मुंबईच्या पायधुणी परिसरातील श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिर हे शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक घडणीचा महत्त्वाचा भाग मानले जाते. श्वेतांबर जैन समुदायातील तेविसावे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांना समर्पित असलेले हे मंदिर इ.स. १८१२ मध्ये स्थापन झाले. दोन शतकांहून अधिक काळ धार्मिक वारसा लाभलेले हे स्थान श्वेतांबर जैन पंथात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हे मंदिर गोडीजी पार्श्वनाथांच्या नावावर असलेल्या अनेक मंदिरांपैकी सर्वात प्रमुख आहे. जैन धर्मपरंपरांबरोबरच मुंबईच्या भौगोलिक इतिहासाशीही या मंदिरवास्तूचा वारसा जोडलेला आहे.
पायधुणी या परिसराच्या नावाचा इतिहास मुंबईच्या भौगोलिक रचनेशी आणि समुद्रकिनाऱ्याच्या स्थितीशी थेट जोडलेला आहे. पायधुणी हा शब्द मूळ मराठी शब्द ‘पाय’ आणि ‘धुणे’ यांच्यापासून तयार झालेला आहे. याचा शब्दशः अर्थ पाय धुण्याची जागा असा होतो. ऐतिहासिक काळामध्ये मुंबई हे शहर सात बेटांचे मिळून बनलेले होते आणि या बेटांच्या मध्ये अनेक खाड्या व पाण्याचे प्रवाह होते. भरतीच्या वेळी वरळी आणि मुंबई बेटांना वेगळे करणाऱ्या ‘ग्रेट ब्रीच’ मधून आणि माझगाव व मुंबई बेटांमधील उमरखाडी या भागातून पाणी आत येत असे. या खाडीच्या मुखाशी पाणी कमी असताना लोक आपले पाय धुवून शहरात प्रवेश करत असत आणि याच कारणास्तव या ठिकाणाला पायधुणी असे नाव पडले आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार, पायधुणी हे क्षेत्र मुंबईतील समुद्रामधून कायमस्वरूपी जमिनीमध्ये रूपांतरित करण्यात आलेल्या सुरुवातीच्या भागांपैकी एक आहे. मुंबईच्या सात बेटांचे एकत्रीकरण १८व्या शतकाच्या अखेरीस झाले. या प्रक्रियेत पायधुणीचे भौगोलिक महत्त्व सातत्याने वाढत गेले. या परिसरात जैन समुदायाने आपले धार्मिक व सांस्कृतिक अस्तित्व १८व्या शतकापासून जपले आहे.
श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिरास अनेक शतकांचा ऐतिहासिक वारसा आहे. या मंदिराचे ‘गोडीजी’ हे नाव मूलतः सिंध प्रांतातील गोडीपूर येथील प्राचीन तीर्थक्षेत्रावरून आले आहे. हे गोडीपूर सध्या पाकिस्तानात आहे. गोडीपूर येथील मंदिर मध्ययुगीन काळात एक अत्यंत प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र होते. सध्या तेथे केवळ मंदिराचे अवशेष शिल्लक आहेत, परंतु तेथील कलाकुसर आजही प्रेक्षणीय आहे. जैन साहित्यातील उल्लेखानुसार, संवत १२२८ मध्ये आचार्य हेमचंद्र यांनी गुजरात मधील पाटण येथे एका पार्श्वनाथ प्रतिमेची प्रतिष्ठापना केली होती. ही प्रतिमा सेठ गोडीदास यांनी तयार करून घेतली होती. कालांतराने परकीय आक्रमणांच्या भीतीमुळे ही प्रतिमा सुरक्षिततेसाठी जमिनीत गाडून ठेवण्यात आली होती. संवत १४३२ म्हणजेच इसवी सन १३७५-७६ मध्ये मेघशा नावाच्या जैन व्यापाऱ्याने ही प्रतिमा शोधून काढली आणि ती सिंध प्रांतातील गोडीपूर येथे आणली. तेथे त्यांनी एका भव्य मंदिराची उभारणी केली आणि संवत १४४४ मध्ये या मंदिराचे कार्य पूर्ण झाले. या मंदिराला मूळ गोडीजी पार्श्वनाथ तीर्थ असे नाव पडले. १८व्या शतकामध्ये हे तीर्थक्षेत्र खूप प्रसिद्ध होते आणि १७१६ मध्ये येथील स्थानिकांनी ही प्रतिमा सुरक्षेसाठी एका किल्ल्यात हलवली होती. ब्रिटिशांच्या काळातील मॅजिस्ट्रेट कॅप्टन स्टॅन्ले नेपियर रायक्स यांनी १८५४ मध्ये या मंदिराला भेट दिली होती, अशी नोंद आहे.
