परमेश्वर मंदिर

शिराढोण, ता. कंधार, जि. नांदेड

भारतीय संस्कृती आणि पुराणांमध्ये ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिदेवांचे स्थान अनन्यसाधारण आहे. यातील ‘ब्रह्मा’ हा विश्वाचा निर्माता आणि सृष्टीचा जनक मानला जातो. तरीही, इ.स. ५०० नंतर ब्रह्मदेवाची उपासना कमी होत गेल्याने त्यांची स्वतंत्र मंदिरे देशात अत्यंत दुर्मिळ आहेत. मात्र, याला अपवाद ठरवणारे आणि प्राचीन वारशाची साक्ष देणारे एक अद्वितीय मूर्ती असलेले मंदिर महाराष्ट्रातील कंधार तालुक्यातील शिराढोण येथे आहे. स्थानिक लोक याला परमेश्वर मंदिर म्हणून ओळखतात. नवव्या शतकात, राष्ट्रकूट काळात घडवलेली येथील काळ्या पाषाणातील ब्रह्मदेवाची मूर्ती भारतीय शिल्पकलेचा आणि मूर्तीशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे.

नांदेड गॅझेटियरनुसार, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ब्रह्मदेवाच्या मूर्ती आढळतात, परंतु त्या बहुधा मंदिराच्या बाह्य भिंतीवर किंवा उपमूर्ती म्हणून असतात. महत्त्वाचे म्हणजे, शिराढोण येथील ही परमेश्वर मंदिरातील ब्रह्मदेवाची मूर्ती मुख्य देवतेची मूर्ती म्हणून स्थापन केली गेली आहे. राष्ट्रकूट काळात कंधारचा विकास झाला, तेव्हा सुरक्षिततेच्या कारणास्तव ही मूर्ती मुख्य शहरातून या टेकडीवर हलवली असावी, असा अंदाज आहे. कारण या मूर्तीशिवाय परिसरात इतर कोणतेही प्राचीन अवशेष आढळत नाहीत. पिंगळी (ता. परभणी) येथे सापडलेल्या अशाच एका खंडित मूर्तीवरून हे सिद्ध होते की नवव्या आणि दहाव्या शतकात महाराष्ट्रात ब्रह्मदेवाच्या स्वतंत्र पूजेची पद्धत अस्तित्वात होती.

शिराढोण गावात एका टेकडीवर हे मंदिर वसलेले आहे. गावातील दाटीवाटीच्या भागात असलेल्या या मंदिराला दगडी प्राकार आहे. दहा ते बारा पायऱ्या चढून मंदिराच्या कमानीतून प्रांगणात प्रवेश होतो. दोन्ही बाजूला स्तंभ व ते महिरपी कमानीने एकमेकांशी जोडलेले, असे या प्रवेश कमानीचे स्वरूप आहे. कमानीच्या एका स्तंभावर गरूड व दुसऱ्या स्तंभावर हनुमान यांची चित्रे आहेत. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपासमोर एका मोठ्या उंच चौथऱ्यावर दोन दीपस्तंभ व त्यांमध्ये अखंड पाषाणातील नंदी व शिवपिंडी आहे. येथील दीपस्तंभ व गर्भगृहाच्या मधील जागेत नंतरच्या काळात सभामंडप बांधल्याचे जाणवते. सिमेंटचा वापर करून बांधलेल्या या सभामंडपात गोलाकार स्तंभ आहेत. त्यापुढे काही इंच उंच असलेल्या जमिनीवर अंतराळ व त्यापुढे गर्भगृह आहे. हे गर्भगृह येथील मूळ मंदिर असल्याचे सांगितले जाते.

गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दीपकोष्ठके आहेत. गर्भगृहाचे संपूर्ण बांधकाम हे हेमाडपंती शैलीचे आहे. गर्भगृहात एका उंच वज्रपिठावर ब्रह्मदेवाची मूर्ती विराजमान आहे. काळ्या बेसाल्ट पाषाणात घडविलेली ही मूर्ती १०५ सेंमी उंच व ६० सेंमी रुंद आहे. ही मूर्ती नवव्या शतकातील व राष्ट्रकूट काळातील असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. ब्रह्मदेवाची मूर्ती कमलासनावर उभी आहे. या मूर्तीला चार मुखे आहेत, त्यातील तीन मुखे समोरून स्पष्ट दिसतात, तर चौथे मुख मागील बाजूस आहे. ही मुखे अत्यंत प्रमाणबद्ध आणि गोलाई असलेली आहेत. मूर्ती समभंग अवस्थेत उभी आहे आणि ती चतुर्हस्त आहे. तिच्या हातात अनुक्रमे अक्षमाला, स्तूप, मौजी बंध आणि कमंडलू आहेत. मूर्तीच्या गळ्यात मौक्तिक माळा, जानवे आणि कानात मकरकुंडले आहेत. मूर्तीचे शरीरशास्त्र, रचना आणि अंगावर विविध अलंकार अत्यंत नाजूकपणे कोरलेले आहेत. मूर्तीचे वाहन हंस देखील येथे स्पष्टपणे दिसून येतो. मूर्तीच्या दोन्ही बाजूला स्त्री-पुरुषांची दोन-दोन जोडपी उभी आहेत, तसेच चवरीधारी आहेत. मूर्तीच्या डाव्या बाजूला नमस्कार मुद्रेतील एक सेवक आहे.

या मूर्तीसोबतच तिची प्रभावळदेखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. या प्रभावळीवर दोन शिल्पपट कोरले आहेत. एका पटावर गंधर्व युगुलांची नक्षी आहे आणि हाती पुष्पमाला घेतलेले विद्याधरही दाखविले आहेत. दुसऱ्या शिल्पपटावर अष्टदिक्पालांचे अंकन केलेले आहे. विशेष म्हणजे हे सर्व दिक्पाल आपल्या वाहन व आयुधांसह सहपत्नीक आहेत. इंद्र आपल्या पत्नीसह म्हणजे शचीसह आहे. त्याच्या हाती गज, अंकुश आणि कमंडलू आहे आणि तो आपल्या वाहनावर म्हणजे हत्तीवर आरूढ आहे. या प्रकारे यम महिषावर तर अग्नि, नैऋती, वरूण, वायू, सोम, कुबेर, ईशान आपापल्या वाहनांवर आरूढ आहेत, यांसारखे बारकावे या मूर्तीत पाहता येतात. मंदिराचे शिखर विटा आणि चुन्याचे असून ते तीन टप्प्यांत वर निमुळते होत जाते, ज्यावर विविध देवतांची आणि प्राण्यांची शिल्पे कोरलेली आहेत.

मंदिरात साजरा होणारा मुख्य उत्सव अर्थातच ब्रह्म जयंतीचा असतो. वैशाख शुक्ल तृतीयेला हा उत्सव सुरू होतो. त्यात अभिषेक, त्रिमूर्ती पूजा, हवन, अन्नदान केले जाते. त्यावेळी अनेक भाविक उपस्थित असतात. याव्यतिरिक्त महाशिवरात्र, श्रावण कृष्ण अष्टमीला जन्माष्टमी येथे साजरी केली जाते.

उपयुक्त माहिती:

  • कंधार येथून २३ किमी अंतरावर
  • नांदेड येथून २७ किमी अंतरावर
  • नांदेड व कंधार येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात न्याहरीची सुविधा आहे निवासाची नाही

देव मंदिर शिराधोन,

ताल. कंधार, जिला. नांदेड़

Back To Home