देवी चामुंडेश्वरी मंदिर

वरगाव-पिळगाव, ता. डिचोली, जि. उत्तर गोवा

देवी चामुंडेश्वरी हे आदिशक्ती पार्वतीचे एक रूप असल्याचे मानले जाते. शक्तीस्वरूप असलेली ही देवी गोव्यातील कदंब राजवंशाची कुलदेवता होती. गोव्यातील अनेक मंदिरांतील देवतांप्रमाणेच या देवीचेही पिळगावनजीकच्या वरगाव येथे सुमारे ५०० वर्षांपूर्वी स्थलांतर झाले. या देवीचे येथील स्थान जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा असल्याने अनेक लोक कार्यारंभी येथे येऊन देवीचे दर्शन घेतात. येथे देवीस कौल प्रसाद लावण्याचीही प्रथा आहे. येथे पौषातील कृष्ण प्रतिपदेस देवीचा मोठा जत्रोत्सव भरतो.

नवदुर्गांपैकी चामुंडा देवी म्हणजेच चामुंडेश्वरी देवी होय. देवीच्या उत्पत्तीची कहाणी ‘मार्कंडेय पुराणा’तील ‘देवी माहात्म्या’च्या सातव्या अध्यायात कथन केलेली आहे. ती अशी की शुंभ-निशुंभ या दैत्यांनी इंद्राकडून त्रैलोक्याचे राज्य जिंकले. तेव्हा त्यांच्या वधाकरीता पार्वतीमातेच्या शरीरकोषातून अंबिका देवी निर्माण झाली. चंड आणि मुंड हे शुंभ-निशुंभाचे सेवक होते. त्यांनी अंबिकेस पाहिले व तिच्या रुपसौंदर्याचे वर्णन शुंभाकडे केले. शुंभाने अंबिकेस आपली पत्नी हो, असा निरोप पाठवला. अंबिकेने त्यास धुडकावून लावल्यावर तिला पकडून आणण्यासाठी शुंभ-निशुंभाने चंड-मुंडांना पाठवले. त्यावेळी अंबिकेच्या शरीरातून प्रकटलेल्या कालीने चंड-मुंडांचा वध केला. यामुळे देवी अंबिकेने कालीदेवीस चामुंडा असे नाव दिले. उत्तर भारतात ती चामुंडा याच नावाने, तर दक्षिण भारतात चौंढेश्वरी, चौडेश्वरी वा चामुंडेश्वरी या नावाने पूजली जाते.

चामुंडेश्वरी ही गोमंतकात इ.स. १००० ते १२३७ या कालखंडात राज्य करणाऱ्या कदंब घराण्याची कुलदेवता होती. गोवा बेटावरील गोपकपट्टण (वेल्हा गोवा म्हणजेच थोरले गोवा) ही कदंबांची राजधानी होती. येथील एका डोंगरावर देवीचे भव्य मंदिर वसले होते. इ.स. १२३७ मध्ये येथे त्रिभुवनमल्ल हा कदंब राजा राज्य करीत होता. देवगिरी येथील यादवनृपती सिंघण याच्या पदरी बिच्चण व खोलेश्वर हे दोन सेनापती होते. यांतील बिच्चणाकडे दक्षिणेकडील राज्यविस्तार वाढवण्याची जबाबदारी होती. त्याने गोवेकर कदंबांवर आक्रमण केले. राजा त्रिभुवनमल्ल यास ठार मारले. त्याचे राज्य यादव साम्राज्यास जोडून कदंबांना आपले मांडलिक बनवले. पुढे इ.स. १३१२मध्ये अल्लाउद्दिन खिलजीचा सेनापती मलिक कफूर याने देवगिरीच्या यादवांवर स्वारी केली. त्याने रामदेवरायाचा पुत्र शंकरदेवराय यास ठार मारून मुलुख लुटला व देवगिरी येथे ठाणे दिले. मलिक कफूर हा मूळचा मथुरेतील हिंदू होता. गुजरातेतील खंबायतमधील एका व्यापाऱ्याचा तो गुलाम होता. हजार दिनार देऊन त्याला खरेदी करण्यात आल्याने त्यास हजार दिनारी असे नाव पडले होते. पुढे तो अल्लाउद्दिनचा सेनापती झाला. गोवा गॅझेटियरमध्ये असे म्हटले आहे की मलिक कफूरने १३१२ मध्ये केलेल्या आक्रमणादरम्यान गोपकपट्टण म्हणजेच वेल्हा गोवा ही कदंबांची राजधानी उद्‌ध्वस्त केली असावी. यामुळे कदंबांनी आपली राजधानी चंद्रपूर येथे हलवली. याच धामधुमीत वेल्हा गोवा येथील चामुंडेश्वरीच्या मंदिरास हानी पोचली असावी.