मुंबईतील मंदिराचा इतिहास १८व्या शतकाच्या सुरुवातीस सुरू होतो. खंभात येथील सेठ अमिचंद मुंबईमध्ये स्थायिक झाले आणि त्यांनी मुंबईच्या फोर्ट म्हणजेच किल्ला भागात आपल्या निवासस्थानी एक गृह जिनालय बांधले. या ठिकाणी त्यांनी राजस्थानमधील मीरपूर येथील सिरोही जिल्ह्यातून आणलेली गोडीजी पार्श्वनाथांची प्रतिमा स्थापित केली. संवत १८५९ म्हणजेच इसवी सन १८०३ मध्ये मुंबईच्या फोर्ट भागात मोठी आग लागली. ही आग सुमारे ७२ तास सुरू होती. या वणव्यात अनेक घरे आणि मालमत्ता जळून खाक झाली. यामुळे जैन समुदायाने फोर्ट भाग सोडून पायधुणी परिसरात स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. या आगीचा उल्लेख मुंबईच्या इतिहासात ‘द ग्रेट फायर ऑफ बॉम्बे’ असा केला जातो, ज्यामुळे संपूर्ण फोर्ट परिसराची पुनर्रचना करण्यात आली होती. सेठ अमिचंद यांचे पुत्र नेमचंद आणि मोतीचंद शाह यांनी पायधुणी येथे अविचळदास गोविंदजी भन्साळी यांच्याकडून जागा खरेदी केली आणि येथे १८१२ मध्ये नवीन मंदिर उभारले. सुरुवातीला हे मंदिर लाकूड आणि विटांनी बांधलेले होते.
१८६८ मध्ये या प्रतिमेची प्रतिष्ठापना नव्या प्रशस्त मंदिरात करण्यात आली. १९८९ मध्ये या जुन्या लाकडी वास्तूच्या जागी तीन मजली भव्य संगमरवरी मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले. २०१२ मध्ये या मंदिराच्या स्थापनेला २०० वर्षे पूर्ण झाली.
श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिराचे स्थापत्य हे भारतीय मंदिर वास्तुकलेच्या नागर शैलीतील एक उत्कृष्ट उदाहरण आहे. या मंदिराच्या रचनेवर पश्चिम भारतातील सोळंकी किंवा मारु-गुर्जर स्थापत्यशैलीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. सध्याची तीन मजली वास्तू संपूर्णपणे पांढऱ्या मकराना संगमरवरात घडवलेली आहे. मंदिराची रचना ही ‘बावन जिनालय’ या संकल्पनेवर आधारित आहे आणि या प्रकारच्या रचनेत मुख्य मंदिराच्या भोवती लहान लहान ५२ मंदिरे असतात. पायधुणी येथील मंदिरात १६ उप-मंदिरे असून त्यामध्ये विविध तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत. बावन जिनालय ही संकल्पना प्रामुख्याने राजस्थान आणि गुजरात मधील जैन मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. मंदिराच्या तळाच्या भागावर (अधिष्ठानावर) वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम आहे. यामध्ये हत्ती, सिंह, गायी आणि पारंपारिक जैन प्रतिकांची शिल्पे कोरलेली आहेत. अधिष्ठानाच्या वर असलेल्या भिंतींवर म्हणजेच जंघा भागावर अत्यंत नाजूक कोरीव काम केलेले दिसते.
यामध्ये देवी महालक्ष्मी, हत्ती आणि पारंपारिक दीपमाळांचे अंकन केलेले आहे.
प्रशस्त सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. भाविकांकडून या मंडपात सामूहिक प्रार्थना व भजन केले जातात. सभामंडपाच्या घुमटाकार छतावर सुंदर नक्षीकाम आहे. सभामंडपाच्या पुढील भागात कोरीव स्तंभांनी आणि कमानींनी सजलेले गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. ही रचना सोळंकी स्थापत्याचे वैशिष्ट्य मानली जाते. गर्भगृहात मुलनायक भगवान पार्श्वनाथांची प्रतिमा विराजमान आहे. मुख्य प्रतिमेचे स्वरूप अत्यंत शांत असून ही प्रतिमा पांढऱ्या संगमरवरामध्ये घडवलेली आहे. भगवान पार्श्वनाथांच्या प्रतिमेचे सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे त्यांच्या डोक्यावर असलेला सात फणांचा सर्पमुकुट होय. हे फण धरणेंद्र आणि पद्मावती या यक्ष-यक्षिणींनी भगवान पार्श्वनाथांच्या रक्षणासाठी पसरवले होते, अशी मान्यता आहे. पार्श्वनाथांच्या छातीवर श्रीवत्स हे चिन्ह कोरलेले आहे. मूर्ती पद्मासनात असून तीर्थंकरांचे नेत्र अर्धे मिटलेले आहेत. भगवान पार्श्वनाथांच्या प्रतिमेची उंची सुमारे दीड फूट आहे. ही प्रतिमा राजस्थानमधील मीरपूर येथून मुंबईत आणली गेली होती. ही प्रतिमा अत्यंत प्राचीन मानली जाते आणि जैन मान्यतेनुसार या प्रतिमेमध्ये अनेक चमत्कारिक शक्ती असल्याचा भाविकांचा विश्वास आहे.
