेवलेला असावा. तो अगदी वरच्यावर, म्हणजे जमिनीखाली दोन–अडीच फुटांवर सापडला, यावरून तो घाईगडबडीत पुरला असावा, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. त्यानंतर त्याच्या स्मृती नष्ट झाल्या व १९९७ मध्ये तो सापडला. मुखवटा व दागिने असलेली ही पेटी सापडल्यानंतर राज्य सरकारतर्फे एक अधिसूचना काढण्यात आली होती की हा ऐवज कोणाच्या मालकीचा असल्यास दोन महिन्यांच्या आत त्यावरील दावा सांगावा. मात्र कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे हा मुखवटा सरकारच्या मालकीचा झाला. मात्र ग्रामस्थांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना विनंती केली की हा मुखवटा सिद्धिविनायकाचा असून तो दिवेआगारात सापडलेला असल्याने तो येथेच ठेवण्याची परवानगी मिळावी. त्यानुसार तो मंदिरात सिद्धिविनायकाच्या मूर्तीशेजारी सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आला आहे.
मात्र त्याची पूजा करण्यात येत नाही.
दिवेआगरमध्ये प्रवेश करताच ‘सुवर्ण गणेशाच्या नगरीत स्वागत’ अशी उंच कमान नजरेस पडते. तेथून काही अंतर पुढे आल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला आवारभिंतीआड असलेले सुवर्ण गणेशाचे लाल रंगाचे आकर्षक मंदिर नजरेस पडते. संपूर्ण जांभ्या दगडातील या कौलारू मंदिराची वास्तू कोकणी स्थापत्यशैलीतील आहे. मंदिराच्या समोरील बाजूला पूजा साहित्याची व प्रसाद विक्रीची अनेक दुकाने आहेत. रस्त्याला लागून असलेल्या लाल चिऱ्याच्या दगडात बांधलेल्या आवारभिंतीत दोन छोटेखानी लोखंडी प्रवेशद्वारे आहेत. त्यातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रवेशद्वारातून काही पायऱ्या चढून मंदिराच्या उंच जगतीवर प्रवेश होतो. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दगडी चौथऱ्यावर उभारलेल्या जांभ्या दगडाच्या दोन दीपमाळा आहेत. नजीकच काळ्या पाषाणातील सुंदर तुळशी वृंदावन आहे.
छोटेखानी दर्शनमंडप, प्रशस्त सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची वास्तुरचना आहे. दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस सुवर्णगणेशाची प्रतिकृती आहे. प्रवेशद्वार लाकडी असून द्वारशाखांवर छान नक्षीकाम केलेले आहे. मंदिराचा सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे. येथील भिंतींवर बाजूने प्रकाश व हवा खेळती राहावी यासाठी अनेक गवाक्ष आहेत. सभामंडपाच्या पुढील बाजूस प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे. या गर्भगृहात एका उंच वज्रपीठावर शेंदुरचर्चित सिद्धिविनायकाची मूर्ती विराजमान आहे. या मूर्तींशेजारी अन्नपूर्णा माता आणि काही स्थानिक देवता आहेत. गर्भगृहाच्या डावीकडील बाजूला एका मोठ्या लॉकरसदृश्य पेटीमध्ये सुवर्ण गणेशाचा मुखवटा आहे.
ग्रामस्थांची या देवावर अतूट श्रद्धा आहे. हे देवस्थान शिलाहार राजघराण्याचे दैवत होते, असाही संदर्भ इतिहासात सापडतो. याच प्रमाणे पेशव्यांचेही ते श्रद्धास्थान होते. या ठिकाणी माधवराव पेशव्यांच्या पत्नी रमाबाई या दर्शनासाठी येऊन गेल्या होत्या, अशी नोंद आहे. येथील सुवर्ण मूर्तीमुळे दिवेआगरला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस आले. सुवर्ण गणेशाच्या आगमनानंतर दिवेआगरमध्ये पर्यटक व भाविकांचा ओघ कित्येक पटींनी वाढला आहे. या मंदिरात माघ शुद्ध चतुर्थीला गणेश जन्मोत्सव आणि कार्तिक वद्य चतुर्थीला सुवर्ण गणेशाचा प्रकटदिन साजरा केला जातो. या उत्सवासाठी रायगड जिल्ह्यासह कोकणातून हजारो भाविक उपस्थित असतात.
दररोज सकाळी ८ ते रात्री ८ या दरम्यान भाविकांना सुवर्ण गणेशाचे दर्शन घेता येते. द्रौपदी पाटील यांना गणेशाचा सुवर्ण मुखवटा असलेली तांब्याची पेटी ज्या वाडीत सापडली त्या स्थानावर आजही जाता येते. नारळी–पोफळीच्या मधोमध त्या जागेवर एक छोटे देऊळ बांधलेले आहे व भाविकांना तेथे दर्शन घेता येते. या नारळी–पोफळीच्या वाडीचे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे याच ठिकाणी पूर्वी एक ताम्रपट सापडला होता. तो मराठीतील पहिला ताम्रपट असल्याचे सांगण्यात येते.