काही अभ्यासकांच्या मते, चामुंडेश्वरी देवीच्या मूळ मंदिरास मुस्लिम फौजेने नव्हे, तर पोर्तुगीज सैन्य व धर्मगुरुंनी हानी पोचवली. १५१०च्या नोव्हेंबरमध्ये पोर्तुगीजांचा हिंदुस्थानातील तत्कालिन व्हिसेरेई ऑफाँस द अल्बुकर्क याने गोवा बेट जिंकले. येथील हिंदूंनी पोर्तुगीज सत्ताधाऱ्यांचे स्वागत केले. आपण हिंदुंना धार्मिक स्वातंत्र्य देऊ असे अल्बुकर्क याने जाहीर केले होते. पण लवकरच त्याने तिसवाडीतील सप्तकोटेश्वराचे मंदिर पाडून, तेथे चर्च बांधून धर्मांधतेचा नमुना दाखवला. या नंतरच्या काळात तिसवाडी, बार्देश, सासष्टी प्रांतात पोर्तुगीजांचे अत्याचार वाढतच गेले. या कालखंडात, इ.स. १५३०च्या सुमारास पोर्तुगीजांनी तिसवाडीतील थोरल्या गोव्यातील चामुंडेश्वरीचे मंदिर उद्‌ध्वस्त केले. मात्र तत्पूर्वी चामुंडेश्वरीच्या भक्त महाजनांनी मंदिरातील देवीची मूर्ती सुखरूप वरगाव येथे आणली. ती नेमकी कधी, कशी आणि कोणत्या मार्गाने आणली गेली याबाबतची ठोस माहिती अनुपलब्ध आहे.

चामुंडेश्वरी मंदिराच्या ऐतिहासिकतेविषयीचे एक प्रमाण येथे सापडलेल्या एका शिलालेखातून प्राप्त झाले आहे. चामुंडेश्वरी मंदिरातील तलावात सापडलेल्या कालभैरवाच्या मूर्तीच्या मागच्या भागात हा कोकणी भाषेतील तीन ओळींचा लेख कोरलेला आहे. त्यांत ‘गोंये सिंहासमी’, ‘गोंए’ व ‘गोंयांत चंडिका’ असे शब्द आहेत. गोव्यातील इतिहास संशोधक डॉ. रोहित फळगावकर यांच्या मते, ही कालभैरवाची मूर्ती १५७९मधील आहे. येथे ती १५८३मध्ये स्थापित करण्यात आली असावी. मंदिरात नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना झाली, त्यावेळी या मूर्तीचे तलावात विसर्जन करण्यात आले. या शिलालेखातील गोंयात चंडिका या शब्दांवरून व ही मूर्ती चामुंडेश्वरी मंदिराच्या तलावात आढळली यावरून, येथील मंदिर १५७९ मध्ये अस्तित्वात होते हे स्पष्ट होते. सध्या येथे अस्तित्वात असलेले मंदिर इ.स. १६२५मध्ये बांधण्यात आल्याचे सांगण्यात येते. मंदिराच्या गर्भगृहावरील शिखराचा १९६९मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. याच प्रमाणे येथे २१ डिसेंबर २००८ रोजी, सर्वधारी नाम संवत्सर, मार्गशीर्ष कृष्ण दशमीच्या मुहुर्तावर चामुंडेश्वरी देवीची पुनःप्रतिष्ठा करण्यात आली.