मुख्य प्रतिमेव्यतिरिक्त या मंदिरामध्ये इतर अनेक महत्त्वाच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या वरील मजल्यावर चिंतामणी पार्श्वनाथ आणि शर्मिला पार्श्वनाथ यांच्या प्रतिमा आहेत. मंदिरात एकूण १५५ मूर्ती आहेत. त्यामध्ये ८६ संगमरवरी, २ स्फटिक मूर्ती आणि ७६ लहान चांदीच्या मूर्तींचा समावेश आहे. अलीकडच्या काळात येथे ३१ इंच उंचीची सुवर्ण पार्श्वनाथ प्रतिमेची स्थापना करण्यात आलेली आहे. ही प्रतिमा पंचधातूंची बनलेली असून त्यावर ५ किलो सोन्याचा मुलामा आहे. पार्श्वनाथांच्या प्रतिमेच्या दोन्ही बाजूस धरणेंद्र यक्ष आणि पद्मावती देवीच्या प्रतिमा आहेत. धरणेंद्र हे सर्पराज आहेत आणि पद्मावती त्यांची पत्नी आहे. या देवता पार्श्वनाथांच्या शासनाचे रक्षण करतात. तसेच मंदिरात भगवान शांतीनाथ आणि भगवान विमलनाथ यांच्याही प्रतिमा स्थापित आहेत. प्रत्येक तीर्थंकराचे स्वतःचे एक लांछन असते आणि भगवान पार्श्वनाथांचे लांछन सर्प आहे, जे मूर्तीच्या खालील भागात कोरलेले असते.
मंदिराच्या वरील मजल्यावर एक सभामंडप आहे. या सभामंडपाच्या सभोवती संगमरवरी जाळ्या बसवलेल्या आहेत. या जाळ्यांमधून नैसर्गिक प्रकाश आणि हवा आत येते. मंदिरातील स्तंभांची संख्या लक्षणीय असून यामध्ये एकूण २२६ स्तंभ आहेत आणि प्रत्येक स्तंभावर वैशिष्ट्यपूर्ण असे कोरीव काम आहे. या मंदिराला एकूण नऊ शिखरे आहेत. ही शिखरे त्रिकोणी आकाराची आहेत व त्यांच्या टोकावर सोन्याचे कळस बसवलेले आहेत. शिखरांची रचना पायरी-पायरीने उंच जाणारी आहे. या मंदिरातील संगमरवरी कोरीव काम माऊंट अबू येथील विमल वसाही मंदिराप्रमाणे आहे.
श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिरामध्ये वर्षभर अनेक उत्सव साजरे केले जातात. पर्युषण पर्व हा जैन धर्मातील सर्वात पवित्र उत्सव दरवर्षी येथे आठ दिवस साजरा केला जातो. या काळात भाविक उपवास आणि ध्यान करतात.
पौष दशमी हा भगवान पार्श्वनाथांचा जन्मकल्याणक दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मंदिरात विशेष पूजा आणि अभिषेक केला जातो. तसेच महावीर जयंती, दिवाळी आणि मौनी एकादशी हे सण देखील मोठ्या उत्साहात साजरे होतात. ऐतिहासिक संदर्भांनुसार, गोडीजी पार्श्वनाथांच्या नावाने मोठ्या प्रमाणावर दानधर्म केला जातो. १८व्या शतकातील नोंदीनुसार, येथे आठ लाख लोकांसाठी सामूहिक भोजनाचे आयोजन करण्यात आले होते आणि यासाठी १.३४ लाखांहून अधिक कुटुंबांना निमंत्रण देण्यात आले होते. २०१२ मध्ये मंदिराला २०० वर्षे पूर्ण झाली तेव्हा मुंबईतील सुमारे दीड लाख जैन कुटुंबांना मिठाई वाटण्यात आली होती.
या ऐतिहासिक प्रसंगी संपूर्ण मुंबईतील ८५० पेक्षा अधिक जिनालयांमध्ये आणि ३५० पेक्षा अधिक उपाश्रयांमध्ये एकाच वेळी ध्वजारोहण करण्यात आले होते. सुमारे सात किलोमीटर लांबीची भव्य रथयात्रा हे या सोळह्याचे प्रमुख वैशिष्ट्य होते.
भारतीय टपाल विभागाने या ऐतिहासिक महोत्सवाच्या स्मरणार्थ १७ एप्रिल २०१२ रोजी एक विशेष टपाल तिकीट देखील प्रसिद्ध केले होते. हे मंदिर दररोज सकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत दर्शनासाठी उघडे असते.