भव्य सभामंडप, अर्धमंडप, महामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपासमोर सहा स्तरीय दीपस्तंभ आहे. सभामंडप उंच, प्रशस्त आणि खुल्या प्रकारचा आहे. त्यावर दोन्ही बाजूंनी उतरते कौलारू छप्पर आहे. आत अनेक गोलाकार स्तंभ आहेत. बाजूला कक्षासने आहेत. मध्यभागी होमकुंड आहे. येथून चार पायऱ्या चढून मंदिराच्या अर्धमंडपात प्रवेश होतो.

अर्धमंडपास कमानीकृती प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस मोठा देव्हारा बसवलेला आहे. त्याच्या वरच्या भागात कृष्णप्रतिमा आहे. प्रवेशद्वाराच्या कमानीवर, येथील स्तंभांवर, तसेच महामंडपाच्या प्रवेशद्वारावर कावी कला प्रकारातील नक्षी कोरलेली आहे. महामंडपात बाह्यभिंतीपासून आत डावीकडून व उजवीकडून काही अंतर सोडून रुंद गोलाकार स्तंभरांग आहे. रुंद कमानीने हे स्तंभ एकमेकांस जोडलेले आहेत. छतावरील तुळईला मोठी पितळी घंटा टांगलेली आहे. गर्भगृहाच्या दर्शनीभिंतीस संगमरवरी फरशा बसवलेल्या आहेत. येथील प्रवेशद्वार गोमंतकातील अन्य मंदिरांतील प्रवेशद्वाराप्रमाणेच वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यावर बारीक नक्षीकाम केलेले रौप्यावरण चढवण्यात आले आहे. द्वारचौकटीच्या खालच्या भागात द्वारपालांच्या मूर्ती, तर ललाटबिंबस्थानी कीर्तिमुख कोरलेले आहे. गर्भगृहात मोठ्या लाकडी मखरामध्ये वज्रपीठावर चामुंडेश्वरीची काळ्या पाषाणातील मूर्ती विराजमान आहे. या मूर्तीस पितळी मुखवटा घातलेला आहे व ती भरजरी वस्त्रालंकारांनी आणि पुष्पमालांनी शृंगारलेली आहे. गर्भगृहावर गोमंतकीय मंदिर स्थापत्यशैलीचे वैशिष्ट्य असलेले, खाली अष्टकोनाकार आणि त्यावर घुमटाकार असे शिखर आहे.

या मंदिरात वर्षभरातील विविध धार्मिक उत्सव उत्साहाने साजरे करण्यात येतात. शारदीय नवरात्रोत्सव हा त्यातील एक सर्वांत मोठा उत्सव असतो. या काळात मंदिरात होणारा मखरोत्सव पाहण्यासाठी येथे शेकडो भाविकांची गर्दी होते. पौष कृष्ण पक्ष प्रतिपदेस येथे मोठी जत्रा भरते. या दिवशी रात्री देवीला भाविकांनी अर्पण केलेल्या वस्तूंची पावणी म्हणजे लिलाव होतो. रात्री ११ वाजता चामुंडेश्‍वरीची पालखी निघते. येथील मंदिरालगत असलेल्या मोठ्या तलावामध्ये पालखीचा नौकाविहार होतो. या यात्रेत प्रतिवर्षी दशावतारी नाटकाचा प्रयोग होतो. केवळ गोव्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील देवीचे महाजन व भक्त या यात्रेत मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात.

उपयुक्त माहिती:

  • डिचोलीपासून ६ किमी आणि पणजीपासून २४ किमी अंतरावर
  • डिचोली येथून परिवहन सेवेच्या बस उपलब्ध
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : तुषार टोपले, अध्यक्ष, मो. ९८२२१५२१२०
  • उमेश गोवेकर, सचिव, मो. ९८२२१२६५३२
Back To Home